आठवणीतले डॉ. गंगाधर पानतावणे सर..!
महा एमटीबी   28-Mar-2018१९८४ मध्ये जळगावला आम्ही आंबेडकरी विचारांनी झपाटलेल्या साहित्यिकांनी ‘खान्देश दलित साहित्य संघ’ स्थापन केला. या संघामार्फत आम्ही पहिले दलित साहित्य संमेलन डॉ. गंगाधर पानतावणे सरांच्या अध्यक्षतेखाली घेतले. तेव्हा माझा सरांशी परिचय झाला. तोपर्यंत मी बर्‍या पैकी कविता लिहू लागलो होतो. म्हणून मी काही कविता ‘अस्मितादर्श’ ला पाठवल्या. काही दिवसांनी मला डॉ. गंगाधर पानतावणे सरांचे पत्र आले. त्यात कविता कशी लिहायची याचे सुव्यवस्थित मार्गदर्शन केले होते. त्यासाठी काय काय वाचले पाहिजे हेही आत्मीयतेने लिहिले होते आणि शेवटी एक दिवस तुमची कविता ‘अस्मितादर्श’ मध्ये नक्की छापून येईल असा आशावादही अधोरेखित केला होता. सरांचा हा सल्ला मी तंतोतंत पाळला. घाईघाईने कविता लिहिणे थांबवून झपाटल्यासारखं वाचन सुरू केलं. तो काळ नेमका दलित आत्मकथनांचा काळ होता. मी बहुतेक आत्मचरित्र वाचून काढली. इतकेच नव्हे तर सरांनी सुचवलेल्या कवींचे कविता संग्रह मिळवून वाचले. सरांच्या एका पत्राने मी इतका प्रभावीत झालो होतो. १९९१ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्ताने मुंबई दूरदर्शनने आयोजित केलेल्या कविसंमेलनात मला निमंत्रित करण्यात आले होते. सुरेश भट, नामदेव ढसाळ, फ. मुं. शिंदे, केशव मेश्राम, यशवंत मनोहर, ना.धों. महानोर, वामनदादा कर्डक, शांताराम नांदगावकर यासारख्या कवींसोबत कविता सादर करण्याची संधी मला मिळाली होती. हे पाहून सरांनी मला पत्र पाठवून अभिनंदन केले आणि अस्मितादर्शसाठी कविता पाठवण्यास सांगितलं. याचा अर्थ पाच वर्षानंतर सरांनी माझी कविता प्रकाशित केली. जोपर्यंत तुम्ही चांगले वाचन करून प्रगल्भ होत नाहीत तोपर्यंत तुम्ही प्रामाणिकपणाने व्यक्त होत नाहीत, ही सरांची धारणा होती. अस्मितादर्श चालवताना त्यांनी कधीच कसलीही तडजोड केली नाही. सरांचा हा मूलमंत्र मी कायम स्वीकारला. अस्मितादर्शमध्ये स्थान मिळाल्यानंतर मला अस्मितादर्श साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून बोलावण्यात येऊ लागले. मीही मोठ्या उत्साहाने सहभागी होऊ लागलो. अस्मितादर्श साहित्य संमेलन हा केवळ उरूस नसतो तर तो नव्या जुन्या साहित्यिकांच्या भेटीचा मिलन सोहळा असतो हे मी अनुभवले. या माध्यमातून माझ्या खूप ओळखी झाल्या. चळवळीची महती कळली. आपल्या लेखनाची दिशा ठरवता आली. या संमेलनांवर सरांची कमांड असायची. संमेलन कुठे घ्यायचे, स्वागताध्यक्ष कोण असावे, संमेलनाध्यक्ष, उद्घाटक, वक्ते, साहित्यिक, कवी, निमंत्रण पत्रिका हे सारं काही सरच ठरवणार आणि सतत तीन दिवस सर मंडपातच सर्व कार्यक्रमांना दाद देत तंबू टाकून बसणार. मला वाटतं सतत अव्याहत पन्नास वर्षे एकहाती नियतकालिक प्रकाशित करून त्या नियतकालिकाच्या नावाने इतके साहित्य संमेलन यशस्वी करण्याचा हा प्रयोग या जगात जर कोणी केला असेल तर त्याचे श्रेय डॉ. गंगाधर पानतावणे सरांनाच दिले पाहिजे. या पन्नास वर्षाच्या काळात त्यांनी असंख्य नवलेखन करणार्‍यांचे हात तयार केलेत. सामाजिक बांधिलकी जोपासून समाजाच्या तळागाळापर्यत आंबेडकरी ऊर्जा पोहोचवली. यासाठी सरांनी प्रकृतीची तमा न बाळगता अहोरात्र काम केले.

