कुषाण साम्राज्य
 महा एमटीबी  04-Mar-2018
 
 
कुषाण सम्राट कनिष्कने साम्राज्यविस्तार करतानाच कुशल राज्यकारभाराची घडी बसवली. अफगाणिस्तान, बॅक्ट्रिया, काशगर, खोतान, यारकंद हे भारताबाहेरील प्रदेश तसेच भारतातील कौशांबी, पेशावर, बनारस, रावळपिंडी, मथुरा, सारनाथ, वायव्येकडील काश्मीर, सिंध, पंजाब एवढे भूप्रदेश केवळ कुषाण साम्राज्याच्या वर्चस्वाखाली त्याने आणले होते. त्याच्या या महाकाय साम्राज्याची राजधानी ’पुरुषपूर’ (आताचे पेशावर) हे शहर. आपल्या हयातभर लष्करी मोहिमांमध्ये गुंतलेल्या कनिष्काचा अधिकारीवर्ग मात्र त्याच्या या सततच्या मोहिमांमुळे एवढा त्रासलेला होता की, त्यांनी त्याची हत्या करण्याचा कट रचला. कनिष्क आजारी असताना त्याच्याजवळ असणार्‍या लष्करी अधिकार्‍यांनीच त्याला ठार मारले.
 
आर्यानंतर सर्वाधिक महत्त्वाचे कुशल नेतृत्व लाभलेले, वास्तुकलेत जिवंतपणा आणणारे कुषाण साम्राज्य आणि त्याचे सम्राट हे भारतवर्षात मौर्यांइतकेच लोकप्रिय झाले. मूळची भटकी जमात असलेल्या या टोळीच्या सरदारांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर कुषाण साम्राज्य निर्माण केले. त्यांनी केवळ भारताचा व्यापार-उदीमच वाढवला नाही, तर तत्कालीन मोठ्या साम्राज्यांना हाताशी धरून आपले साम्राज्य समृद्ध केले. कुषाण हे मध्य आशियातून भारतात विस्थापित झाले होते. सुरुवातीला चीनच्या वायव्य सरहद्दीवर यांचे वास्तव्य असताना इ.स.पू. १६५ च्या सुमारास हुणांनी त्यांच्यावर आक्रमण केले. त्यांना तिथून हाकलून लावल्यावर यांच्या टोळ्या पश्चिमेकडे आल्या. तिथे त्यांचे दोन गट पडले. त्यापैकी एक तिबेटच्या सीमेवर स्थायिक झाला. दुसरा गट पश्चिमेकडे जात असताना त्यांचे शकांबरोबर युद्ध झाले. त्यांनी शकांना भारताकडे पिटाळले. पण इ. स. पूर्व १४० च्या सुमारास हुणांच्या आक्रमणामुळे ही टोळी पुन्हा दक्षिणेकडे गेली आणि त्यांनी इ. स. पूर्व पहिल्या शतकात बॅक्ट्रिया प्रांत जिंकून घेतला. या प्रांतात कुषाणांची पाच राज्ये, ह्यू-मी, चुआँग-मो, कु-चुआँग उर्फ कुषाण, ही-थू आणि कु-फू अस्तित्वात आली. जवळपास एक शतकानंतर कुषाण टोळीचा पुढारी कुजुल कॅडफिसस याने संपूर्ण बॅक्ट्रिया ताब्यात घेतला. त्यानंतर त्याने वेगाने साम्राज्यविस्तार केला. पूर्वेकडे चीनचे स्वर्गीय साम्राज्य, पश्चिमेकडे पार्थियन साम्राज्य तर एकीकडे रोमन साम्राज्याचा उदय होत होता. कुजुल कॅडफिसस याने हिंदुस्थानच्या वायव्य सरहद्दीवरची ग्रीक आणि पार्थियनांची सत्ता नष्ट केली. काबूल, गांधार, अफगाणिस्तान जिंकून कुषाणांची सत्ता स्थापन केली. तिथून भारतात शिरण्याच्या विचारात असतानाच इ.स. ६५ मध्ये तो मरण पावला. त्यानंतर त्याचा मुलगा व्हिम कॅडफिससने आपले वडिलांचे भारत हस्तगत करण्याचे स्वप्न बर्‍याचअंशी पूर्ण केलं. उत्तर भारतात सापडलेल्या त्याच्या नाण्यांवरून त्याचे राज्य पंजाबपासून बनारसपर्यंत असल्याचं सिद्ध होतं. त्याच्या कारकिर्दीतल्या मोहरांवर एका बाजूला रोमन लिपी, तर दुसर्‍या बाजूला खरोष्ठी लिपी अंकित आहे.
 
