देशभरात रामनवमी उत्साहात साजरी
महा एमटीबी   25-Mar-2018

 
 
 
आज चैत्र शुद्ध नवमी अर्थात रामनवमी. श्रीविष्णूचा सातवा अवतार प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म झाला तो दिवस. देशभरात आज सर्वत्र रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वत्र आज दुपारी १२ वाजता रामजन्माचा उत्सव मोठ्या आनंदी वातावरणात व जल्लोषात साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी राम मंदिरांमध्ये रामकथा, रामभजन व कीर्तन-प्रवचनांचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांनी रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
 
प्रभू श्रीरामचंद्रांचे संपूर्ण जीवनचरित्र हेच मुळात एका संदेशाप्रमाणे आहे. न्यायप्रियता व सत्याच्या मार्गावर चालण्याच्या त्यांच्या संदेशाचे पालन आपण करूया आणि समाजात बंधुभाव वाढवूया असा संदेश राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या ट्वीटमधून दिला आहे.
 
 
सत्याचे मूर्तीमंत प्रतीक म्हणजे श्रीराम. त्यांचे जीवन म्हणजे एक प्रेरणादायी असे आदर्श मानवजीवन होते. महात्मा गांधींनीही आपल्या तत्त्वज्ञानाला रामचरित्राचे अधिष्ठान दिले आहे असे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटले आहे.
 
 
भगवान राम म्हणजे उच्चतम मानवी मूल्ये. एक आदर्श पुत्र, आदर्श बंधु, आदर्श पती, आदर्श मित्र आणि एक आदर्श राजा म्हणून रामाकडे पाहिले जाते. अयोध्या ही एक आदर्श नगरी होती व रामराज्य ही आदर्श प्रशासन व्यवस्था होती. त्याग व तपस्येचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे प्रभू श्रीराम असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटले आहे. भारतातील विविध उत्सव हे सामाजिक शिक्षणाचे माध्यम असतात असेही मोदी यांनी पुढे म्हटले आहे.
 
 
राज्यातही ठिकठिकाणी रामनवमीनिमित्त मोठमोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ठिकठिकाणी भजन-कीर्तनाच्या सप्ताहांचे आयोजन करण्यात आले होते त्यांची आज सांगता झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यातील जनतेला रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
 
 
 
राज्यात बहुतांश ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये गीतरामायणातील रामजन्मावर आधारित 'राम जन्मला गं सखे' या गाण्याच्या गायनाने रामजन्म साजरा करण्यात आला. गीतरामायणाला ५० वर्षे उलटूनही त्याची मोहिनी अजूनही महाराष्ट्राच्या मनावर कायम आहे याचेच हे प्रतीक.