हनुमानाचा रथ ओढतात संगमनेरच्या रणरागिणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Mar-2018   
Total Views |



संगमनेर, अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा, म्हाळुंगी आणि महानुती ह्या तीन नद्यांच्या संगमावर वसलेलं एक छोटं शहर. दिसायला तसं महाराष्ट्रातल्या इतर शहरांसारखंच, आसपास उसाची शेती, एक-दोन मोठी महाविद्यालये, एखादा साखर कारखाना आणि आठवड्याचा बाजार. पण संगमनेरचा खास सांस्कृतिक ठेवा म्हणजे इथला हनुमान जन्मोत्सव. संगमनेरच्या हनुमान जन्मोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी ह्या दिवशी शहरातल्या हनुमान मंदिरापासून हनुमान विजयरथाची मिरवणूक काढली जाते. बालब्रह्मचारी श्री हनुमानाची सुंदर उत्सवमूर्ती जुन्या, सुबक, लाकडी बांधणीच्या रथात बसवून गांवभर फिरवली जाते आणि हा रथ ओढायचा पहिला मान असतो संगमनेरच्या लेकी-सुनांचा ! हनुमान विजयरथाची मिरवणूक जेव्हा मंदिरातून निघते तेव्हा शेकडो स्त्रियांच्या आवाजातल्या 'पवनसुत हनुमान की जय', 'बोलो बजरंगबली की जय' ह्या घोषणांनी आसपासचा परिसर दणाणून जातो. हनुमानाच्या रथाचा दोरखंड मोठ्या अभिमानाने ओढतात बांगड्या घातलेले नाजुक हात, पण ह्या हातांमधली मात्र ताकद बघण्यासारखी असते.

स्त्रियांनी हनुमान विजयरथ मंदिरापासून मुख्य मार्गापर्यंत ओढत आणण्याची ही परंपरा संगमनेरमध्ये जवळजवळ ९० वर्षांपासून अबाधितपणे सुरु आहे. हनुमंताचा विजयरथ रथ साधारणपणे १९२५च्या दरम्यान गांवच्याच नामदेव सुतार ह्या कसबी कलाकाराने बनवला. ह्या रथाचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या रथाच्या एका बाजूला श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसऱ्या बाजूला गांधीजी यांचे लाकडी पुतळे बसवले आहेत. पण म्हणूनच हा रथ तत्कालीन ब्रिटिश सरकारच्या डोळ्यात सलत होता. त्यात हनुमान जयंतीला गावचे सर्व लोक एकत्र जमायचे, त्यात गावातली पुढारी मंडळीही असायची. देशप्रेमाच्या जोरदार घोषणाही दिल्या जायच्या. हे सगळे अर्थातच ब्रिटिश सरकारला मंजूर नव्हते त्यामुळे ह्या मिरवणुकीमुळे गावात हिंदू-मुसलमानांमधली तेढ वाढेल हे कारण सांगून ब्रिटिश सरकारने १९२७ साली ह्या मिरवणुकीवर पाच वर्षांसाठी बंदी आणली. साहजिकच गावातले लोक बिथरले आणि त्यांनी सरकारी बंदीहुकूम मोडून १९२७ साली हनुमान विजयरथाची मिरवणूक काढली. पण पोलिसांनी आणि ब्रिटिश शासनाने त्यांना रस्त्यातच अडवलं व रथ मशिदीसमोरून जाऊ देणार नाही असे सांगितले तर गावकऱ्यांनी वर्षानुवर्षे रथाचा जो मार्ग होता तोच मार्ग कायम राहील अशी भूमिका घेतली. पोलिसांनी बळाचा वापर करून रथातून मूर्ती काढून घेतली आणि परत देवळात नेली. गांवकऱ्यांनी रागावून रथ जिथे होता तिथेच सोडून दिला. पुढच्या वर्षी, म्हणजे १९२८ मध्ये परत ह्याच प्रकाराची पुनरावृत्ती झाली. सरकारने बळाचा वापर करून रथ वाटेतच थोपवला आणि मूर्ती परत मंदिरात पाठवली. लोकांनी चिडून रथ जवळजवळ दीड महिना रस्त्यावरच ठेवला.

आता १९२९ साल उजाडले. गावात असंतोष खदखदत होता. हनुमान जन्मोत्सव साजरा करण्याची संगमनेरची परंपरा शेकडो वर्षे जुनी होती. ब्रिटिश सरकारचा जुलूम कुणालाच मंजूर नव्हता. १९२९ साली काही झाले तरी हनुमान विजयरथाची मिरवणूक पूर्ण करायचीच ह्या जिद्दीने गांव पेटले होते. गावातल्या स्त्रियादेखील सरकारच्या हडेलहप्पीला कंटाळल्या होत्या. आपल्या धार्मिक परंपरेवर ब्रिटिश सरकारने घातलेला घाला सगळ्यानांच अन्यायाचा वाटत होता. गावातल्या स्त्रियांमध्ये धुमसणाऱ्या ह्या असंतोषाला वाट करून दिली ती गावातल्याच झुंबरबाई औसक ह्या रणरागिणीने.





