डावे आणि त्यांच्या ‘असहिष्णू’ विद्यार्थी संघटना...
महा एमटीबी   27-Mar-2018

'रलीव, त्सलीव या गलीव!' (इस्लाम स्वीकारा, ही जागा सोडा अन्यथा उद्ध्वस्त व्हा! ) 'दिल मै रखो अल्लाह का खौफ, हात मै रखो कलैश्नोकोव्ह'... या व अशा असंख्य घोषणा १९ जानेवारी १९९० रोजी संपूर्ण काश्मीरमध्ये देण्यात आल्या. जे. के. एल. एफ या संघटनेचा नेता यासीन मलिक आणि त्याचे सहकारी भर दिवसा हातात बंदुका घेऊन श्रीनगर, अनंतनाग आणि विशेषत: हब्बा कदल सारख्या भागातील कश्मीरी पंडितांच्या घरांजवळून मोर्चे काढत होते. खरं तर त्या रात्रीपासून खोऱ्यात वास्तव्यास असलेले कश्मीरी पंडित, मिळेल त्या वाहनांच्या माध्यमातून जम्मूच्या दिशेने जाऊ लागले. पण, इतक्या प्रतिकूल परिस्तिथीत देखील काही पंडितांना आपले घर, आपली भूमी सोडून जाणे काही पटले नाही. आता जरी वातावरण तंग असले तरी काही दिवसांनी खोऱ्यातील जनजीवन पूर्ववत होईल अशी वेडी आशा त्यांच्या मनात होती. ही आशा, या स्वप्नाचा भंग झाला तो दिनांक २२ मार्च १९९० रोजी जेव्हा भर दिवसा श्रीनगरमध्ये बिट्टा कराटे उर्फ फारुक अहमेद दरच्या सहकाऱ्यांनी बी. के. गंजू नामक एका कश्मीरी पंडिताचा (ते ज्या तांदळाच्या कणगीत लपले होते) त्यावर गोळ्यांचा वर्षाव करून खून केला. खरं तर त्या दिवशी त्यांनी यमास धोका दिला होता, दहशतवाद्यांनी जेव्हा पहिल्यांदा त्यांच्या घरात प्रवेश केला तेव्हा त्यांना गंजू काही सापडले नाहीत. मात्र, ते तीन मारेकरी जेव्हा तेथून बाहेर पडले तेव्हा शेजारी राहणाऱ्या एका वयस्क मुस्लीम महिलेने स्वतः हून गंजू कुठे लपले आहेत याची माहिती दिली. या घटनेमुळे खरं तर खोऱ्यातील पंडित कुटुंबांचा त्यांच्या कश्मीरी बांधवांवरील उरलेला विश्वास आणि सौहार्दाचे स्वप्न देखील धुळीस मिळाले. पुन्हा एकदा जीव वाचविण्यासाठी असंख्य पंडितांनी जम्मू आणि मग पुढे दिल्लीची वाट धरली.

सत्तावीस वर्षांपूर्वी गेल्याच आठवड्यातल्या २२ तारखेस ही घटना घडली होती. आज त्या घटनेची गंजू कुटुंबियांव्यतिरिक्त कोणालाच आठवण नाही. JNU मध्ये मात्र आजही भारताचे तुकडे व्हावे अशी मनीषा बाळगणाऱ्या डाव्या विद्यार्थी संघटनांचे नेते स्वस्थ बसून आहेत. हल्ली ते गावोगाव त्यांच्या तथाकथित उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी विखारी भाषणे करीत फिरतात. एकीकडे न्यायाच्या प्रतीक्षेत असलेले कश्मीरी पंडित तर दुसरीकडे कश्मीर एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास यावे अशी मनीषा बाळगणारे आपल्याच भारतातील हे तरूण. एरवी अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सांप्रदायिकतेवर आधारित राजकारणाचा विरोध, मुलभूत हक्क इत्यादी संकल्पनांवर मोठमोठ्या परिषद आणि चर्चासत्रांमध्ये भाषणे देत, गावगन्ना पिटत हिंडणारी ही तथाकथित पुरोगामी मंडळी या अन्यायावर मात्र गप्प आहेत.


