‘शहीद दिना’च्या निमित्ताने...
महा एमटीबी   23-Mar-2018

भारतीयांच्या मनगटातील ताकदीचा फिरंग्यांना परिचय करून देण्याचं धाडस सर्वप्रथम कोणी दाखवलं असेल तर ते भगतसिंग, सुखदेव व राजगुरू या त्रय क्रांतिकारकांनी. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या या महायोद्धांचे कार्य म्हणजे एक रोमहर्षक रणसंग्रामच होता. तसेच विद्रोेह व जहालवादी क्रांतीचे ते मूर्तिमंत प्रतीकच होते. २३ मार्च १९३१ रोजी हसत-हसत फासावर चढून हौतात्म्य पत्करणार्‍या या क्रांतिवीरांना मराठी जनमानसाचा मानाचा मुजरा व भावपूर्ण श्रद्धांजली. क्रांतिसूर्य भगतसिंग हे मूळचे पंजाबचे, तर राजगुरू हे पुणे जिल्ह्यातील खेडचे रहिवाशी. भगतसिंगांच्या बाबतीत बोलायचे झाले तर, छत्रपती शिवाजी महाराजांना ‘ते’ आदर्श वीरपुरुष व आपलं स्फूर्तीस्थान मानत असत. सन १९२४ मध्ये भगतसिंग महाराष्ट्रात आले असताना त्यांनी शिवरायांच्या रायगडाला भेट देऊन तेथील माती आपल्या मस्तकाला लावून देश स्वातंत्र्याची प्रतिज्ञा घेतली. स्वातंत्र्यलढ्यासाठी भारतीय युवकांना प्रवृत्त करून त्यांच्या मनात स्वातंत्र्याची मशाल पेटविण्यासाठी भगतसिंगने जोशपूर्ण लिखाणही केलं. वीररस हा त्यांच्या साहित्याचा आत्मा होता. आपल्या साहित्यातून युवकांना क्रांतीचे धडे देऊन ते आत्मसात करायचे, हे त्यांचे जीवनध्येय होते, तर कुठल्याही परिस्थितीत भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करणं, हा त्यांचा मानस होता. स्वातंत्र्यप्राप्तीचं ध्येय साध्य करण्यासाठी त्यांनी १९२८ मध्ये दिल्ली येथे क्रांतिवीरांची गुप्त बैठक घेऊन ‘हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मी’ची स्थापना केली अन् तिचं सेनापतीपद चंद्रशेखर आझाद यांच्याकडे सोपविले. सन १९२८च्या अखेरीला पंजाब प्रांताच्या लाहोर स्थानकाजवळ सायमन कमिशन आले असता, पंजाब केसरी लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली हजारो स्वातंत्र्यप्रेमी युवकांनी उग्र निदर्शने करून ‘सायमन गो बॅक’ अशा गगनभेदी घोषणा दिल्या. सदर आंदोलनाला थांबविण्यासाठी सँडर्सने पोलीस स्काऊटला लाठीमार करण्याचा फर्मान काढले. या हल्ल्यात वयोवृद्ध स्वातंत्र्यसेनानी लाला लजपतराय जबर जखमी होऊन जागीच मृत्यू पावले. या क्रूर व दुर्दैवी घटनेचा प्रतिशोध घेण्यासाठी भगतसिंग व त्याच्या साथीदारांनी कट रचून सँडर्सचा वध केला. या गुन्ह्याखाली भगतसिंग व त्यांच्या सहकार्‍यांविरुद्ध अरेस्ट वॉरंट निघाल्याने ते सर्व वेष पालटून वेगवेगळे राज्यांमध्ये भूमिगत राहिले. तथापि भगतसिंगने निर्भय होऊन ब्रिटिशांच्या अन्यायकारी कायद्यांविरुद्ध जनआंदोलन उभारलं.भग तसिंग व बटुकेश्वर यांनी ‘इन्कलाब जिंदाबाद- साम्राज्यशाही मुर्दाबाद’ अशा घोषणा देत केंद्रीय असेंब्लीवर बॉम्ब फेकला. पुढे या खटल्याची सुनावणी १० जून १९२९ रोजी होऊन दोषी क्रांतिकारकांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यानंतर ५ मे १९३० रोजी लाहोर खटला सुरू झाला. हा खटला म्हणजे भारतीय स्वातंंत्र्यसंग्रामातील एक रोमांचक प्रसंग होता. सँडर्सचा खून, पंजाब नॅशनल बँक लूट प्रकरण, दिल्ली विधिमंडळावर बॉम्ब फेकणे, ‘हिंदुस्थान आर्मी’ची स्थापना, पंजाबपासून कोलकात्यापर्यंत क्रांतिकारकांच्या विध्वंसक कारवाया आदी गंभीर गुन्ह्यांखाली अखेर तिन्ही क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. भगतसिंग आपल्या आई बेबजींना म्हणत, ‘‘फाशी झाल्यावर तू माझं शव घ्यायला येऊ नकोस, कुलबीरला पाठव, कारण तू रडलीस तर लोक म्हणतील बघा, भगतसिंगची आई रडत आहे.’’ खरं तर राष्ट्रासाठी समर्पण वृत्तीचं दर्शन रयतेला भगतसिंगच्या या शब्दांतून घडलं. फाशी जाण्याआधी भगतसिंग आपल्या साथीदारांना उद्देशून म्हणतात ‘‘आमचं भारतमातेसाठीचं इतिकर्तव्य संपलं. आमच्या बलिदानानंतर शेकडो युवक पेटून उठले पाहिजेत. इतकेच नव्हे तर आमचं अपुरं क्रांतिकार्य वेगाने व नेटाने पुढे चालवावं, म्हणजे आपलं स्वातंत्र्यप्राप्तीचं ध्येय साध्य होऊ शकेल.’’ वास्तवात, प्रत्येक भारतीयाला भगतसिंगच्या रूपात साक्षात मृत्युंजय दिसत होता. क्रांतिवीर भगतसिंग फाशीवर जाण्याआधी मॅजिस्ट्रेटला म्हणतात ‘‘जज्जसाहेब, आपण खरोखर भाग्यवान आहात, आज तुम्हाला प्रत्यक्ष पाहावयास मिळत आहे की, भारतीय क्रांतिकारक मातृभूमीसाठी आपल्या प्राणांची आहुती देण्यास सदैव तयार असतात.’’ २३ मार्च १९३१ हा अमर दिवस उजाडला. तिन्ही क्रांतिकारकांना फाशी होणार यासाठी सारं राष्ट्र व्याकुळ झालं होतं. भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्यात प्रथमकोणी फासावर चढायचं याबाबत प्रेमकलह होता. शेवटी आपापसात तडजोड होऊन आधी सुखदेव मग भगतसिंग व शेवटी राजगुरू अशी तडजोड झाली. त्याप्रसंगी भगतसिंग आपल्या आवेशपूर्ण वक्तव्यात म्हणाले की, ‘‘दिल से निकलेगी न मरकर भी वतन की उल्फत, मेरी मिट्टी से भी खुशबू ए-वतन आयेगी’’ फासावर चढतेवेळी ‘इन्कलाब जिंदाबाद, भारतमाता की जय,’ असे जयघोष देत, हे तिन्ही क्रांतिकारी हसत-हसत फासावर चढले आणि हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी हे भारतमातेचे सपूत शेवटी शहीद होऊन अमर झाले.


- रणवीर राजपूत