समर्थ रामदास आणि आम्ही...
महा एमटीबी   29-Mar-2018
 
 
 
समर्थ रामदास स्वामींसारखे अलौकिक व्यक्तिमत्त्व या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आले आणि सतराव्या शतकात धार्मिक क्षेत्र, राजकारण, समाज संघटन, पारमार्थिक विचारांची वाङ्‌मय निर्मिती इत्यादी बाबतींत कायमचा ठसा उमटवून गेले यात शंका नाही. तथापि आजचा काळ खूप बदलला आहे. सर्वच क्षेत्रांत अनेक अपप्रवृत्तींनी शिरकाव केल्याने बेगडीपणाला महत्त्व आले आहे. चकचकीत ते सोने वाटू लागले आहे. जातीयतेचा चष्मा लावून महान व्यक्तींचे चरित्रहनन करण्यात हे लोक धन्यता मानू लागले आहेत. हे जमले नाही तर निदान थोर व्यक्तींबाबत लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करावा ही राजकारणाची दिशा ठरत गेली. या सार्‍या गोष्टींचा प्रयोग समर्थ रामदासांचे चरित्र व त्यांचे वाङ्‌मय यावर करण्यात आला. अशा पार्श्वभूमीवर रामदासांचे चरित्र, कर्तृत्व आणि वाङ्‌मय याची खरी स्थिती काय आहे आणि त्यांचे वाङ्‌मय आजच्या काळातही आमचे परिवर्तन करण्यास कसे समर्थ आहे, या विचारांनी प्रेरित होऊन ही लेखमाला लिहायला घेतली. त्यातून समर्थांचे समर्थ विचार त्यांचे वाङ्‌मय, चरित्र लोकोद्धाराची तळमळ, त्यांच्या चरित्र व वाङ्‌मयावरील आक्षेप तपासून, त्यांचे निराकरण या सार्‍यांचे विवेचन होणार आहे.
 
समर्थ रामदास स्वामींचा जन्म मराठवाड्यातील जांब या गावी शके १५३० म्हणजे इ. स. १६०८च्या चैत्र शुद्ध नवमीला रामनवमीच्या दिवशी झाला. भास्कराच्या कृपेने हा मुलगा झाला म्हणून त्याचे नाव ‘नारायण’ ठेवण्यात आले. या शुभमुहूर्ती, शुभदिवशी हा प्रतापसूर्य महाराष्ट्राच्या क्षितिजावर उदयास आला आणि आपल्या प्रतिभेने कर्तृत्वाने अखंड साधना व बारा वर्षे सारा हिंदुस्थान पायी फिरुन हिंदवी स्वराज्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यासाठी पोषक वातावरणाची निमिर्ती करीत राहिला.
 
इ. स. २००८ मध्ये या महापुरुषाच्या जन्माला चारशे वर्षे पूर्ण झाली. समर्थांसारखे व्यक्तिमत्त्व दुसर्‍या कुठल्या देशात जन्माला आले असते, तर त्या देशांनी त्यांचे नाव व कर्तृत्व सार्‍या जगभर पोहोचवले असते. पाश्चात्त्य देशांनी त्यांच्याकडील सॉक्रेटिस, प्लेटो, ऍरिस्टॉटल, शेक्सपीअर, वायक्लीफ, जॉन हस, मार्टिन ल्यूथर इत्यादी अनेक कर्तृत्ववान माणसांची नावे जगभर पोहोचवली आहेत. समर्थ रामदासांचे कार्य आणि कर्तृत्व काही त्यांच्यापेक्षा कमी नव्हते, याउलट त्यांचे प्रपंच विज्ञान, समाज संघटन, राजकारण, तत्त्वज्ञान यांचा विचार करता ते काळाच्या पुढे होते. असे असूनही रामदासांची चौथी जन्मशताब्दी २००८ साली साजरी करण्याची आस्था सरकारी पातळीवर दाखवली गेली नाही. तसेच महाराष्ट्रातील कोणत्याही सामाजिक धार्मिक संस्थांनी तो दिवस मोठ्या प्रमाणावर साजरा केल्याचे माझ्यातरी ऐकिवात नाही. रामदास स्वामी हे अनेकांचे प्रेरणास्थान असल्याने त्यांची चौथी जन्मशताब्दी मोठ्या प्रमाणावर साजरी व्हायला हवी होती.
 