मुळात भारतातील समस्त पुरोगामी आणि डाव्या मंडळींकडून काही अपेक्षा करणेच चुकीचे आहे, पण तसे का ? हे पाहणे आजच्या घडीला महत्त्वाचे आहे. एखादी व्यक्ती आपल्या विचारधारेची पाईक असली पण समजा त्या व्यक्तीने आपल्याच एखाद्या चुकीवर बोट ठेवले की मग त्या व्यक्तीला जाणीवपूर्वक समाजमाध्यमांवर छळण्याचा प्रयत्न केला जातो. आणि समजा, ती व्यक्ती टी.व्ही वरील चर्चांमध्ये सहभागी होत असेल आणि प्रसारमाध्यमांतील मंडळी त्यांचा 'विचारवंत', 'विश्लेषक' इत्यादी सारखे शब्द वापरून उल्लेख करत असतील तर मग त्यांचा पुरता बँड वाजवण्यात येतो. नुकतेच अशा 'विचारवंत' म्हणून विख्यात एका व्यक्तीच्या एका जुन्या भाषणाची चित्रफीत व्हायरल झाली. आता ते ज्या कंपूचा भाग आहेत, त्याच कंपूमध्ये त्यांच्यावर टपलेल्या लोकांसाठी एवढे निमित्त पुरेसे आहे. असो, खरं तर ते कसे आणि किती भाजपद्वेष्टे आहेत हे जवळपास सर्वश्रुत आहे, म्हणून मला त्याशी काही देणेघेणे नव्हते, निदान कालपर्यंत तरी माझी तशी धारणा होती. एखादी व्यक्ती, मग भले तिच्या बोलण्यात किंवा लिखाणात तथ्य असो किंवा नसो, ती मोदी तसेंच हिंदुत्ववादी पक्षांवर टीका करत आहे म्हणजे ती 'आपल्यातली' आहे असा डाव्या किंवा डावीकडे कल असणाऱ्या विद्यार्थी संघटनांचा समज होतो. तसे याबाबतीत देखील झाले. मग अचानक त्या जुन्या भाषणाची चित्रफीत व्हायरल होते आणि लगेच हेच तथाकथित तरुण विद्यार्थी नेते आपले खरे रंग दाखवत, "अरे हे तर या जातीचे आहेत, आपल्याला आधीच लक्षात यायला हवं होतं..." अशा तर्हेने फेसबुकवरील वेगवेगळ्या पोस्ट्सवर ही मंडळी कमेंट करत होती. खरं तर या पद्धतीने अश्लाघ्य भाषेत टीका करणे, ते देखील त्या व्यक्तीने फार आधी मांडलेले विचार आपल्या विचारधारेस अनुकूल नाहीत म्हणून, ही देखील एक प्रकारची 'असहिष्णूताच' आहे, जे ते कधीच मान्य करणार नाहीत. म्हणूनच, मी दुर्दैवाने या समस्त तथाकथित पुरोगामी मंडळींचे लाडके - डावे आणि त्यांच्या विद्यार्थी संघटनांच्या दाव्यांमधील फोलपणावर टीका करणारा हा लेख लिहिण्यास उद्युक्त झालो.

आता सदर प्रसंगांच्या माध्यमातून या विषयाकडे बघूया...

१. या वर्षाच्या सुरुवातीस, मुंबईतल्या एका प्रतिष्ठित महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे आयोजित एका व्याख्यानमालेस, एक विद्यार्थी आणि श्रोता या नात्याने मी उपस्थित होतो. व्याख्यान सुरू व्हायला वेळ असल्याने अर्थातच बहुतांश लोकं सभागृहाबाहेर रेंगाळत होते. चहा पिणे वगैरे आटोपल्यावर मी सहज चक्कर मारण्याच्या हेतूने तेथे सभागृहाच्या दाराजवळच थाटलेल्या एका स्टॉलपाशी गेलो आणि थक्क झालो... तेथे पानसरे, गोर्कि यांची पुस्तके आणि लेनिन, मार्क्स, भगतसिंग वगैरेंवर छापलेल्या छोट्या पुस्तिका विक्रीस उपलब्ध होत्या. स्टॉलवरील विद्यार्थ्यांनी भगतसिंगचे चित्र असलेल्या लाल भडक रंगाचे टी-शर्ट घातले होते. त्यांचा एवढा अवतार बघून ते कोणत्या विद्यार्थी संघटनेचे आहेत एवढा निष्कर्ष काढणे सहज सोपे होते. तितक्यात एक प्रसिद्ध पुरोगामी प्राध्यापक तेथे प्रसन्न मुद्रेने प्रकटल्या आणि त्या विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुस्तकं चाळू लागल्या. मी हे सगळे मजेत पाहत होतो.

