‘सकळ त्याजुनि भावें कास तुझी धरावी’
महा एमटीबी   22-Mar-2018

हिंदूंचं नववर्ष गुढीपाडव्यापासून सुरू झालं. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या पावन पर्वावर गुढी उभारुन नूतन वर्षाचं स्वागत करणारी आपली हिंदू संस्कृती! प्रभू श्रीरामाला आदर्श मानणारी संस्कृती! त्याचं पूजन करुन चरणावर नतमस्तक होणारी संस्कृती! श्रीरामाचं पूजन म्हणजे काय? हा प्रश्न जिज्ञासू उमलत्या पिढीला पडणं स्वाभाविक आहे. श्रीरामाचं पूजन करायचं म्हणजे त्याच्या गुणाचं पूजन होय. एकवचनी, एक बाणी, एक पत्नी हे श्रीरामाच्या चरित्रामधून आचरण्यायोग्य असणारे गुण आहेत.

प्राण जाय पर वचन जाय

प्राणपणानं वचनाचं पालन श्रीरामानं केलं. पित्याच्या आज्ञेनुसार वनवास पत्करला. पित्याची आज्ञा प्रमाण मानली. त्याचं पालन करताना अनेक कष्ट सहन केले. एक राजकुमार जो आता अयोध्याचा राजा होणार होता, राज्यभिषेकाचा सोहळा संपन्न होणार होता, असा सुकुमार राजपुत्र, भावी राजा, जंगलामधील कष्टमय जीवनाचा सहजपणानं स्वीकार करतो. वचनाच्या जतनासाठी ऐन उमेदीचं आयुष्य, जंगलामधील कंदमुळं, फळं खाऊन व्यतीत करतो. सुंदर सीतेसमवेत असूनही व्रतस्थ राहतो. रेशमी, जरतारी वस्त्रांचा त्याग करुन वल्कलं धारण करतो.

आजची तरुण पिढी वडिलांचं ऐकते का? त्यांच्या सल्ल्याचा मान राखते का? त्यांच्या अनुभवाचा आदर करते का? स्वत:च्या मतांना चिकटून राहून अयोग्य असलं तरी योग्यच असल्याचा आग्रह धरते. वडिलांच्या विचारांना बुरसटलेपणाचा, मागासलेपणाचा शिक्का मारुन मोकळ्या होणार्‍या पुत्रांनी रामापासून शिकण्याची गरज आहे. पित्याचा आदर करुन त्यांच्या अनुभवातून परिपक्व झालेल्या विचारांचा लाभ करुन घेणं आवश्यक आहे.

दिलेला शब्द पाळणारे, दिलेल्या वचनाला, शब्दाला जागणारे किती जण दिसतात? भारंभार वचनं द्यायची आणि त्याचा भंग करायचा, हे योग्य नाही. वचनानुसार वर्तन नसेल तर त्याला काहीही अर्थ नाही. जो बोलतो त्यानुसार आचरण करतो ना त्याला महत्त्व आहे. शब्द फिरवणारे काही उपयोगाचे नाहीत त्यामुळे अनर्थ ओढवून व्यक्तीचं, कुटुंबाचं आणि ओघानं समाजाचं अधः पतन होतं. एकबाणी असणार्‍या श्रीरामाच्या अंगी ध्येयाची अचूकता असल्याचं लक्षात येतं. ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी अचूक प्रयत्न करण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीमध्ये न डगमगता ठामपणानं उभा ठाकणार्‍या श्रीरामाचा आदर्श ठेवणं महत्त्वाचं आहे. शौर्य, धैर्य याचा सुरेख संगम श्रीरामाच्या व्यक्तिमत्त्वात झालेला दिसतो. ध्येयप्राप्तीसाठी मार्गात येणार्‍या अडचणींवर, संकटांवर मात करण्याचा संदेश श्रीराम देतो.

एक पत्नी असणारा श्रीराम चारित्र्य संपन्नतेचा आदर्श समोर ठेवतो. मोहाचे प्रसंग कितीही आले तरी त्यामध्ये न अडकता पुढे जाणं महत्त्वाचं आहे. परस्त्री मातेसमान मानणारी आपली संस्कृती आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसायाच्या स्थानी अनेक स्त्रियांसमवेत वावरणार्‍या लोकांना संयमाचा गुण ग्रहण करण्यास प्रेरणा देणारं श्रीरामाचं जीवन आहे. आपलं शील शुद्ध ठेवून समाजातील वासना, विकारांना नाहीसं करण्याची ताकद त्यामध्ये आहे. कामिनीला दूर ठेवलं की कामही दूर होतो, काम जिंकला की क्रोधाचा भडका उडत नाही आणि त्यामुळे वैर, वैमनस्य उद्भवत नाही. माणसाने माणुसकीनं वागावं यासाठी श्रीरामाच्या पूजनाचा सोहळा असतो.

समाजाला सुसंस्कृत ठेवण्यासाठी गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत चालणार्‍या रामायणाची, रामपाठाची आहे. मरगळलेल्या मनाला भरकटलेल्या लोकांना सुपंथावर, सन्मार्गावर आणून संजीवनी प्रदान करणारं प्रभू श्रीरामाचं चरित्र आहे. त्याच्या चरित्राचा मनः पूर्वक अभ्यास करणार्‍याचं चारित्र्य शुद्ध होणार, राहणार हे नक्की! त्यागाच्या कमळावर फुलणारं जीवन सदैव तेजाकडे वाटचाल करून तेजस्वी होणार यात शंका नाही. कोदंडधारी श्रीरामवीरत्वाचं प्रतीक आहे. सकल आदर्शाचा समुच्चय श्रीरामाठायी एकवटलेला आहे. त्याच्या जीवनातील प्रत्येक घटना, प्रसंग यांमधून दैवी गुणसंपदा नजरेत भरते.

श्रीरामाने षड्‌रिपूरुपी राक्षसांचा संहार केला. अहंकार, अहंभावरूपी रावणाचा वध करून त्याने नरजन्माचं अवताराचं सार्थक केलं. त्याकरिता विवेक आणि वैराग्याचा अंगीकार केला आणि वैभवाचा त्याग केला.

षड्‌रिपू नष्ट होणं एकवेळ जमेल, परंतु अहंकाराला मारणं मोठं कठीण आहे. हेच अवघड कार्य श्रीरामानं केलं. लौकिक आणि पारमार्थिक या दोन्ही अंगांचा विकास प्रभू श्रीरामाच्या चरित्रामधून होतो. दुर्गुणांचा त्याग आणि दैविगुणांचा अंगीकार केला की आनंदाची गुढी उभी करता येते. म्हणून श्रीरामाचं नवरात्र करून त्याच्या चरित्राचा डोळसपणानं अभ्यास करून उत्तम जीवन जगून समाजाला उन्नत अवस्थेला नेणं नितांत गरजेचं आहे. षड्‌रिपूरुपी राक्षस आणि अहंकाररूपी रावणाचा वध केला की स्वानंदाच्या सिंहासनावर आरूढ होता येतं. हीच खरी श्रीरामाची पूजा आहे, ज्यामुळे तो कृपेचा अविरत वर्षाव करेल.


- कौमुदी गोडबोले