शीतयुद्धाची नांदी?
महा एमटीबी   28-Mar-2018
 
 
 
रवींद्र कौशिक हे नाव आपल्यापैकी फार कमी जणांना माहीत आहे. रवींद्र कौशिक हा ’रॉ’ या भारतीय गुप्तचर संस्थेचा गुप्तहेर होता. ’रॉ’कडून प्रशिक्षण घेऊन तो पाकिस्तानात गेला. तिथून त्याने वकिलीचे शिक्षण पूर्ण केले आणि पाकिस्तानी सैन्यात सामील झाला. पाकिस्तानी सैन्यात सामील झाल्यावर त्याने पाकिस्तानी सैन्याच्या आतल्या गोटातील अतिशय महत्त्वाची माहिती भारतीय गुप्तहेर संस्थांना देण्यास सुरुवात केली. याचा बराच फायदा भारतीय सैन्याला झाला, पण एके दिवशी त्याचे बिंग फुटले आणि पाकिस्तानी सैन्याने त्याच्यावर कारवाई केली. आधी त्याला मृत्यूदंड ठोठावला गेला. पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तरी पाकिस्तानी सैन्याने त्याचा अतोनात छळ केला आणि २००१ साली त्याचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर भारतीय सरकारने त्याचा मृतदेहही ताब्यात घेण्यास नकार दिला. परिणामी त्याचा मृतदेह तुरुंगातच पुरला गेला, तर ही अवस्था असते गुप्तहेरांची. त्यांचे आयुष्य हे त्यांचे आयुष्य नसतेच. जे काही यश असेल ते देशाचे आणि जे काही अपयश असेल ते स्वतःचे. आता या सगळ्याची उजळणी करण्याचे कारण असे की, नुकतेच ट्रम्प सरकारने अमेरिकेतील रशियाच्या ६० राजदूतांना हाकलवून देण्याचे आदेश दिले आहेत. ट्रम्प यांनी ही कारवाई करण्यामागचे कारण सांगितले की, १०० हून अधिक रशियन राजदूत अमेरिकेत हेरगिरी करत आहेत. हीच कारवाई ब्रिटन, कॅनडा आणि युरोपीय देशांनीही केली.
 
अमेरिका, ब्रिटन आणि इतर अशा १८ देशांनी मिळून १०० रशियन राजदूतांना निष्कासित केले आहे. ही कारवाई करण्यामागचे मुख्य कारण ४ मार्च रोजी रशियन गुप्तहेरांनी स्क्रिपल आणि त्याच्या ३३ वर्षीय मुलीला विष देऊन मारण्याचा केलेला प्रयत्न. रशियाच्या ‘नर्व्ह एजंट’ने हे दुष्कार्य केल्याचे म्हटले जाते. स्क्रिपल हा रशियन सैन्याचा माजी अधिकारी आणि नंतर त्याने रशियाची माहिती ब्रिटनला विकली. या माहितीसाठी त्याला एक लाख डॉलर रुपये मिळाले. त्यासाठी रशियाने त्यावर कारवाई करत त्याला जेरबंद केले. पण, नंतर २०१० साली अमेरिका आणि रशियात गुप्तहेरांच्या बदल्यात आपले गुप्तहेर सोडण्याचा करार झाला. या गुप्तहेरांमध्ये स्क्रिपलचाही समावेश होता. स्क्रिपल नंतर इंग्लंडमध्ये जाऊन स्थायिक झाला, पण रशियाचा इतिहासाच हा असा रक्तरंजित आणि थंड रक्ताने विरोधकांच्या नायनाटाचा आहे. या आधी निकोलाई ग्लुसकोव्ह या ६८ वर्षीय रशियन व्यापार्‍यावरही संशयास्पद विषप्रयोग झाला आणि त्यांचा त्यात मृत्यू ओढवला. या अशा घटना घडल्यामुळे ब्रिटन खवळला आणि त्यांनी रशियाच्या राजदूतांना घरचा रस्ता दाखवला.
 
ब्रिटनने सरळ पुतीन यांच्यावर दोषारोप ठेवत भाष्य केले की, पुतीन यांनीच स्क्रिपल आणि त्यांच्या मुलीला मारण्याचा आदेश दिला असावा. दुसर्‍या महायुद्धानंतर ब्रिटनमध्ये अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे. भारताने अजून तरी रशियन राजदूतांवर कुठलीही कारवाई केलेली नाही. भारताचे रशिया आणि अमेरिकेशी आता चांगले संबंध आहेत. शीतयुद्धात भारताने जरी अलिप्ततावादाचे धोरण स्वीकारले होते तरी भारताचा कल हा सोव्हिएत रशियाकडे होता आणि अमेरिकेकडे आपण संशयाने पाहत होतो. पण, आता २१व्या शतकात दोन्ही देशांशी भारत आपले संबंध वृद्धिंगत करत आहे. तरी हे प्रकरण वाटते तितके सोपे दिसत नाही. १९९१ साली संपलेल्या शीतयुद्धाची ही नांदी तर नाही ना? जगात आपले वर्चस्व असावे यासाठी अमेरिका आणि रशियातील रस्सीखेच सर्वज्ञात आहे. आता त्यासाठी रशियाची नाकेबंदी करण्यासाठी अमेरिकेने रशियन राजदूतांना काढून टाकले. हेच कार्य युरोपीयन राष्ट्रांनीही केले आहे. यामुळे अमेरिकाप्रणीत आणि रशियनप्रणित राष्ट्र अशी विभागणी अजून तरी झालेली दिसत नाही. रशियानेही ब्रिटनच्या विरोधात जशास तसे उत्तर द्यायचे ठरवले असे दिसते कारण, ब्रिटनचे २३ राजदूत रशियात आहेत. यांनाही रशिया घरी पाठविण्यास मागेपुढे पाहणार नाही.
 
 
 
 
- तुषार ओव्हाळ