आदिवासींच्या जीवनात आशेचा किरण...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Mar-2018   
Total Views |

हातामध्ये इंटरनॅशनल बिझनेस मास्टर्सची पदवी, इंग्लंडमध्ये एका प्रतिष्ठित कंपनीमध्ये कामकरण्याचा अनुभव गाठीशी असताना, अमिताभ सोनीचे मन मात्र आदिवासींना रोजगार मिळवून देण्यामध्ये गुंतलं आहे...

जिथे लहानाचे मोठे झालो, त्या गावामध्ये राहूनच अर्थार्जनाचे नियोजन करणे कठीण असल्याचे लक्षात आल्यानंतर अनेक ग्रामीण भागातील मंडळी, विशेषतः तरूणांची पावले शहराकडे वळतात. शहरांमध्ये छोटी-मोठी कामे करून उदरनिर्वाह करण्याचा मार्ग मिळाला तरी शहरातील स्पर्धात्मक युगामध्ये प्रत्येकाचे टिकून राहणे थोडे कठीणच असते. त्यातच अशा तरूणांना कोणी ‘गॉडफादर’ नसल्यामुळे ते मार्गदर्शनपासून वंचित राहतात. याशिवाय त्यांना कुटुंबाची ओढ असते ती वेगळीच. मग अशावेळी ग्रामीण भागातच तरूणांना मार्गदर्शन करून त्यांना योग्य मार्ग दाखवून रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा विचार एका २५ वर्षीय तरूणाच्या मनात आला आणि त्याने तो बघता-बघता साकार केलादेखील. ४२ वर्षीय अमिताभ याचे बालपण भोपाळ आणि इंदूरमध्ये गेले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जवळपास दहा वर्षे त्यांनी इंग्लंडमध्ये नोकरी केली. भोपाळपासून २५ किलोमीटरवर असलेल्या केकाडिया या वनवासी भागामध्ये अमिताभ सोनी यांनी वनवासींना रीतसर प्रशिक्षण देऊन चक्क एका आयटी कंपनीची स्थापना करून दिली. ’विलेज क्वेस्ट’ या आयटी कंपनीची सूत्रे वनवासींकडे सोपविण्यात आली आहेत. सध्या या कंपनीमध्ये २१ कर्मचारी कार्यरत आहेत. उच्चशिक्षित असलेल्या अमिताभकडे इंग्लंडमधल्या एका नामांकित कंपनीमध्ये कामकरण्याचा अनुभव होता; शिवाय मोठ्या आकड्याचा पगार असतानाही त्याचे मन दुसर्‍यांची मदत करण्यामध्ये गुंतले होते. मग अशावेळी त्यांच्या डोळ्यांसमोर ग्रामीण विशेषतः आदिवासींचे चेहरे येऊ लागले. मग त्या कंपनीत राजीनामा दिल्यानंतर त्यांचा सामाजिक कार्याचा प्रवास सुरू झाला.


साधारणपणे बारा वर्षांपूर्वी या कामाला सुरूवात झाली. बारा वर्षांपूर्वी तिथले वातावरण, समस्यांचे स्वरूप वेगळे होते. तिथे असलेल्या प्राथमिक सुविधांचा अभाव त्यांना पहिले दूर करायचा होत्या. केकाडिया तसेच आसपासच्या अन्य तीन गावांमध्ये त्यांनी कामकरण्याचा श्रीगणेशा केला. शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि पाण्याची समस्या दूर करणे या चार गोष्टी बदलण्याचे त्यांच्यापुढे आव्हान होते. सर्वात आधी त्यांनी एका एनजीओची स्थापना केली. त्यानंतर गावामध्ये फिरून आदिवासींच्या नेमक्या समस्या व परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला. त्यानुसार पुढील कामाचे नियोजन करण्यास सुरूवात केली. अमिताभ सोनी यांनी आपल्या मित्रांकडून या कामासाठी आर्थिक मदत घेतली. शिवाय इथे विजेची समस्या होती. काही वर्षे गेल्यानंतर बदलेल्या परिस्थितीची जाणीव त्यांना होऊ लागली. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये होत असलेली प्रगती, विज्ञान यामध्ये होणारे बदल त्यांना जाणवू लागले. या बदलत्या काळाच्या प्रवाहामध्ये आदिवासींमध्ये काही बदल करण्याची गरज भासू लागली. त्यावर योग्य तोडगा काढून त्याने इथल्या तरूणांना आयटीच्या संदर्भात प्रशिक्षण द्यायला सुरूवात केली. याची सुरूवात संगणक नेमका कसा हाताळायचा इथंपासून करण्यात आली होती. या कामामध्ये अमिताभ यांनी आपल्या काही मित्रांची मदत घेतली. एक बांधकामकरून तिथे संगणकाचे ज्ञान, तसेच आयटीचे प्रशिक्षण देण्याचे कामसुरू झाले. सुरूवातीला संगणकासमोर बसून त्याची माहिती करून घेणे तरूणांना कठीण गेले. संगणकाच्या स्क्रीनसमोर कामकरायला त्यांना अवघड जात होते, पण हळूहळू त्याची सवय होत गेली. या कामासाठी शहरी भागातील इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणार्‍या तरूणांनी हातभार लावला. आज ही कंपनी भारतातील पहिली आदिवासी आयटी कंपनी म्हणून ओळखली जाते. प्रत्येक तरूणाची क्षमता बघून त्यानुसार कामाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या कंपनीमध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिस, पेन्टिंग, टायपिंगचे तरूणांना प्रशिक्षण दिल जाते. आज केकाडिया या गावामध्ये राहणार्‍या मुकेश भोपल हा तरूण या कंपनीमध्ये कार्यरत आहे. अमिताभ यांच्याशी भेट झाल्यानंतर त्याचे आयुष्य बदलून गेले. बारावीमध्ये ८२ टक्के मिळवलेल्या मुकेशला पुढच्या शिक्षणासाठी पैशांची चणचण भासत होती. परंतु, अमिताभ त्याच्या मदतीला धावून आले. आज अमिताभ यांनी सुरू केलेल्या आयटी कंपनीमध्ये मुकेशसारख्या १८ तरूणांचे आयुष्य मार्गी लागले आहे. याशिवाय इथल्या मुलांच्या शिक्षणावर भर दिला जातो. यासाठी अमिताभ व त्यांच्या १८ सहकार्‍यांनी ’अभेद्य’ नावाची एक संस्था स्थापन केली आहे. शहरांतील शाळांमध्ये ज्याप्रमाणे शैक्षणिक सोयी-सुविधा तसेच इतर सोयी उपलब्ध करून दिल्या जातात, तशाच प्रकारच्या सुविधा ‘अभेद्य’ टीम मुलांना देते. मुलांना शैक्षणिक साहित्य शाळेतर्फे उपलब्ध करून दिले जात असून, त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते. शिवाय ‘अभेद्य’ टीमच्या सहकार्‍यांनी मुलांच्या पालकांचा विश्वास संपादन केल्याने मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालक प्रोत्साहन देतात. अर्थात, या कामासाठी काही सामाजिक संस्थांनी आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेतल्यामुळे हे सगळे करणे शक्य झाले असल्याचे अमिताभ सांगतात. याशिवाय महिला, तरूणींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली आहे. येत्या काळात आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी पुढे अजून कोणती कामे करता येतील, यावर अमिताभ सध्या भर देत आहेत. त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी त्यांना शुभेच्छा.


- सोनाली रासकर
@@AUTHORINFO_V1@@