मैत्री : कलाकार आणि चाहत्याची
महा एमटीबी   21-Mar-2018

 
मित्र म्हणु की भाऊ.. की भावासारखा मित्र.. त्याच्याबद्दल जेवढं मी बोलेन तेवढं कमीच आहे.. अरे हो, मी कोणाबद्दल बोलतोय हे फोटो बघून तुम्हाला कळालं असेलच पण तरीही 'सांगतो; तो आहे मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील एक ग्रेट Idya. (आयड्या : ऑनलाईन-बिनलाईन या चित्रपटातील हेमंतचं नावं.) कळलं की नाही... काय राव तुम्ही.. ज्याच्या लेखणीतून स्त्रीभ्रुण हत्या, शेती विषयी जिव्हाळा, गडसंवर्धनाची आस दिसते तो अभिनेता, लेखक व दिग्दर्शक असलेला हेमंत ढोमे! हेमंतबद्दल खुप काही लिहायचं अनेक दिवसांपासून मनात होतं. आज खास दिवसाच्या औचित्याने तो योग जुळून आल्याचे समाधान अधिक आहे. हेमंतच्या एकूण जीवनाचा या लेखातून थोडक्यात सारांश मांडण्याचा मी प्रयत्न केलाय पण त्याहीपलीकडे जाऊन मी एक चाहता व एक अभिनेता यांच्या नात्यावर या निमित्ताने भाष्य करणार आहे. 
 
पुण्याजवळ शिरूर गावात २१ मार्च १९८६ला आपल्या या लाडक्या हेमंत चा जन्म झाला. वडील पोलिस ऑफिसर असल्यामुळे सगळीकडे फिरण्यात त्याचे बालपण गेले व त्यातील जास्तीत जास्त वेळ त्याचा कोकणात गेला. शालेय शिक्षण झाल्यानंतर त्याने प्राणीशास्त्र या विषयातून गरवारे कॉलेज, पुणे येथून पदवी घेतली, त्याच वेळी तो कॉलेज मधील अंतर्गत स्पर्धांमधून आपल्या लिखाणातील आणि अभिनयातील कौशल्य दाखवत होताच. कॉलेज पूर्ण झाल्यानंतर त्याने UK मध्ये "Wild Life Conservation" या विषयातून मास्टर्स साठी प्रवेश घेतला. मास्टर्स करत असताना पण हेमंतला त्याचं अभिनय आणि लिखाणातील वेड शांत बसून देत नव्हते, शेवटी मास्टर्स झाल्यानंतर परत येऊन त्याने पूर्णपणे स्वतःला या क्षेत्रात झोकून दिले. हेमंत ने लिहिलेले आणि अभिनय केलेले "Lose Control" हे नाटक म्हणजे त्याच्या या क्षेत्रातील सुरवात झाली आणि तिथून त्याने मागे वळून पाहिलेच नाही. "नवा गडी नवं राज्य" हे नाटक हे खूपच लोकप्रिय झाले आणि जवळपास सगळेच नाट्य पुरस्कार या नाटकाला मिळाले. क्षणभर विश्रांती, सतरंगी रे, पोश्टरगर्ल, बघतोस काय मुजरा कर, या चित्रपटाच्या लिखाणानंतर तर आता हेमंत खूपच उंचीवर जावून बसला आहे. 'पोश्टरगर्ल'मधील अभिनय असो की स्टोरी अथवा संवाद सगळ्यात जीव ओतला आहे त्याने आणि त्याचा काय परिणाम महाराष्ट्रावर झाला ते आपण सगळ्यांनी पाहिलाच आहे. 'फु बाई फु' तर त्याने अक्षरशः गाजवलं आहे! त्यातील जे 'स्किट' लिहिलेली असायची त्याबद्दल तर काय बोलू... कधी हसवले.. तर कधी रडवले... खूप वेळा विचार करायला सुद्धा लावला त्याच्या लिखाणाने. त्याबददल हेमंतचे मन:पूर्वक आभार...!!!

