'जय सीता, राम सीता' च्या जयघोषात नाशिकमध्ये भव्य श्री राम रथयात्रा
महा एमटीबी   27-Mar-2018
 
 
रथात बैसुनी प्रभू श्रीराम
निघाले भक्तांना दर्शन द्यावयाला....
 
 
चैत्र शुद्ध एकादशी हा दिवस नाशिककरांच्या दृष्टीने अतिशय भाग्याचा, पावित्र्याचा आणि उत्साहाचा. या दिवशी श्री काळाराम मंदिरातील श्री प्रभू रामचंद्र रथारूढ होऊन नगर प्रदक्षिणा करतात व भाविकांना दर्शन देतात. आज मंगळवार दि.२७ मार्च रोजी श्री राम रथयात्रा आहे त्या निमित्ताने.....
 
श्री राम रथयात्रेच्या दिवशी एकादशी असते. मात्र प्रभूस स्नानादी उपचार केले जात नाहीत, कारण श्रीराम नवमीस स्नानादी उपचार झालेले असतात. माध्यान्ह पूजेनंतर प्रतिकात्मक रथ मांडला जातो. श्रीराम प्रभू रथारूढ झाले की दुपारी ठीक ४ वाजता सालकरी बुवा पुजारी परिवारासह व निमंत्रितांसह दीक्षित यांच्या घरी जातात. बाबुराव दीक्षित यांच्या घरी (मंदिराचे पश्‍चिम दरवाजास) मंदिराचे बांधकाम सुरू असताना श्रीराम, लक्ष्मण, सीता यांच्या मूर्ती ठेवल्या होत्या, त्यांच्या घरी राम व्यायामशाळेतर्फे सन्मान करून गदा लावली जाते. सालकरी बुवा व पुजारी परिवार दीक्षित परिवार व उपस्थितांना रथयात्रेचा शुभारंभ करण्याविषयी सांगतात व मंदिरात येऊन आरतीस सुरुवात करतात. आरतीनंतर मानकर्‍याचा सन्मान केला जातो. त्यावेळी गाभारा तुडुंब भरलेला असतो. ढोल-झांज्या-नगारे यांच्या गजरात भाविकजन ’जय सीता, राम सीता’ हा गजर करीत असतात. संपूर्ण वातावरण भक्तीमय झालेले असते. वातावरणनिर्मिती अशी होते की, आनंदातिरेकाने डोळ्यातून नकळत अश्रू ओघळतात. सर्वजण ’जय सीता, राम सीता’ या नादात तल्लीन होतात. श्रीराम रथ हा श्री रास्ते आखाडा तालीम संघ यांच्याकडून ओढला जातो, तर श्री गरूड रथ हा श्री अहिल्याराम व्यायामशाळा यांच्याकडून ओढला जातो.
 
