महाभारतातील दिव्य अस्त्रे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Mar-2018
Total Views |



मागील लेखात आपण सेना आणि व्यूहरचना यांविषयी थोडी माहिती घेतली. आता कुरुक्षेत्रावर वापरात आलेल्या अनेक अस्त्रांपैकी काही महत्त्वाच्या अस्त्रांविषयी माहिती घेऊया.
 
अस्त्र हे एखाद्या विशिष्ट देव अथवा देवतेशी मंत्रायोगे जुळवलेले असते आणि ते त्या त्या देवाला आवाहन करून शस्त्रावरती आरूढ करावे लागत असे. ते साध्य करण्याकरिता कठोर साधना करून गुरूंकडून मंत्र घ्यावा लागत असे. त्यासाठी गुरूकडे सेवा तपसाधना करून त्यांची मर्जी संपादन करावी लागत असे. महाभारत काळात गदा, तोमर, चक्र, खड्‌ग, धनुष्य बाण, चाप, वज्र, त्रिशूळ अशा प्रकारची प्राथमिक शस्त्रे वापरात होती. लांब पल्ल्याच्या मार्‍यासाठी मात्र बाण आणि दिव्य अस्त्रांचा प्रयोग करावा लागे. त्यावेळी तोफा, बंदुका यांचा शोध लागला नसावा.

ब्रह्मास्त्र, वायव्यास्त्र, आग्नेयास्त्र, पर्जन्यास्त्र, वरुणास्त्र, वैष्णवास्त्र, पाशुपतास्त्र, वज्रास्त्र, इंद्रास्त्र, वासवी शक्ती, सुदर्शनास्त्र, नारायणास्त्र, कौमुदकी, भौमास्त्र, मानवास्त्र, गरुडास्त्र, नागास्त्र, नागपाश, भार्गवास्त्र, बर्बरीक उर्फ खाटूश्यामयांचे तीन बाण अशा प्रकारची दिव्यास्त्रे प्रचलित होती.

ब्रह्मास्त्र : असे म्हणतात की, ब्रह्मदेवाने हे अस्त्र निर्माण केले. ते एकदा सोडले की थांबत नसे. कोणतीही शक्ती त्या अस्त्राला रोखू शकत नव्हती. ब्रह्मास्त्राचेच पुढे ‘ब्रह्मशीर्ष’ आणि ‘ब्रह्मदंड अस्त्र’ झाले; ज्यामध्ये अधिक शक्ती सामावल्या होत्या. ब्रह्मदेवास पूर्वी पाच मुखे होती. त्यांचे आणि शिवाचे युद्ध झाले, तेव्हा एक मुख गळून पडले, तर या पाचही मुखांची शक्ती या ब्रह्मास्त्रामध्ये एकवटलेली होती. अतिशय शक्तिमान असे हे अस्त्र होते. संपूर्ण सूर्यमंडळ नष्ट करण्याची ताकद त्यात होती. आजच्या काळातील अणुबॉम्बसारखे हे अस्त्र होते. त्यावेळी परशुराम, भार्गव, कर्ण, अर्जुन, अश्वत्थामा, भीष्म, द्रोण, कृपाचार्य, युधिष्ठिर अशा महारथींनाच याची माहिती होती. त्या अस्त्रामुळे शेकडो मैल भूमी निर्जन आणि ओसाड होत असे आणि लोकही वंध्य होत म्हणून ते क्वचित वापरले जाई. पूर्वी हे अस्त्र श्रीरामआणि विश्वामित्र ऋषी यांनी रोखले होते. महाभारतात अर्जुन आणि कर्ण तसेच अश्वत्थामा यांनी हे वापरले. अश्वत्थाम्यास मात्र ते परत कसे घ्यायचे हे माहिती नव्हते. वायव्यास्त्र : हे नावाप्रमाणे वायू देवतेचे अस्त्र. यात प्रचंड शक्तीने वादळे निर्माण होत आणि समोरच्या शत्रूला उधळून टाकण्याची क्षमता होती. अर्जुनाने द्रोणांवर हे अस्त्र सोडले व त्यास उत्तर म्हणून त्यांनी पर्वतास्त्र वापरले.

आग्नेयास्त्र : या अस्त्रात अग्निदेवतेस आवाहन करून समोरच्या शत्रूस अग्नीच्या साहय्याने भस्मसात केले जाई. त्यास ‘पर्जन्यास्त्र’ किंवा ‘वरुणास्त्र’ हे तोडीस तोड अस्त्र असे. पर्जन्यास्त्र आणि वरुणास्त्र : यात वरूण देवाची प्रार्थना करून अतिवृष्टी केली जाई. ज्यामुळे महापूर येऊन समोरील शत्रू नामोहरमहोई. वैष्णवास्त्र, नारायणास्त्र :


विष्णू देवतेस आवाहन करून हे महाभयंकर अस्त्र वापरले जाई. याला सर्व शस्त्रे अस्त्रे टाकून देऊन पूर्ण शरण जाणे हाच एक उपाय असतो. अश्वत्थामाने हे पांडवांवरती सोडले तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना हेच सुचवून वाचविले.

पाशुपतास्त्र : शिवशंकराच्या कृपेने हे अस्त्र अर्जुनास मिळाले होते. संपूर्ण विश्वाचा विनाश करण्याची शक्ती यात होती. वज्रास्त्र, इंद्रास्त्र आणि वासवी शक्ती ही आयुधे इंद्रदेवतेची होती. यातून हजारो प्रज्वलित बाणांचा वर्षाव शत्रूवर येऊन पडायचा!


सुदर्शन अस्त्र व नारायणास्त्र : ही विष्णूची अस्त्रे होती. श्रीविष्णू यांना श्रीदामा राक्षसाला जिंकायचे होते. त्यासाठी त्यांनी पायाच्या एका अंगठ्यावर उभे राहून शंकराची घोर तपश्चर्या केली आणि प्रसन्न होऊन शंकरांनी त्यांना हे चक्र दिले. यात बारा आरे असतात, ज्यावर बारा राशींच्या देवता वसल्या आहेत, चैत्र ते फाल्गुन अशा बारा महिन्यांचे देव, सहा नाभी, सहा ऋतूच्या देवता, दोन युगे अशा अमोघ शक्तींनी युक्त असे हे अस्त्र नंतर श्रीकृष्णाने वापरले. हे तेव्हाचे बुमरँग होय, कारण हे शिरच्छेदन करून पुन्हा परत येई. भौमास्त्र हे भूदेवतेला वश करून सोडले जाई. तसेच नागपाश, नागास्त्र हे नागदेवता, गरुडास्त्र गरुड देवता यांच्या मंत्राने प्रेरित होत असे. खाटूश्यामयांची कथा अशी आहे की, ज्या बाजूचे वीर पराभूत होत आहेत आणि बाजू लंगडी पडत आहे त्यांच्या रक्षणार्थ खाटूश्यामउभे राहत. त्यांच्याकडे तीन अमोघ असे बाण होते, जे शत्रूचा पूर्ण नायनाट करत. अशा अनेक प्रकारच्या अस्त्र आणि शस्त्रांनी महाभारताचे युद्ध कसे रंगले ते पुढे पाहू.


- सुरेश कुळकर्णी
@@AUTHORINFO_V1@@