तारा होण्यासाठी काळोख जिंकावा लागतो

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Mar-2018   
Total Views |
 

 
संतोषसारखे तरूण प्रत्येक समस्येतून मार्ग काढतात. प्रतिकूल परिस्थितीतीला बदलवण्याची हिंमत ठेवतात आणि यशस्वी आयुष्याची मुहूर्तमेढ रोवतात.
 
 
ऐसे ही नही होतें
ख़्वाब पूरे अरमानों के
टूटना पडता हैं हर पल
जु़डना पडता है हर पल
 
 
संतोष पालेकर या तरूणाचे आयुष्यही असेच. प्रत्येक क्षण तुटण्याचा, प्रत्येक क्षण तुटून पुन्हा माणूस म्हणून उभे राहण्याचा. मूळ सांगलीच्या संतोषचे वडील मोहन पालेकर १९७२ साली मुंबई दाखल झाले. मुंबईत आल्यावर संसाराचा गाडा ओढण्यासाठी मिळेल ते काम करता करता ते मिलमध्ये कामाला लागले. पण, त्यांनतर मिल कामगारांच्या बंदमध्ये मिल बंद पडल्या आणि त्यांची हातातोंडाची गाठ पडणे मुश्किल झाले. अशा परिस्थितीत संतोषचे बालपण जात होते. पण, त्याही परिस्थितीत आईवडिलांचे मुलांना संस्कार देण्याचे प्रयत्न वाखाणण्यासारखेच होते. आर्थिक हलाखीत संतोषने अत्यंत चांगल्या गुणांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली. चांगल्या गुणांमुळे चिनॉय महाविद्यालयात प्रवेश मिळवला. महाविद्यालयाचे जग आणि संतोष राहत असलेल्या कुर्ल्याच्या तानाजीनगर झोपडपट्टीचे जग यांच्यात मात्र जमीन अस्मानाचा फरक होता.
 
एके दिवशी पाऊस मी म्हणत होता. त्या दिवशी महाविद्यालयातून संतोष घरी आला. भुकेने तो व्याकूळ झाला होता. पण, घरात मात्र स्मशान शांतता. आईवडिलांच्या डोळ्यात वेदना उतरलेली. आईवडील दोघेही संतोषला आग्रह करू लागले, ‘‘काकांकडे जा, जेवणाची वेळ आहे.’’ संतोषच्या लक्षात आले की, घरात चूल पेटली नव्हती. त्यातच आईच्या दोन्ही पायाला खराब पाण्याच्या संसर्गामुळे जखमा झाल्या होत्या. पावसामध्ये घरात गुडघाभर पाणी साचत असे. वडील, भाऊ आणि स्वतः संतोष कामानिमित्त दिवसभर बाहेर असत. त्या गुडघाभर पाण्यात आई जयश्री दिवसभर असे. त्या खराब पाण्यामुळे त्यांच्या दोन्ही पावलांना संसर्ग झाला. पण, तरीही आईला गुडघाभर पाण्यात राहण्याशिवाय काही पर्याय नव्हता.
 
हा दिवस संतोषच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला. त्यांनी शिकता शिकता काम करायचे ठरवले. त्यावेळी संतोषचे वय होते १७ वर्षे. सोबत होती मनातल्या प्रचंड न्यूनगंडाची. त्याचबरोबर आशा होती परिस्थितीवर मात करण्याची. ते अंधेरीच्या आयसीआयसीआय बँकेमध्ये अर्धवेळ नोकरीला लागले. अंधेरीच्या लोखंडवाला भागात बँकेची सेव्हिंग पॉलिसी विकायची. काही दिवस शिकण्यात गेले. पहिली पॉलिसी विकण्यासाठी ते लोखंडवालातील एका फ्लॅटमध्ये गेले. एका महिलेने दार उघडले. संतोष पॉलिसीची माहिती देऊ लागले. त्या महिलेने बँकेचे ओळखपत्र मागितले. संतोषला तर अजून ओळखपत्र मिळाले नव्हते. तिने तडक पोलिसांना फोन केला. पोलीस आले. संतोषचे काहीही न ऐकता त्यांनी त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेले. संतोष म्हणतात, ‘‘त्यादिवशी वाटले मरण आले तर बरे होईल. कारण मला पॉलिसी विकायची होती. एक पॉलिसी विकल्यावर १०० रू मिळणार होते. त्या मॅडमना वाटले की, माझ्याकडे बँकेचे ओळखपत्र नाही म्हणजे मी चोर आहे. त्यानंतर बँकेचे ऑफिसर आले. त्यांनतर पोलिसांना आणि त्या मॅडमना खात्री पटली की खरेच मी पॉलिसी विकायला गेलो आहे.’’ हे सांगताना संतोषच्या डोळ्यात पाणी आले. आसवांच्या धारा लागल्या.
 
त्यानंतर संतोषने ठरवले की आपण आपली पात्रता वाढवायची. पॉलिसी विकण्याचे काम सुरू होतेच. बँकेच्या राकेश परमार अधिकार्‍यांच्या सांगण्यावरून संतोषने एमबीएचे फायनान्स मार्केटिंगचे शिक्षण पूर्ण केले. वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये सेल्स ऑफिसर असिस्टंट मॅनेजरसारख्या पदावर काम करता करता संतोष आता यात्रा डॉट कॉम कंपनीचे नॅशनल हेड आहेत.
 
१०० रूपयांसाठी पॉलिसी विकण्याचे किचकट काम करणारे संतोष आता देशभरात जिच्या ८२ शाखा आहेत अशा कंपनीचे प्रमुख झाले. आज शेकडो कर्मचारी त्यांच्या हाताखाली कामाला आहेत. त्याचसोबत ’इच्छाशक्ती प्रतिष्ठान’ नावाची सेवाभावी संस्थाही आहे. या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून ते अनेक सेवाभावी उपक्रम राबवतात. शून्यातून उभे राहिलेले हे आयुष्य. त्यामागची प्रेरणा काय होती? संतोषच्या शेजारी विश्‍वनाथ सुतार नावाचे संघ स्वयंसेवक राहतात. त्यांनी आठ वर्षांपूर्वी संतोषला संघशाखेत नेले. संतोषचे संघ प्रथमवर्ष पूर्ण झाले. संतोष म्हणतात, ‘‘रा. स्व. संघाचे प्रथमवर्ष करताना माझ्यात आत्मविश्‍वास आला. तारा होण्यासाठी काळोख जिंकावा लागतो, त्यासाठी हातात घेतलेल्या कामाला १०० टक्के न्याय द्यायचा आणि तेही नि:स्वार्थ वृत्तीने हा भाव तयार झाला. त्यामुळे मी सर्वच स्तरांवर प्रत्येक वेळी माझ्याकडून १०० टक्के देण्याचाच प्रयत्न करतो. हलाखीच्या, प्रतिकूल दिवसांतही वडिलांनी जपलेली माणुसकी, साध्य होत नाही, तोपर्यंत प्रयत्न करत राहायचे ही त्यांची शिकवण मला प्रेरणा देते.’’
 
 
संतोषसारखे युवक आज परिस्थितीतून मार्ग काढून मुकद्दरचे सिकंदर होतात. तो प्रवास समजून घेणेही प्रेरणादायी आहे.
 
 
 
- योगिता साळवी 
@@AUTHORINFO_V1@@