श्रीलंकेमध्ये १० दिवसांची आणीबाणी लागू
 महा एमटीबी  06-Mar-2018
 
 
 
 
 
 
मुस्लीम आणि बौद्ध धर्मियांचा वाद वाढला
 
 
कँडी : मुस्लीम आणि बौद्ध धर्मियांचा वाद वाढू नये म्हणून श्रीलंकेमध्ये १० दिवसांची आणीबाणी लागू करण्यात आली आहे. मुस्लीम आणि बौद्ध धर्मियांच्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही आणीबाणी आजपासून लागू करण्यात आली आहे. देशात शांततेचे वातावरण राहावे तसेच हिंसक हालचालींना खतपाणी मिळू नये यासाठी ही आणीबाणी लागू करण्यात आली आहे.
 
 
दोन धर्मीयांमधील वाद भडकू नये तसेच या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येण्यासाठी श्रीलंका सरकारने हा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेतील कँडी या भागात मुस्लीम आणि बौद्ध धर्मियांमध्ये वाद उसळला आणि या वादाला थांबवण्यासाठी आता श्रीलंका सरकारने १० दिवसांची आणीबाणी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षभरापासून दोन्ही समुदायांमध्ये संघर्ष सुरु होते.
 
 
मात्र आता हा संघर्ष जास्त वाढू लागल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मुस्लीम धर्मातील नागरिक बौद्ध धर्मियांना जबरदस्तीने मुस्लीम धर्म स्वीकारण्यास भाग पाडतात असे बौद्ध धर्मियांचे म्हणणे आहे. तसेच मुस्लीम धर्मियांनी बौद्ध धर्मियांची धार्मिक स्थळे उध्वस्त केली असल्याचे म्हणणे देखील बौद्ध धर्मियांचे आहे. म्हणून सध्या हा वाद बऱ्याच प्रमाणात चिघळलेला दिसत आहे.
 
 
श्रीलंकेतील कँडी या भागात मुस्लीम आणि बौद्ध धर्मियांमध्ये जो वाद उसळला यावेळी काही बौद्ध धर्मियांना पोलिसांकडून पोलीस कोठडीत टाकण्यात आले होते आता या बौद्ध नागरिकांच्या सुटकेसाठी काही बौद्ध नागरिक पोलीस स्थानकापुढे जमा होवून विरोध प्रदर्शन करीत आहेत. त्यामुळे श्रीलंकेतील वातावरण सध्या चिघळलेले दिसून येत आहे.