रथयात्रेची रथ ओढण्याची परंपरा प्राचीन आहे. इ.स.१७८५ साली सवाई माधवराव पेशवे नाशिक मुक्कामी रामदर्शनासाठी आले होते. येथे आल्यावर देवतेची यथासांग पूजा करून देवतेस दागदागिने अर्पण केले जातात. शिवाय चैत्र उत्सवातील श्रीरामचंद्राच्या रथ उत्सवासाठी नवीन रथ व त्याच्या खर्चासाठी वार्षिक दोनशे रुपयांची सनद सरदार रास्ते यांना करून दिलेली आहे. हा श्रीराम रथ रास्ते आखाडा तालीम संघ यांच्याकडून ओढला जातो. रथयात्रेची प्रथा इ.स.१७८५ पूर्वीपासून अस्तित्वात असावी, असे वाटते.
रथयात्रेस प्रारंभ करण्यापूर्वी मानकर्‍यांचा ढोल-नगारा-झांज यांच्या गजरात मानकर्‍यांना प्रभूचा प्रसाद म्हणून सालकरी बुवांकडून हार घालण्यात येतो व श्रीफळ देऊन सत्कार केला जातो. मानकरी म्हणजे श्री अहिल्याराम तालीम संघाचे पदाधिकारी श्री रास्ते आखाडाचे पदाधिकारी श्री काळाराम संस्थानचे सन्माननीय अध्यक्ष विश्वस्त तसेच वंशपरंपरागत सेवा करणारे सेवेकरी उत्सवात व इतरवेळीही सेवा घेणारे भाविक यांचा हार घालून व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येतो. त्यानंतर सालकरी बुवांच्या हस्ते ’’राजाधिराज श्री रामचंद्र महाराज की जय, महारूद्र हनुमान की जय’, असा जयघोष करून श्रीफळ वाढविण्यात येते. बुवांना जरीचे पांढरेशुभ्र उपरणे फेट्यासारखे डोक्यावर बांधले जाते. हेतू हा की, रथयात्रेत बुवांचे उन्हापासून संरक्षण व्हावे. तसेच त्यांची सालकरी बुवा म्हणून लवकर ओळख पटावी, सालकरी बुवांच्या हातात श्री प्रभुरामचंद्राच्या पादुका व श्रीराम लक्ष्मण व सीता यांच्या भोगमूर्ती प्रभावळी ठेवल्या जातात. श्रीरामप्रभूंच्या भोगमूर्तीला अलंकृत केले जाते व प्रभूंवर चांदीच्या चौरीने वारा घातला जातो. सर्वच उपस्थित भाविक प्रभूंच्या पादुंकांचे दर्शन घेतात. प्रभूंचे दर्शन घेतात. पावन होतात, कृतकृत्य होतात. आनंदित होतात, प्रभूच्या पादुकांना व मूर्तींना हात लावून दर्शन घेण्याची सगळ्यांनाच मुभा असते. कोणत्याही तर्‍हेचा कसलाही भेदभाव तेथे नाही. प्रत्येकजण पादुकांना स्पर्श करू शकतो व दर्शन करू शकतो. श्रीरामप्रभूंच्या पादुका व भोगमूर्ती घेऊन सालकरी बुवा मंदिराभोवती एक प्रदक्षिणा मारतात व पूर्वेस घंटेखालील बाजूस चांदीची पालखी ठेवलेली असते, तेथे येतात. प्रदक्षिणा करून असंख्य भाविक दर्शनाचा लाभ घेतात. पालखीत विधिवत पूजा आरती करून श्रीरामप्रभूंच्या पादुका व भोगमूर्ती ठेवण्यात येतात व खर्‍या अर्थाने रथयात्रेस प्रारंभ होतो. येथून सालकरीबुवा प्रभूंना पाठ दाखवायची नाही, या भावनेने प्रभूंकडे तोंड करूनच चालतात म्हणजे पालखीकडे तोंड करून चालतात, उलटे चालतात. जाणकार भाविक बुवांना उलटे चालताना योग्य ते मार्गदर्शन करतात. सालकरी मंदिराच्या पूर्वेस पूर्व दरवाजाबाहेर येतात. तेथे गरूड रथ तयार असतो. श्री गरूड रथ व श्रीराम रथ उत्तम तर्‍हेने सजवलेले असतात. त्यांची योग्य ती देखभाल केलेली असते. ऑईलिंग ग्रेसिंग केलेले असते तसेच ब्रेक सिस्टिम उत्तम तर्‍हेने काम करत असल्याचे तपासलेले असते. रथांना उत्तम तर्‍हेने रंगरंगोटी केलेली असते. केळीचे खांब रथाची शोभा वाढवित असतात. रोषणाईसाठी दिव्यांच्या माळा, हॅलोजन बल्ब यांचा उत्तम तर्‍हेने वापर केलेला असतो. तसेच ध्वनिक्षेपणाची व्यवस्थाही उत्तम केलेली असते. सालकरी बुवा रथाजवळ उलटे चालत पालखीकडे श्रीरामप्रभूंकडे तोंड करून येतात व रथारूढ होतात. श्रींची पालखीदेखील रथाच्या उंचीला मिळवून श्री सालकरी बुवांच्या हस्ते पूजा-आरती उपचार होतात व श्रीरामप्रभूंच्या पादुका व भोगमूर्ती पालखीतून गरूड रथात ठेवल्या जातात. तेथे पूजा-आरती होते. श्री गरूड रथांवर सालकरी बुवांच्या हस्ते हार घालून श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येतो. त्यानंतर श्री अहिल्याराम व्यायाम प्रसारक मंडळाचे मानकरी व धुरीचे मानकरी यांच्या हस्ते धुरीवर श्रीफळ वाढवून रथयात्रेस प्रारंभ होतो. धुरी म्हणजे रथाच्या पुढील बाजूस जो लाकडी दंडा असतो, ज्याला रथाचे नाडे गुंडाळलेले असते व ज्यामुळे रथ वळविता येतो, त्या लाकडी दांड्यास धुरी म्हणतात. फटाक्यांची आतषबाजी होते व ’राजाधिराज श्री रामचंद्र महाराज की जय महारूद्र हनुमान की जय जय सीता राम सीता’ या गजरात रथ पुढील बाजूस बांधलेल्या दोरखंडाने (त्याला नाडा म्हणतात) श्री अहिल्याराम व्यायाम प्रसारक मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून व भाविकांकडून ओढावयास सुरुवात होते. श्री गरूड रथ हा श्रीराम रथाजवळ बाजूस थांबविला जातो. सालकरी बुवांच्या हस्ते पूजा-आरती होऊन ’जय सीता राम सीता’च्या गजरात श्री रामप्रभूंच्या भोगमूर्ती पालखीत ठेवल्या जातात. पालखीत मूर्ती ठेवल्यानंतर आरती केली जाते व पालखी बाजूस घेतली जाते. सालकरी बुवा गरूड रथातून उतरून श्रीराम रथावर आरूढ होतात. श्रींची पालखी श्रीराम रथाजवळ घेतली जाते. पूजा करून श्रीरामप्रभूंच्या मूर्ती रथात ठेवल्या जातात. पूजा आरती होऊन सालकरी बुवा श्रीराम रथातून खाली उतरतात. उलटे श्रीरामप्रभूंकडे तोंड करून चालावयास सुरुवात करतात. आता ही खरी रथयात्रेची सुरुवात होते. श्रीरामप्रभूंकडे तोंड करून उलटे चालणारे सालकरी बुवा त्याच्यामागोमाग श्रींची पालखी त्याच्या पाठीमागे श्रीरामप्रभूंच्या मूर्ती असलेला श्री गरूड रथ व त्यानंतर श्रीराम रथ अशी भव्य रथयात्रा होते. ’जय सीता राम सीता’ या नामाचा सारखा जयघोष सुरू असतो. या रथयात्रेबरोबरच ढोल- नगारा पथक, बॅण्डपथक, लेझीम पथक यांचाही समावेश असतो.
 
