बिग बी आता तेलुगु चित्रपटातही झळकणार...
महा एमटीबी   30-Mar-2018
 

बॉलीवूडचे "शहेनशहा" आणि सर्वांचे ला़डके बिग बी आता तेलुगु चित्रपटात पदार्पण करत आहेत. स्वतः बिग बीं यांनीच याविषयी माहिती देत नुकताच त्यांच्या आगामी तेलुगु चित्रपटातील त्यांचा फर्स्ट लूक ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला आहे.
 
दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांच्या "से रा नरसिम्हा रेड्डी" या चित्रपटात अमिताभ बच्चन प्रमुख भुमिकेत पहायला मिळणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अमिताभ बच्चन हैदराबादला रवाना झाले आहेत.
 
"निर्वाण... अॅण्ड द कॉल ऑफ द हिमालया्ज..." या टॅगलाईन खाली काही फोटो अमिताभ बच्चन यांनी शेअर केले आहेत. या चित्रपटाबद्दल ते अत्यंत उत्साही असल्याचे दिसत आहे. नुकताच त्यांनी चित्रपटातील एका दृश्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामध्ये त्यांचा लूक अत्यंत वेगळा दिसत असून चित्रपटात ते मुख्य भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे. या दृश्यामध्ये दाक्षिणात्य अभिनेते चिरंजीवी आणि अभिनेत्री नयनतारा हे राजवेषामध्ये पुजेसाठी बसलेले दिसत आहेत, त्यांच्या पाठीमागे उजव्या बाजूलाच अमिताभ बच्चन बसलेले दाखवण्यात आले आहे. यामध्ये त्यांचा पेहराव एखाद्या साधूसारखा दिसत आहे.
 
 
 
 
अमिताभ बच्चन नेहमीच वेगवेगळ्या भूमिका आणि नवीन विषय मांडून आपल्या चाहत्यांचे प्रेम मिळवत असतात. त्यामुळे "जहाँ हम खडे होते है, लाईन वहींसे शुरु होती है" हे त्यांच्या चित्रपटातील वाक्य त्यांच्यासाठी तंतोतंत लागू होते. बिग बी बॉलीवूडमध्ये तर सर्वांचे लाडके आहेतच पण आता त्यांच्या तेलुगु चित्रपटामधील पदार्पणामुळे त्यांचे चाहते त्यांना काय प्रतिसाद देतात हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.