संविधान अभ्यासवर्ग
महा एमटीबी   28-Mar-2018
 
 
 
‘घटना रक्षती रक्षत’ असा महामंत्र देणारी ‘संविधान’ या विषयाचा सर्वांगाने सर्वार्थाने विचार करायला लावणारा दोन दिवसांचा अभ्यासवर्ग समरसता अध्ययन केंद्रातर्फे दिनांक २४ मार्च आणि २५ मार्च रोजी मुंबईच्या यशवंत भवन येथे आयोजित करण्यात आला होता. अखिल भारतीय समरसता गतविधी प्रमुख शामाप्रसाद हे पुर्णवेळ कार्यशाळेमध्ये उपस्थित होते. संविधान निर्मिती, संविधानाची अंमलबजावणी, व्याप्ती, संविधानासंबंधिचे विशेष पैलू, समज गैरसमज यावर मान्यवरांनी अभ्यासपूर्ण संदर्भ-माहिती दिली. या कार्यशाळेचा वृत्तांत आपल्या समोर..
 
तथागत गौतम बुद्धाला एका भिकार्‍याने विचारले की, ’’मी भिकारी आहे. गरीब आहे. असे का?’’ यावर गौतम बुद्ध म्हणाले, ’’कारण तू कुणालाही काहीही देत नाहीस.’’ यावर भिकारी म्हणाला, ’’मी तर स्वतःच गरीब आहे, मी कोणाला काय देणार?’’ गौतम बुद्ध म्हणाले ,’’तू गरीब नाहीस. तुझ्याकडे देण्यासारखे खूप काही असतानाही तू देत नाहीस. तू कुणाला स्मितहास्य देऊ शकतोस, कुणाशी दोन गोड शब्द बोलू शकतोस, सर्वात महत्त्वाचे म्हणजे तू दुसर्‍या व्यक्तीला विचार देऊ शकतोस. ही खरी श्रीमंती आहे. तू भिकारी नाहीस.’’ तथागत गौतम बुद्धांनी विचार देऊन श्रीमंत होण्यासाठीचा मार्ग सांगितला आहे. आपणही समाजाला विचार देऊन श्रीमंत होऊ, हा विचार आपल्या राज्यघटनेचा. माझ्या मते घटना हा एक विचार आहे. हा
 
सर्वोत्तम विचार आपण सगळ्यांनी समजून घेऊन सगळ्यांना समजावूया.’’
 
समरसता अध्ययन केंद्राचे आणि शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे शांत, संथ लयीत घटनेच्या विचारांवर मत व्यक्त करत होते आणि समोरचे सुजाण आणि जागरूक श्रोते मन:पूर्वक होऊन ऐकत होते. कारण संविधानासंबंधी ‘संविधान बचाओ’, ‘संविधान रॅली’ वगैरे वगैरे गोष्टी आज सर्वजण पाहत असतात. त्या पार्श्‍वभूमीवर यशस्वी उद्योगपती असलेल्या डॉ. हावरेंनी संविधानाच्या विचारांवर भाष्य केले होते.
 
