वसुंधरेचे हितचिंतक
महा एमटीबी   28-Mar-2018
 
 
अल्बर्ट आईनस्टाईन असोत वा स्टीफन हॉकिंग, वास्तविक हे ‘पर्यावरणवादी’ नव्हेत. ते होते खगोलशास्त्रज्ञ. पृथ्वीच्याही पलीकडे जाऊन अब्जावधी किलोमीटर लांबच्या अवकाशाचा अभ्यास करणारे. पण या दोन्ही शास्त्रज्ञांचं वैशिष्ट्य असं की, काही प्रकाशवर्षं दूरच्या विश्वाचा विचार करताना पृथ्वीशी त्यांनी नाळ तोडली नाही. त्यांची बुद्धी आणि विचार हे विश्वव्यापी होते; पण पाय मात्र जमिनीवर होते.
 
हा लेख वाचताना वाचकांना अशी शंका येणं स्वाभाविक आहे की, ‘वसुंधरा’ या पर्यावरणविषयक पानावर आईनस्टाईन आणि स्टीफन हॉकिंग हे शास्त्रज्ञ कशासाठी? या शास्त्रज्ञांचा पर्यवरणाशी संबंध काय? पूर्ण लेख वाचताना याचं उत्तर मिळत जाईल. गेल्याच आठवड्यात खगोलशास्त्राच्या बाबतीत अल्बर्ट आईनस्टाईन यांच्या बरोबरीनेच ज्यांचं नाव घेतलं जातं ते जगद्विख्यात खगोलशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचं निधन झालं. गॅलिलिओपासून सुरू झालेल्या खगोलशास्त्रज्ञांच्या परंपरेतले स्टीफन हॉकिंग हे वर्तमानकालीन उमेदवार होत. स्टीफन हॉकिंग हे एक गूढ होतं. हाताची दोन बोटं आणि मेंदू हे दोनच अवयव कार्यक्षम असताना विश्वाचं कोडं उलगडण्याचा प्रयत्न करणं, त्याचे वेगवेगळे गणिती सिद्धांत मांडणं, ही सर्वसामान्य माणसांसाठी अजब गोष्ट होती. अल्बर्ट आईनस्टाईन असोत वा स्टीफन हॉकिंग, वास्तविक हे ‘पर्यावरणवादी’ नव्हेत. ते होते खगोलशास्त्रज्ञ. पृथ्वीच्याही पलीकडे जाऊन अब्जावधी किलोमीटर लांबच्या अवकाशाचा अभ्यास करणारे. पण या दोन्ही शास्त्रज्ञांचं वैशिष्ट्य असं की, काही प्रकाशवर्षं दूरच्या विश्वाचा विचार करताना पृथ्वीशी त्यांनी नाळ तोडली नाही. त्यांची बुद्धी आणि विचार हे विश्वव्यापी होते; पण पाय मात्र जमिनीवर होते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाकडे माणसासमोरच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं नाहीत; पृथ्वीवर मानवजातीचं अस्तित्व जास्तीत जास्त काळ टिकावं आणि आपापसांतले संघर्ष कमी होऊन प्रेमभाव वाढावा ही दुर्दम्य इच्छाशक्ती या शास्त्रज्ञांनी वेळोवेळी व्यक्त केली. ‘काही प्रश्नांचं मूळ हे मानवी वृत्तीमध्ये आहे आणि जोपर्यंत माणूस आपली वृत्ती बदलत नाही तोपर्यंत जग सुखी आणि शाश्वत होणार नाही; माणसाने आपली स्वार्थी, आक्रमक वृत्ती बदलली नाही तर पृथ्वीचा विनाश अटळ आहे, हे आईनस्टाईन-हॉकिंगसारख्या खगोलवैज्ञानिकांनी सांगणं ही गोष्ट नक्कीच विचार करायला लावणारी आहे.
 