झुंबरबाई कुणी मोठ्या नेत्या नव्हत्या. शिवणकाम करून स्वतःचे आणि परिवाराचे पोट भरणाऱ्या साध्या, कष्टकरी विधवा महिला होत्या. पण ब्रिटिश सरकारच्या जुलमी धोरणांनी त्यांच्यामधला स्वाभिमान पेटून उठला. त्यांनी आणि गावातल्या काही इतर स्त्रियांनी मिळून ठरवलं की काही झालं तरी हनुमान विजयरथाची मिरवणूक पूर्ण झालीच पाहिजे आणि ब्रिटिश सरकार जर पुरुषांना रोखत असेल तर गांवच्या लेकी-सुना हे काम जिद्दीने पूर्ण करतील. हनुमान जन्मोत्सवाच्या दोन-तीन आठवडे पूर्वीपासून घरोघरी स्त्रिया एकमेकींना भेटून हा बेत आंखत होत्या.

पोलिसांनाही गावातल्या स्फोटक परिस्थितीची कल्पना होतीच! ब्रिटिश शासनाने गावात काही गडबड होऊ नये म्हणून आधीपासून जमावबंदीचे कलम १४४ लागू केले होते. पोलिसांची ज्यादा तुकडी संगमनेरला तैनात झाली होती. मिरवणुकीच्या मार्गात जागोजागी बैलगाड्या आडव्या ठेवून पोलिसांनी रोडब्लॉकचीही तयारी केली होती. २३ एप्रिल १९२९ उजाडला. हनुमान जन्मोत्सवाच्या दिवस. गावात सगळीकडे मंतरलेले वातावरण होते. आज काहीतरी मोठे घडणार असे सगळ्यांनाच वाटत होते. हनुमानाच्या मंदिराजवळ मोठा फौजफाटा घेऊन पोलीस तयारच होते. गावातले पुरुष मंदिरातली उत्सव मूर्ती रथात ठेवण्यासाठी आणत होते त्यांना पोलिसांनी अटकाव केला. मोठा वादविवाद झाला. त्या गडबडीत पोलसांचे सर्व लक्ष तिथेच केंद्रित होते ह्याचा फायदा घेऊन झुंबरबाई पदरात लपवून आणलेली श्री हनुमानाची तसबीर घेऊन पटकन रथात चढल्या आणि त्यांनी तसबीर रथात ठेवली. त्यांच्याबरोबर बंकाबाई परदेशी, लीलाताई पिंगळे आदी गावातल्या इतर स्त्रियाही होत्या. पोलीस गावातल्या पुरुषांना अडवण्यात गुंग होते ह्याचा फायदा घेऊन काय होतंय ते पोलिसांना कळायच्या आताच गावच्या रणरागिणी स्त्रियांनी हनुमानाचा विजयरथ ओढत पुढे नेला होता.





काही काळ गोंधळ उडाला. पोलिसांना कळून ते रथापाशी येईपर्यंत रथ बराच पुढे निघून गेला होता. त्वेषाने पेटून उठलेल्या गांवच्या स्त्रियांच्या मनगटात इतकी ताकद होती की वाटेत रोडब्लॉक म्हणून लावलेल्या बैलगाड्याही ढकलून टाकून रथ पुढे गेला. पोलीस अडवायला आले तेव्हा झुंबरबाई आणि बरोबरच्या स्त्रियांनी त्यांच्या डोळ्यात गुलालाचा मारा केला व बत्ताशे फेकून मारले. स्त्रियांच्या ह्या अनपेक्षित प्रतिकारामुळे पोलीस गडबडून गेले आणि रथाची मार्गक्रमणा पूर्ण झाली. बंदीहुकूम मोडून १४४ कलमाचा भंग केला म्हणून ब्रिटिश सरकारने त्याच दिवशी झुंबरबाई आणि त्यांच्या सहकारी स्त्रियांना अटक केली. पण तेव्हा १४४ कलम स्त्रियांना लागू होत नव्हते म्हणून ब्रिटिश पार्लमेंटने तो खटला अवैध ठरवून झुंबरबाई व इतर सर्व स्त्रियांना निर्दोष मुक्त केले.

९२७-१९२९ पर्यंत पोलिसांनी केलेल्या छळाची भरपाई म्हणून असेल पण संगमनेरच्या हनुमान जन्मोत्सवाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तिथल्या पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी ह्या दिवशी आपल्या सहकाऱ्यांसह खांद्यावर भगवा ध्वज घेऊन मिरवणुकीने शहरातून वाजत- गाजत मिरवणुकीच्या ठिकाणी येतात. त्यांच्या हाताने हा ध्वज रथावर चढवला जातो, आरती केली जाते आणि मगच स्त्रिया रथ ओढून मिरवणुकीसाठी मार्गस्थ करतात.





ब्रिटिश सरकारला नमवून १९२९ मध्ये विजयरथाची मिरवणूक स्त्रियांनी यशस्वी केल्यामुळे तेव्हापासून आजतागायत झुंबरबाई आणि गावातल्या स्त्रियांच्या कर्तृत्वाचा मान म्हणून हनुमान जन्मोत्सवाच्या विजयरथ मिरवणुकीच्या वेळी रथ ओढण्याचा पहिला मान संगमनेरच्या स्त्री-शक्तीला आहे. झुंबरबाई हयात होत्या तोपर्यंत त्यांना हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी रथात बसण्याचा मान होता. १९८३ साली वयाची शंभरी पूर्ण करून त्या गेल्या, पण त्यांचे नाव संगमनेर मध्ये अजूनही आदराने घेतले जाते. ब्रह्मचारी हनुमानाचा रथ ओढण्याचा मान स्त्रियांना असणारे संगमनेर हे कदाचित भारतातले एकमेव शहर असावे.

- शेफाली वैद्य
@@AUTHORINFO_V1@@