अशी ही भव्य रथयात्रा श्रीराम मंदिराच्या पूर्वद्वारापासून सुरू होते. रथयात्रा गणेश वाडीतून वाळवंटात येते. गाडगेमहाराज पुलाच्या खाली येते. श्रीराम रथ व सालकरी बुवा तेथेच थांबतात. सालकरी बुवा व्रतस्थ असतात. त्यांना नदी ओलांडायची नसते. श्री गरूड रथ नदी ओलांडून श्री रोकडोबा मंदिराजवळ जातो. तेथे पूजा-आरती होऊन गाडगे महाराज पुलाखालून डावीकडे वळतो व सरळ नेहरू चौक, दहिपूल, चांदवडकर लेन या मार्गाने वळून मेनरोडला येतो. मेनरोडहून बोहोरपट्टी, दरकारवाडा भांडीबजार या मार्गे बालाजी मंदिरापर्यंत येतो. तेथे आरती होते. कल्पना अशी आहे की, श्री हनुमान रामासाठी बालाजीची आरती आणतो. त्याप्रमाणे श्री गरूडरथ पुढे असतो व त्यात श्री हनुमान व श्रीरामप्रभूंच्या पादुका असतात. जणूकाही श्री हनुमान समस्त भाविकजनांना गावात जाऊन सांगतो की, ’’चला चला भाविकजन हो, चला श्रीराम प्रभू रथारूढ होऊन येत आहेत. चला दर्शनाला चला,’’
 