 
 
हे झालं हेमंत बद्दल, पण आता मी माझ्या आयुष्यातलं त्याचं स्थान काय आहे ते सांगतो. हेमंतला 'फु बाई फु'च्या स्टेजवर बघत होतो, त्याचे धमाल स्किट्स लोटपोट हसवुन सोडत होते आणि त्यातुन चांगला संदेश पण देत होते. तेव्हापासूनच तो मला अभिनेता व लेखक म्हणुन आवडायला लागला. नंतर 'क्षणभर विश्रांती' पाहिल्यावर त्याच्या लिखाणाची जादु हळुहळु मनात रूजायला लागली. तेव्हा मी सोशल मीडियावर जास्त 'ॲक्टिव' नसायचो त्यामुळे आपण डायरेक्ट आपल्या आवडत्या कलाकारासोबत बोलू शकतो हेच मला माहित नव्हते. दोन वर्षांपूर्वी मी ट्विटरवर ॲक्टिव झालो आणि त्याचवेळी हेमंतचा 'पोस्टरगर्ल' चित्रपटगृहात झळकला. चित्रपट आवडला म्हणूनमी ट्विट्स केले होते आणि त्याला आलेला हेमंतचा रिप्लाय पाहून मला खुप खुप आनंद झाला. आपला आवडता अभिनेता-लेखक मला रिप्लाय करतोय म्हंटल्यावर कोणाला आनंद नाही होणार. मग पुढे त्याच्या अभिनयाबद्दल ट्विट्स करत होतो आणि त्याचे रिप्लाय येतं होते. थोड्याच दिवसात त्याचा वाढदिवस होता तर त्याला एक सरप्राईज म्हणून मी वेबसाईट बनवली होती. ती त्याला खुप आवडली आणि त्यांनतर माझ्यासाठी खरं सरप्राईज होतं ते म्हणजे त्याने मला 'ट्विटर'वर फाॅलोबॅक दिला. मला ट्विटरवर फाॅलो करणारा पहिला सेलेब्रिटी म्हणजे हेमंत ढोमे होता. थोडे दिवस गेले आणि आता ओढ लागली होती ती त्याला भेटायची. त्याचवेळी 'बघतोस काय मुजरा कर'चं पहिल पोस्टर आलं. काही निमित्ताने हेमंतशी बोलणं झाल्यावर कळालं की या चित्रपटाचं शुटींग साताऱ्यात सुरु आहे. मी भेटायची इच्छा व्यक्त केली आणि तो क्षणाचाही विलंब न करता लगेच ये म्हणाला. काही दिवस व्यस्त असल्यामुळे तसेच गेले आणि अखेर तो दिवस उजाडला.
 
 
१६ मे २०१६.. मित्राला सोबत घेऊन साताऱ्याला शूटिंग पहायला गेलो. शुटच्या ठिकाणी पोहचलो. अनिकेत आणि रसिका यांचा एक सिन सूरू होता. आम्ही थांबलो होतो. थोड्या वेळात हेमंतच लक्ष माझ्याकडे गेलं तसा तो उठुन आला आणि चौकशी केली. आम्हाला काय हवं नको ते विचारून तो परत उर्वरित सिन पूर्ण करायला गेला. थोड्या वेळात सिन संपवून आल्यानंतर पुढच्या सिनसाठी वेळ होता तर आम्ही मस्त चर्चा करत बसलो. गप्पा, शूटिंग सगळं मिळून जवळपास ३ तास होतो आणि त्यामुळे असं वाटलचं नाही की आम्ही पहिल्यांदा भेटतोय. खुपच मनमोकळा, दिलदार स्वभावाचा नवीन मित्र, मित्र नाही भाऊच मला भेटला. तो जसा पडद्यावर दिसतो त्याच्यापेक्षा कित्ती तरी पटीने खऱ्या आयुष्यात चांगला आहे. पुढे आम्ही भेटत राहिलो आणि आमचं नातं अजुनचं घट्ट होतं गेलं.. खरचं मी खुपच नशीबवान आहे, की मला या आयुष्यात हेमंत सारखा भाऊ भेटला! एखाद्या कलाकार आणि चाहत्यामध्ये इतकी चांगली मैत्री, इतके निस्वार्थी नाते निर्माण होऊ शकते हे कधी मला वाटलंच नव्हतं. पण हेमंत आणि माझ्या मैत्रीने-नात्याने हे खोडून काढलं.
 
आज २१ मार्च, त्याचा वाढदिवस.. मी काय शुभेच्छा देऊ.. एवढं मात्र सांगेन की माझ्या आयुष्यातलं त्याचं स्थान अढळ आणि सगळ्यात वरचं आहे. विशेष म्हणजे ते आयुष्यभर तसेचं राहिलं. भावा तुला तुझ्या आयुष्यात कशाचीचं कमी पडु नये.. तुला जे ते हवे ते ते मिळो आणि काही झालं तरी मी तुझ्या आयुष्यात असाचं असेन हे माझ्याकडून वचन..!!!
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा...
बाप्पा मोरया..!!
- किरण जाधव
कोल्हापूर