ज्येष्ठांना मान!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Mar-2018
Total Views |
 

 
रणभूमीवर अचानक शांतता पसरली. कारण सर्वांचे लक्ष युधिष्ठिराकडे लागले होते. त्याने आपले चिलखत आणि आयुधे उतरवली आणि अनवाणी पायांनी तो कौरवांच्या सैन्य तळाकडे चालू लागला. सारे त्याच्याकडे श्वास रोखून पाहू लागले. युधिष्ठिर मात्र अविचल होता. तो पितामह भीष्म यांना भेटण्यासाठी निघाला होता. त्याच्या मागोमाग भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव पण निघाले. श्रीकृष्णही त्यांच्यासोबत होता. अर्जुन म्हणाला, ’’तू असा अचानक शत्रूच्या सैन्याकडे का निघाला आहेस? तू आम्हा भावांना विसरलास काय? हे तू काय करतो आहेस?’’ नकुलही म्हणाला, ‘‘दादा! तुझ्या या अशा वागण्याने आम्ही सर्व भाऊ घाबरून गेलो आहोत. त्यांच्याशी लढायचे सोडून तू त्यांना शरण जायला निघाला आहेस?’’ युधिष्ठिर एक अक्षरही बोलला नाही. तो चालतच राहिला. श्रीकृष्ण मात्र आश्वस्त होता. त्याने सर्वांना सांगितले, ’’त्याचा हेतू मला कळला आहे. युधिष्ठिर आता भीष्म, द्रोण, कृप, शल्य यांच्याकडे जाईल आणि त्यांचे आशीर्वाद घेईल, त्यांच्याशी लढण्याची परवानगी मागेल. ही सर्व तुमच्याहून ज्येष्ठ मंडळी आहे आणि असं म्हणतात की ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि परवानगी घेऊन त्यांच्याशी लढलात तर विजय तुमचाच हे नक्की! मात्र अशी परवानगी घेतली नाहीत तर मात्र तुमचा पराभवच होणार. म्हणूनच युधिष्ठिर असे वागत आहे.‘‘ कौरवांना पण वाटले की, युधिष्ठिर घाबरला आहे. अखेरच्या क्षणी तो कौरवांना युद्ध थांबवा अशी विनंती करण्यासाठी भीष्मांकडे येत आहे. भीष्म त्याची वाट पाहत होते. सैनिकांनी त्याला भीष्मांपर्यंत वाट करून दिली. युधिष्ठिर त्यांच्या समीप आला. त्याचे डोळे अश्रूंनी भरले होते. युधिष्ठिर आणि सर्व पांडव बंधू भीष्मांच्या पाया पडले. तो म्हणाला, ’’पितामह, आता युद्ध अटळ आहे. आम्हाला तुमच्याशी लढावं तर लागणारच आहे. कृपा करून आम्हाला विजय मिळेल असा आशीर्वाद द्या.’’ युधिष्ठिराच्या या नम्र वागण्याने भीष्म प्रसन्न झाले, ते म्हणाले, ’’वत्सा, विजय तुमचाच आहे हे तू जाणतोस, श्रीकृष्ण तुमच्या बाजूला आहे तेव्हा धर्मच तुमच्या बाजूस आहे आणि जिकडे धर्म तिकडे विजय ठरलेलाच!
 
 
संपत्ती मानवाची दास नसते, तर माणूस संपत्तीचा दास असतो. माझी संपत्ती कौरव सम्राटाची असल्यामुळे मला तुम्हाविरुद्ध लढावे लागणार आहे. राजा दुर्योधनाने मला आश्रय दिला म्हणून त्याच्याकरिता लढणे माझे कर्तव्य आहे. पण, माझे अपार प्रेम तुमच्यावर आहे आणि माझे आशीर्वाद तुम्हालाच आहेत हे तुम्हाला माहिती आहे. विजयी व्हा!’’ त्या नंतर युधिष्ठिर द्रोण, कृप आणि शल्य यांनाही भेटला. युद्धासाठी त्यांची परवानगी आणि आशीर्वाद त्याने घेतले आणि मग तो आपल्या सैन्य तळाकडे निघाला. युधिष्ठिर शल्याशी बोलत होता तेव्हा कृष्ण राधेयास भेटला आणि म्हणाला, ’’राधेया, मला कळले आहे की, भीष्मांविषयी तुझ्या मनी द्वेष आहे, म्हणून जोवर भीष्म जिवंत आहेत तोवर तू लढणार नाहीस! मग तोवर तू पांडवांच्या बाजूला येऊन का लढत नाहीस? तुझे शत्रू असणार्‍या भीष्मांशी तू लढ आणि ते मारले गेले की तू पुन्हा दुर्योधनास येऊन मिळ!’’ राधेय हसून म्हणाला, ’’कृष्णा, किती पोरकट प्रश्न हा? तुझे प्रेम त्या पांडवांवर उतू जात आहे, म्हणून तू असे म्हणतोस. पण, माझेही तितकेच किंबहुना त्यापेक्षाही जास्त प्रेम दुर्योधनावर आहे आणि त्यासाठी मी माझे प्राणही देईन. मी मला नियतीच्या स्वाधीन कधीच केले आहे आणि हा फक्त काही दिवसांचाच प्रश्न आहे. तेव्हा मला नियतीप्रमाणे वागू दे.’’ कृष्णाला माहीत होते की, या वीरांचा अंत आता जवळ आला आहे. राधेयाकडे पाहून त्याचे डोळे एकदम भरून आले. युधिष्ठिराने दोन्ही सेनांना उद्देशून भाषण केले आणि सांगितले, ’’ज्यांना कौरव पक्ष सोडून माझ्याकडे यायची इच्छा असेल त्यांचे मी स्वागत करतो.’’ हे ऐकून दुर्योधनाचा एक भाऊ युयुत्सु युधिष्ठिरास येऊन म्हणाला,’’तू माझा स्वीकार करणार असशील, तर मी तुझ्या बाजूने लढायला तयार आहे.’’ यावर युधिष्ठिराने त्याचे स्वागत केले आणि म्हणाला, ’’मला आनंदच आहे, माझे चुलते धृतराष्ट्र यांचा अंत झाल्यावर त्यांचे विधी करण्यासाठी निदान त्यांचा एक पुत्र तरी जिवंत असेल!’’
 
आता कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटणार होते. भीष्मांनी सिंहगर्जना केली, घोषणा केल्या आणि आपला शंख फुंकला. त्याचा आवाज ऐकून सर्वांनी आपापले शंख फुंकले. अर्जुनाच्या रथातून कृष्णाच्या पांचजन्य शंखाचा आवाज ऐकू आला. त्यानंतर अर्जुनाच्या देवदत्त या शंखाचा ध्वनी आला. भीमाने ‘पौंड्र’ नावाचा शंख फुंकला. युधिष्ठिराने अनंतविजय, नकुलाने सुघोष, सहदेवाने मणिपुष्पक आणि नंतर काशीराज, शिखंडी, सात्यकी, धृष्टद्युम्न, विराट, दुपद, अभिमन्यू अशा अनेक महारथींनी आपापले शंख फुंकले. या सर्व शंखांच्या ध्वनींनी धरणी कापू लागली आणि स्वर्गही दुमदुमला...
 
 
 
 
 
- सुरेश कुळकर्णी 
@@AUTHORINFO_V1@@