आज जगासमोर असलेली दोन मोठी संकटं आहेत. पहिलं म्हणजे पर्यावरण र्‍हास आणि दुसरं म्हणजे अणुयुद्धाचा धोका. हे दोन्ही धोके टाळू शकणारी एकमेव गोष्ट म्हणजे मानवी वृत्ती. म्हणूनच आईनस्टाईन आणि स्टीफन हॉकिंग या ‘वसुंधरेच्या हितचिंतकांचे’ संदेश आजच्या काळात उद्बोधक ठरतात. अल्बर्ट आईनस्टाईन यांच्या काळात पर्यावरणीय धोके एवढे लक्षात आलेले नव्हते. मात्र अण्वस्त्रांच्या निर्मितीमुळे एक भीषण संकट उभं राहिलं होतं. १९१५ साली मांडलेल्या व्यापक सापेक्षता सिद्धांतामुळे आईनस्टाईन शास्त्रज्ञ म्हणून सर्वप्रथम जगासमोर आले. १९१६ साली त्यांनी गुरुत्वीय लहरींची संकल्पना मांडली जी शंभर वर्षांनी म्हणजे २०१६ साली प्रत्यक्ष प्रयोगाने सिद्ध झाली. त्यांच्या फोटोएलेक्ट्रीक ईफेक्टच्या सिद्धांतावर आज सौरऊर्जा आणि कॅमेर्‍यांसारख्या मानवी उपयोगाच्या वस्तू निर्माण झाल्या. त्यांचं वस्तूमान आणि उर्जा यांचं परस्परांमध्ये रूपांतरण होण्याचं सूत्र E=mc2 हे क्रांतिकारी ठरलं आणि यातून आण्विक उर्जेचा जन्म झाला. हा काळ होता १९३० च्या सुमाराचा. मानवी वृत्तीच अशी आहे की, कुठलीही नवीन गोष्ट हातात मिळाली की ती सर्वप्रथम त्याचा गैरवापर करते. अण्वस्त्र किती संहारक ठरू शकतात याची प्रचिती १९४५ साली सगळ्या जगाला आली. आईनस्टाईन स्वत: या सगळ्याबाबत प्रचंड बेचैन होते. अणुयुद्धापासून राज्यकर्त्यांना परावृत्त करण्यासाठी आईनस्टाईननी जिवाचं रान केलं. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट यांना वारंवार पत्र लिहून आईनस्टाईन अणुतंत्रज्ञानाच्या धोक्यांबाबत सावध करत होते. युद्धविरोधी विचार जगभर पसरवण्यासाठी त्यांनी जगातील सर्व शास्त्रज्ञांना एकत्र करून परिषदा भरवण्याची योजना आखली होती. जगातील सर्व राष्ट्रांनी शस्त्रत्याग करावा असे आवाहन करणार्‍या जाहिरनाम्याचा त्यांनी पुरस्कार केला. ज्या काळात आईनस्टाईन अमेरिकेत हे सगळं करत होते त्याच काळात भारतात गांधीजी ब्रिटिशांविरूद्धचं अहिंसक आंदोलन चालवत होते. गांधीजींच्या या अभिनव प्रयोगाने आईनस्टाईन प्रचंड भारावून गेले होते. ‘‘गांधींसारखा माणूस पृथ्वीतलावर होऊ शकतो ही गोष्टच अविश्वसनीय आहे,’’ हे आईनस्टाईन यांचं वाक्य आहे. आईनस्टाईन ज्यू अत्याचारविरोधी चळवळींमध्ये सक्रिय होते. त्यावेळी ज्यू विद्यापीठात व्याख्यान देताना गणिती समीकरणांबरोबर गांधीजींच्या मार्गाचीही त्यांनी स्तुती केली आहे.
 
आईनस्टाईनना एकदा विचारण्यात आलं होतं की, पहिल्या महायुद्धात बंदुका वापरण्यात आल्या होत्या; दुसऱ्या महायुद्धात अणुबॉम्ब वापरले गेले, आता तिसऱ्या महायुद्धात कुठली शस्त्रे वापरली जातील? यावर आईनस्टाईननी दिलेलं उत्तर फार मजेशीर आहे. ते म्हणाले, ''तिसऱ्या महायुद्धात कुठली शस्त्रे वापरली जातील ते सांगता नाही येणार पण चौथ्या महायुद्धात मात्र नक्की दगड आणि काठ्याच वापराव्या लागतील !'' आईन्स्टाईन यांच्या मृत्यूच्या थोडेच दिवस आधी ९ जुलै १९५५ ला अल्बर्ट आईन्स्टाईन आणि बर्ट्रांड रसेल यांनी युद्ध टाळण्याचा प्रचार करणारा एकजाहीरनामा प्रसिद्ध केला ज्याला 'रसेल- आईन्स्टाईन मॅनिफेस्टो' म्हणतात. ज्यांच्या संशोधनाच्या आधारावर अण्वस्त्रनिर्मिती झाली तेच आईनस्टाईन शेवटच्या श्वासापर्यंत अण्वस्त्रांना विरोध करत राहिले.
 