२. JNU - ही तीन अक्षरे तुम्ही कोणत्याही कडव्या भाजप समर्थकासमोर उच्चारलीत तर तुमच्याकडे त्याने एक जळजळीत कटाक्ष न टाकल्यास नवल. डावे पक्ष प्रत्यक्ष लोकप्रतिनिधीत्वाच्या दृष्टीने जरी भारतीय राजकारणात फारसे महत्त्वाचे राहिले नसले तरी देखील केंद्रीय आणि विशेषतः स्वायत्त विद्यापीठांमधल्या आपल्या विद्यार्थी संघटनांच्या जोरावर समाजमाध्यमे आणि इतर ठिकाणी झोतात राहण्याचे कसब आजमावत असतात. JNU देखील त्याला अपवाद नाही. असो, तर मूळ मुद्दा असा की येथे डाव्या विद्यार्थी संघटनांचे नेते अभ्यासापेक्षा टुकार चळवळी आणि गुंडगिरी करण्यातच राम मानतात. मग ती गुंडगिरी प्रत्यक्ष शारीरिक स्वरूपाची असो किंवा बौद्धिक. २०१४ साली सत्तांतर झाल्यावर काँग्रेस आणि त्यांच्या NSUI सारख्या विद्यार्थी संघटनांना देखील जितक्या वेदना झाल्या नसतील तितका त्रास या मंडळींना होऊ लागला. 'राष्ट्रवाद' या विषयावर या विद्यार्थी संघटनांनी कॅम्पसमध्ये प्रशासकीय कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत व्याख्यानमाला भरवली. नेहमीच्या Modus operandi चा अवलंब करण्यात आला उदा. ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांना आग्रह करत मुद्दाम पहिल्या रांगेत बसवणे, आपल्या विचारसरणीशीच निगडित विद्यार्थी तिथे बसतील याची दक्षता घेणे वगैरे. मला या साऱ्याशी देखील काही देणे घेणे नाही. आता खरी गंमत बघूया. या व्याख्यान सत्रांत, त्यांच्याच कंपूतील बहुतांश प्राध्यापक वक्ते म्हणून बोलवण्यात आले. अपवाद तो तेवढ्या प्राध्यापक मकरंद परांजपे यांचा. तटस्थ अभ्यासक, निर्भीडपणे, मुद्देसूदरित्या भारतीय राष्ट्रवाद या विषयावर आपले म्हणणे मांडणारा वक्ता म्हणजे प्रा. परांजपे. पण या निर्भीड आणि अभ्यासू वृत्तीची शिक्षा म्हणून त्यांचा हे विद्यार्थी पुरेपूर मानसिक छळ करण्याचा प्रयत्न करतात उदा. वर्गात जाऊ न देणे, त्यांचे व्याख्यान चालू असताना टिंगलटवाळी करणे, अतिशय अश्लाघ्य भाषेत टिप्पणी करणे इत्यादी गोष्टींना प्रा. परांजपे खंबीरपणे सामोरे जात असतात. अगदी कॅनडामध्ये आयोजित त्यांचे व्याख्यान देखील प्रा. जंगम नामक एका तथाकथित समाजसुधारक चळवळीच्या इसमाने उधळवून लावले. आता एवढा छळायचा प्रयत्न करून देखील प्रा. परांजपे यांना फरक पडत नाही हे पाहून बावचळलेल्या डाव्या प्रा. मेनन त्या व्याख्यानमालेत सर्व पुढारलेल्या जातींबद्दल वाटेल ते बरळतात उदा. त्या म्हणतात राष्ट्रवाद ही संकल्पना सवर्णांचा कावा आहे, ज्याच्या माध्यमातून त्यांना भारतातील संस्कृतीवर हल्ला करायचा आहे तसेंच त्या असं ही म्हणतात की, सारे रानडे-आपटे-गोखले आडनावाचे बहुतांश लोकं वाईट असतात. बरं, हा वेडेपणा येथेच थांबत नाही. न्याय आणि स्वातंत्र्य या संकल्पनांचा कैवार घेतलेल्या दिल्लीच्या त्या कंपूतील या प्राध्यापक बाई पुढे जाऊन असे देखील म्हणतात की भारताने अवैध मार्गाने ईशान्य भारत आणि काश्मीरवर तेथील नागरिकांच्या हक्कांवर गदा आणत अवैध मार्गाने ताबा मिळवला आहे. अर्थात, त्या असे बोलत असता भाषणादरम्यान वाजणाऱ्या उत्स्फूर्त टाळ्या आणि सदर जातीय टिप्पणीवरून त्यांचा रोख कोणाकडे आहे हे कोणाच्याही लक्षात येईल...