‘संविधान’ विषयाच्या कार्यशाळेत ‘संविधानाची तोंडओळख’ या सत्रात ते मत व्यक्त करत होते. त्यांच्या आधी विचारवंत आणि ज्यांच्या बुद्धीची चमक स्वतंत्रच म्हणावी लागेल, अशा रमेश पतंगेंनी संविधान कार्यशाळेचे बीजभाषण केले होते. रमेश पतंगे हे समरसता अध्ययन केंद्राचे संचालक आणि मार्गदर्शकही. संविधानाची स्वतंत्र भारताला गरज काय होती आणि आहे, यावर त्यांनी प्रकाश टाकला. संविधानामध्ये दिलेल्या उद्देशिकेवर मार्मिक भाष्य करत पतंगे म्हणाले की,’’घटनेत ’आम्ही लोक’ असा का उच्चार असतो? ‘आम्ही, आमचा देश’ असा का उल्लेख नसतो? कारण, दुर्देवाने आम्ही जातीच्या कुंपणात होतो. ते कुंपण सारून आम्ही ‘लोक’ म्हणून एकत्र आलो आहोत, आता एकत्र आलेल्या लोकांनी एक राष्ट्रीय भावना असलेले घटक व्हायचे आहे. याचाच अर्थ ‘कम्युनिटी ते पीपल’ प्रवास झाला आहे आता ‘पीपल ते नेशन’ प्रवास सुरू आहे. ११ व्या शतकात परकीय आक्रमकांनी दिल्ली जिंकली, मग सातत्याने आक्रमणे होत राहिली. शेवटी ११ व्या शतकानंतर १९ व्या शतकाच्या मध्यार्धात आम्ही दिल्ली पुन्हा जिंकली. या कालखंडात आपल्या भारतीयांची मनोवृत्ती कशी झाली असेल? आपले स्वतंत्र स्वतःचे राज्य सर्वांनी मिळून चालवण्यासाठी एक मध्यवर्ती संकल्पना, यंत्रणा हवी होती. त्यासाठी राज्यघटनेची निर्मिती आवश्यक होती. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, ’’सांस्कृतिकदृष्ट्या भारत एक आहे. भारतात अनेक जाती असल्या तरी सर्वांना बांधणारी एक खोल संस्कृती आहे. तिला धक्का लावू इच्छित नाही.’’ घटना त्याचे प्रतिबिंब आहे, असे सांगून पतंगेंनी संविधाननिर्मितीच्या वेळी भारताची परिस्थिती कशी होती, यावर मत मांडले. ते म्हणाले, ’’एका भारतातच दोन भारत होते. एक भारत नुकताच इंग्रजांपासून स्वतंत्र झालेला तर दुसरीकडे अजूनही ५५६ संस्थानिक. जाताना इंग्रज त्यांना संभ्रमित करून गेले की, स्वतंत्र भारतात सामील व्हायचे की नाही हा सर्वस्वी तुमचा निर्णय असेल. त्यामुळे हे संस्थानिक आणि उर्वरित भारत असे दोन भारत. दुसरीकडे जातीपातीत विभागलेला भारत, त्याचबरोबर भाषाभेदात अडकलेला भारत अशी आपल्या देशाची स्थिती होती. या सर्वांचा संघर्ष टाळत समन्वय साधत एक राष्ट्र म्हणून उभे राहताना संविधान महत्त्वाची भूमिका निभावते. संविधानामध्ये कॉंग्रेसची महत्त्वाची भूमिका मान्य करताना आणि ती विशद करताना त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातल्या कॉंग्रेसचे मोठेपण कबूल केले. मात्र हे सांगण्यासही ते विसरले नाहीत की, ‘‘स्वातंत्र्यपूर्व कॉंग्रेस ही राष्ट्रीय कॉंग्रेस होती. आज जी कॉंग्रेस आपण पाहतो ती कॉंग्रेस ती नव्हती. आजची कॉंग्रेस राष्ट्रीय नाही तर राजकीय आहे.’’
 
