‘त्रिलोकी’चा किफायतशीर थंडावा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Mar-2018   
Total Views |
 

 

उन्हाळ्याने अंगाची लाही लाही होत असताना एसीचा थंडावा दिलासा देऊन जातो. पण, एसी हा सर्वसामान्यांना परवडेलच असे नाही. पण, त्रिलोक नावाच्या अवलियाने कमी वीजपुरवठ्यात पर्यावरणपूरक एसी तयार केला आहे.
 
अन्न, वस्त्र, आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा. पण, आजकाल या मूलभूत गरजांची यादी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अर्थात, याला अनेक कारणे आहेत. पण, यातील बर्‍याच गरजांचा उपभोग घेण्यासाठी पैसा मोजण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. परंतु, पैशाच्या अभावामुळे आवश्यक वस्तूंचा, गरजांचा उपभोग काहींना घेता येत नाही. तरीदेखील परिस्थिती कोणतीही असो, प्रत्येक समस्येवर तोडगा काढण्यासाठी काही व्यक्ती झटत असतात. असाच एक प्रयत्न केला आहे राजस्थान येथील सरदार शहरामध्ये राहणार्‍या त्रिलोक कटारिया याने.
 
त्रिलोकने महत्त्वाचे म्हणजे कमी विजेचा वापर करून चालणारे वातानुकूलित यंत्र (एअरकंडिशनर) बनविण्याचे आव्हान यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवले आहे. ‘नॅशनल स्कूल ऑफ ओपन लर्निंग’मधून बारावीमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर त्रिलोक कटारियाने राजस्थानमध्ये आयटीआयमधून एसीशी संबंधित अर्धवेळ पदविका अभ्यासक्रमपूर्ण केला. त्यानंतर त्याने देहरादून, फरीदाबाद, दिल्ली आणि नोएडामध्ये एसीची निर्मिती करणार्‍या कंपनीत काम केले. मग त्याने एसी बनविण्याच्या पद्धती, त्याच्याशी संबंधित लहान-सहान गोष्टी शिकल्या. कामकरण्यासोबतच त्यांनी अशा एसीची निर्मिती करणे सुरू केले. खरंतर आज दैनंदिन जीवनामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर हा वाढत चालला आहे. अर्थात इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर वाढल्यामुळे येणार्‍या विजेच्या बिलांच्या आकड्यांमध्ये वाढ झाली आहे. परिणामी, या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी केली तरी वाढत्या बिलामुळे त्या वस्तूंचा समाधानकारक उपभोग घेता येत नाही. वातानुकूलित यंत्रणेच्याबाबतीत असंच होत असतं. एसी लावल्यानंतर बिल जास्त येत असल्याची तक्रार अनेक ग्राहक करत असतात. शिवाय एसीची किंमत सर्वांच्याच खिशाला परवडणारी नसते. ही बाब लक्षात घेऊन त्रिलोकने विजेची बचत करणारा एसी बनवून दाखवला आहे. त्याने तीन वर्षांपर्यंत एसी बनविण्यासाठी मन लावून संशोधन केले. त्रिलोकने सलग तीन वर्ष हा एसी बनविण्यासाठी मेहनत घेतली आणि त्याचं फळ त्याला मिळालं. त्यांच्या जिद्दीला नंतर यश मिळाले.
 
एक टन वजनाच्या, विजेची बचत करणार्‍या त्रिलोकला या एसीची निर्मिती करण्यासाठी दहा हजारांचा खर्च आला आहे. त्रिलोकला लहानपणापासूनच इलेक्ट्रॉनिक वस्तू, त्यांची दुरुस्ती करण्याची आवड होती. त्यामुळे तो शालेय वयापासूनच इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये रमायचा. एसीमध्ये कोणताही बिघाड झाला तरी त्रिलोकने एसीला हात लावल्यानंतर तो बिघाड तात्काळ दुरुस्त होतो. हे काम करत असताना त्रिलोकच्या एक गोष्ट नेहमीच लक्षात यायची ती म्हणजे, ज्या घरात एसी दुरुस्त करण्यासाठी ते जायचे, तेथे सर्व लोक एकच गोष्ट बोलायचे की, एसी लावल्यानंतर विजेचे बिल खूप येते. त्यामुळे त्रिलोकने एसी दुरुस्तीचे काम सुरूच ठेवण्याबरोबरच कमी किमतीमध्ये एसी कसा बनवता येईल, यासाठी प्रयत्न करण्याचा निश्चय केला. हे सगळं करत असताना विजेची बचत कशी करता येईल, यावरही त्याने विशेष भर दिला. त्रिलोक सांगतो की, ‘‘मी बनवलेला एसी हा एक इकोफ्रेंडली एसी आहे. बाजारात उपलब्ध एसीमध्ये सामान्यत: ’आर २२’ वायूचा उपयोग केला जातो. या अशा एसीमुळे ओझोन आवरणाला नुकसान होते, पण त्याचबरोबर या एसीमध्ये हायड्रोकार्बन वायूचा वापर केला जात असल्यामुळे या वायूमुळे पर्यावरणाला हानी पोहोचत असते. खरंतर एक जागरूक ग्राहक या नात्याने आपल्या गरजा जरी पूर्ण होत असल्या तरी त्यातून जर पर्यावरणाचे नुकसान होत असेल तर आपण जरा सावध राहायला हवे. हा हेतू डोळ्यासमोर ठेवून अशा एसीची निर्मिती करण्याचा मी निर्णय घेतला.’’
 
त्रिलोकने बनवलेल्या एसीमुळे इतर एसीच्या तुलनेत आठ ते दहा टक्के विजेची बचत होते. तसेच कमी वॉल्टमध्येदेखील चालू होतो. एक टन एसी दोन हजार वॅट विजेचा वापर करतो. हा एसी २०० वॅट विजेचा वापर करतो. तेव्हा, अशा या स्वस्त आणि मस्त एसी बनवणार्‍या त्रिलोकला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...
 
 
 
 
- सोनाली रासकर 
 
@@AUTHORINFO_V1@@