३.
मुंबई शहर किंवा महाराष्ट्र राज्यातच म्हणा, समाजशास्त्र विषयात शिक्षण आणि संशोधनासाठी फार कमी चांगल्या शैक्षणिक संस्था आहेत. त्यांपैकीच एक म्हणजे TISS. तर ही स्वायत्त शिक्षण संस्था फारशी कधी बातम्यांत नसते. इतर संस्था आणि तिथल्या विद्यार्थी संघटना प्रसिद्धीत न्हाऊन निघत असताना हे TISS तेवढे शांत कसे ? असा प्रश्न या डाव्यांच्या मनात निश्चितच आला असणार. आणि, लवकरच त्यांना ती संधी मिळाली. या संस्थेचे माजी कुलगुरू परशुरमन यांनी राजीनामा देण्याआधी काही मोजक्याच इंग्रजी वृत्तपत्रांना मुलाखती दिल्या होत्या, त्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की TISS म्हणजे दिल्लीतील संस्थांसारखी नाही. येथे तशा प्रकारचे राजकारण होत नाही, बहुतांश विद्यार्थी पण तसे करू इच्छित नाहीत. मात्र, येथे अशी काही महत्त्वाकांक्षी मंडळी आहे जी प्रश्न निर्माण करून स्वतः चे राजकीय मनसुबे साधू पाहत आहे आणि लगेच काही दिवसांनी आंदोलनाला सुरुवात झाली. आरक्षित प्रवर्गातील PG लेव्हलच्या विद्यार्थ्यांना होस्टेल आणि कँटीनचे शुल्क आता भरावे लागणार होते. TISS ने आजवर या विद्यार्थ्यांना स्वतः हून सदर सुविधा मोफत देऊ केल्या होत्या. मात्र, जवळपास वीस कोटींची वित्तीय तूट असल्या कारणाने या सुविधा प्रशासनाने सशुल्क करण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थी कौन्सिलने असा आक्षेप घेतला की प्रवेश घेताना प्रोस्पेक्टटसमध्ये असे काहीही लिहिले नव्हते, तेव्हा प्रशासनाने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी करण्यात आली. आंदोलन झाले, संस्थेच्या मुख्य प्रवेशद्वारातून या विद्यार्थ्यांनी इतर विद्यार्थी आणि प्राध्यापकांना आत जाण्यास मज्जाव करण्यात आला, lectures cancel झाली. आता या महत्त्वाकांक्षी मंडळीने यात देखील संधी शोधली. आंदोलन कर्त्यांमध्ये आपल्या विद्यार्थी कार्यकर्त्यांना घुसवत ' भाजपा मुर्दाबाद ' या आशयाचे पोस्टर हाती देत घोषणा द्यायला उत्तेजित करायचे चाळे करण्यात आले. पुढे प्रतिनिधी मंडळ आणि प्रशासनात बऱ्याच चर्चा झाल्या आणि बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या. असे असताना देखील या मंडळीने, अशाच तर्हेने आंदोलन चालू ठेवणे कसे बरे राहील याबाबत इतरांना उत्तेजित करू लागले. अर्थात, आंदोलनकर्त्यांमध्ये दोन गट पडले. एक गट, जो चर्चेच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या तोडग्याशी समाधानी होता, ते यातून बाजूला झाले तर दुसरे जे ह्याला आणखी पेटते ठेऊन स्वतः चे मनसुबे सिद्धीस नेऊ इच्छितात, ते अजूनही विद्यार्थ्यांना दिशाभूल करत आहेत.

