‘राष्ट्रगंगेच्या तीरावर....’
 महा एमटीबी  06-Mar-2018


सुमारे १० वर्षांपूर्वी मी आणि माझे काही दोस्त कोलकात्याला फिरायला गेलो होतो. प्रवासात एका बंगाली माणसासोबत गमंतशीर डिबेट झाला. आम्ही “लोकमान्य” म्हणालो की तो “नेताजी” म्हणायचा, आम्ही “सचिन” म्हणालो की तो “सौरव” म्हणायचा, कुसुमाग्रज, पु ल, रवींद्रनाथ, बंकिंचद्र, ताडोबा, सुंदरबन अशा विविध विषयांच्या अनुषंगाने ‘महाराष्ट्र की प.बंगाल’ या विषयावर खूप वेळ गप्पा झाल्या. अखेर ‘या दोन्ही प्रांतांचं देशाच्या घडणीत मोठं योगदान आहे’ यावर आमचं एकमत झालं. आझाद हिंद एक्स्प्रेसने हावड्याला उतरल्यावर सकाळी सकाळी सुप्रसिद्ध ‘हावडा ब्रिज’ बघताना भारी वाटलं! मेट्रोचा प्रवास कोलकत्यात करताना त्यावेळीच आम्ही पुण्यात पण ‘लवकरच’ मेट्रो येणार असं भाकीतही वर्तवल होतं!आमच्या कोलकात्यातल्या मुक्कामात एक दिवस बेलूर मठात गेलो होतो. तिथे श्री रामकृष्ण परमहंस यांचे नितांत सुंदर मंदिर आहे. त्या मंदिरात श्री रामकृष्णांच्या मूर्तीसमोर साधारण माझ्याच वयाचा (२२-२३ वर्षं) शुभ्र वस्त्र नेसलेला, मुंडण केलेला तरूण कितीतरी वेळ हात जोडून बसला होता. काहीवेळाने डोळ्यातून वाहणाऱ्या अपार श्रद्धेसह त्याने मूर्तीसमोर साष्टांग प्रणिपात केला. मला या मुलाची जाम कमाल वाटली. त्याच्या मनात काय चाललं असेल? तो कसली प्रार्थना करत असेल? त्याने काय मागितलं असेल? मुळात हा कोण आहे? कुठून आलाय? असे खूप प्रश्न मनात उमटत होते. त्याची प्रार्थना झाल्यावर मी त्याला गाठले. परिचय करून घेतला. नुकतच बी.टेक.चं शिक्षण पूर्ण करून तो आला होता. त्याने ‘नावात काय आहे’ असा मलाच सवाल केला आणि परिचय सत्र फार न लांबवता ‘विवेकानंद वाचलेत का?’ असं मला विचारलं. त्यावेळी विवेकानंदांच्या ५-६ गोष्टी मी ऐकून होतो. त्यामुळं मी जरा बिचकत ‘हो थोडे वाचलेत’ असं सांगितलं. नंतर आमच्या छान गप्पा झाल्या. त्यात ‘या पुण्यभूमीत. भारतभूमीत जन्म घेऊन आपण फार भाग्यवान असल्याचं तो पुन्हा पुन्हा सांगत होता! करिअर कसं निवडायच? कशाला जास्त स्कोप आहे? काय केल्यास मला चांगलं ‘पॅकेज’ मिळेल? अशा ‘स्ट्रगलिंग’ पिरीयडमध्ये आम्ही मित्र होतो. हा पठ्या मात्र ‘आनंद’ व्हायच्या मार्गावर होता! मिळालेलं आयुष्य या भूमीसाठी काम करण्यात घालवलं पाहिजे असं त्याला विवेकानंद वाचताना समजलं होतं. सगळं आयुष्यच या मातीसाठी अर्पण केलेला माझ्या वयाचा मुलगा भेटल्याने माझी अस्वस्थता वाढली! कोलकात्यात नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या घरी गेलो, विवेकानंदांच्या घरी गेलो, काली मातेच्या मंदिरात जाऊन आलो. कोलकाता ते पुणे प्रवासात ठरवलं ही पुण्यभू आहे तरी कशी याचं दर्शन घेतलंच पाहिजे.