त्याने प्रशासनाचा कारभार पाहण्यासाठी भारतात प्रमुख ठिकाणी आपले सरदार नियुक्त केले होते. त्यांना मोठे अधिकार देऊन राज्यकारभार नीट चालावा, याची दक्षताही त्याने घेतली. त्याच्या मृत्यूनंतर राज्यासाठी त्याच्या सरदारांमध्ये झालेल्या भांडणात मथुरेचा सरदार कनिष्क विजयी झाला. पुढे तो कुषाण सम्राट झाला. कॅडफिससनंतर या सम्राटाने चीन आणि रोमन साम्राज्यांमध्ये व्यापारी संबंध प्रस्थापित करून राज्याची भरभराट केली.
 
सत्ता हाती आल्यावर त्याने इ. स. ७० मध्ये शक सुरू केला. त्याला ’शक नृप काल’ म्हटले जाते. कनिष्काने पार्थियनांचा नायनाट केला. काश्मीर जिंकून त्याने आपल्या कुषाण साम्राज्याला जोडले. त्याने चिनी वर्चस्वाखाली असलेले प्रदेशही आपल्या वर्चस्वाखाली आणले.
 
 
त्याने हा हा म्हणता कुषाण साम्राज्य प्रचंड विस्तारले. रोमन आणि पार्थियन साम्राज्यात शत्रुत्व असल्याने रोम आणि चीनचा व्यापार पर्थिया या आपल्या शत्रूराष्ट्राच्या मार्गातून होऊ नये म्हणून रोमन सम्राटांनी कुषाणांबरोबर मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे व्यापारिकदृष्ट्या महत्त्वाच्या ’सिल्क मार्गा’वर कुषाणांचे नियंत्रण होते. परिणामी कुषाण राजवटीत उत्तर-पश्चिम भारत महत्त्वपूर्ण व्यापारी केंद्र बनले होते. या भागातील उत्खननात हे प्रकर्षाने आढळून आले की, त्यावेळी शहरीकरण फारच विकसित झालेले होते. कुषाण राजवटीत रोमनला भारतातून निर्यात केल्या जाणार्‍या वस्तूंमध्ये काळीमिरी, आलं, रेशीम, मलमल, सुती वस्त्रे, रत्ने, मोती यांचा समावेश असे तर काच, चांदी, सोन्याची भांडी इ. वस्तू भारतात आयात केल्या जात असत.
 
कनिष्काने परकीय व्यापारास उत्तेजन दिल्यामुळे देशाची भरभराट झाली. त्याने काश्मीरमध्ये ’कनिष्कपूर’ नावाचे शहर वसवले. पेशावर येथे ग्रीक शिल्पकाराकडून बुद्धावशेषांवर ६०० फूट उंच लाकडी मनोरा बांधला, जो ’कनिष्क चैत्य’ म्हणून ओळखला जातो. त्याने मगधवरून आणलेले बौद्ध भिक्षू अश्वघोष, तसेच वसुमित्र, पार्श्व हे बौद्ध धर्माचे विद्वान त्याच्या दरबारात होते. कनिष्काने वसुमित्र यांच्या अध्यक्षतेखाली ५०० बौद्ध भिक्षूंची धर्मपरिषद काश्मीरमध्ये कुंदलवन विहारात आयोजित केली होती. या विद्वानांच्या मार्गदर्शनाखाली बौद्ध तत्त्वज्ञानावर आधारित ’महाविभाषा’ नावाचा संस्कृत ग्रंथ तयार करण्यात आला. कनिष्कने पेशावरमध्ये बौद्ध स्तूप आणि एक बौद्धविहार बांधले होते. या बौद्ध स्तुपाच्या उत्खननावेळी तेथे बुद्ध, इंद्र, ब्रह्मा आणि कनिष्काच्या मूर्ती आढळून आल्या. भारतात सूर्य आणि कार्तिकेय यांची पूजा कुषाणांनीच सुरू केली. कुषाण सूर्यउपासक होते. इतिहासकार डी. आर. भांडारकर यांच्या मते, मुल्तानमध्ये पहिले सूर्यमंदिर कुषाणांच्या राजवटीत बांधले गेले. पुरातत्ववेत्ता कनिंघमच्या मतानुसार कुषाणांशी संबंधित असल्यामुळेच मुल्तानचे पहिले नाव ’कास्सापूर’ हे होते. सम्राट कनिष्कने सूर्यदेवाच्या मीरो (मिहीर) या नावाने अंकित केलेल्या सोन्याच्या मुद्रा बनवल्या. मीरो-मिहीर म्हणजे सूर्य. मिहीरचा अर्थ होतो, ’जो धरतीवरील पाण्याचे सिंचन करतो, समुद्रातून आर्द्रता शोषून त्याचे ढग बनवतो.’ या नावाने अंकित केलेल्या मुद्रा म्हणूनच विशेष ठरतात.
 
