जिल्हाधिकाऱ्यांची 'अशी' शेती पहिली आहे का ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Mar-2018
Total Views |


अकोला : मनात इच्छाशक्ती असल्यास जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही, अकोला जिल्हयाचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी आपल्या व्यस्त कामातून बंगल्याच्या परिसरात उत्तम शेती करुन शेतकऱ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. बंगल्याच्या परिसरातील दहा एकर क्षेत्रात विविध पिकांसह भाजीपाला व फळांची शेती त्यांनी पिकवली आहे.
कामाच्या व्यस्ततेतून वेळ काढत जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या बंगल्याचा परिसर हिरवागार केला आहे. बंगल्याच्या परिसरातील दहा एकर जमिनीवर त्यांनी शेतीचे विविध प्रयोग केले आहेत. विशेष म्हणजे सेंद्रीय शेतीवर त्यांनी भर दिला आहे. नुकतेच त्यांनी अर्धा एकर शेतीतून सुमारे सात क्विंटल गव्हाचे उत्पादन घेतले. त्यापूर्वी दोन-दोन क्विंटल उडीद आणि मुगाचे उत्पादन काढले. याशिवाय शेतात मोठया प्रमाणात भाजीपाला पिकवलेला दिसून येईल. वांगी, पालक, कोबी, कोथिंबीर, शेवगा या भाजीपाल्यांसह पपई, डाळींब, केळी यांचीही लागवड केल्याचे दिसून येते. सोबतच जनावरांचा चाराही त्यांनी भरघोस प्रमाणात पिकवला आहे. सेंद्रीय शेतीवर भर देताना त्यांनी जलकुंभीच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या खताचा उपयोग प्रायोगिक तत्वावर केला.

कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी म्हणून ओळखले जाणारे आस्तिक कुमार पाण्डेय यांनी वर्षभरापूर्वी अकोला जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार हाती घेतला. अल्पावधीत आपल्या कामाची चुणूक दाखवत त्यांनी अनेक विकास कामे मार्गी लावली. अकोल्याचे वैभव असणारी आणि जलकुंभी व कचऱ्याने घाण झालेली मोर्णा नदी लोकसहभागातून स्वच्छ करण्याचा उपक्रम त्यांनी हाती घेतला. या उपक्रमाची स्वत: पतंप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेऊन मोर्णा स्वच्छता मोहिमेचे कौतुक केले.
@@AUTHORINFO_V1@@