समर्थ वाङ्‌मयाचा आम्ही कधी फारसा विचार केला नाही. नव्या पिढीसाठी सुसंस्कार करण्याचे सामर्थ्य वाङ्‌मयात असूनही शालेय अभ्यासक्रमात त्याला यशोचित स्थान मिळाले नाही. कॉलेजातील अभ्यासक्रमात ‘दासबोध’ किंवा ‘मनाचे श्लोक’ यांचा अंतर्भाव करावा तर आमचे शिक्षणतज्ज्ञ यांच्याकडे धार्मिक वाङ्‌मय म्हणून बघतात व त्याला हात लावायला बिचकतात. मनाच्या श्लोकांच्या अभ्यासाने आपण मनाची चंचलता दूर करून त्याचा उपयोग जीवनाची सकारात्मकता वाढवण्यासाठी करू शकतो. पुढील एखाद्या लेखात ते आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. ’सुखकर्ता दुःखहर्ता’, ’लवथवती विक्राळा’, ’सत्राणेउड्डाणे’ या आरत्या सर्वांना पाठ आहेत. पण, या आरत्या रामदासांनी लिहिलेल्या आहेत, हेही बर्‍याच जणांना माहीत नसते. पूर्वीच्या काळी मराठी घरात ज्ञानेश्र्वरी, तुकारामाच्या गाथा, एकनाथी भागवत व समर्थांचा दासबोध यापैकी एखादा तरी ग्रंथ असायचाच. आज घरात समर्थांचा दासबोध ग्रंथ असला तर त्याला दूरून हात जोडून आम्ही पूज्यभाव व्यक्त करतो, पण तो उघडून त्याच्या अंतरंगात शिरण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही. समर्थ रामदासांची समाधी असलेले ठिकाण सज्जनगड हे फारच थोड्यांचे प्रेरणास्थान आहे, इतरांना ते सहलीचे ठिकाण वाटते.
 
कुठल्याही महान व्यक्तीला जाणून घ्यायचे, तर प्रथम तत्कालीन इतिहास समजून घ्यावा लागतो. रामदासकालीन इतिहासात शिरल्याशिवाय रामदासांची योग्यता समजणार नाही. श्री. म. माटे यांनी ‘रामदास स्वामींचे प्रपंच विज्ञान’ या आपल्या प्रबंधात लिहिले आहे की, ‘‘तुकाराम, रामदास आणि शिवाजी ही बुद्धीची, इच्छाशक्तीची आणि पराक्रमाची मोठी भव्य स्फुरणे महाराष्ट्रात एकाच काळात जन्माला आली, हे महाराष्ट्राचे महत्भाग्य होय. एवढी बुद्धिमान माणसे, प्रचंड पुरूष राष्ट्राच्या जीवितात एकाच वेळी नांदत असता ते परस्परांशी भांडले नाहीत, त्यांचे एकमेकांशी मतभेद झाले नाहीत, ही मोठी नवलाची गोष्ट आहे; एवढेच नव्हे तर ते एकमेकांच्या कार्याला पूरक बनले आणि असे बनण्याला ते शरणागतीचे औदात्त्य लागते ते या तिघांनी दाखवले.’’ त्यामुळे महाराष्ट्राला अलौकिक वैभव प्राप्त झाले आहे. हे वैभव परत मिळवायचे असेल तर शिवाजी महाराज आणि समर्थ रामदासस्वामी यांचे कर्तृत्व राष्ट्रपे्रम व जनसामान्यांविषयीची तळमळ या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे.
 
 
 
 
- सुरेश जाखडी