चीनकडून भारताला व्यापार संतुलन करण्याचे वचन
महा एमटीबी   27-Mar-2018


नवी दिल्ली :
भारत आणि चीन यांच्यातील व्यापारमध्ये योग्य संतुलन तयार करू, असे वचन चीनकडून देण्यात आले आहे. चीनचे मंत्री झोंग शान यांनी काल नवी दिल्ली येथे झालेल्या संयुक्त आर्थिक समूह बैठकीमध्ये हे वचन दिले आहे. यावेळी केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू हे देखील याठिकाणी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये भारत आणि चीन या दोन्ही देशांचे मंत्री आणि अधिकारी सहभागी झाले होते. यावेळी भारताने भारत-चीन यांच्यातील व्यापारामध्ये होत असलेल्या असंतुलनावर चिंता व्यक्त करत, याकडे चीनने लक्ष देण्याची मागणी केली. तसेच भारतातील कृषी उत्पादनाला चीनमध्ये बाजारपेठ तयार करून देण्याची मागणी केली. यावर शान यांनी भारताच्या मागण्या मान्य करत, भारत-चीन व्यापार संतुलित बनवण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. तसेच भारतीय कृषी मालाला चीनमध्ये बाजारपेठ निर्माण करून देण्याचे देखील आश्वासन दिले.

चीनकडून भारतात येणाऱ्या मालामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. परंतु या बदल्यात भारताकडून मात्र चीन फार कमी प्रमाणात मालाची आयात करत आहे. त्यामुळे भारताकडून चीनला वर्षाला अब्जावधी डॉलरचा फायदा होतो. परंतु भारताला मात्र अत्यंत अल्प प्रमाणातच फायदा होतो. त्यामुळे चीनने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी भारताने अनेक वेळा केलेली आहे. परंतु याकडे चीनने वारंवार दुर्लक्ष केले होते.