केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या सत्राला आजपासून सुरुवात
 महा एमटीबी  05-Mar-2018


नवी दिल्ली : संसदेच्या अर्थ संकल्पीय अधिवेशानच्या दुसऱ्या सत्राला आजपासून प्रारंभ होत आहे. गेल्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये देशात झालेल्या पीएनबी घोटाळ्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षाला घेरण्यासाठी सर्व विरोध सज्ज झाले असून यंदाचे हे दुसरे सत्र अत्यंत गाजण्याची शक्यता अनेकांकडून व्यक्त केली जात आहे.

आज सकाळी ११ वाजता संसदेच्या कामकाजाला नेहमी प्रमाणे सुरुवात होणार आहे. गेल्या महिन्याच्या १ तारखेला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सभागृहात सादर केलेल्या अर्थसंकल्पात नव्याने करण्यात आलेले बद्दल आणि नवीन बाबींच्या समावेशासंबंधी ते सभागृहात माहिती देतील व विरोधी पक्षाकडून विचारण्यात येणाऱ्या सर्व प्रश्नांची देखील ते उत्तरे देतील. याच बरोबर गेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये रखडलेले काही प्रस्ताव देखील सभागृहासमोर येण्याची शक्यता आहे.

दरम्यान या संपूर्ण पार्श्वभूमीवर सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी देखील आपली कंबर कसली आहे. मोदी सरकारचा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत आला असून त्यादृष्टीने यंदाचा अर्थसंकल्प हा सर्वांसाठीच अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे विरोधक सरकारला कोंडी पकडण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत. गेल्या महिन्यात उघड झालेल्या नीरव मोदी यांच्या बँक घोटाळ्यावरून तसेच विजय माल्याच्या प्रकरणांवरून विरोध सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार असल्याचे दिसत आहे.