वेध जयेंद्र सरस्वतींच्या परंपरेचा...
 महा एमटीबी  03-Mar-2018
 कांचीकामकोटी पीठाचे शंकराचार्य जगद्गुरु जयेंद्र सरस्वती स्वामीगल् यांचे बुधवार २८ फेब्रुवारी रोजी वयाच्या ८२ व्या वर्षी महानिर्वाण झाले. पूज्य जयेंद्र सरस्वतींच्या व्यक्तिगत माहितीबरोबरच कांचीकामकोटी शंकर पीठ आणि एकंदरीतच देशभरातील शंकराचार्य पीठांचा वेध घेणारा हा लेख...


काळ हा अनादि आहे, अनंत आहे. कालचक्राच्या अनंत फेर्‍यांमधलं सर्वात मोठं जाणवणारं वैशिष्ट्य म्हणजे, सतत बदल. कोणतीही गोष्ट सतत बदलत असते, पण बदल होणे, हे मात्र सनातन आहे.मग हिंदू धर्म हा सनातन आहे, म्हणजे काय ? तर कालचक्राच्या अविरत फेर्‍यांमध्ये ‘हिंदू’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या जीवन पद्धतीतसुद्धा शबलत्व येते; हीनता, संकुचितता निर्माण होते. धर्माचा गंगेसारखा निर्मळ, पवित्र ओघ साचल्यासारखा भासू लागतो. म्हणजे ऋषिमुनींनी सांगितलेले, मनुष्य जीवन कसे जगावे, याचे तत्त्वज्ञान पुस्तकात, आचारधर्मात, संकुचित, कर्मठपणात अडकून पडल्यासारखे होते.पण, भारताचे, इथल्या ‘हिंदू’ नामक जीवनप्रणालीचे हेच तर वैशिष्ट्य आहे की, अशा काळातच कुणीतरी एक महान व्यक्ती याच भूमीतून निर्माण होते. आपल्या अलौकिक प्रज्ञेने आणि अथक उद्योगशीलतेने ती व्यक्ती धर्माला आलेले साचलेपण दूर करते. तिच्या पराक्रमाने सगळी बंडे-पाखंडे-अवडंबरे मोडून पडतात. धर्माची धारा पुन्हा स-जल आणि स-बल होते. परिणामी समाज आणि राष्ट्र पुन्हा रसरसून उठते, उत्साहाने सळसळून उठते.


इसवी सन पूर्व पाचव्या शतकात अगदी असेच घडले. संपूर्ण देश अवैदिक, तांत्रिक, कापालिक, शाक्त अशा विविध मतपंथांच्या गलबल्यात हरवून गेला होता. सर्वत्र अनाचार आणि अनीती हाच धर्म ठरला होता. अशा काळात सन पूर्व ५०९ या वर्षी केरळ प्रांतात अलवाई नदी काठच्या कालडी नावाच्या खेड्यात शंकर नावाचा एक मुलगा जन्मला. तो फक्त ३२ वर्षे जगला. पण, त्या ३२ वर्षांत त्याने संपूर्ण भारत देश धार्मिक-सांस्कृतिकदृष्ट्या जिंकला. मतामतांच्या गलबत्याची सगळी जळमटे, बंडे, अवडंबरे, मोडून त्याने पुन्हा सनातन धर्माचा ध्वज सर्वत्र फिरवला. त्यांनाच आपण आज ‘आदि शंकराचार्य’ म्हणतो. आचार्यांनी देशाच्या चार दिशांना चार मठ किंवा धर्मपीठे स्थापन केली. त्या पीठांवर आपल्या विद्वान शिष्यांची पीठाधीश म्हणून स्थापना केली. या पीठाधीशांनी आपापल्या क्षेत्रातील समाजाचे जीवन सुविहितपणे चालेल, याची काळजी घ्यायची होती. उत्तर भारतासाठी हिमालयात बद्रीनाथ येथे ज्योतिर्मठ, पश्‍चिम भारतासाठी द्वारका, पूर्व भारतासाठी जगन्नाथपुरी आणि दक्षिण भारतासाठी शृंगेरी अशी ही पीठे होती. लोक या पीठांना ‘शंकरमठ’ आणि त्यांच्या पीठाधीशांना ‘शंकराचार्य’ म्हणूनच ओळखू लागले.


