केरळच्या अम्मारुपी धन्वंतरी....
महा एमटीबी   28-Mar-2018
 

 
सर्पदंश, विंचूदंश झाल्यावर जंगलातल्या अनेक जडीबुटींच्या मदतीने रामबाण उपाय करून मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढून लक्ष्मीकुट्टी ऊर्फ अम्मांनी अनेकांना जीवनदान दिले आहे.
 
केरळमधल्या तिरूवनंतपुरम जिल्ह्यातील कल्लार गावामध्ये राहणार्‍या ७५ वर्षीय लक्ष्मीकुट्टी या आदिवासी ’कानी’ समाजाच्या. आठव्या इयत्तेपर्यंत शिक्षण झालेल्या लक्ष्मीकुट्टी यांचं पुस्तकी ज्ञान फारसं नसलं तरी पाचशेहून अधिक वनौषधींचा खजिना त्यांनी काळजीपूर्वक जपून ठेवला आहे. लक्ष्मीकुट्टी या जडीबुटी आणि वनषौधींचा वापर करून त्यापासून औषध तयार करण्याचे कामकरतात. जंगल तसेच डोंगरदर्‍यांमध्ये राहणार्‍या विषबाधा झालेल्या हजारो वनवासींवर त्यांनी उपचार केले आहेत. खरंतर जंगलामध्ये वावरताना सर्पदंश, विंचू चावणे किंवा विषारी किड्यांचा दंश झाल्यानंतर जीवाला धोका निर्माण होतो. अर्थात, वैद्यकीय क्षेत्रामधील प्रगतीमुळे यावर उपचार करणे शक्य असले तरी इतक्या दुर्गमभागात आजही वैद्यकीय सोयींची वानवा आहेच. त्यात अंधश्रद्धेचा पगडादेखील बरेचदा उपचारांदरम्यान येतो. परंतु, या अशा परिस्थितीवर मात करत लक्ष्मीकुट्टी यांनी मेहनतीने व आईची मदत घेऊन विषबाधा झाल्यानंतर वनौषधींचा वापर करून त्यावर इलाज शोधून काढला. औषधी वनस्पतींची बारीकसारीक माहिती असणार्‍या लक्ष्मीकुट्टी यांचं बालपणही वनातलचं. त्या जंगलामध्ये अगदी सहजरित्या वावरतात. वनसान्निध्यात असताना झाडे, फळ-फुलांचे त्या निरखून निरीक्षण करायच्या. अर्थात, ही बाब काहींना खटकायची. थोडीशी विचित्र वाटायची. लक्ष्मीकुट्टी यांच्या डोक्यात नेमकं काय चालू आहे, हे सुरुवातीला कोणाच्याच लक्षात आलं नाही. पण, हळूहळू हे कोडं उलगडत गेलं. झाडांच्या फळं-फूलं, बियांपासून त्यांनी औषधं तयार करायला हळूहळू सुरुवात केली. लक्ष्मीकुट्टी यांची आई दाई म्हणून काम करत होत्या. त्यादेखील गरजूंना मदत करण्यामध्ये नेहमी पुढाकार घ्यायच्या. त्यांच्यातला हाच गुण लक्ष्मीकुट्टी यांच्या अंगी, स्वभावी उतरला.
 
