मराठा साम्राज्य पूर्वार्ध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Mar-2018
Total Views |



 
सन १६२७ मध्ये जवळजवळ भारतभर मुघलांचे साम्राज्य पसरले होते. उत्तरेत शहाजहाँ, विजापूरचा आदिलशहा, गोवळकोंड्यात कुतुबशहा यांचे साम्राज्य होते. दख्खनचे सुलतान सेनेकरिता मुस्लीम अधिकार्‍यांनाच प्राधान्य देत असत. बंदरांवर पोर्तुगालांचे राज्य, तर थळमार्गावर मुघलांचा अधिकार. त्यामुळे उत्तर-आफ्रिका आणि मध्य आशियातून मुस्लीम अधिकारी आणणं मुश्कील होत असे. त्यामुळे सुलतानांना हिंदू अधिकारी सैन्यात नियुक्त करावे लागत असत. आदिलशहाच्या सैन्यात असाच एक पराक्रमी हिंदू अधिकारी सेनाध्यक्ष होता. त्याचे नाव शहाजी भोसले. ते सेनेत उच्च पदावर होते. इ. स. १६३० मध्ये शिवनेरीवर शहाजी भोसलेंची पत्नी जिजाबाई यांनी पुत्ररत्नास जन्म दिला. शिवनेरीवर शिवाई देवीच्या नावावरून त्याचे नाव ‘शिवाजी’ ठेवले गेले. याच शिवाजीने पुढे मुघलांना जेरीस आणून आपले स्वतंत्र मराठा स्वराज्य’ निर्माण केले आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या नावाने विश्वविख्यात झाले. शहाजी महाराज आपल्या मोहिमांमुळे बाल शिवाजीला वेळ देऊ शकत नसत. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत दादोजी कोंडदेव यांनी शिवबाला युद्धकलेत तसेच नीतीशास्त्रात निपुण केले, तर जिजाबाईंनी धार्मिक गोष्टी सांगून त्याच्यावर चांगले संस्कार केले. शिवाजीचे साहस पाहून तोही आपल्या वडिलांप्रमाणेच सुलतानाच्या सैन्यात मोठ्या पदावर नियुक्त होईल, असे दादोजी कोंडदेव यांना वाटत असे. पण, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. १६४६ मध्ये हिंदूंचे स्वतंत्र राज्य निर्माण व्हावे, यासाठी तीन गोष्टींची गरज होती. त्या म्हणजे हे स्वतंत्र राज्य या शक्तिशाली साम्राज्यांपासून दूर असावे. तिथली जमीन शेतीकरिता निरूपयोगी असावी आणि जंगलाने घेरलेली असावी. दुर्गम जागा असल्यामुळे शत्रूला आपल्यापर्यंत पोहोचणे कठीण जाईल आणि शत्रू आपल्यापर्यंत पोहोचलाच, तर गनिमी कावा वापरून त्याला जेरीस आणता येईल. असे आपले साम्राज्य उभारले जावे आणि मुघल सल्तनतपासून वेगळे असे आपले स्वराज्य निर्माण व्हावे, अशी शिवबाची इच्छा होती.
 
स्वराज्याकरिता गडांचे किती महत्त्व आहे, हे त्यांनी वेळीच ओळखले होते. त्यामुळे स्थानिक शेतकर्‍यांना आपल्याबरोबर घेऊन मावळ्यांचे सैन्य त्यांनी उभे केले. वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी आदिलशहाच्या अधिकार्‍यांशी झुंज देऊन तोरणा, चाकण, कोंढाणा किल्ला हस्तगत केला. त्याचबरोबर आबाजी सोनदेव यांच्या मदतीने ठाणा, भिवंडी, कल्याण येथील किल्ले जिंकून घेतले. यामुळे आदिलशाहीत खळबळ माजली. शिवाजीच्या कारवाया रोखण्यासाठी शहाजी भोसलेंना बंदीवासात ठेवण्यात आले. त्यानंतर जवळजवळ सात वर्षे शिवबाने आदिलशहावर थेट हल्ला केला नाही. मात्र, हा कालावधी त्यांनी आपले सैन्य बळकट करण्यासाठी तसेच प्रभावशाली अशा देशमुखांना आपल्याकडे वळविण्यासाठी वापरला. हळूहळू त्याने आपले सैन्य वाढवले. त्याच्या घोडदळाचे नेतृत्व नेताजी पालकरकडे, तर पायदळाचे नेतृत्व येसाजी कंक यांच्याकडे होते. शिवाजींच्या वाढत्या उपद्रवाने वैतागून १६५९ मध्ये विजापूरची बडी साहिबाँने अफजलखानाला पाठवले, त्यानंतर आझमखान, सिद्दी जोहर, शाहिस्तेखान यासारख्या बलाढ्य आणि तितक्याच कू्रर, कपटी शत्रूंनाही शिवाजींनी कधी सरळसरळ युद्ध करून तर कधी चतुराईने जशास तसे उत्तर दिले.
 
