वाणीचं वरदान...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Mar-2018
Total Views |
 

 
भगवंतानं मानवाला वाणी प्रदान केली आहे. वाणीद्वारे एकमेकांशी संवाद साधला जातो. या वाणीचे चार प्रकार आहेत. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. अशा वाणीच्या प्रकारांमधून भक्ती आकाराला येते. वैखरीमधून फुलणारी वाणी मधुर असली की ती श्रवणीय होऊन जाते. कोमल असली की प्रिय होते. माधुर्य व कोमलता या गुणांनी अलंकृत असली की ती व्यक्तिमत्वाला सौंदर्य प्रदान करते. म्हणूनचं माणसं जोडण्याचं आणि जिंकण्याचं प्रभावी माध्यम म्हणजे मृदू मुलायम वाणी होय.
 
 
प्रेमाचा पाझर हृदयात निर्माण करणारी वाणी संत आणि भगवंताला प्रिय आहे. समाजाला सुसंस्कृत करण्यात तिचा महत्त्वाचा सहभाग आहे. शब्दांची निवड अचूक असली की जीवनाचं गणित बिनचूक होतं. मुखामधून उमटणार्‍या शब्दाला गुळाचा गोडवा असला म्हणजे मुंग्या न बोलावता आपोआप गोळा होतात. त्यामुळे माणसंदेखील जवळ येतात आणि भक्तिमार्गाच्या पाऊलवाटेचा प्रशस्त मार्ग तयार होतो. यामधून समाजाला सुयोग्य आकार देण्याची ताकद सामावली आहे. संत तुकाराम महाराज वाणीचा जपून वापर करावा, असं प्रेमानं सांगतात.
 
बोलल्यानंतर विचारात पडण्यापेक्षा बोलण्याआधी विचार करावा. शब्दांमधून भावना व्यक्त होतात. कठोर शब्दांचा उपयोग केला की दुसर्‍याच्या मनावार घाव बसून जखमा होतात. दुःख देणारी वाणी पापाला जन्म देते, तर सुखावणारी वाणी पुण्याची प्राप्ती करून देते. नात्यांना तोडणारी आणि जोडणारी वाणी. समाजाला सांधणारी एकसंध ठेवणारी वाणी. प्रसन्नतेची शिंपण करणारी वाणी. प्रक्षुब्ध व प्रक्षोभक असणार्‍या शब्दांमधून भावनांचा भडका उडवणारी, अयोग्य दिशेकडे नेऊन, अधःपतन व आत्मघात करणारी वाणी. नानाविध भावना प्रवाहित करणारीही वाणीच.
 
वाणीला भगवंत नामाची गोडी लागली की ती इतरत्र रमतच नाही. सदैव चैतन्यघन परमात्म्याशी संवाद साधून त्याला भूलोकी अवतीर्ण होण्यास सहाय्यक ठरणारी वाणी. गुळचट जिव्हा, गोड नाम भगवंताला भक्ताशी सहजपणानं जोडते. वैखरीमधून भगवंताला हाक मारता मारता, थेट भगवंताच्या हृदयात स्थान निर्माण करते. प्रपंच आणि परमार्थ दोन्ही सुयोग्यपणानं साधणारी वाणी. समर्थ रामदास स्वामींनी प्रभू रामचंद्राकडे मागणं मागीतलं ते म्हणजे-
 
’’कोमल वाचा दे रे राम’’
 