 
 
 
 
 
 
 

अग्नी आणि सूर्यपूजेतले विशेषज्ञ मानले जाणारे इराणचे पुरोहित कुषाण काळातच भारतात आले. भारत अथवा पाकिस्तानात गुर्जर जातीच्या कुषाण गोत्र असलेल्या लोकांना आजही ’मिहीर’ ही उपाधी लावली जाते. मुघल दरबारात जशी नवरत्ने होती त्याचप्रमाणे कनिष्कच्या दरबारातही सप्तरत्ने होती. अश्वघोष (राजकवि), आचार्य नागार्जुन, पाष्टर्व, वसुमित्र, मातृचेट, संघरक्ष (पुरोहित), चरक (राजवैद्य) ही ती सप्तरत्ने. अश्वघोषाने बुद्धचरित, सौन्दरानंद, सूत्रालंकार यांची रचना केली. आचार्य नागार्जुन हे केवळ एक तत्वज्ञ नव्हते, तर एक वैज्ञानिकही होते. पुढील काळात त्यांची तुलना मार्टिन ल्यूथर यांच्याशी केली गेली. तसेच त्यांना ’भारताचे आइन्स्टाइन’ ही म्हटले गेले आहे, इतके ते विद्धान होते. त्यांनी त्या काळात ’माध्यमिक सूत्र’ या आपल्या पुस्तकात ’सापेक्षता सिद्धांत’ मांडला होता.
 
कनिष्कच्या दरबारातील आयुर्वेदाचार्य चरक यांच्या आयुर्वेदावर आधारित ’चरकसंहिता’ हा ग्रंथ आजही आधारभूत मानला जातो. कनिष्कच्या कारकिर्दीतच वात्सायनाने ’कामसूत्र’ तर भासाने ’स्वप्नवासवदत्त’ची रचना केली. हे ग्रंथ आजही अभ्यासले जातात, हे विशेष. सम्राट कनिष्कच्या कारकिर्दीतच बौद्धधर्म ’महायान’ व ’हीनयान’ या दोन गटांत विभागला गेला. सम्राट कनिष्क हा बौद्धधर्माच्या ’महायान’ या शाखेचा अनुयायी होता. त्यानेही सम्राट अशोकाप्रमाणेच बौद्धधर्माचा प्रसार भारतभर केला.
 
गांधारकलेचा उदय कुषाणकाळातील मानला जातो. बुद्धांच्या बर्‍याचशा मूर्ती या गांधार कलेच्या माध्यमातून निर्मिल्या गेल्या. ही कला भारतीय आणि रोमन कलेचं मिश्रण असल्यामुळे तिला ’इंडोग्रीक’ कला असेही म्हटले जाते. या मूर्त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या कोरताना व्यक्तीच्या मांसपेशी, हातापायांच्या शिराही उद्धृत केल्या जात असत. त्याचप्रमाणे वस्त्रांवरील सुरकुत्याही नेमकेपणाने उठून दिसाव्यात इतक्या या मूर्ती भव्य आणि सजीव वाटतात. या कलेचा नमुना असलेल्या तत्कालीन मूर्त्या अफगाणिस्तान, तक्षशिला, चीन, कोरिया, जपान इथे आढळल्या आहेत. कुषाण सम्राट कनिष्कने साम्राज्यविस्तार करतानाच कुशल राज्यकारभाराची घडी बसवली. अफगाणिस्तान, बॅक्ट्रिया, काशगर, खोतान, यारकंद हे भारताबाहेरील प्रदेश तसेच भारतातील कौशांबी, पेशावर, बनारस, रावळपिंडी, मथुरा, सारनाथ, वायव्येकडील काश्मीर, सिंध, पंजाब एवढे भूप्रदेश केवळ कुषाण साम्राज्याच्या वर्चस्वाखाली त्याने आणले होते. त्याच्या या महाकाय साम्राज्याची राजधानी ’पुरुषपूर’ (आताचे पेशावर) हे शहर. आपल्या हयातभर लष्करी मोहिमांमध्ये गुंतलेल्या कनिष्काचा अधिकारीवर्ग मात्र त्याच्या या सततच्या मोहिमांमुळे एवढा त्रासलेला होता की, त्यांनी त्याची हत्या करण्याचा कट रचला. कनिष्क आजारी असताना त्याच्याजवळ असणार्‍या लष्करी अधिकार्‍यांनीच त्याला ठार मारले.
 
 
 
 
कनिष्कानंतर हूविष्क हा कुषाण सम्राट झाला. त्याने काश्मीरमध्ये ’हूविष्कपूर’ नावाचे नगर निर्माण केले. मथुरेत बौद्ध विहार बांधले. वसुदेव कुषाणांचा शेवटचा राजा ठरला. काबूलच्या खोर्‍यातील सत्ता सोडली तर इतर साम्राज्याला त्याच्या काळात उतरती कळा लागली. इ.स. ५ व्या शतकात हुणांनी हल्ले करून हे विशाल कुषाण साम्राज्य संपुष्टात आणले.
 
 
 
 
- रश्मी मर्चंडे