संविधान निर्मिती करणार्‍यांबाबत विचारवंत ब्रायन ऍन्थोनी काय म्हणतात हे सांगताना पंतगेंचा स्वर मिश्किल झाला, पण त्या मिश्किल स्वरामधला अभिमान आणि आनंद लपत नव्हता. ते म्हणाले, ’’ब्रायन म्हणतात की, घटना समितीचे सर्व सदस्य कॉंग्रेसचे सदस्य आहेत मात्र अध्यात्मिकदृष्ट्या ती सर्व आरएसएसचीच माणसे आहेत’’ पतंगेंनी केलेल्या विधानाने सभागृहात एक वेगळेच तरंग उमटले. कारण १९४६ साली रा. स्व. संघाची ताकद काही मोठी नव्हती, तरीसुद्धा प्रभाव केवढा की देशाबाहेरील विचारवंतांनाही या देशप्रेमी विचारधारेची दखल घ्यावी लागली. एखाद्या माणसाच्या ज्ञानाची कक्षा किती असू शकते, याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणते पतंगेंचे हे बीजभाषण होते. अमेरिकन राज्यघटना, ब्रिटनची अलिखित राज्यघटना आणि पाकिस्तानची ‘अल्ला सार्वभौम है’ म्हणत दुहीची बीजे पेरत बांगलादेशची निर्मिती करणारी राज्यघटना या सर्वांचा ऊहापोह त्यांनी बीजभाषणात केला. संविधानासंबंधीची सर्वोत्तम पुस्तके कोणती आहेत? त्याचा अभ्यास आपण का करायला हवा? याबाबतही त्यांनी महिती दिली. संविधानाचा एकूण बाज तांत्रिक दृष्टीने कायद्यावर आधारित आहे, पण त्या संविधानाचा आत्मा समरसता भाव आहे, हे सांगण्यास पतंगे विसरले नाही. एकंदर कार्यशाळेची सुरुवातच विलक्षण अभ्यासपूर्ण झाली होती. अर्थात राष्ट्रीय वैचारिक लेखन आणि चिंतन करण्यात पतंगेंचं आयुष्य गेल्यामुळे त्यांनी इतके श्रीमंत वैभवशाली वैचारिक मांडणे यात काही आश्‍चर्य नव्हते. पण, त्यांच्यानंतर ‘संविधान’ विषयावर आपले मत मांडणार्‍या वक्त्यांची जबाबदारी मात्र वाढली होती. पतंगे यांच्या बीजभाषणानंतर अत्यंत महत्त्वपूर्ण सत्रे पार पडली.
 
डॉ. हावरे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये भरपूर मार्मिक लोककथांचा वापर केला होता. राज्यघटनेतली तत्त्वे कशी आहेत हे सांगताना ते म्हणाले की, ’’एक मोटू आणि एक पतलू उन्हात धावत होते. दोघांनाही उन्हाची गरज होती. पण मोटू धावत होता पतलू होण्यासाठी, तर पतलू धावत होता सशक्त होण्यासाठी. याचाच अर्थ दोघेही सर्वच स्तरावर भिन्न. त्यांना उन्हाची गरज होती, पण त्या गरजपूर्तीची कारणं वेगवेगळी होती. आपली राज्यघटना आणि तिचे दैनंदिन जीवनातले महत्त्वही असेच आहे.’’ राज्यघटनेमध्ये आहे तरी काय हे प्रत्यक्ष दाखविण्यासाठी भाषण करताना डॉ. हावरेंनी सोबत राज्यघटनाही ठेवली होती. ही राज्यघटना देवाच्या आणि महामानवाच्या पवित्र तसबिरींसारखी आपल्या घरात विराजमान असायला हवी, असा त्यांनी ठाम आग्रह केला. त्यानंतर प्रश्‍नोत्तराचा तास झाला. श्रोत्यांची मानसिकता डॉ. हावरेंना प्रश्‍न विचारताना पूर्णतः बदललेली होती. कित्येक प्रश्‍न तर अर्थकारण आणि संविधान यावरचेच होते. अर्थात विषयांतर होतेच, पण त्यातही एक मनोरम पैलू होता की, संविधानाचा विचार या अंगानेही होऊ शकतो.
 
त्यांनतर दीपक जेवणे यांनी ’भारताचा संवैधानिक इतिहास’ मांडला. त्यांच्या साध्या सरळ मनाला भिडणार्‍या बोलण्याने विषय स्पष्ट होत होता. त्यानंतर प्रा. डॉ. सुवर्णा रावळ यांनी ‘आरक्षण, संविधानातील कायद्यांमधील बदल आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे’ हा अभ्यासपूर्ण विषय मांडला. संध्याकाळचे अॅड. किशोर जावळे यांचे ’धर्मनिरक्षेपता आणि संविधान’ या विषयावरचे मार्गदर्शन म्हणजे श्रोत्यांसाठी पाहणे आणि ऐकणे या दोन्हींचाही सुरेख संगम होता. दुसर्‍या दिवशीच्या पहिल्या सत्रात प्रा. श्याम अत्रेंनी ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान’ या विषयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध भाषणांचे संदर्भ वाचून दाखवले. दुसर्‍या सत्रात भीमराव भोसले यांनी ‘राज्यघटना आणि सामाजिक न्याय’ या विषयाला विशिष्ट उंची देत, अस्खलित इंग्रजीतून मांडणी केली. त्यानंतर अॅड. दादासाहेब बेंद्रे यांनी ’महत्त्वाचे संवैधानिक निवाडे’ यावर महत्त्वपूर्ण विषयमांडणी केली. एखादा वक्ता किती सोज्वळ पण सालंकृत भाषेत विषय मांडू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे दादासाहेबांची विषय मांडणी होती. मला विचाराल तर बेंद्रेंचे भाषण म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या दुधातल्या गोड किसमिससारखे होते.
 