१९५०च्या काळात आठवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या लक्ष्मीकुट्टी या पहिल्या आदिवासी महिला म्हणून देखील ओळखल्या जातात. अभ्यास आणि वनौषधींचे संशोधन हे सगळं सुरू असतानाच लक्ष्मीकुट्टी यांचं लग्न झालं. सगळं काही सुरळीत सुरू असतानाच अशी एक घटना घडली की त्यानंतर लक्ष्मीकुट्टींनी वनौषधी तयार करून गरजूंच्या उपचार- सेवेमध्ये स्वतःला वाहून घेतलं. लक्ष्मीकुट्टी यांच्या मोठ्या मुलावर जंगलातील एका हत्तीने हल्ला केल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला. काही कळायच्या आतच हा प्रकार घडल्याने मुलावर उपचार करायला विलंब झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर लक्ष्मीकुट्टींनी पुन्हा जोमाने काम करायला सुरुवात केली आणि त्यांचा सुरू झालेला प्रवास अविरतपणे सुरूच आहे. आज त्यांनी आपल्या घराच्या आसपास विविध प्रकारच्या वनौषधींची लागवड केली आहे. लक्ष्मीकुट्टी त्यांच्या वनौषधींच्या ज्ञानासंपदेच्या मदतीने एक प्रकारची समाजसेवा करत आहेत. खरंतर १९९५ पर्यंत त्यांचे काम फारसे कोणाच्या परिचयाचे नव्हते. पण, १९९५ मध्ये केरळ सरकारतर्फे ‘नॅचरोथेरपी’ पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर त्यांचं कामखर्‍या अर्थाने प्रकाशझोतात आले.
 
यानंतर त्यांच्या कार्याची सातत्याने दखल घेत त्यांना अनेकविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. या कामा व्यतिरिक्त कविता करण्याचा छंदही लक्ष्मीकुट्टींनी जोपासला आहे. आदिवासींची संस्कृती, त्यांची जीवनशैली, त्यांच्या व्यथा, जंगलाचे वर्णन त्या कवितांमधून व्यक्त करतात. गरजूंवर उपचार करण्याबरोबरच त्यांच्या चेहर्‍यावरचे स्मितहास्य, त्यांचं मनमोकळेपणाने बोलणं हे वनवासींना विशेष भावतं. म्हणून तर त्या ’अम्मा’ या नावानेही ओळखल्या जातात. आज त्यांच्या ज्ञानाचा उपयोग इतरांना करता यावा, यासाठी त्या या विषयावर दक्षिण भारताच्या वैद्यकीय इन्स्टिट्यूटमध्ये ’नॅचरल मेडिसिन’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. साप-विंचवाच्या विषावर उतारा देणारी वनौषधी तयार करण्याचे काम करत असताना त्यांनी त्यांची कौटुंबिक जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली. त्यांनी त्यांच्या दुसर्‍या मुलाला चांगले शिक्षण देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. आज त्यांचा मुलगा रेल्वे खात्यामध्ये चांगल्या पदावर कार्यरत आहेत. डोळ्यादेखत मोठा मुलगा गमावल्याचे दुःख असतानाही त्यांनी त्यांचं आयुष्य इतरांना जीवनदान देण्यामध्ये खर्ची केलं.
 
आज केरळच्या वनविभागाने लक्ष्मीकुट्टी यांच्याकडे असलेल्या ज्ञानाचा खजिना पुस्तकरूपात छापण्याचा निर्णय घेतला असून ते पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. हा ठेवा त्यांनी जपला तो केवळ निरीक्षणाच्या व अभ्यासाच्या जोरावर. इतकं सगळं होऊनही आतापर्यंत या सर्व जडीबुटींची रीतसर नोंद करण्याची तसदी घेतली नसल्याची खंत मात्र त्या व्यक्त करतात. आता त्यासाठी हालचाल करण्यास सुरुवात केली असली तरी हे खूप आधी व्हायला पाहिजे होतं, असं त्यांना वाटतं. आज लक्ष्मीकुट्टी ज्या जंगलात राहतात तिथं जायला साध्या रस्त्यांची सोयही नाही. हा रस्ता १९५२ मध्ये मंजूर झाला, तेव्हापासून केवळ कागदोपत्री राहिला. आजच्या काळात ग्रामीण भागात अनेक सोईसुविधा पोहोचल्या आहेत, पण आदिवासी पाडे अजूनही त्यापासून वंचित आहेत. ’पद्मश्री’बरोबरच रस्ता द्यावा, अशी अपेक्षा अम्मा व्यक्त करतात.
 
 
- सोनाली रासकर