Men, men these are wanted...
महा एमटीबी   26-Mar-2018

शिक्षणाच्या गरजांआधी येतात आरोग्याच्या गरजा ! किमान गरजा भागतील एवढीही सोय नसलेल्या एका गावात जायचं आम्ही ठरवलं. पुण्यातून निघताना २२ वर्षे त्या भागात काम करणाऱ्या एका डॉक्टरांशी बोलून व्यवस्था होईल असं बघून आम्ही बारसूर या गावी चाललो होतो.

तिथून आणखी आतल्या एका वस्तीवर मुक्काम करायचा होता. साधारण सकाळी १०.३० वाजता बारसूरच्या स्टॉपला उतरलो. थोडे अंतर चालून गेल्यावर एक साधारण ५० - ५५ वयाचा माणूस “ज्ञानप्रबोधिनी?” असं मोजकं विचारत माझ्याकडे आला. मी हो म्हणताच माझ्या हातातली बॅग हातात घेत “चलो आपका स्वागत है” म्हणाला. मी नको नको म्हणत असतानाही त्या माणसाने माझी बॅग न्यायला मदत केलीच.

तिथे पोहचलो आणि मला समजलं की ज्या डॉक्टर काकांशी मी फोनवर बोललो होतो ते हेच.... डॉक्टर राम गोडबोले ! सुनीता ताई आणि राम काका अशा उभयतांनी या जंगलातल्या ‘अनारोग्य आणि कुपोषण’ या अही-मही राक्षसांशी युद्ध करायचा चंग बांधलाय. इंद्रावती नदीच्या महाराष्ट्रातल्या बाजूला डॉक्टर आमटे उभयता याच प्रश्नांवर काम करतायत आणि नदीच्या या बाजूला ही मंडळी प्रकाशाची वाट उजळवत आहेत.

महिलांच्या आरोग्याचे २०१५ सालीसुद्धा किती तीव्र प्रश्न असू शकतात हे तिथे लक्षात आलं. नाचणीसारखे अत्यंत पौष्टिक पीक तिथे येतं, पण ‘नाचणी खायची असते आणि ती आरोग्याला आवश्यक आणि पोषक असते’ अशा मूलभूत गोष्टींपासून अनेक प्रकारच्या आरोग्य शिक्षणाच्या प्रश्नांवर प्रबोधन आणि प्रशिक्षण सुनीताताई करताहेत. गेल्या काही वर्षात काही स्वबळावर आणि काही शासकीय यंत्रणेतून मदत घेऊन, असे अनेक महिला आरोग्याचे प्रकल्प ताई राबवीत आहेत. कधी आहार मार्गदर्शन तर कधी मासिक पाळीच्या संदर्भाने जागृती मोहीम, कधी आरोग्य तपासणी शिबीर तर कधी गावातल्या घराघरात जाऊन आरोग्य सर्वेक्षण मोहीम. ‘मितानीन’ नावाचा एक प्रकल्प चालू होता, ज्यात महिला आरोग्य प्रबोधनाचं महत्त्वाचं काम ताई करीत होत्या. मितानीन म्हणजे मैत्रीण ! सुनीताताई खरोखरीच तिथल्या सगळ्या महिलांची ‘मैत्रीण’ बनून काम करताना पाहायला मिळाले. एखादीच्या आरोग्याची काळजी करता करता ही माऊली तिच्या आयुष्याचीही काळजी करू लागते, तिच्या घरच्या प्रश्नांवर हलबी किंवा गोंडी भाषेत बोलते. तिची सुख दुःख वाटून घेते, प्रेमाने आपुलकीनं तिला समजून घेते. एखादी फारच अडचणीत असेल तर मग ‘रहा आता इथेच’ असं म्हणून तिला काही काम मिळेल असं बघते.