त्यानंतरच्या काही वर्षात स्वामी विवेकानंद वाचले. तरीही अजूनही थोडे राहिलेत असं वाटतं. समर्थ रामदास, संत नामदेव, शिखांच्या गुरूंचे कार्य आणि शिकवण वाचली. वाचता वाचता स्वामीजींचे एक वाक्य माझ्या मनात घर करून बसले होते, ‘ज्या देशासाठी काम करायचं तो देश वयाच्या विशीत बघून झाला पाहिजे.’ माझा मूळचा स्वभाव फिरस्तीचा असल्याने मला हे वाक्य भावले यात काही नवल नव्हतेच! खूप फिरलो... सुदैवाने ज्ञान प्रबोधिनीत काम करण्याची संधी मिळाली. ज्ञान प्रबोधिनी गुरुकुलात ‘देश दर्शनाची’ एक छान पद्धत आहे. शालेय वयातली मुलं ‘मातृभूमी परिचय’ शिबिराला जातात. इथले युवक युवतीही वेगवेगळ्या अभ्यास सहलींना जातात. शिबिरे किंवा अभ्यास सहलींच्या निमित्ताने मी फिरलो आणि अनेकांना ‘असं’ फिरण्याची गोडी चाखवली! तुम्हालाही सर्वाना आमच्या सोबत किंवा आमच्यासारखं फिरायला नक्की आवडेल यात शंकाच नाही!
आसामचे कामाख्या देवीचे मंदिर, रामेश्वरम, सुचीन्द्र्मचे मंदिर, उज्जैन, ओंकारेश्वर, कुंभकोणम्, त्रिवेन्द्रमचे पद्मनाभ मंदिर, मीनाक्षी मन्दिर, तामिळनाडूमधील अतिभव्य बृह्देश्वर मंदिर, ओडिशामधील सूर्य मंदिर, आपल्या रत्नागिरीजवळचं कनकादित्य मंदीर, काश्मीर मधले हनुमानाचे मंदिर प्रत्येक मंदिराचे वैशिष्ट्य वेगळे नि त्या त्या मंदिराचे इतिहासातले स्थान वेगळे.... किती लिहावे? निसर्गाने तर मुक्त हस्ताने दिलंय या देशाला... काश्मीरमधला हिमालय आणि ईशान्येतला हिमालय, सह्याद्रीच्या कडा, सातपुड्याची आणि अरवलीची पर्वतरांग, चिल्का सरोवर, केरळमधले ‘कायल’, गुजराथेत आखात, मन भरून येईल अशा नर्मदा, कृष्णा, गोदावरी, कावेरी! पंचनद्यांच्या प्रांतात म्हणजे पंजाबात झेलम, रावी यांनी बहाल केलेली समृद्धी, या देशाची परंपरा समृध्द करणारी, इथल्या हजारो वर्षांच्या संस्कृतीची आणि भगीरथाची साक्ष सांगणारी गंगा! तिकडे ईशान्येत तिस्ता आणि ब्रह्मपुत्रा ! या ब्रह्मपुत्रेने मला कित्येकदा भुरळ घातली, कितीही वेळा पाहून आलो तरी पुन्हा येण्याचीच ओढ! भीमाशंकर, दांडेली, काझीरंगा, ताडोबा, गडचिरोली-छत्तीसगडचं दंडकारण्य, थेकडीचं जंगल! राजस्थानातले वाळवंट आणि भव्य राजवाडे, मुन्नारचे चहाचे मळे, कोकणातली आमराई वनं, पंजाबमधली दूरवर पसरलेली गहू, मका, सरसोची शेती! मेघालयातनं तर मी स्वतः ला अक्षरशः कसबसं परत घेऊन आलो कारण तिथले धबधबे, पाऊस आणि डोंगर दऱ्यांतून जाणाऱ्या पायवाटा यातून पायच निघत नव्हता. उपसागर, महासागर, समुद्र अशी अथांगतेची सगळी रूपं देशाच्या तीनही बाजूनी आहेत.

कन्याकुमारीला शीला स्मारकावर तिथला रखवालदार हाकलत नाही तोवर बसून राहिलो होतो. आग्र्याच्या किल्ल्याबाहेरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आग्र्याहून सुटकेची, पराक्रम आणि स्वकीयांसाठी निरपेक्षपणे सत्ता निर्माण करणाऱ्या अनेक वीरांची आठवण करून देतो. शनिवार वाडा, सिंहगड इथपासून ते दिल्लीचा लाल किल्ला, गुरु तेगबहाद्दूरांच्या बलिदानाची अस्वस्थ आठवण देणारा चांदणी चौकातला सिशगंज गुरुद्वारा, जालियनवाला बाग, माहेश्वरचा अहिल्याबाईंचा वाडा, इंग्रजांच्या नजरकैदेतून निसटून थेट जर्मनी गाठणाऱ्या महानायकाचं घर, भूदान चळवळीतून अहिंसेचा प्रेमपंथ दाखवणाऱ्या आचार्य विनोबाजींचे कोकणातले घर आणि वर्ध्याजवळचा पवनारचा आश्रम, सामान्यातल्या सामान्य माणसाला सहज कृतीतून देशभक्तीच व्रत देणाऱ्या महात्मा गांधींचं सेवाग्राम, ‘ऑपरेशन ब्लू स्टारची साक्ष असलेलं आणि आपल्या सर्वांच्या श्रद्धेच अमृतसरचं सुवर्णमंदिर..... इतिहासातल्या कितीतरी खुणा!