मग दक्षिण भारतासाठी, आजच्या कर्नाटक प्रांतात, चिक्कमंगळूर जिल्ह्यात, तुंगभद्रेच्या तीरावर शृंगेरी मठ असताना हे पाचवे कांचीकामकोटी पीठ किंवा मठ कुठून आले? तर या संदर्भात, कांचीकामकोटी मठातील अधिकृत दस्तऐवज असे सांगतात की, देशभर धर्मदिग्विजय करून, देशाच्या चार दिशांना चार पीठे स्थापन करून, त्यावर आपल्या विद्वान आणि कर्तबगार अशा शिष्यांची स्थापना करून मग आदि शंकराचार्य, या कांची नगरीमध्ये कायमचे निवासासाठी आले. आपले कार्य आता संपले आहे, हे जाणून त्यांनी इथे स्वत:साठी एक मठ निर्माण केला.


सध्याच्या तामिळनाडू राज्यातले ‘कांजीवरम् सिल्क’ साड्यांसाठी प्रसिद्ध असलेले कांजीवरम् म्हणजेच कांचीपुरम् किंवा कांची हे भारतातले एक अत्यंत प्राचीन शहर आहे. हिंदू परंपरेनुसार उत्तर भारतात जे महत्त्व काशी शहराला आहे, तितकेच महत्त्व दक्षिणेत कांचीला आहे. पांड्य, चोल, पल्लव इत्यादी महान राजघराणी इथे नांदून गेली. शिव, शक्ती आणि विष्णु या दैवतांची इथे सारख्याच श्रद्धेने उपासना होत असे. आजही एकांबरेश्‍वर शिवमंदिर, वरदराज पेरुमाल विष्णू मंदिर आणि कामाक्षी मंदिर ही कांजीवरम् शहरातली सर्वात प्रसिद्ध देवस्थाने आहेत.


आदि शंकराचार्य या कामाक्षी देवीचे महान उपासक होते. हिंदू परंपरेत मंत्र उपासना, तंत्र उपासना याप्रमाणेच यंत्र उपासनादेखील आहे. प्रत्येक देवतेचे एक विशिष्ट यंत्र असते. देवीचे यंत्र म्हणजे ‘श्री यंत्र.’ कांची शहराची रचना श्री यंत्राच्या आराखड्याप्रमाणे आहे. आदि शंकराचार्यांनी कामाक्षी मंदिराच्या परिसरातच उरलेला काळ घालवला आणि सन पूर्व ४७७ मध्ये आपले जीवितकार्य संपवले. म्हणजे आदि शंकराचार्य हेच कांचीकामकोटी पीठाचे प्रथम आचार्य होत.


आदि शंकराचार्यांच्या काळाबद्दल अर्थातच मतभेद आहेत. ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकात भारतात, तत्त्वज्ञान या विषयात, एवढा प्रचंड बुद्धिमत्तेचा एक ज्ञानसूर्य होऊन गेला, यावर पाश्‍चिमात्य विद्वान विश्‍वास ठेवत नाहीत. ते शंकराचार्यांना ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकातून थेट ख्रिस्तोत्तर सातव्या-आठव्या शतकात फेकून देतात. इंग्रज विद्वान असे म्हणतात, त्यामुळे त्यांचे बगलबच्चे भारतीय विद्वानही तसेच म्हणतात. पण, कांचीकामकोटी मठाकडे आदि शंकराचार्यांपासून आजपर्यंतच्या पीठाधीशांची नावनिशी, तारीखवार नोंद आहे.


त्या नोंदीनुसार चंद्रशेखरेंद्र सरस्वती हे ६८ वे पीठाधीश होते. त्यांचा जन्म १८९४ सालचा. १९०७ साली वयाच्या १३ व्या वर्षीच त्यांनी कांचीकामकोटी पीठाचे प्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली. १९९४ साली वयाची शंभरी पूर्ण करून त्यांनी जगाचा निरोप घेतला. अलीकडच्या काळातील एक महान हिंदू दार्शनिक, एक महान ऋषी म्हणूनच देश त्यांना ओळखत होता. लोक त्यांना ‘परमाचार्य’ म्हणत असत! रा. स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक प.पू. श्रीगुरुजी आणि परमाचार्य यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते.