खूप लांबून लांबून चालत चालत अनेक आदिवासी लोक ओ.पी.डी. मध्ये मोठ्या विश्वासाने आणि आदराने येतात. हा विश्वास कमवायला आवश्यक असलेली अचाट ‘कार्यशरणता’ डॉक्टर काकांशी बोलताना पदोपदी जाणवत होती. एक प्रकारचा विश्वास मला काकांच्या बोलण्यात सतत जाणवत होता. आम्ही सगळे गोलात बसून काकांशी गप्पा मारत होतो. घनदाट जंगलातल्या गंमती जंमती काका सांगत होते. हळूहळू आमच्या प्रश्नांचा रोख काकांच्या कामाकडे वळला. नववीतल्या एका मुलाने काकांना ‘तुम्ही लोकांचा विश्वास कसा मिळवला?” असा प्रश्न विचारला. खूप विविध अनुभव, थक्क करणारे अनुभव ऐकायला मिळाले.

एकदा एका विशीतल्या तरुणाबरोबर सुमारे तासभर चालत जंगलातल्या एका वस्तीवर काका गेले. त्या मुलाच्या वडिलांचा पाय सुजला होता ते तपासायला! तपासणी झाली, औषध वगेरे दिली आणि आईची चौकशी केली. तर त्या तरुणाने सांगितलं की आई गुनियाकडे आहे. गुनिया म्हणजे मांत्रिक. तिला गेले तीन आठवडे ताप आणि उलट्या होतायत. कुठलासा देव कोपला होता. आता काहीच दिवसात तो मांत्रिक काही महत्त्वाचे विधी करणार होता. ते विधी झाले की त्याची आई त्या आजारातून मुक्त होईल असा त्या मांत्रिकाला विश्वास होता. काका निघाले त्या ‘मुक्त’ करून देणाऱ्या मांत्रिकाकडे आणि तिथे जाऊन त्या मांत्रिकाशी भांडून, हातापाया पडून या बाईला माझ्या हवाली कर असं सांगू लागले. त्या मुलाला, त्याच्या वडिलांना आणि शेवटी त्या मांत्रिकाला विनवून आणि त्या आजारी आईची जबाबदारी घेऊन हा माणूस तिला खांद्यावरून बारसुरला आणि तिथून अम्ब्युलन्स मधून जगदलपूरला घेऊन गेला! मलेरियाची शेवटची स्टेज होती. वेळीच उपचार मिळाले, ती बाई आजारातून मुक्त झाली आणि स्वतः च्या पायाने चालत घरी गेली. अनेक प्रसंग ताई आणि काका सांगत होते आणि आम्ही थक्क होऊन ऐकत होतो. हे सगळं ऐकून एवढा धीर आणि चिकाटी दाखवणाऱ्या दांपत्याला त्रिवार वंदन करावंसं वाटतं.

बारसूरपासून काही किलोमीटर अंतरावर एक वस्ती आहे. त्या वस्तीत आम्ही एक रात्र रहायचे असे नियोजन होते पण काकांना त्या वस्तीतून निरोप आला की, “अंदरवालेने मना किया है!” त्यामुळे आम्ही बारसूरमध्येच राहायचं ठरवत होतो, तोपर्यंत पुन्हा निरोप आला “ये तो स्कूल के बच्चे है, तो वो आ सकते है!” पहिल्या निरोपाने खचलो होतो. आता हा निरोप आल्यावर मी काकांना म्हटलं “कशाला उगाच रिस्क? नको जायला आता”

“अरे अब नाही गये तो उठा के लेके जायेंगे!” असं म्हणत काकांनी मला धीर दिला आणि “अस काही नसतं तुम्ही फारच घाबरताय ही माणसं तुमचा योग्य पाहुणचारच करतील don’t worry!” असं म्हणत त्यांनी त्या वस्तीवर जाण्यासाठी गाडी बोलावली.

