होमियोपॅथीबद्दलचे समज -गैरसमज -भाग- १

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Mar-2018
Total Views |
 

 
आज प्रगत वैद्यकशास्त्रात अनेक चिकित्सा पद्धती जगभरात उपलब्ध आहेत. या सर्व उपचार प्रणालींमध्ये होमियोपॅथी ही चिकित्सा पद्धती जगभरात झपाट्याने वाढते आहे. अत्यंत गुणकारी, अत्यंत सुरक्षित व रोगाचा समूळ नाश करुन, रुग्णांना आरोग्य प्रदान करणारी औषधप्रणाली म्हणून होमियोपॅथी प्रसिद्ध आहे.
 
होमियोपॅथी हे गेले दोनशेहून अधिक वर्षे जगभरात अत्यंत यशस्वी औषधशास्त्र म्हणून गणले जाते. परंतु, काही लोकांच्या मनात या शास्त्राबद्दल अनेक गैरसमज असतात. ते कधी कधी ज्यांना अर्धवट ज्ञान आहे अशा लोकांकडून पसरवले जातात; पण त्यात काहीही तथ्य नाही. आज २०० वर्षांच्या प्रदीर्घ काळाच्या कसोटीवर खरे उतरून होमियोपॅथी उत्कृष्ट उपचार करते आहे. या वर्षीच्या सर्वेक्षणानुसार तर ५९ टक्के लोकांनी होमियोपॅथीला प्रथमपसंती दिली आहे. तेव्हा आजच्या भागात होमियोपॅथीबद्दलचे काही ठळक गैरसमज जाणून घेऊया...
 
गैरसमज - १ - होमियोपॅथी संथ गतीने काम करते व फक्त जुनाट रोगांवरच उपचार होतात
 
होमियोपॅथीबद्दलचा हा एक मोठा गैरसमज आहे. होमियोपॅथी इतर कुठल्याही औषधप्रणाली इतकीच किंबहुना मी म्हणेन की, ती त्याहूनही जलद काम करते. अनेक प्रकारचे इमर्जन्सी आजार, उदा. मलेरिया, डेंग्यू, टायफॉईड, अपेंडिसायटिस, मुतखडा दाह, कावीळ, उलट्या, जुलाब, दमा या सर्व आजारांवर होमियोपॅथी अत्यंत जलद उपचार करुन, कमीत कमी वेळात रुग्ण बरा होतो. आमच्याकडे औषध घेणार्‍या हजारो रुग्णांना ही गोष्ट पटलेली आहे. कारण, त्यांनी ती स्वत: अनुभवलेली आहे. म्हणजेच होमियोपॅथी जुनाट रोगांना तर मुळापासून बरे करतेच, पण इतर सर्व रोगांनासुद्धा जलदपणे नष्ट करते.
 
गैरसमज २- होमियोपॅथी औषधाला फार पथ्य असतात
 
हा अजून एक दुसरा गैरसमज आहे. होमियोपॅथीची औषधे ही वैज्ञानिकरित्या सिद्ध केलेली असतात. काही ठराविक आजार सोडले तर होमियोपॅथीमध्ये किचकट पथ्ये अजिबात नसतात.
 
गैरसमज ३ - होमियोपॅथीच्या उपचाराने आजार प्रथम बळावतो
 
हे अर्धसत्य आहे. याचे कारण असे की, होमियोपॅथीकडे येणारे रुग्ण हे आधी सर्व इतर औषध पद्धतींचे उपचार करुन, बरेचदा नंतर होमियोपॅथीकडे येतात. यातील काही आजार औषधांनी दाबले जातात. जेव्हा होमियोपॅथीचे औषध चालू होते तेव्हा हे आत दाबलेले आजार परत पृष्ठभागावर येतात हे होणे अत्यंत चांगले लक्षण असते. जेव्हा या जुन्या तक्रारी वर येतात तेव्हाच त्या मुळापासून नष्ट होऊ शकतात. म्हणून प्रारंभी रुग्णाला असे वाटते की, आपला आजार वाढतोय की काय, पण तसे नसते. फक्त वेदनाशमक औषधांच्या (pain killers) विळख्यातून बाहेर पडताना हा थोडा त्रास होऊ शकतो; पण तो अतिशय सौम्य असतो व नंतर रुग्णाला बरे वाटू लागते. होमियोपॅथीच्या नियमांना धरुन, जेव्हा औषध दिले जाते, त्यावेळी ते आजाराला सम अशा प्रकारे असते, अशावेळी आजारांची लक्षणे प्रारंभी वाढल्यासारखी वाटतात. पण, हे फार थोडावेळ होते व नंतर आजार बरा व्हायला सुरुवात होते. होमियोपॅथीच्या दृष्टीने हे चांगले लक्षण मानले जाते.
 
 
होमियोपॅथीबद्दल अजूनही काही गैरसमज आहेत, त्यांची माहिती पुढील भागात करुन घेऊयात.
 
 
 
- डॉ. मंदार पाटकर  
(लेखक एम.डी होमियोपॅथी आहेत.)
 
@@AUTHORINFO_V1@@