भिलाई दुर्गचा पोलाद निर्मितीचा भव्य कारखाना, इस्रोचं थुंबा मधलं अवकाश संशोधन केंद्र, श्रीहरीकोटाचं उड्डाण केंद्र, आसाममधले चहाचे कारखाने, गुजराथमधलं आणंद, टाटानगर मधले कारखाने, कोकण रेल्वे – पानवलचा पूल, भाक्रा नांगल धरण, सुवर्णचतुष्कोन महामार्ग, अणुभट्ट्या, औष्णिक उर्जा प्रकल्प, कोयना प्रकल्प.... ही तर आधुनिक भारताची प्रतीकं! मंगळुरूजवळच आजही संस्कृत माध्यमातून शिक्षण देणारं मैत्रेयी गुरुकुल, पुद्दुचेरीचं अरबिंदो स्कूल, रवींद्रनाथांचं शांतीनिकेतन – श्री निकेतन, कर्नाटकातलं वेद विज्ञान गुरुकुलम, गोव्यातल्या आणि उत्तर भारतातल्या कितीतरी वेदपाठशाला.... शिक्षणातले किती प्रयोग आणि किती वाटा ! कथक, कुचीपुडी, भरतनाट्यम, बिहू नृत्य, जाखडी नृत्य, पोयरले नृत्य, गाण्यातली किती घराणी, वाद्यांचे प्रकार, रविंद्र संगीत, रामलीलापासून आसाममधल्या सत्र परंपरेतल्या कृष्णलीला.....नीर डोसा आणि पोंगल पासून ते मिष्टी, रसगुल्ले, लस्सी आणि कहावा (काश्मिरी चहा)..... हे सारं अनुभवणं ‘मस्ट’ आहे. शब्दांच्या मर्यादेत या ‘अतुल्य भारताचे’ कसे वर्णन करावे?

मला भेटलेल्या माणसांबद्दल किती सांगू? विकासाची फळ की काय म्हणतात त्याची कल्पनाही न सुचलेल्या अनेक आदिवासी, वनवासी जमाती... किमान आरोग्याच्या सुविधाही उपलब्ध नसलेली, चुकीच्या समजुती, रूढी, दारिद्र्य अशा सगळ्याने गांजलेली माणसं.... या गांजलेल्यांना ‘आपलं’ मानून त्यांच्यासाठी आयुष्याच्या आयुष्य देणारी याच मातीत जन्म घेतलेली देवमाणसं... अतिथीला देव मानून स्वागत आणि आदरातिथ्य करणारी दुर्गम भागातली माणसं, भरभरून प्रेम देणारी माणसं... त्यांच्या भाषा, सण, विवाहापासून ते अंत्यसंस्कारापर्यंतच्या विविध पद्धती....

वरवर पाहता या सगळ्यात खूप विविधता... भजन, भाषा, भूगोल, भोजन सगळंच वेगळ! एकमेकांशी काहीच नातं नाही, भाषा समजत नाही आणि तरीही त्या सगळ्यांशी ‘आपली जुनी ओळख’ असल्याचा अनुभव येतो. ट्रेनमध्ये गप्पा मारता मारता जमून गेलेलं मैत्र अनेकदा अनुभवता आलं. मातृभूमी परिचय शिबिराला एखाद्या गावात जावं आणि आज आमच्याकडे जेवायला या असं गावातल्या २०/२५ जणांनी एकदम निमंत्रण द्यावं असं काही अनुभवलं की सगळ्या विविधतेतही काही समान धागे मला सापडत गेले. ते धागे होते सर्वांवर प्रेम करायला शिकवणारे, सर्वांच्या कल्याणाचं पसायदान मागणारे. सर्वे सन्तु निरामय: अशी प्रार्थना करणारे. मग या माणसांवरचा विश्वास अधिक वाढला आणि ते सारे माझे बांधव आहेत याची खात्री पटली.

मातृभूमी परिचय शिबिरांमुळे देशाचा परिचय आणि देशाशी माझे नेमके नाते काय हे उलगडत जाते. आपले हे नाते अधिक पक्के होत जाण्याचा अनुभव माझ्यासारख्या अनेकांनी घेतलाय. शालेय वयात न कळत झालेला देशाचा असा परिचय, थोड मोठ झाल्यावर महाविद्यालयीन आयुष्यात अधिक डोळसपणे अनुभवता येतो. स्थानिक माणसांशी दोस्ती करायची, तिथल्या समाज जीवनाचा प्रत्यक्ष त्यांच्यात राहून अनुभव घ्यायचा हे या शिबिरांचं वैशिष्ट्य! म्हणूनच ही शिबिरं जाणीव वाढवणारी आणि अनुभवाने समृद्ध करणारी ठरतात. म्हणूनच माझ्यासोबत अनेकजण ‘देशदर्शन’ घ्यायला येत असतात. यापैकीच काही देवदर्शन च्या कहाण्या तुम्हा सगळ्यांसोबत share करतोय. मला आजवर घडलेल्या देशदर्शनाची कहाणी लिहिण्याचा हा छोटासा प्रयत्न! चला तर मग पुढच्या लेखात पाहुयात छत्तीसगडमधल्या अनोख्या प्रवासाची कहाणी  .......
 
 
- आदित्य शिंदे