वरील प्रसंगांचे विच्छेदन -


वरील प्रसंग माझ्यामते तरी बऱ्यापैकी बोलके आहेत. डाव्या विद्यार्थी संघटनांच्या दाव्यांतील फोलपणावरच हे प्रकाश टाकतात. पहिल्या प्रसंगात आपण पाहिले की कशा तर्हेने त्या महाविद्यालयात डाव्यांच्या ज्या विविध विद्यार्थी संघटना आहेत, त्यांपैकी एका संघटनेने स्टॉल थाटला होता. बरं, मग यात विशेष काय ? असा प्रश्न कोणाच्याही मनात येईल. आता खरी गंमत येथे नमूद करतो. ते महाविद्यालय पुण्यातील एका प्रसिद्ध शिक्षण संस्थेद्वारे संचलित असून, संचालक मंडळावरील बहुतांश संचालक मंडळी संघ आणि भाजपशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे संबंधित आहेत. त्यांपैकी एक तर खुद्द सध्या भाजपच्या आमदार आहेत. तेव्हा, या संघाचे वर्चस्व असलेल्या या कॉलेजात चक्क इतर विचारधारेचे विद्यार्थी प्रत्यक्ष आवारात आपल्या विचारधारेचा बिनधास्त प्रचार करू शकतात हे थोडे विचित्र नाही वाटत ? म्हणजे एकीकडे 'हे संघपरिवार आणि भाजपचे लोकं आमची गळचेपी करतात,' 'they have left no space for expressing dissent' - वगैरे म्हणत वाहिन्यांवर कंठशोष करायचा आणि दुसरीकडे त्याच तथाकथित असहिष्णू लोकांचे वर्चस्व असलेल्या संस्थांमध्ये बिनबोभाटपणे, कोणाचाही त्रास होत नसताना आपल्या विचारधारेचा प्रसार करायचा... याहून मोठा दुटप्पीपणा तो कोणता ?

"एक तर तू आमच्यासोबत असशील तर उत्तम अन्यथा तू भांडवलदारांचा हस्तक आहेस !" - अशी आजवर कम्युनिस्ट विद्यार्थी संघटनांच्या नेत्यांची भूमिका ' होती '. आता कालांतराने जसेजसे कम्युनिस्टांचे प्राबल्य कमी होत आर्थिक उदारीकरणाच्या परिणाम स्वरूप राजकारणात देखील बदल घडत डाव्यांचे खच्चीकरण होऊ लागले तेव्हा या भूमिकेत थोडासा बदल झाला. 'बदलत्या काळानुसार बदलत पुढे जाणे' असे करण्याऐवजी भूतकाळ आणि वैचारिक सोवळेबाजीत रमण्यातच डावे धन्यता मानतात. बहुदा म्हणूनच आता या भूमिकेत थोडासा बदल होत - "एक तर तू आमच्यासोबत असशील तर उत्तम, अन्यथा तू 'मनुवाद्यांचा हस्तक' आहेस" अशी तद्दन जातीय भूमिका घेत राजकारण करण्याचा प्रयत्न ही मंडळी करत आहेत. JNU देखील ह्याला अपवाद नाही हे आपल्याला प्रसंग क्रमांक दोन मधून लक्षात आले असेलच. विद्यापीठात नव्याने प्रवेश घेतलेल्या ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांना गोंजारत, मुस्लीम आणि आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना हेरून, त्यांना आपल्यात मुद्दाम समाविष्ट करण्याचा प्रयत्न करत... 'तुमच्यावर या व्यवस्थेने अन्याय केला आहे' - हे मनावर बिंबवले जाते. स्पष्ट शब्दात सांगायचे झाले तर त्यांचा 'वापर' केला जातो. सत्तेची फळं मात्र पुढे जाऊन भद्रलोक मंडळींनाच चाखायला मिळतात. ही गोष्ट हळूहळू या विद्यार्थ्यांच्या देखील लक्षात येऊ लागली आहे. बहुदा म्हणूनच ज्याच्या आत्महत्येचे भांडवल करण्यात आले, तो रोहित वेमुला देखील डाव्यांच्या गटातून बाहेर पडत एका दुसऱ्या पण तसल्याच तद्दन जातीय विद्यार्थी संघटनेत सक्रिय झाला होता. दुसरीकडे, दिल्लीत डाव्या विचारसरणीची प्राध्यपक मंडळी, जे स्वतः एका पुढारलेल्या समाजातून येतात, ते राजरोसपणे खालच्या पातळीला उतरत जातीय द्वेष पसरविण्याचे टुकार धंदे करत आहेत. केंद्रात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणारा तथाकथित असहिष्णू भारतीय जनता पक्ष सत्तेत असताना देखील, सत्ताधारी आणि समस्त उजवे कसे असहिष्णू आणि Communal आहेत या विषयांवर आधारित चर्चासत्र आणि व्याख्यानमाला विद्यार्थ्यांचे ब्रेन वॉशिंग करण्यासाठी नियमितपणे भरवल्या जात आहेत, येचुरी तसेंच करात तर आवर्जून तेथे उपस्थिती लावतात. तर दुसरीकडे डॉ. सुब्रमण्यम स्वामी हे भाजपचे खासदार आहेत, फक्त एवढेच कारण गुंडगिरी करत त्यांचे व्याख्यान होऊ नये, यासाठी पुरेसे ठरते !