त्यांच्यासारखे संत रामाला म्हणतात की, ’’कोमल वाचा दे.’’ म्हणजे ती कानांतून मनापर्यंत जाईल मनाला रक्तबंबाळ न करता प्रेमाचं गंध लावून, शांतता शीतलता प्रदान करेल. तप्त मनाला शांत करण्याचं काम अशी सुकोमल वाचा करते. कोमलतेमध्ये नाजूकपणाची नजाकत असते. अलवारपणा हळूवारपणानं आरपार झिरपतो. त्यामुळे काठिण्य नाहीसे होऊन मृदूता येते. अशा वाणीमधून रामनामाची वीणा झंकारते. नादमयता प्राप्त होऊन श्रीराम नादावतो. भक्ताला भवसागर तरून जाण्यास सुयोग्य असलेलं कोमल वाचेतून, वाणीतून आलेलं रामनाम होय. श्लोक, स्तोत्र, मंत्र, आरत्यांद्वारे भगवंताला आळवलं की भगवंत लवकर प्रसन्न होतो. आर्तपणानं आरत्या म्हटल्या की भगवंताला भूलोकी आल्याशिवाय राहवत नाही. स्तोत्रामधल्या शब्दांची आशयघनता प्रभावी ठरते. नृसिंहसरस्वती स्वामींच्या स्तोत्रामध्ये भक्त म्हणतो,
 
अनसुयात्मज हे जगपालका,
तुजविणा कुणि ना जगि बालका|
तरी कथी स्मरू मी कवणाप्रति,
शरण मी नरसिंहसरस्वती।।
अर्थात, स्वामी तुम्ही संपूर्ण जगाचे पालक आहात. या संपूर्ण जगतामध्ये मला तुमच्या शिवाय कोणीही नाही, म्हणून मी इतरांचं स्मरण करण्याचा प्रश्र्नच येत नाही. नृसिंहसरस्वती स्वामी मी तुम्हाला संपूर्ण शरण आलो आहे. इतक्या भावपूर्ण स्तोत्राद्वारे आपल्या भावना भक्ताने व्यक्त केल्या आहेत. वाणीमधून प्रकट होणारे शरणागताचे भाव, स्वामींपर्यंत तात्काळ पोहोचल्याशिवाय राहणं शक्य नाही. भगवान दत्तात्रेयांचा प्रभावी मंत्र म्हणजे-
‘‘दिगंबर दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’’
 
हा मंत्र भक्तांना तारक असणारा आहे. याच्या जपाने पापीदेखील पुण्यवान होतात. कोणत्याही संकटामधून सोडवणारा हा मंत्र आहे. जो अखंड हा मंत्रजप करतो त्याची वाणी शुद्ध होऊन जाते. त्याची स्पंदनं सर्वत्र पसरतात. वाईट, नकारात्मक शक्ती दूर होते. सकारात्मक, दैवी स्पंदनांची शक्ती जाणवू लागते. वातावरण भारुन टाकते. त्यामुळे दुष्टता दूर जाऊन लौकिक आणि पारलौकिकामधील कोणतीही गोष्ट प्राप्त होते. भोग आणि योग प्रदान करणारे दत्तप्रभू भक्तापाशी नित्य वास करतात. व्यक्तीपासून ते संपूर्ण समाजापर्यंत वाणीचा नाद निनादतो. भयमुक्त करुन भगवंतापर्यंत भक्तिभाव पोहोचवण्याचं सामर्थ्य वाचेमध्ये, वाणीमध्ये असल्याची अनुभूती येते. अंतर्मनाशी विश्वमनाचा संवाद साधला जातो. या दोघांचा संवाद साधणारी वाणी मानवाला देऊन त्याला उपकृत केलेलं आहे. जन्ममरणाच्या फेर्‍यामधून मुक्त होण्याची ताकद व शक्ती त्यामध्ये आहे. याची जाणीव झाली की जागृती लवकर होते. ती लवकरात लवकर व्हावी यासाठीच सकल संतांनी सदैव प्रयत्न केले. स्वआचरणामधून त्याचं महत्त्व, महती पटवून दिली. वाणीचं वरदान मुक्तीपर्यंत घेऊन जातं. त्याचा सुयोग्य आणि सत्वर उपयोग करुन घेऊन, नरजन्माचं सार्थक करुन घेण्याचा संदेश संत देतात. मग आपण आत्तापासूनच त्याचा लाभ घ्यायला प्रारंभ नको का करायला?
 
 
 
- कौमुदी गोडबोले 
 
@@AUTHORINFO_V1@@