यात आमचा काय दोष?
महा एमटीबी   22-Mar-2018
 

मुंबई... या शहराच्या नावामध्ये नानाविध वैशिष्ट्ये सामावलेली आहेत. या शहराचा थाट काहीसा निराळाच. मुंबईत घडणार्‍या अनेक छोट्या-मोठ्या घडामोडींची चर्चा अगदी गल्लीपासून ते थेट दिल्ल्लीपर्यंत होत असते. इकडच्या घडामोडींचे पडसाद जागतिक पातळीवरदेखील उमटतात. मुंबईकरांविषयी बोलायचं झालं तर ते घरातून बाहेर पडल्यानंतर इच्छितस्थळी पोहोचण्यामध्ये विलंब होऊ शकतो, अशी मनाची तयारी करूनच बाहेर पडत असतो. कारण इकडची वाहतूककोंडी, दाटीवाटीच्या रस्त्यावरून मार्ग काढताना होणारी दमछाक, लोकल, बसच्या अनिश्चित वेळा, गर्दीचा महापूर अशा एक ना अनेक समस्यांचा सामना त्याला करावा लागतो. अशी ही अनुभवाची शिदोरी जवळ बाळगूनच त्याची घरातून लवकर निघण्याची कसरत सुरू असते. पण, कधी कधी अशा काही घटना घडतात की त्यामुळे त्याने आखलेल्या कामाचे नियोजन बिघडते.
 
मंगळवारी रेल्वे परीक्षा भरतीतील गोंधळ आणि अन्य मागण्यांसाठी रेल्वेच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी मध्य रेल्वेच्या दादर-माटुंगा स्थानकांदरम्यान ’रेल रोको’ हे त्याचेच एक उदाहरण. लाखो चाकरमान्यांना या ‘रेल रोको’चा नाहक फटका बसला. काही मंडळी आपल्या न्याय्य मागण्या पूर्ण करण्यासाठी थेट रेल्वेरूळावर ठिय्या आंदोलन करण्याचा मार्ग पत्करतात. कारण त्यांना माहीत असते की, ही सेवा ठप्प झाली की त्याचे नेमके परिणाम काय होतात ते. अशावेळेस संबंधित यंत्रणांना हालचाली करणे भाग पडते. अर्थात, या अशा आंदोलनामुळे त्यांच्या मागण्या पुढे पूर्ण होतात याची शाश्वती नसते, पण तेवढ्यापुरतं का होईना आंदोलनकर्त्यांचा राग शांत केला जातो. या सगळ्यामध्ये भरडला जातो तो सर्वसामान्य मुंबईकर. ’मुंबईकरांचे स्पिरिट’ या गोंडस नावाखाली त्याने अजून किती यातना सहन करायच्या, याला काही मर्यादा आहेत की नाही, असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतोच. एरवीदेखील मुंबईमध्ये अनेक दुर्घटना घडत असतात. मग त्या दुर्घटना मानवनिर्मित चुका असो किंवा मग नैसर्गिक संकट असो; या अशा दुर्घटनांमध्ये मुंबईकरांचा नाहक बळी जातो. त्यांचं आयुष्य विस्कटून जातं. आर्थिक अडचणी असतात त्या वेगळ्याच. नुकसानभरपाईसाठी संबंधित यंत्रणेचे उंबरठे झिझवावे लागतात. असं हे किती दिवस चालणार? सर्वसामान्य मुंबईकरांचा या सगळ्यांमध्ये नक्की काय दोष आहे, याचं उत्तर कोणी देऊ शकेल का?
 
 
0000000000000000000000000000000000000000000000000000000000 
 
ज्येष्ठांना हवंय सुरक्षाकवच
 
 
आतापर्यंत गुन्हेगारीचा अहवाल सादर झाला की, त्यामध्ये अल्पवयीन मुलांचा, तरुणांचा तसेच महिलांच्या वाढत्या सहभागामुळे चिंता व्यक्त केली जात होती. परंतु, आता या गुन्हेगारीच्या आकडेवारीमध्ये नव्याने निदर्शनास आलेली बाबदेखील गंभीरच आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात ज्येष्ठ नागरिकांवर होणार्‍या अत्याचारांमध्ये २०१४ आणि २०१६ या दोन वर्षांत ४० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती गृहमंत्रालयाच्या आकडेवारीतून समोर आली आहे. अशा गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्राने देशात आघाडी घेतली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही आकडेवारी अतिशय चिंताजनक आहे.
 
६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात २०१६ मध्ये देशभरात एकूण २१ हजार ४१० गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. यापैकी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात ७ हजार ४१९ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे, तर राज्यात २०१४ मध्ये ३ हजार ९८१, २०१५ मध्ये ४ हजार ५६१ आणि २०१६ साली ४ हजार ६९४ गुन्ह्यांची नोंद राज्यात करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील वृद्धांविरोधातील एकूण गुन्ह्यांमध्ये फसवणूक, गंभीर स्वरूपाची मारहाण, जबरी चोरी आणि दरोडा या प्रकारचे गुन्हे जास्त घडले आहेत. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशानंतर तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि छत्तीसगड या राज्यांत सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. दुसरीकडे ज्येष्ठ नागरिकांविरुद्ध गुन्हेगारी कमी झालेल्या राज्यांच्या यादीत राजधानी दिल्ली पहिल्या स्थानावर आहे. त्यामुळे जरी भारतीय संस्कृतीत ज्येष्ठ नागरिकांना आदराचे स्थान असले तरी बदलत्या काळाप्रमाणे ज्येष्ठांच्या समस्याही वाढल्या आहेत. एकट्या राहणार्‍या, शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या खचलेल्या वृद्धांना गुन्हेगारांकडून लक्ष्य केले जाते.
 
मध्यंतरी मुंबईमध्ये एक इमारतीमध्ये एका वृद्ध महिलेचा मृत्यू होऊन सहा महिन्यांचा कालावधी लोटला तरी परदेशामध्ये असलेल्या मुलाला याचा काहीच थांगपत्ता नव्हता. काही कामानिमित्त मुलगा मुंबईत घरी आल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला होता. हे उदाहरण देण्यामागचा मुद्दा हाच आहे की, ज्येष्ठ नागरिक हे खूप एकटे पडले आहेत. त्यांची हक्काची माणसं दुरावल्यामुळे त्यांच्या एकटेपणाचा फायदा घेऊन त्यांच्यावरील प्राणघातक हल्ले, फसवणुकींच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे आणि ही चिंताजनक बाब आहे. आयुष्याच्या संध्याछायेत काहीसे निराश व एकाकी जीवन जगत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.
 
 
 
- सोनाली रासकर