या सुंदर चेहऱ्यांच्या गूढ मृत्युचे रहस्य कधी उलगडेल का?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Mar-2018   
Total Views |
 
 
 
गेल्या काही दिवसांमध्ये सर्व माध्यमांमध्ये श्रीदेवी आणि तिच्या मृत्युविषयी चर्चा होती. ती गेली.. अनेकांना जबरदस्त धक्का देवून, अनेकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित करुन आणि तिच्या आधी अशाच गूढ पद्धतीने मृत्युमुखी पडलेल्या अनेक तारकांच्या मृत्युची आठवण करुन देवून ती गेली.. मात्र तिच्या जाण्यामागचं रहस्य तसंच राहीलं... ते कोडं कधीतरी उलगडणार का? हा प्रश्न मात्र अद्याप तसाच्या तसाच आहे..
 
श्रीदेवीचा मृत्यु अत्यंत दुर्दैवी होता. वय केवळ ५४ वर्ष. सगळ्यांच्या लाडक्या 'चांदनी'चं हे काय जाण्याचं वय होतं का? आणि ते पण अशा पद्धतीनं एके दिवशी सकाळ या बातमीने व्हावी.. किती वाईट. मात्र ती गेली ही बातमी खरी होती. आधी कळलं की हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने तिचा मृत्यु झाला. आणि काही काळानंतर शवविच्छेदनाच्या अहवालानं एक नवीनच बाब सांगितली. 'बाथटब मध्ये बुडून श्रीदेवी यांचा मृत्यु." त्यानंतर माध्यमांनी अक्षरश: ओंगळवाण रूप घेतलं आणि श्रीदेवीच्या पार जीवनाचं विच्छेदन केलं. मात्र सामान्य माणसाच्या मनातील प्रश्न "बाथटबमध्ये बुडून तिचा मृत्यु होतो आणि तिच्याच खोलीत असलेल्या तिच्या पतीला कळत देखील नाही?" बाथटबमध्ये बुडून तिचा मृत्यु कसा शक्य आहे? हा मात्र तसाच राहीला.
 
कालच चित्रपट समीक्षक कोमल नहाटा यांचा ब्लॉग वाचला. त्या रात्री काय घडलं होतं हे बोनी कपूर यांनी त्यांना सांगितलं आणि त्यांनी त्यावर त्या रात्रीच्या काही मिनिटांचा अहवाल जगासमोर मांडला. मात्र खरंच त्या रात्री काय घडलं असेल हे कुणाला माहिती.
 
बोनी कपूर यांचं असं वागणं सामान्य माणसाला खटकणारं आहे. कारण श्रीदेवीच्या मृत्यूची बातमी आलेल्या दिवसापासून बोनी कपूर दुबईत नव्हते असं म्हणलं जात होत, असं स्वतः त्यांनी व अमर सिंग यांनी सांगितलं होतं मग नहाटा यांच्या ब्लॉग मध्ये बोनी त्या रात्री श्रीदेवीबरोबर होते असं जगासमोर मांडणं विरोधाभास निर्माण करणारं आहे. आणि मुळात जर हे खरं असेल तर दुबई पोलिसांनी बोनी कपूर यांना अवघ्या २४ तासात क्लीन चिट कशी दिली किंवा ती केस तिथल्या तिथे कशी मिटवण्यात आली हे प्रश्न अनुत्तरीतच राहतात.
 
सिनेसृष्टी आणि यामध्ये जगणाऱ्या लोकांची 'लाईफस्टाइल' सामान्य माणसापेक्षा खूप भिन्न असते. श्रीदेवी अत्यंत गुणवान, सुंदर कलाकार होती. त्यामुळे तिच्या वैयक्तिक जीवन शैलीबद्दल न बोलता तिच्या कलेचा आदर झालाच पाहीजे. मात्र तिच्या मृत्युने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत हे नाकारता येणार नाही.
 
