न्यायासाठीची भरारी...
महा एमटीबी   30-Mar-2018
 

हिंदू असलेल्या कृष्णाकुमारींची पाकिस्तानच्या सिनेटवर खासदार म्हणून निवड झाली. पण, ‘हिंदू’ हीच त्यांची एकमेव ओळख नाही. बालकामगारांचे, बंधक मजुरीचे आयुष्य जगलेल्या एका मुलीची ही न्यायासाठीची भरारी आहे.
 
पाकिस्तानातल्या कृष्णाकुमारी सध्या आशिया खंडात चर्चेचा विषय ठरल्या आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांची पाकिस्तानच्या सिनेटवर खासदार म्हणून निवड झाली. कृष्णा यांनी तालिबानशी निगडीत एका मौलानाचा पराभव केला. सिनेटवर कृष्णा यांचा विजय हा पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांसाठी आणि महिलांसाठी मैलाचा दगड ठरणार असल्याचे मानले जात आहे. पाकिस्तान संसदेच्या वरिष्ठ सभागृहातील ५२ सदस्य निवृत्त झाल्याने येथे निवडणूक झाली. ५२ जागांसाठी नवाझ शरीफ यांच्या पीएमएल-एन, पीपी आणि अपक्षांसह १३० उमेदवार रिंगणात होते. ५२ जागांसाठी प्रांत आणि राज्याच्या सर्व आमदारांनी मतदान केले. या निवडणुकीत सत्ताधारी ’पीएमएल-एन’ला १५ जागा मिळाल्या आहेत. या १५ जागांसह पीएमएल-एन आता वरिष्ठ सभागृहातील सर्वाधिक सदस्य संख्या असलेला पक्ष झाला आहे.
 
३८ वर्षीय कृष्णाकुमारींबद्दल अलीकडच्या काळात बरंच काही लिहून आले आहे. भारतीय माध्यमांनी त्यांना मोठी प्रसिद्धी दिली. भारतीय माध्यमांत फक्त ‘हिंदू’ महिलेची निवड अशी बातमी आली; मात्र ती त्यांची एकमेव ओळख नाही. एका बंधक मजूरापासून सिनेटरपर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.
 
कृष्णाकुमारी यांचा जन्म १९७९ साली एका शेतमजूर कुटुंबात झाला. सिंध प्रांतातील नगरपारकर जिल्ह्यातील ‘धना गम’ गावात कुडाच्या घरात आजही त्यांचे नातेवाईक राहतात. ‘द डॉन’ने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे पणजोबा रोपलो कोहलींनी याच गावातून भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी ब्रिटिशांविरूद्ध विद्रोह केला होता. त्यापायी इंग्रजांनी त्यांना १८५८ साली फासावर लटकवले. त्यांचे आजोबा शेतमजूर होते. अतिशय मागास समजल्या जाणार्‍या या परिसरात त्यांची ही तिसरी पिढी आहे. आठव्या वर्षी वडिलांसोबत त्यांना बालकामगार म्हणून बंधक करण्यात आले होते. याच काळात त्यांचे शिक्षणही काही काळासाठी बंद होते. एका व्यक्तीने त्यांच्या कुटुंबीयांना मजुरीसाठी तब्बल तीन वर्षे कैद केले होते. तेव्हा त्या तिसर्‍या इयत्तेत शिकत होत्या. बंदिवास! केवळ हीच एक घटना त्यांना न्याय्य हक्कांसाठी पेटून उठण्यासाठी परिणामकारक ठरली. देशातील मागास समाजातील महिलांसाठी कृष्णाकुमारींचे ‘सिनेट’ पद मैलाचा दगड मानले जात आहे.
 
दहावीत असताना त्यांचा लालचंद यांच्याशी त्यांचा बालविवाह झाला. लग्नानंतर त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. २०१३ साली त्यांनी समाजशास्त्रात सिंध विद्यापीठाची पदवी मिळवली.
 
२००५ पासून पूर्णवेळ त्यांनी देशातील अल्पसंख्य समुदायासाठी शिक्षण आणि मानवी हक्कांची लढाई सुरू केली. २०००च्या दशकात पाकिस्तानमध्ये ईशनिंदेच्या आरोपाखाली अल्पसंख्य समुदायाला लक्ष्य करण्यात येत होते. शिया-सुन्नी-अहमदिया-इस्माईली पंथांचा वाद केंद्रस्थळी होता. न्यायाधीश, गव्हर्नर, मानवी अधिकार कार्यकर्ते, बंड करून उठणार्‍यांना ठार मारले जात होते. अशा काळात कृष्णाकुमारी अल्पसंख्य हिंदू समुदायाच्या मानवी हक्कांसाठी उभ्या राहिल्या. त्यांनी २०१३ साली बिलावल भुट्टो यांच्या नेतृत्वाखाली ‘पाकिस्तान पीपल्स पक्षा’त प्रवेश केला. सामाजिक कार्यकर्ती म्हणून त्यांनी भावाच्या साथीने पक्षात काम सुरू केले. तेथील लोकांसाठी त्यांनी कार्य केले आहे. २००५ पासून त्यांनी सामाजिक कार्यकर्त्या म्हणून काम करण्यास सुरुवात केली. २००७ मध्ये इस्लामाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘मेहेरगढ ह्युमन राईट्‌स युथ लिडरशिप ट्रेनिंग कॅम्प’साठी त्यांची निवड झाली होती. समान नेतृत्व आणि समान संधी या धोरणातून पीपीपीने कृष्णाकुमारी यांना उमेदवारी दिली. याखेरीज कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषण, महिलांचे मूलभूत हक्क आणि बंधुआ मजूर यांच्याविषयी काही महत्त्वाची पावले उचलण्यात आणि त्यांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाच्या कामांमध्ये हातभार लावण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. पाकिस्तानच्या ‘युथ सिव्हिल ऍक्शन प्रोग्राम’मध्येही त्यांनी आपले योगदान दिले आहे. कृष्णाकुमारी या ‘पीपल्स पार्टी’च्या तिसर्‍या हिंदू खासदार आहेत. २००६ साली रत्ना भगवानदास चावला या देशातील पहिल्या हिंदू सिनेटर ठरल्या होत्या. २०१३ साली रीता ईश्र्वरलाल कौमी असेम्ब्लीत निवडून गेल्या होत्या.
 
पाकिस्तानच्या कौमी असेम्ब्ली (लोकसभा) आणि सिनेट (राज्यसभा) वर निवडून जाण्यासाठी पैशांचा घोडेबाजार सुरू असतो. अशा काळात कृष्णाकुमारींची निवड होणे फारच मोठी गोष्ट म्हणावी लागेल. पाकिस्तानच काय तर जगातील अनेक भागात मागास घटकांना हीन वागणूक दिली जाते. ‘ऑक्सफॉम’च्या अहवालानुसार जगातील १ टक्के लोकांकडे ५० टक्के संपत्ती आहे. म्हणजे मूठभर लोकांकडे संपत्तीचे बंदिस्तीकरण झाले आहे. ही अब्जाधीश माणसे दिवसेंदिवस अधिकच श्रीमंत होत आहेत. अशा धनाढ्यांमध्ये शोषण आणि वर्चस्ववादी वृत्ती वाढणारच आहे. यातून शोषक जमातीच्या तावडीतून सुटून एखादीच कृष्णकुमारी सिनेटर होते. त्यामुळे जगातील इतर समुदायांनीही आपल्या न्याय्य हक्कांसाठी मसीहाची वाट न पाहिलेली बरी !
 
 
 
- तन्मय टिल्लू