 

 
आईन्स्टाईनच्या काळात अणुयुद्ध हेच एक जागतिक संकट होतं. आजही अणुयुद्धाचा धोका आहेच पण भरीस भर म्हणून पर्यावरण ऱ्हास हे आणखी एक जागतिक संकट उभं राहिलं आहे. जागतिक तापमान वाढ ही गोष्ट खरी आहे की नाही यावरून मतमतांतरं आहेत. पण स्टीफन हॉकिंग हे जागतिक तापमानवाढीचे पुरस्कर्ते होते. कृष्णविवरांवर संशोधन करणारे स्टीफन हॉकिंग ग्लोबल वॉर्मिंगचे धोके आक्रमकपणे मांडत राहिले. २०१५ साली जागतिक तापमान वाढ कमी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना आखण्यासाठी पॅरिस येथे झालेल्या परिषदेत जागतिक करार करण्यात आला ज्यावर अमेरिकेसहित १९५ देशांनी सह्या केल्या होत्या. पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे ग्लोबल वॉर्मिंग वगैरे गोष्टी खोट्या आहेत असं मानतात. त्याप्रमाणे जून २०१७ मध्ये ट्रम्प यांनी पॅरिस करारातून अमेरिका बाहेर पडत असल्याची घोषणा केली. स्टीफन हॉकिंग यांनी ट्रम्प यांच्या निर्णयावर कडाडून टीका केली. बीबीसी न्यूजला दिलेल्या एका मुलाखतीत स्टीफन म्हणतात, ''ट्रम्प यांच्या या कृत्यामुळे आपल्या पृथ्वीची अवस्था अडीचशे अंश सेल्सियस तापमान असलेल्या आणि सल्फ्युरिक ऍसिडचा पाऊस पडत असलेल्या शुक्रासारखी होईल; माणसाच्या आटोक्यात असलेला पर्यावरणल ऱ्हास स्वार्थी वृत्तीमुळे अटळ होत चालला आहे; त्यामुळे पुढील शंभर वर्षांत माणसाला पृथ्वी सोडून दुसरा ग्रह शोधायला लागेल.'' सकृतदर्शनी हॉकिंग यांची विधानं अतिशयोक्तीपूर्ण वाटतात पण दुर्लक्ष्य करण्यासारखी मात्र निश्चितपणे नाहीत. २०१० साली 'बिग थिंक पोर्टल' ला दिलेल्या मुलाखतीत हॉकिंग म्हणतात, ''मानवी सभ्यता सध्याच्या युगातून अतिशय खतरनाक अशा कालखंडात प्रवेश करते आहे. पर्यावरण रक्षणासाठी मानवी सभ्यतेजवळ कोणतीच तांत्रिक क्षमता नाही. मानवी सभ्यतेला असणारा हा धोका मला स्पष्टपणे जाणवतो आहे. त्यामुळे आपल्याला अगदी जपून पावलं टाकावी लागतील.''
 
पर्यावरणाच्या बाबतीत दोन मतप्रवाह आहेत. एक तंत्रज्ञानावर विश्वास ठेवणारा आहे तर दुसरा मानवी वृत्ती बदलण्याचा अट्टाहास धरणारा. स्वच्छ आणि हरित तंत्रज्ञानच जागतिक तापमानवाढीच्या प्रश्नावर मात करू शकेल असं एक गट म्हणतो तर माणसाची भौतिक सुखोपभोगाची हाव आणि एकमेकांवर कुरघोडी करण्याची राष्ट्रांची प्रवृत्ती बदलत नाही तोपर्यंत कुठलंही तंत्रज्ञान पृथ्वीला वाचवू शकत नाही, असा दुसरा मतप्रवाह आहे. आईन्स्टाईन आणि हॉकिंग हे दुसऱ्या मतप्रवाहाचे पुरस्कर्ते होते. आईन्स्टाईन यांनी म्हटलं आहे की, “you can’t solve the problem with the same mindset which has created it’’ जी मनस्थिती समस्या निर्माण करते तीच मनस्थिती समस्या सोडवू शकत नाही. ज्या आक्रमक प्रवृत्तीमुळे वसुंधरेसमोर संकटं निर्माण झाली आहेत ती प्रवृत्ती बदलल्याशिवाय ही संकटं टळू शकत नाहीत. ज्या आक्रमक प्रवृत्तीमुळे वसुंधरेसमोर संकटं निर्माण झाली आहेत ती प्रवृत्ती बदलल्याशिवाय ही संकटं टळू शकत नाहीत. विश्वाचा पसारा अमर्याद आहे. विश्वातले हजारो ग्रहतारे, सूर्यमाला, आकाशगंगा यांच्या पसाऱ्यात आपण मुंगीएवढेसुद्धा नाही. तरीही आपण 'तुझं-माझं' करत एकमेकांशी भांडत असतो, याला काही अर्थ आहे का? हे मूलभूत शहाणपण जेव्हा येईल तेव्हाच पृथ्वीवर माणूस आणि निसर्ग यांचं शांततापूर्ण सहजीवन शक्य होईल.
 
 
 
- हर्षद तुळपुळे