१९९३ मध्ये अशीच एक उत्स्फूर्त अभिनेत्री आपल्या घराच्या खिडकीच्या कठड्यावरुन पडून मृत्युमुखी पडली. असे म्हणतात तिच्या आणि श्रीदेवी यांच्या दिसण्यात साम्य होतं. ती अभिनेत्री म्हणजे "दिव्या भारती". अवघ्या १९ वर्षाच्या आयुष्यात तिने दाक्षिणात्य सिनेसृष्टी आणि बॉलिवुडमध्ये मोठं नाव कमावलं होतं. वयाच्या १८ व्या वर्षी दिग्दर्शक साजिद नाडियादवाला याच्या सोबत तिचं लग्न झालं. आणि अचानक ५ एप्रिल १९९३ रोजी खिडकीच्या कठड्यावरुन पडून तिचा मृत्यु झाला. मात्र त्या क्षणी नेमकं काय घडलं, हा खरंच अपघात होता का? असे कितीतरी प्रश्न आजही तिच्या चाहत्यांच्या मनात आहेत.
 
 
 
 
परवीन बाबी सोबतही असंच झालं. ७०-८० ची दशकं गाजवणारी, 'अमर अकबर अँथनी, दीवार सारख्या चित्रपटांमधून सुंदर अभिनयाचं दर्शन घडवणारी अभिनेत्री म्हणजे परवीन बाबी. तीन दिवस एकाकी घरात एक अतिशय प्रतिभावान अभिनेत्री मृतावस्थेत आढळते, मात्र त्या तीन दिवसात कुणालाही काहीही कळत नाही. असं कसं झालं? डॉक्टरांनी 'मल्टिपल ऑर्गन फेल्युअर' असं जरी सांगितलं असलं तरी असं कसं झालं हा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे.
 
अभिनेत्री जिया खानचंही असंच. नि:शब्द, गजनी, हाउसफुल मधून या अभिनेत्रीच्या अभिनयाची प्रशंसा सगळ्यांनीच केली होती. आता कुठे तिच्या कारकीर्दीला सुरुवात झाली होती, आणि अचानक तिच्या आत्महत्येची बातमी समोर आली. सूरज पांचोली यासोबत असलेल्या प्रेम संबंधातून तिने कंटाळून आत्महत्या केली. तसं तिचं पत्र देखील समोर आलं. मात्र नेमकं काय घडल. तिच्या आईने उपस्थित केलेल्या प्रश्नांप्रमाणे ही खरंच आत्महत्या होती का? का आणखी काही घडलं?
 
भारतीय मॉडेल आणि एमटीव्ही व्हीडीयो जॉकी नफीसा जोसेफचे देखील या यादीत नाव आहे. २००४ मध्ये राहत्या घरी तिने फाशी घेतली. यामागे गौतम खंडूजा यांच्यासोबत तिचं ठरलेलं लग्न मोडल्याचं कारण देण्यात आलं होतं. मात्र या बाबत पुढे काहीच झालं नाही. आणि असं का झालं हे अजूनही कळलेलं नाही.
 
 


 
 
कुलजीत रंधावा, सिल्क स्मिता, प्रिया राजवंश किंवा प्रत्यूषा बैनर्जी. यापैकी काहींनी आत्महत्या केल्याचं समोर आलं मात्र त्या आत्महत्येचं ठोस कारण अजून कुणाला माहीत नाही. प्रिया प्रमाणे काहींचे मृतदेह राहत्या घरी किंवा आणखी कुठे आढळले मात्र हा मृत्यु कसा झाला हे माहीत नाही. राजनेते शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्युचं रहस्य देखील अद्याप तसंच्या तसंच आहे.
 
या सर्व सिने तारकांच्या, प्रसिद्ध व्यक्तींच्या आयुष्यात त्या एका क्षणी नेमकं काय घडलं, इतकी मोठी व्यक्ती संशसयास्पदरित्या मृतावस्थेत आढळते मात्र याचं कारण काय? ही कोडी कधीही सुटणार नाहीत का? तसेच इतके मोठे गुन्हे होतात, प्रसिद्ध व्यक्तिंसोबत होतात मात्र त्याचं पुढे काहीच होत नाही. हे कुणाला वाचवण्यासाठी होतं का यामागे आणखी काही कारण आहे, याचं उत्तर सामान्य माणसाला कसं मिळणार?
 
ती आणि तिच्या सारख्या अनेक गेल्या मात्र रहस्य?... ते कधीतरी उलगडेल का? असे मृत्यु का झाले कसे झाले हे सामान्य माणसाला कळेल का?
 
- निहारिका पोळ  
@@AUTHORINFO_V1@@