 

 

१६६४ मध्ये मुघलांचे व्यावसायिक केंद्र सूरत शिवरायांनी लुटले. त्यामुळे प्रचंड संतप्त झालेल्या औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंग याला दीड लाख सैन्यासह शिवरायांना पकडण्यासाठी पाठवलं. या महाकाय सैन्यासमोर शिवरायांचा पराभव झाला आणि त्यानंतर झालेल्या तहाअंतर्गत त्यांना २३ किल्ले आणि चार लाख होन उत्पन्नाचा प्रदेश द्यावा लागला. तसेच त्यांना औरंगजेबाला भेटावयास आग्य्राला जावे लागले. तिथून त्यांनी औरंगजेबाच्या कैदेतून कशी सुटका केली, हा इतिहास सर्वज्ञात आहेच. १६७० मध्ये शिवरायांनी बर्‍याच युद्धमोहिमा जिंकून केवळ चार महिन्यांच्या कालावधीत आपला बराचसा प्रदेश मुघलांच्या तावडीतून मुक्त केला. १६ जून, १६७४ साली शिवरायांचा राज्याभिषेक झाला. काही शतकांनंतर हिंदू रितीरिवाजांनुसार, शास्त्रानुसार राज्याभिषेक झाला होता. रयतेला त्यांचा राजा मिळाला होता. मुघलांच्या गुलामीतून, त्यांच्या अत्याचारातून त्यांची सुटका झाली होती. शिवराय केवळ पराक्रमी राजेच नव्हते, तर ते कुशल प्रशासकही होते. राज्यकारभार नीट चालावा म्हणून त्यांनी अष्टप्रधान मंडळ नेमले. धर्माच्या नावावर त्यांनी कधीच कुणाला दुखावले नाही. त्यांच्या सैन्यात तसेच त्यांचे खाजगी अंगरक्षकही मुस्लीम होते. त्यांच्या राज्यात स्त्रियांना सन्मानाची, अदबीची वागणूक दिली जात असे. अगदी युद्धात हरलेल्या शत्रूच्या स्त्रियांनाही मानाने परत पाठवले जात असे. त्यांच्या या धोरणामुळेच ते जनतेमध्ये लोकप्रिय होते. प्रसंगी त्यांचा जीव वाचवण्यासाठी मावळे आपले प्राण पणाला लावत असत. मार्च १६८० मध्ये तापाने आणि अतिसाराने हैराण होऊन शिवराय आजारी पडले आणि ५ एप्रिल, १६८० रोजी वयाच्या अवघ्या ५२व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला.