या कार्यशाळेचा समारोप मधुभाई कुलकर्णी या समरसतेच्या दूताकडून झाला. समारोपात त्यांनी श्रोत्यांना आवाहन केले की, आज राज्यघटनेच्या ज्या मार्गदर्शक तत्त्वांची सर्वांगाने ओळख झाली आहे. ती तत्त्वे आम्ही आमच्या प्रत्यक्ष जीवनात उतरवायला हवीत. राज्यघटना वस्ती पातळीवर अगदी अंत्यज स्तरावर कशी पोहोचेल यावर कल्पकतेने योजना आखून त्यावर कारवाई करायला हवी. हे सांगत असताना त्यांनी धारावीच्या एका घटनेचा उल्लेख केला. ते म्हणाले, ’’एक स्वयंसेवक बालकाच्या घरी गेले असता, शेजारी राहणारा बाल स्वयंसेवकही तिथे आला. ज्या घरी गेले होते तिथल्या मातेने चहा बनवला. सगळ्यांनी चहा घेतला. मात्र तिने शेजारच्या घरातल्या बालकाला चहा दिला नाही. ती म्हणाली,’’तू चहा पिऊ शकत नाहीस. असे का? विचारल्यावर तिने उत्तर दिले, ’’आमची जात जनावरांच्या कातडे सोलणार्‍यांची आहे आणि या मुलाची जात आमच्यापेक्षा उच्च आहे. ते कमावलेल्या कातड्याचे जोडे बनवतात. आमच्या घरी चहा प्यायला तर तो बाटेल आणि आम्हालाही पाप लागेल. भयंकर आणि दुःखद घटना,’’ हे सांगताना मधुभाईंचा आवाज कापरा झाला होता. चेहर्‍यावर वेदना स्पष्ट उमटली होती.
 
एखादी सामाजिक परिवर्तनाची वैचारिक कार्यशाळा कशी असावी, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही कार्यशाळा होती. यामागे रमेश पतंगे यांचे वास्तवावर आधारित मार्गदर्शन जितके महत्त्वाचे होते तितकेच दीपक जेवणे, सूर्यकांत गायकवाड या समरसता अध्ययन केंद्राच्या पदाधिकार्‍यांची मेहनत तसेच समसरता गतविधीचे कोकण प्रांत संयोजक नागेश धोंडगे, रवींद्र गोळे, अशोक कांबळे,विश्‍वनाथ सुतार, आणि नेहमीच गतिशील सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्‍या इतर अनेक कार्यकर्त्यांच्या यशस्वी सहभागातून ही कार्यशाळा समाजाच्या सकारात्मक परिवर्तनासाठी काम करणार्‍या सज्जनशक्तीसाठी एक मैलाचा दगड नव्हे हिमालय होती, हे नक्कीच.
 
रमेश पांडव यांनी दुर्गादास बसू यांच्या ’इंट्रोडक्शन टू दी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया’, सपना आचरेकर यांनी ’झिया मोदी टेन जजमेंट दॅट चेंज्ड इंडिया’, तर योगिता साळवी यांनी ’भारतीय राज्यघटना : राष्ट्राची कोनशिला’ (मूळ लेखक ग्रॅनव्हिल ऑस्टिन भाषांतर भारती केळकर) या पुस्तकांचे परीक्षण सादर केले.
 
 
- योगिता साळवी