तिसरा प्रसंग तर खऱ्या अर्थाने मार्मिक आहे. मुंबईल्या या संस्थेत जो काही वाद उद्भवला तो थेट विद्यार्थी आणि संस्थेचे प्रशासन यांत होता. तेव्हा त्यांनी तिथे हातात फलक धरत, घोषणा देत आंदोलन केले असते तर त्यात काहीही वावगे नव्हते. पण येथे देखील डाव्यांनी संधी शोधली. त्या घोळक्यात सर्वात पुढे आपली माणसे उभी करत, त्यांच्या हातात ' भाजपा मुर्दाबाद ' असे लिहिलेले फलक देण्यात आले. याचा स्पष्ट अर्थ एवढाच की यांना त्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांशी खऱ्या अर्थाने काहीही देणे-घेणे नसून फक्त आंदोलनाचे कव्हरेज करण्यासाठी जी ओळखीची पत्रकार मंडळी येईल, त्यात ठळकपणे हे फलक आणि आपली माणसे दिसावी असे त्यांचे मनसुबे होते. हे सारे न कळण्याइतपत विद्यार्थी मूर्ख असतात असे बिलकुल नाही. उलट याच दरम्यान JNU मधील एका माजी विद्यार्थ्याने आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा हे डावे कसे वापर करतात हे फेसबुकवरील पोस्टच्या माध्यमातून स्पष्ट केले. झारखंड, छत्तीसगढ व ईशान्य भारतातून येणारे असे कित्येक विद्यार्थी व त्यांच्या कहाण्या आहेत ज्यांत असे दिसून येते की पैशाच्या कमतरतेमुळे त्यांना होस्टेलची खोली रिकामी करावी लागून रस्त्यावर रात्री झोपावे लागले तेव्हा याच तथाकथित असहिष्णू मंडळी आणि अभाविपच्या विद्यार्थ्यांनी त्यांना मदत केली होती.

सरते शेवटी.....