. स. १६४६ मध्ये चार किल्ले आणि २००० सैन्य हाताशी धरून स्वराज्याचा लढा सुरू करणार्‍या शिवरायांकडे १६८० मध्ये ३०० किल्ले आणि १ लाख सैन्यबळ होते. गनिमी काव्याचा जनक मानल्या जाणार्‍या शिवरायांनी प्रचंड मुघल सैन्याचा पाडाव आपल्या साध्यासुध्या मावळ्यांना बरोबर घेऊन शिताफीने केला. त्यांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्य संपून जाईल, असे औरंगजेबाला वाटले होते. पण, शिवाजीपुत्र संभाजी याने मराठा साम्राज्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि शेवटपर्यंत साम्राज्याचा उत्कर्ष केला. संभाजी महाराजांना राजपद सहजासहजी मिळाले नाही. अष्टप्रधानातील अमात्य अण्णाजी दत्तो यांच्याबरोबरच्या मतभेदांमुळे अष्टप्रधान मंडळाने संभाजीराजांचे हुकूम मानणे नाकारले. १६ जानेवारी, १६८१ रोजी संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांनी मोठ्या मनाने अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या सहकार्‍यांना माफ केले. मात्र, त्यांनी संभाजीराजांविरुद्ध कट रचून राजारामांचा अभिषेक करण्याचा घाट घातला. तेव्हा मात्र संभाजी महाराजांनी अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या सहकार्‍यांना हत्तीच्या पायी देऊन ठार मारले. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्याने एकूण १२८ युद्धे केली. विशेष म्हणजे एकही युद्ध ते हरले नाहीत. त्यांच्या उपद्रवाला औरंगजेब पुरता कंटाळला होता, त्याने शपथ घेतली होती की जोपर्यंत संभाजी पकडला जात नाही तोपर्यंत तो आपला राजमुकुट (किमोस) परिधान करणार नाही.

 

 

संभाजीराजांनी बर्‍याच भाषा अवगत केल्या होत्या. ज्याचा पुढे राज्य कारभारासाठी त्यांनी उपयोग करून घेतला. शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत ते जनता दरबारन्याय दरबार’ भरवत. जनतेचा न्यायनिवाडा करत असत. १४व्या वर्षापर्यंत ते विज्ञान, अर्थशास्त्र आणि युद्धनीतीत निपुण झाले होते. १४व्या वर्षी त्यांनी बुधभूषण’ हा संस्कृत ग्रंथ लिहिला होता. लहान वयातच त्यांनी तीन ग्रंथ लिहिले होते. नखशिखांत, नायिकाभेद, सात शातक हे ब्रज भाषेतले ग्रंथ आजही लोकप्रिय आहे. नखशिखांतमधील गणपतीचं वर्णन याआधी क्वचितच कोणी इतकं अप्रतिम केलं असेल. त्यांनी शंभूराज, नृपशंभू, शंभूवर्मन या नावाने साहित्य लिहिले. ते छत्रपती झाले त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की, मराठी मुलखात धनधान्याचा तुटवडा आहे. त्यांनी औरंगजेबाच्या औरंगाबाद आणि बुर्‍हाणपूर या प्रदेशांवर आक्रमण करून भरपूर प्रमाणात धन आणि जडजवाहीर लुटले. औरंगजेबाने संतापून ५ लाख सैन्य आणि ४ लाख उंट, घोडे, हत्तीचे सैन्य घेऊन निघाला. मराठ्यांचा प्राण त्यांच्या किल्ल्यांत असतो, हे जाणून त्याने गडकिल्ले घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या अवाढव्य सैन्याने संभाजीराजांच्या मावळ्यांपुढे हार पत्करली. पुढे कपटाने औरंगजेबाने संभाजीराजांना कैद करून त्यांचा अनन्वित छळ करून १६८९ मध्ये त्यांना ठार मारले. संभाजीनंतर त्यांचा लहान भाऊ राजाराम याने राज्यकारभार आपल्या हाती घेतला. मराठ्यांच्या गनिमी काव्याच्या युद्धाने मुघल सैन्य पुरतं हादरून गेलं होतं. संभाजींच्या मृत्यूनंतर छत्रपती राजारामांनाही मुघलांच्या हल्ल्याला तोंड देत राज्यकारभार सांभाळावा लागला. मुघलांविरुद्धच्या यशस्वी मोहिमांच्या दरम्यान इ. स. १७०० मध्ये राजाराम यांचाही मृत्यू झाला. राजाराम यांच्या तीन पत्नींपैकी राणी ताराबाईने आपला मुलगा शिवाजी द्वितीय याला गादीवर बसवले. जो केवळ चार वर्षांचा होता. राणी ताराबाईने मुघलांविरुद्ध मराठा साम्राज्याचे प्रतिनिधीत्व केले.