 
पुढे बालाजी मंदिरापासून ’श्री गरूड रथ पटांगणात येतो व थांबतो. येथे सर्वच जण विश्रांती घेतात. जलपान करतात. येथेच बालाजी कोटावर श्री गायधनी परिवारातर्फे पूर्वापार परंपरागत सर्व श्री गरूड रथ ओढणार्‍या भाविकांना जलपान दिले जाते श्रमपरिहार केला जातो. आज ही परंपरा त्यांचे वंशज श्री विश्वनाथ ऊर्फ (बाळासाहेब ) गायधनी आणि बंधू परिवार निष्ठेने पाळीत आहेत. जलपानाच्या विश्रांतीनंतर रथयात्रा गाडगे महाराज पुलाखालील खंडव्यावरून नदी ओलांडून पंचवटी परिसरात येते. तोपर्यंत श्री सालकरी बुवा व श्रीरामरथ येथेच असतात. भाविक प्रचंड संख्येने दर्शनास येत असतात. हजारोंच्या संख्येने भाविक म्हसोबा पटांगणात गाडगे महाराज पूल रामसेतूपूल नदीच्या दोन्ही काठचा परिसर येथे प्रचंड प्रमाणात उपस्थित राहून श्रीरामप्रभूंच्या दर्शनाचा लाभ घेतात.
 
नाशिक शहरामध्ये जास्तीत जास्त गर्दीचा, उत्साहाचा हा दिवस असतो. ढोल-नगारे-झांजांच्या गजरात ’जय सीता राम सीता’ जयघोष सुरूच असतो. प्रत्येक जण उत्साहाने न्हाऊन निघालेला असतो. राममय झालेला असतो. फटाक्यांची आतषबाजी होते, अशी ही रथयात्रा श्रींची पालखी, सालकरी बुवा, श्री गरूड रथ, श्रीराम रथ अशी श्री रामकुंडावर येते. रथातून श्रींच्या पादुका व भोगमूर्ती विधिवत पूजा करून पालखीत ठेवल्या जातात व वाजत गाजत रामकुंडावर ठेवतात. तोपर्यंत रात्रीचे ९ वाजलेले असतात. रामकुंडावर षोड्शोपचारे पूजा अभिषेक होतो व अद्भुत स्नान होते. येथे विशेष की, प्रत्येक भाविकास पादुका व मूर्तीला पाणी वाहता येते, स्नान घालता येते, कोणत्याही तर्‍हेचा मतभेद तेथे नाही. स्पृश्य -अस्पृश्य, लहान-मोठा, स्त्री-पुरुष कोणीही श्रींची पादुका व भोगमूर्तीस रामकुंडातील पवित्र जलाने स्नान घालू शकतो. त्यासाठी पूजाधिकारी, पुजारी परिवारातील तरुण मंडळी पादुका व मूर्ती घेऊन रामकुंडाच्या काठाकाठाने प्रदक्षिणा मारतात. जेणेकरून उपस्थित असलेला प्रत्येक भाविक लाभ घेऊ शकेल. अद्भुत स्नानानंतर मूर्तीस पोषाख चढवून अतिशय उत्साहाने आरती होते व परत पादुका श्री गरूड रथात, मूर्ती श्रीरामरथात, पालखी पुढे त्या मागे उलटे चालणारे सालकरी बुवा. त्यामागे गरूड रथ व श्रीराम रथ अशी रथयात्रा रामकुंडावरून पाताळेश्वर मंदिराकडे धर्मशाळेवरून शनिचौकातून पुणे विद्यार्थीगृहावरून मंदिराच्या पूर्व द्वारास येते. विधिवत पूजा-आरती होऊन पादुका व मूर्ती श्रींच्या पालखीत ठेवल्या जातात. पूर्व दरवाजास पुजारी परिवारातील सुहासिनींकडून व भाविक स्त्री वर्गाकडून प्रभूस औक्षण केले जाते. पालखी व हनुमानाची मूर्ती विधिवत पूजा-आरती करून मंदिरात आणली जाते. तेथे आरती होते. सर्वांना पिठीसाखरेचा प्रसाद दिला जातो. मंदिरात फटाक्यांची आतषबाजी केली जाते व नंतर आरती होऊन मंदिर साधारण रात्रौ दीड-दोनच्या सुमारास बंद होते, असा हा रथयात्रेचा आनंद उत्सवाचा सोहळा संपन्न होतो. या उत्सवात पालकमंत्री, शहरातील खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आदींसह अवघे नाशिककर आनंदाने सहभागी होतात.
 
 
- पद्माकर देशपांडे