दोन हुकुमशहांच्या भेटीचं कोडं
महा एमटीबी   30-Mar-2018
 
 
 
 
उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची बुधवारी झालेली भेट सगळ्या जगासाठी कुतूहलाचा विषय ठरली आहे. ही भेट ठरल्याची बातमी अगोदर कुठेही प्रसिद्ध झाली नसल्याने, हा एक अनपेक्षित धक्का होता. २०११ साली सत्तेत आल्यानंतरची किम यांची ही पहिली परदेश भेट मानली जाते. उत्तर कोरियाने आण्विक नि:शस्त्रीकरण करण्याचं आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेण्याचं आश्वासन दिल्याचं गुरुवारी चीनकडून सांगण्यात आलं. दुसर्‍या बाजूला अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र किम यांच्या भेटीसाठी उत्सुक असल्याचे ट्विटरवरून सांगितले. मात्र, त्याचबरोबर उत्तर कोरियावरील निर्बंध आणि दबाव कायमराहील असंही स्पष्ट केलं.
 
गेल्या काही महिन्यांमध्ये कोरियन उपखंडात संहारक शस्त्रांच्या चाचण्या केल्यामुळे आता जग तिसर्‍या महायुद्धाकडे जाणार की काय? अशी भीती व्यक्त केली गेली होती. किम मुळातच हिंसाचारासाठी (कु)प्रसिद्ध आहेत. हे गृहस्थ अचानक नि:शस्त्रीकरण वगैरेंची भाषा करतात हे सकृतदर्शनी तरी अविश्वसनीय वाटणारं आहे. कोणतीही आगाऊ माहिती न देता अचानक किम चीनला का गेले? २०११ पासून एकही परदेश दौरा न केलेले किम जोंग आत्ताच स्वत:हून चीनला जाण्याचं कारण काय? आत्तापर्यंत लष्करी सामर्थ्याचं भयानक प्रदर्शन करणारे किम जोंग अचानक नि:शस्त्रीकरणाची भाषा कशी काय करायला लागले? असा कोणता आंतरराष्ट्रीय दबाव त्यांच्यावर आला, ज्यामुळे त्यांनी नि:शस्त्रीकरण करण्याची घोषणा केली? या किम यांच्या नुसत्या बाता आहेत, की त्यामागे चीन आणि उत्तर कोरियाची काही राजकीय चाल आहे? अशी अनेक कोडी या भेटीने पडली आहेत. दोन हुकुमशहांची ही भेट जागतिक राजकारण नेमकं कोणत्या दिशेने घेऊन जाईल याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
 
सध्या अमेरिका, चीन आणि उत्तर कोरिया या तीनही देशांमध्ये परस्परांमधला तणाव वाढतो आहे. चीन आणि अमेरिका एकमेकांचे आर्थिक प्रतिस्पर्धी आहेत. अमेरिकेने चिनी वस्तूंवरील निर्बंध वाढवले आहेत. गेल्याच आठवड्यात अमेरिकेने चीनकडून आयात होणार्‍या वस्तूंवर ६० अब्ज डॉलरचं शुल्क लावलं. यामुळे अमेरिका-चीनमधील तणाव वाढतो आहे. उत्तर कोरियाच्या वाढत्या क्षेपणास्त्र चाचण्यांमुळे अमेरिकाही उत्तर कोरियाबाबत काहीशी त्रस्त आणि आक्रमक बनली आहे. वेळ पडल्यास उत्तर कोरियावर सशस्त्र हल्ला करण्याचा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे. मात्र, उत्तर कोरिया आणि चीन हे खूप पूर्वीपासून मित्र राहिले आहेत. उत्तर कोरियाचा जवळपास नव्वद टक्के व्यापार चीनबरोबर आहे. कोरियन युद्धाच्या वेळीही चीनने उत्तर कोरियाला लष्करी मदत केली होती. ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या नात्याने जागतिक राजकारणात सामर्थ्य वाढवण्यासाठी चीन आणि उत्तर कोरियाला एकमेकांची असलेली वाढती गरज या भेटीतून सूचित होते.
 
उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यात भारत-पाकिस्तानसारख्याच चकमकी होत असतात. दक्षिण कोरियाला अमेरिकेचा भक्कम पाठिंबा आहे. या प्रदेशात अमेरिकेचे वर्चस्व वाढू नये या दृष्टीने चीन आणि उत्तर कोरिया यांनी टाकलेलं हे पुढचं पाऊल म्हणायला हरकत नाही. उत्तर कोरिया आर्थिक संकटात सापडल्यामुळे तातडीने किम जोंग मदतीसाठी चीनला गेले असाही तर्क काही तज्ज्ञांनी लावला आहे. उत्तर कोरियाने अमेरिकेची भेट घेण्याची तयारी दर्शवल्याचं चीनकडून सांगण्यात आलं. प्रत्यक्ष अमेरिका भेटीच्या वेळी उत्तर कोरियाला चीनचा भक्कम पाठिंबा असेल. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नुकतीच जॉन बॉल्टन यांची नियुक्ती झाली. यामुळेच कदाचित उत्तर कोरियाला घाम फुटलेला असावा, कारण बॉल्टन हे अतिशय आक्रमक वृत्तीचे आहेत. उत्तर कोरियाविरूद्ध लष्करी ताकदीचा वापर करण्याची भाषा त्यांनी बोलून दाखवली होती. किम जोंग यांचं नि:शस्त्रीकरणाचं आश्वासन खरं असेल तर ते अमेरिकन दबावाचं यश म्हणावं लागेल. मात्र, किम यांची आत्तापर्यंतची पार्श्वभूमी पाहता हे खरं असण्याची सुतराम शक्यता वाटत नाही.
 
 
 
 
- हर्षद तुळपुळे