मी सरांच्या सहवासात आलो ते परिवर्तन साहित्य संमेलनाच्या निमित्ताने. मुंबईच्या बैठकीत माझी परिवर्तन साहित्य महामंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आणि २४ एप्रिल १९९९ मध्ये जळगावला आम्ही तिसरे परिवर्तन साहित्य संमेलन डॉ. पानतावणे सरांच्या अध्यक्षतेखाली घेतले. यातूनच सरांशी स्नेहबंध निर्माण झाला. सातत्याने चर्चा करणं, पत्रव्यवहार सुरू झाला. माझे लेखन सरांच्या मुशीतूनच तयार झाले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सरांची असंख्य भाषणे मी ऐकली. एका ठिकाणी बोललेले दुसर्‍या ठिकाणी बोलायचं नाही हा कटाक्ष सरांनी पाळल्यामुळे ते नवीन काय बोलतात याची उत्सुकता असे. सरांकडे प्रचंड ज्ञान होते.

२००७ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेने सरांच्या संपादनाखाली ’दलित -ग्रामीण साहित्य शब्दकोश व सूची ’ प्रकल्प काढायचे ठरवले. त्यासाठी महाराष्ट्रातील ग्रामीण बोलीभाषा तज्ज्ञांची समिती निवडण्यात आली. त्यात खान्देशातून सरांनी माझी निवड केली. या प्रकल्पाचे काम २०१६ पर्यंत चालले. अनेक सदस्य बदलले गेले, पण सरांसोबत मला प्रकल्प पूर्ण होईपर्यंत राहण्याची संधी मिळाली.

सरांनी मला मुलासारखं वागवलं. सर कोणाशी कसलीही भीडभाड ठेवत नसत. कोणी कितीही सांगितले तरी स्वतः ठरवतील तेच करायचे. कोणाला राग आला तर त्याची पर्वा करत नसत. पंच्याहत्तरीतलं वय असूनही सर कामाला तळ ठोकून बसत. पूर्ण वेळ काटेकोर काम झाले पाहिजे मग कितीही वेळ लागो असा त्यांचा दरारा असायचा. बरेचदा बैठकीच्या निमित्ताने हॉटेलमध्ये ते रूम पण शेअर करायचे. सर्वांनी सोबत जेवण करावे. कायम सोबत राहावे यासाठी ते आमच्यात मिसळत. त्यांनी त्यांची प्रत्येक गोष्ट माझ्याशी शेअर केलेली आठवते. अगदी संध्याकाळी बैठक आटोपल्यावर ते आमच्यासोबत मुंबईत फिरत. सर आमच्यातलेच एक होऊन जात. ते शिस्तप्रिय काटेकोर असले तरी स्वभावाने मृदू आणि संवेदनशील होते. अनेक गंमतीदार प्रसंग अगदी हुबेहूब सांगत. अनेक विद्वान साहित्यिकांचे किस्से ते आमच्यात शेअर करायचे. बैठकीच्या निमित्ताने त्यांनी आम्हाला अनेक साहित्यिकांच्या घरी नेले. नामदेव ढसाळांची तर सरांवर अपार श्रद्धा होती. सर मुंबईत आहेत हे समजले की, ढसाळ गाडी घेऊन सरांना भेटायला यायचे. आग्रह करून आम्हालाही जेवायला न्यायचे. अनेक नामवंत साहित्यिक सरांना भेटायला यायचे. त्यांचे अनेक विद्यार्थी मोठमोठ्या हुद्यांवर काम करतात. आय. ए. एस. झालेले अधिकारी सर दिसताच भररस्त्यात त्यांच्या पायाशी वाकायचे. एकदा तर एम. पी. एस. सी.च्या ऑफिसमध्ये सरांसोबत आम्ही गेलो. सर खाली आले आहेत हे समजताच एमपीएससीचा अध्यक्ष पाचव्या मजल्यावरून खाली उतरून सरांचे स्वागत करायला आला होता त्याची अजून आठवण आहे.

अस्मितादर्शचे पुढे काय होईल अशा प्रश्नाला सरांचे उत्तर असायचे, ’मी आहे तोपर्यंत चालवेल. कोणी इतकी मेहनत घेऊन चालविल असे वाटत नाही.’ कारण सरांच्या मनात नेहमी एक सल होती. ते बोलून दाखवायचे. सरांनी अस्मितादर्शच्या माध्यमातून अनेक कवी - लेखक मोठे केले. पण नावारूपाला आल्यावर त्यांनी पाठ फिरवली. केवळ दलितच नव्हे तर अनेक दलितेतर साहित्यिकांची एक मोठी फळी सरांनी निर्माण केली. पण अनेकांनी सरांना निराश केले. तरीही ‘एकला चलो रे’ म्हणत सर अव्याहत न थकता आपले कार्य जोमाने करत राहिले. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात व्याख्याने देत फिरत राहिले. नव्या दमाच्या असंख्य साहित्यिकांच्या पुस्तकांना त्यांनी प्रस्तावना लिहिल्या. सर कधीच थकले नाहीत. त्यांनी कधीच विश्रांती घेतली नाही. डिसेंबर महिन्यात अस्मितादर्शचे सुवर्ण महोत्सवी संमेलन औरंगाबादला होणार होते. त्याच्या दोन दिवस आधीच सरांना छोटा अपघात झाला. या अपघाताने मात्र सरांना आज कायमची विश्रांती घ्यायला लावली.

- डॉ. संजीवकुमार सोनवणे