परमाचार्यांनी १९५४ साली म्हणचे स्वत:च्या वयाच्या ६० व्या वर्षी आपल्या नंतरचा शंकराचार्य म्हणून महादेव सुब्रह्मण्यम अय्यर नावाच्या एका तरुणाची निवड केली. तत्कालीन मद्रास प्रांताच्या तंजावर जिल्ह्यातल्या इरुलनिकी नावाच्या खेड्यातला हा तरुण तेव्हा फक्त १९ वर्षांचा होता. त्याला कांचीकामकोटी मठात विधिवत संन्यास दीक्षा देण्यात आली. संन्यासानंतर नव्या नावापुढे ‘आनंद’, ‘भारती’, ‘तीर्थ’, ‘सरस्वती’ अशी अभिधाने लावण्याचे संकेत आहेत. त्यानुसार त्यांचे नाव ‘जयेंद्र सरस्वती’ असे ठरवण्यात आले.


शंकराचार्य होणे म्हणजे एखाद्या पक्षाचा अध्यक्ष होण्याइतके सोपे नसते. तिथे नुसतेच ‘पप्पू’ असून चालत नाही, तर खरोखरचे ‘प.पू.’ म्हणजे ‘परमपूजनीय’ व्हायचे असते. जयेंद्रांकडून विशाल अशा हिंदू तत्त्वज्ञानाचा कसून अभ्यास करून घेण्यात आला. आपल्याकडचे डावे विचारवंत, आपल्याकडच्या धार्मिक लोकांना नेहमीच, ‘मठातल्या गाद्यागिरद्यांवर लोळत घृतकुल्या, मधुकल्या हादडणारे ‘भोंदू’ म्हणून हिणवत असतात. डाव्यांचे स्वत:चे मठापती तसेच असतात.
 चंद्रशेखरेंद्र परमाचार्य महान तत्त्वज्ञानी होतेच; आता जयेंद्रांनी त्यांच्या पुढचे पाऊल टाकले. परमाचार्य जीवित असतानाच, जयेंद्रांनी प्रथम खुद्द कांची शहरात आणि मग तामिळनाडू प्रांतभर विविध प्रकारच्या सेवाकार्यांना सुरुवात केली. हिंदू परंपरेच्या शाळा, रुग्णालये आणि नेत्र चिकित्सालये यांचा पाया त्यांनी घातला. १९८५ पासून सुरू झालेल्या आणि १९९२ साली कळसाला पोहोचलेल्या रामजन्मभूमी आंदोलनात जयेंद्रांचा हिंदू धर्मप्रमुख म्हणून मोठा वाटा होता. उत्तर भारतासह संपूर्ण हिंदू द्वेषासाठी सिद्ध झालेले तत्कालीन तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांना त्यांनी ठणकावून सांगितले की, ‘‘तामिळ ही आमची मातृभाषा आहेच, पण संस्कृत ही आमची पितृभाषा आहे.’’


१९९४ साली परमाचार्यांचे निर्वाण होऊन जयेंद्रांकडे कांची पीठाची संपूर्ण जबाबदारी आली. पण, त्यांच्या सामाजिक कार्याचा वेग वाढतच राहिला. त्यामुळे भडकलेल्या हिंदुद्वेष्ट्या जयललिता सरकारने २००४ साली त्यांना चक्क एका खुनाच्या खटल्यात अडकवले. हिंदुद्वेष्ट्या मीडिया माकडांच्या हाती कोलीतच मिळाले. पण, २०१३ सालापर्यंत सरकारला कोणताही आरोप सिद्ध करता न आल्याने खटला रद्दबातल झाला. या कालावधीत आणि नंतरही जयेंद्रांचे कार्य नेहमीप्रमाणेच सुरू होते- अथक, अविश्रांत, संपूर्ण समाजासाठी नि ईश्‍वरावर संपूर्ण श्रद्धा ठेवून!
 ‘कार्यमग्नता व्हावे जीवन, मृत्यू ही विश्रांती’ हे तत्त्व प्रत्यक्ष जगून दाखवून जयेंद्र सरस्वतींची प्राणज्योत आता भगवान चंद्रमौलीश्‍वराच्या तेजात विलीन झाली आहे.
- मल्हार कृष्ण गोखले