 
संभाजीचा मुलगा शाहू याला औरंगजेबाने बंदी केले होते. इ.स. १७०८ मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल शासक आझमखान याने शाहूला मुक्त केले. त्याला मुक्त करण्यामागे मराठ्यांमध्ये फूट पाडण्याचा मुघलांचा कुटिल डाव होता. शाहूराजांचे महाराष्ट्रात स्वागत झाले. त्यांना दक्षिणेतील खानदेश, वराड, बीदर, औरंगाबाद, हैदराबाद, विजापूर या प्रांताच्या चौथाई व सरदेशमुखीचे अधिकार मिळाले. मात्र, त्यांची काकी ताराबाई यांनी त्यांना विरोध केला. मुघलांच्या कैदेतून मुक्त झालेल्या शाहूने ताराबाईंबरोबर युद्ध करून सातारा जिंकले. या युद्धानंतर ताराबाई आपल्या कुटुंबासह पन्हाळ गडावर आल्या आणि आपला मुलगा शिवाजी द्वितीय यास कोल्हापूरच्या गादीवर बसवून करवीर’ राज्य स्थापन केले. औरंगजेबाच्या कैदेतून मुक्त झालेल्या शाहू महाराजांबरोबर त्यांची काही विश्वासू मंडळी होती. त्यातील रघुजी भोसले, बाळाजी विश्वनाथ यांनी त्यांना शेवटपर्यंत साथ दिली. छत्रपती शाहू महाराजांनी आपला राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांचे सहकारी बाळाजी विश्वनाथ यांना पेशवे म्हणून नेमले. शाहूंच्या नेतृत्वाखाली नवीन मराठा साम्राज्याचे प्रवर्तक पेशवे होते, जे शाहूंचे पंतप्रधान होते. त्यांच्याच मदतीने शाहू छत्रसाल राजा बनले.
 
शाहूंच्या कारकिर्दीतच पेशव्यांचा शक्तीचा उदय झाला. त्यांच्याच शासनकाळात मराठा साम्राज्य दोन गटांमध्ये विभागले गेले. एक ताराबाईंच्या नेतृत्वाखाली सातारा व दुसरे शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर. शाहू महाराजांनी राज्यकारभाराचे सर्व अधिकार आपले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्याकडे सोपवले होते. शाहूंनी, निजाम, सिद्दी, पोर्तुगीज यासारख्या कट्टर शत्रूंशी टक्कर देऊन मराठी राज्याचे आसन स्थिर केले. शाहू महाराजांचे राहणीमान साधे होते. उदार, दयाळू शाहू महाराजांना घोडे, कुत्रे, पक्षी बाळगण्याची तसेच बागबगीच्यांची आवड होती. आपले सेनापती आणि अधिकारी यांच्याकडून योग्य ती कामगिरी घडवून आणण्याचे कौशल्य त्यांच्या अंगी होते. त्यांच्याच कारकिर्दीत गुजरात, माळवा, बुंदेलखंड, बंगाल, ओडिशा, कर्नाटक, विदर्भापर्यंत मराठी राज्याचा साम्राज्यविस्तार झाला. सर्वगुणसंपन्न, धीरोदात्त, कुशल, प्रशासक, उत्तमसेनानी असलेल्या शाहू महाराजांचे ताराबाईंशी असलेले शत्रुत्व १३ एप्रिल १७३१ रोजी वारणेच्या तहाअंतर्गत संपले. या तहानुसार वारणी नदी दोन्ही राज्यांची सरहद्द म्हणून मान्य करण्यात आली. शाहूमहाराजांनी वृद्धापकाळात ताराबाईंचा नातू रामराजा यास दत्तक घेतले. प्रदीर्घ आजारामुळे १५ डिसेंबर, १७४९ रोजी त्यांचे निधन झाले. त्यापुढे मराठी साम्राज्य हे पेशव्यांच्या हाती गेले. पेशव्यांची कारकीर्द आणि त्यांनी विस्तारलेले मराठा साम्राज्याविषयी जाणून घेऊ पुढील भागात..
 
 
 
रश्मी मर्चंडे 
@@AUTHORINFO_V1@@