छत्रपती शिवराय भारताच्या उत्थानाचे केंद्रबिंदू - मोहन भागवत
महा एमटीबी   31-Mar-2018

 
रायगड : भारतीय संस्कृतीच्या उत्थानाचे बिंदू म्हणून जेव्हा विचार केला जातो, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव अग्रणीवर घेतले जाते. ते केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून, जागतिक प्रेरणेचे स्थान आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. रायगडावर शिवपुण्यतिथीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
 
 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३३८ व्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावर शिवपुण्यतिथी कार्यक्रमात, प्रमुख पाहुणे म्हणून मोहन भागवतांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमात पुणे, कोकण, मुंबईसहित अवघ्या महाराष्ट्रातून शिवप्रेमी तेथे उपस्थित होते.
 
 
भारतीय संस्कृतीचे वर्णन केले जाते तेव्हा जसे प्रभू श्रीरामचंद्र, श्रीकृष्ण यांचे नाव घेतले जाते, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचे देखील नाव यानंतर घेतले जात असते. त्यांनी जाती-पातींचे निर्मुलन केले. सर्वांना एकत्र केले, आणि देशकार्यासाठी प्रेरित केले. रायगड हे त्यांच्या या कार्याचेच प्रतिक आहे, असे सरसंघालक म्हणाले.
 
 
ते पुढे बोलले की, रायगडावर यायला नशीब लागतं. गेली अनेक वर्षे मी भारतभर प्रवास करत असतो, अनेक प्रांतात प्रवास होत असतो, मात्र रायगडावर येण्याचे भाग्य मला आज पहिल्यांदा मिळाले. रायगड हे केवळ तीर्थ स्थान नसून संपूर्ण भारतासाठीचे प्रेरणा स्थान आहे.