काही अंतर गेल्यावर आर्मीने माझ्याकडून ‘माझ्या जबाबदारीवर’ मी जात असल्याचे चेक पोस्टवर लिहून घेतले. मग आम्ही ‘आत’ वस्तीत गेलो. आमचं एका शाळेच्या मैदान बसवून सरबत, चहा वगैरे देऊन स्वागत करण्यात आलं. मग दोन दोन जण एकेका गावकऱ्याकडे मुक्कामी जाणार असं नियोजन झालं आणि आम्ही रात्रीच्या अंधारात पावलं टाकीत गट सोडून आमची व्यवस्था असलेल्या घराघरात गेलो.
मी यापूर्वी असा ‘अंधार’ कधीच अनुभवला नव्हता. त्या छोट्याशा पण अत्यंत नेटक्या घरात माझं छान स्वागत झालं. घरातल्या सर्वात ज्येष्ठ आजीनं अत्यंत आवडीने माझ्या मोबाईलमध्ये ‘सेल्फी’ काढून घेतले! जेवण झालं, मग गप्पा! साधारण १२ वाजता त्या घरातल्या एका तरुण मुलाने मला ‘आमची भीती नाही वाटत का ?’ असा अत्यंत अनपेक्षित प्रश्न केला. मी स्वतः ला सावरत आप तो हमारे मित्र है ! असं म्हटलो. त्याच्या प्रश्नानं मला नसलेली भीती वाटायला लागली होती. त्यानंतर आपणहून त्याने मला त्याची गोष्ट सांगितली. ती गोष्ट ऐकून मला शहर, नागरी व्यवस्था या सगळ्याची कीव यायला लागली. इतकं आत आल्यानंतर व्यवस्थेच्या आतल्या अनेक फटी दिसू लागल्या ! स्वामी विवेकानंदाचं वाक्य आठवलं..... “ Men, men these are wanted; everything else will be ready, but strong, vigorous, believing young men, sincere to the backbone, are wanted. A hundred such and the world becomes revolutionized.” अशा तेजस्वी युवकांपैकी अनेकजण आजही भारतात अशा प्रवासात भेटतात. आपणही त्यांच्यासम व्हावे अशी प्रेरणा निर्माण मिळते.

आमच्या बारसूरच्या संपूर्ण प्रवासात डॉक्टर गोडबोले आमच्यासोबत होते. माझा नवा ‘लेनोव्हो के ३ नोट’ पुन्हा पुन्हा पाहत होते. whatsapp आणि कॅमेरा पाहत होते. किंमत आणि बाकी जुजबी चौकशी केल्यावर हा डॉक्टर असलेला माणूस म्हणतो एक दोन महिने पैसे साठवून असा मोबाईल घ्यावा म्हणतोय ! मी थक्क झालो.


पुण्यात परतल्यावर ३१ डिसेंबरच्या मूडमध्ये असणाऱ्या माझ्या काही मित्रांकडून काही पैसे घेऊन काकांना ‘के ३ नोट’ पाठवून दिला. नवा मोबाईल, देणगी म्हणून मिळालेला पाहून काकांना आनंद झालाच असणार. संध्याकाळी सुनीताताई मला फोनवर विचारत होत्या “आम्ही आमच्या नातेवाईक मंडळीना या देणगीच्या मोबाईलवर संपर्क केला तर चालेल का रे ?”. हा फोन कामाव्यतिरिक्त वैयक्तिक संपर्कासाठी वापरायची त्या परवानगी घेत होत्या !! आधुनिक वगैरे युगात अशी देवमाणसं भेटतात. अनामिक समाधान ‘दर्शनाचं’ मिळतं. आपण इतकं ‘शुद्ध’ असायला हवं अशी जाणीव पेट घेते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुर्लभ मनुष्य जन्म तोही या देवांच्या देशात मिळाल्यानं अधिक जोमानं पुढच्या कामाला सुरुवात होते. त्या १०० प्रेरित युवकांची या देशातला कोनाकोपरा वाट पाहतोय याची आठवण यानिमित्ताने पुन्हा पुन्हा होत राहते.


 - आदित्य शिंदे


या लेखाचे आधीचे तीन भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - 
 
१)  ‘राष्ट्रगंगेच्या तीरावर....’
२) झांकी हिंदुस्थान की...


३) वसुंधरा को मिलकर स्वर्ग बनायेंगे...
http://mahamtb.com//Encyc/2018/3/20/Vasundhara-ko-milkar-swarg-banayenge-article-by-aditya-shinde-.html