भारतीय राजकारणाच्या आखाड्यात डावे आज देखील जर तग धरून असतील तर ते म्हणजे त्यांच्या विविध offshoots मुळेच, मग ते विविध किसान संघटना, रेल व बँक कर्मचारी युनियन असोत किंवा आक्रमक विद्यार्थी संघटना. निवडणुका जाहीर झाल्यावर याच विविध युनियन आणि संघटनांचा प्रचारासाठी वापर केला जातो, भाजपप्रमाणे यांच्याकडे देखील dedicated अशा स्वत: च्या कार्यकर्त्यांची फळी नाही. त्यातल्यात्यात एस.एफ.आय, डी.वाय.एफ.आय सारख्या विद्यार्थी संघटना तर डाव्यांना विविध व्यासपीठांवर तारण्यात जीवाचे रान करतात. पश्चिम बंगालमध्ये तर पूर्वी निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यावर डाव्यांच्या वरिष्ठ नेत्यांना समजा प्रचार करत असता, पैशाची चणचण भासली तर याच डाव्या विद्यार्थी संघटनांचे विद्यार्थी वर्धमान, बोलपूर, सेरमपूर, कलकत्ता पासून ते दक्षिण २४ परगणा जिल्ह्यांमधील प्रमुख बाजारपेठांमध्ये दुकानदारांना धमकी देत, खंडणी वसूल करत हिंडायचे, कम्युनिस्ट विरोधकांना भीती दाखविण्यासाठी विद्यार्थी वस्तीगृह आणि कॉलेजच्या सुंदर इमारती लाल क्रांतीच्या डांबरी रंगातल्या घोषणांनी चिताडून घाण केल्या जात. रेल्वेतील फर्स्ट क्लास डब्बा हा साम्यवाद विरोधी आहे म्हणून बसायचे आसन आणि बल्ब-पंख्यांची मोडतोड केली जात. आपल्या महाराष्ट्राचे लाडके लेखक पु. ल. देशपांडे यांनी डाव्यांचे हे चाळे बंगाल मधील वास्तव्यात प्रत्यक्ष अनुभवले. आता पश्चिम बंगालमध्ये थोडा बदल घडत आहे, तो इतकाच की लाल रंगाची जागा हिरव्या रंगाने घेतली आहे. पक्ष आणि विचारधारेशी इमान राखणे हे कम्युनिस्टांचे प्राबल्य असलेल्या भागात 'जीवंत' राहण्यासाठी आवश्यक आहे, पण जर तसे केले नाही तर तुम्ही कितीही सुशिक्षित असलात तरी तुमची गय केली जात नाही. कलकत्ता विद्यापीठाचे माजी कुलगुरू संतोष भट्टाचार्य, जे कडवे मार्क्सवादी होती, यांनी चीनने बदललेल्या आर्थिक धोरणाची स्तुती करत मार्क्सवादी विचारांना मूठमाती दिली. याच्या परिणामस्वरूप त्यांच्या कारकिर्दीतला एकही दिवस असा नसेल जेव्हा डाव्या विद्यार्थी संघटनांनी घेराव, खोट्या तक्रारी आणि कोर्टात खटले दाखल केले नाहीत. हे सर्व सोमनाथ चटर्जी यांच्याच नाकाखाली चालू होते. डावे हे असे असतात, मग त्यांचे हे वर्तन योग्य की अयोग्य? हे ठरवण्यासाठी जनता सुज्ञ आहे. पुढे याच डाव्या विद्यार्थी संघटनांमधील निवडक तरुण भारतातल्या मुख्यप्रवाहातील वृत्तसंस्थांमध्ये नोकरी मिळवतात. The Hindu, एक असे वृत्तपत्र ज्याचे आधीपासून नाव आणि भूमिका यांचा दूरपर्यंत संबंध नाही, अशा प्रसिद्ध इंग्रजी दैनिकाचे माजी संपादक आणि सध्या Kasturi and Sons च्या बोर्डवरील अतिशय महत्त्वाची व्यक्ती – एन. राम, त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या एस. एफ. आय या विद्यार्थी संघटनेचे विद्यापीठ स्तरावर उपाध्यक्ष होते. एवढे उदाहरण वरील दाव्यास आधार म्हणून पुरेसे आहे असे वाटते.


' बदल ' या संकल्पनेचे डाव्यांना आधीपासून वावडे आहे. हे त्यांचे 'दुर्दैव' म्हणा किंवा उजव्यांचे 'सुदैव'. मात्र, अखिल भारतीय राजकारणाच्या फळकूटावरून डावे नामशेष होत असताना त्यांना तारू शकेल असा एकमेव आधार म्हणजे त्यांच्या या विद्यार्थी संघटना. भारताचे भवितव्य तरुणांच्या हाती आहे असे म्हणतात. पण जर याच तरुणांच्या अशा विद्यार्थी संघटना नितीमुल्य चुलीत घालत (उदा. जातीवर आधारित राजकीय खेळी खेळणे, जे पूर्वीच्या वरिष्ठ कम्युनिस्ट नेत्यांना पसंत नव्हते), फक्त पक्षीय निष्ठा वेगळ्या म्हणून इतर विद्यार्थी नेत्यांच्या हत्या करत, शांतताप्रिय आणि सुशिक्षित कश्मीरी पंडितांवर अत्याचार करून त्यांना आपल्याच भूमीतून पलायन करायला भाग पाडणाऱ्या फुटीरवादी चळवळीच्या विचारांना आता फक्त जे.एन.युच नव्हे तर प्रत्यक्ष काश्मीर मध्ये जे. के. डी. वाय. एफ या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून पाठींबा दर्शविणे... - स्वत:च्या या अशा कर्मांमुळे जर हीच तरुण मंडळी 'देशद्रोही' म्हणून ‘लौकिक’ प्राप्त करत असतील तर, अशा खऱ्या अर्थाने असहिष्णू डाव्यांच्या विद्यार्थी संघटनांचे प्राबल्य आणि राष्ट्रघातकी कृत्य करण्याची शक्ती नाहीशी करणे कधीही उत्तम !


निवडक संदर्भ –

Our Moon has blood clots – Rahul Pandita

Left Front Rule in West Bengal – Modak, Bhatkhalkar
 
वंगचित्रे – पु.ल.देशपांडे

- कृष्णा प्रदीप डांगे