अन्नदाता अझहर
 महा एमटीबी  03-Mar-2018

भिकारी दिसला की आपण थोडे पैसे देतो किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. पण, हा सगळा अट्टहास पोटासाठी.. त्यात मग लहान मुले, वयोवृद्ध आणि अपंगांचाही समावेश. कारण, ते अर्थार्जन करू शकत नाही. मग अशांसाठी धावून आला हैद्राबादचा अझजर...

जगात कुठलेही श्रेष्ठ दान असेल तर ते अन्नदान. असे म्हटले जाते की, उपाशीपोटी कुठलेही तत्वज्ञान गळी उतरत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरसुद्धा म्हणायचे की, ‘‘माझ्याकडे रुपया असेल तर मी आठ आण्याची भाकर घेईन आणि आठ आण्याचे पुस्तक घेईन.’’ जगातल्या शक्यतो सगळ्याच घडामोडी या शेवटी पोटापाण्यासाठीच चालतात. क्रांती ही उपाशी पोटी होत नसते. अगदी सैन्यही पोटावरच चालते. असे हे अन्नाचे महत्त्व अबाधित आहे. म्हणजे जगातले एकवेळ सगळे व्यवसाय बंद होऊ शकतात, पण खाण्याचे व्यवसाय कधीच बंद पडणार नाही असेही म्हटले जाते. तर हैदराबादमधील अझहर अन्नदानाचे सत्कार्य पार पाडत आहे. हैदराबादच्या दबीरपुरा उड्डाणपुलाच्या खाली दररोज जवळपास ५० उपाशी लोक अझहरची वाट पाहात असतात. हे कार्य करण्यामागची प्रेरणा अशी की, अझहर एका कामानिमित्त आपल्या गाडीमधून जात होता. त्याची गाडी अचानक बंद पडली. उशीर होत होता म्हणून अझहरने रेल्वेतून प्रवास करण्याचे ठरवले. स्थानकाच्या पुलाखाली एक अपंग बाई भीक मागताना अझहरच्या निदर्शनास पडली. त्या बाईला पैसे नको होते, तर तिला हवे होते अन्न. भुकेने ती व्याकूळ झाली होती. अपंग असल्याने ती अर्थार्जन करू शकत नव्हती. अझहरचे वडील तो चार वर्षांचे असताना वारले. अझहर आणि त्यांच्या बहीण भावंडांचे पालन पोषण करताना त्यांच्या आईने खूप खस्ता खाल्या. उपाशीपोटी राहणे काय असते, याची कल्पना अझहरला आहे. म्हणूनच कुणीही उपाशी राहू नये असा चंग त्याने बांधला आणि सुरू झाले उपाशी लोकांना अन्नदान करण्याचे सत्र.दुसर्‍या दिवशी अझहरच्या बायकोने १५ व्यक्तींचा स्वयंपाक बनवला. तो त्याने स्थानकाच्या पुलाखाली गरीबांमध्ये वाटून टाकला. आज अझहरचे कार्य पाहून लोकांकडून त्याला मदत येत आहे. अझहरला दर महिन्याला तांदळाच्या २५ किलोच्या १६ गोण्या देणगी स्वरुपात मिळतात. त्या उड्डाणपुलाखाली दररोज १०० लोक जेवतात. त्यासाठी २५ किलो भात, २ किलो कडधान्य आणि एक लिटर तेल लागतं. यासाठी साधारणतः पंधराशे ते सतराशे रुपये खर्च होतात. पण प्रश्न हा होता ही की, देशातच इतके लोक उपाशी राहतात. अझहर हा कुठे कुठे पुरा पडणार? ही सामाजिक जबाबदारी प्रत्येकाची आहे आणि यात फक्त पैसाच लागतो असे नाही किंवा अन्नदान करण्यासाठी तुम्हाला ठरवून विशिष्ट ठिकाणी जावे लागतेच असे नाही. आपण कामासाठी प्रवास करताना असे भिकारी आपल्या निदर्शनास येतातच. यासाठी अझहरने एक नामी उपाय शोधून काढला. ‘दो रोटी‘ नावाचे अभियान त्याने सुरू केले. ‘दो रोटी’ अभियानाची संकल्पना अशी की, घरून निघताना व्यक्तीने दोन पोळ्या जास्त घ्याव्यात. वाटेत गरजवंतांना त्या द्याव्यात. यासाठी फार पैसे लागत नाही आणि ठराविक ठिकाणी जाण्याचीही गरज नाही. यासाठी अझहरने समाजमाध्यमाचा प्रभावी उपयोग केला. अझहरने स्वतःचे संकेतस्थळ, फेसबुक पान आणि इतर बर्‍या गोष्टींचा वापर पुरेपूर केला आहे. हे वाचून आपण काय करू शकतो असा प्रश्न आपल्यालाही पडला असेल. मग ठरवा तर. कामाला, महाविद्यालयात, फिरायला जाताना दोन पोळ्या सोबत ठेवूया आणि भुकेल्या व्यक्तीला देऊया. एका वेळच्या जेवणाने किमान भुकेली व्यक्ती तृप्त होईल हे नक्की.
- तुषार ओव्हाळ