कोण पांडव, कोण कौरव हे जनतेलाच ठरवू द्या!
 महा एमटीबी  21-Mar-2018
 

 
मागच्याच मंगळवारी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांची मोट बांधण्याच्या हेतूने आयोजित केलेल्या प्रीतीभोजनास विरोधी पक्षांच्या सुमारे वीस नेत्यांनी हजेरी लावली होती. भाजपला आगामी निवडणुकीत जिंकू द्यायचे नाही हे एकमात्र लक्ष्य पुढे ठेवून भाजपविरोधी पक्षांची जुळवाजुळव करण्याचे जे प्रयत्न चालू आहेत, त्यात या डीनर डिप्लोमसीचा समावेश करता येईल. भाजपला मुळीच सत्तेवर येऊ द्यायचे नाही यावर विरोधी पक्षांचे मतैक्य आहे पण कळीचा मुद्दा या आघाडीचे नेतृत्व कोणी करायचे हा आहे. राहुल गांधी, ममता बनर्जी, शरद पवार, शरद यादव, चंद्राबाबू नायडू, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, मायावती, अखिलेश यादव, कारागृहात असलेले लालूप्रसाद यादव आदी अनेक रथी महारथी या आघाडी पर्वात सक्रीय असल्याचे दिसून येत आहे. काही नेते कॉंग्रेसला जवळ करू इच्छितात तर काहींना कॉंग्रेसशी संगत हिताची वाटत नाही. आता शरद पवार यांनीही २८ मार्च रोजी नवी दिल्लीत विरोधी पक्षनेत्यांची बैठक बोलाविली आहे. तिकडे ममतादीदी यांच्या नेतृत्वाखाली आघाडी व्हावी यासाठी तृणमूलचे बिनीचे नेते दिल्लीत अन्य नेत्यांची मनधरणी करीत आहेत. २०१९ च्या निवडणुका लक्षात घेऊन या आघाडीपर्वात विरोधी नेते उतरले आहेत.
 
अलीकडेच उत्तर प्रदेशातील प्रतिष्ठेच्या अशा गोरखपूर आणि फुलपूर या दोन लोकसभा मतदारसंघांत भाजपचा पराभव झाला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य या दोघांचे हे मतदारसंघ, पण दोन्ही ठिकाणी भाजप उमेदवारांचा पराभव झाला. वर्षभरापूर्वी ज्या उत्तर प्रदेशात मतदारांनी भाजपच्या पारड्यात भरभरून मतदान केले होते त्याच राज्यात दोन प्रतिष्ठेचे मतदारसंघ हातून जावेत हे कशाचे द्योतक मानायचे? आदित्यनाथ यांनी पक्षाला फाजील आत्मविश्वास नडल्याचे मान्य केले. तसेच विरोधकांनी ऐनवेळी जी युती केली त्याचा काय परिणाम होईल याचा अंदाज न आल्याने पराभव झाल्याचे त्यांना मान्य करावे लागले. पण ज्या राज्यात भाजपला प्रचंड जनाधार आहे तेथे वर्षभरातच झालेला पराभव जनमानसात चांगला संदेश देणारा नाही, हे लक्षात घ्यायला हवे. पराभवाची अशी पुनरावृत्ती २०१९ साली मुळीच होऊ देणार नाही असे जरी योगी आदित्यनाथ यांनी म्हटले असले तरी हा डाग धुवून काढण्यासाठी अपार प्रयत्न मात्र करावे लागणार आहेत.
 
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकांचे निकाल, राष्ट्रीय लोकशाही आघाडीला चंद्राबाबू नायडू यांनी केलेला रामराम, शिवसेना या मित्रपक्षाने भाजपचा सतत पाणउतारा करण्याची घेतलेली भूमिका याच्या जोडीला केंद्र सरकारविरुद्ध वायएसआर कॉंग्रेस व तेलुगू देसम यांनी आणलेले अविश्वास प्रस्ताव, त्यामागे उभे राहिलेले कॉंग्रेससह अन्य काही पक्ष या सर्वांमुळे जे वातावरण तयार झाले ते पाहता विरोधकांना भलताच चेव आला असल्यासारखे दिसत आहे. पण अविश्वास प्रस्ताव आधी सभागृहात चर्चेला यायला हवा ना! गेल्या काही दिवसांपासून संसदेचे कामकाज ठप्प आहे. दोन्ही सभागृहांत होत असलेल्या गदारोळामुळे कामकाज काहीच होऊ शकत नाही. कामकाज चालूच द्यायचे नाही, असा पवित्रा घेतला गेला तर सभागृह स्थगितीशिवाय अन्य काही पर्यायही राहत नाही. लोकसभेत सरकारविरुद्ध अविश्वास ठराव आणला तरी केंद्र सरकारला काही धोका नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या मित्र म्हणविणार्‍या पक्षांनी तटस्थ राहायचे ठरविले तरीही सरकारला काही धोका नाही. भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी हा प्रस्ताव ३०० हून अधिक मतांनी फेटाळून लावला जाईल, असे ठामपणे म्हटले आहे. विरोधकांनाही याची कल्पना असली तरी सध्या नरेंद्र मोदी विरुद्ध सर्व असे वातावरण निर्माण केले जात आहे. आपल्या हातात असलेल्या सत्तेचा जनहितार्थ उपयोग कसा करता येईल याचा विचार करणार्‍या भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधकांनी चालविला आहे. खोटेनाटे आरोप करून भाजपविषयी मने कलुषित केली जात आहेत. भाजप सरकारची चांगली कामे विरोधकांना दिसतच नाहीत. जे निर्णय घेतले त्याबाबत संभ्रम कसे निर्माण होतील, असे प्रयत्न चालू आहेत. कॉंग्रेस पक्षाचे ८४ वे महाअधिवेशन नुकतेच राजधानी दिल्लीत संपन्न झाले. त्यामध्ये बोलताना सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी भाजप, संघ, मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. देश विभाजित करण्याचा संघ आणि भाजपचा कार्यक्रम असल्याचा आरोप कॉंग्रेसकडून करण्यात आला. ज्या कॉंग्रेसने आणि त्या पक्षाच्या नेत्यांनी जनतेचे हित न पाहता सदैव स्वहितच पाहिले त्या पक्षाने भाजपच्या राष्ट्रनिष्ठेबाबत शंका घ्यावी म्हणजे खूपच झाले! आठ वर्षांनंतर प्रथमच झालेल्या कॉंग्रेसच्या महाअधिवेशनात, राष्ट्रीय पातळीवर कॉंग्रेस हाच भाजपला एकमेव पर्याय असल्याची आरोळी ठोकण्यात आली, पण आपली अवस्था काय? देशाचा एकंदरित विचार करता किती ठिकाणी आपली सत्ता आहे? हे लक्षात न घेता अशी आरोळी ठोकली गेली. अशी घोषणा करताना, देशाच्या ६७ टक्के भागात भाजपचा प्रभाव असल्याचा कॉंग्रेसला जाणूनबुजून विसर पडला असावा! नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसमुक्त भारत करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तर विरोधक भाजपचे उच्चाटन करण्यासाठी कामाला लागले आहेत. कॉंग्रेसच्या महाअधिवेशनात बोलताना पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर पातळी सोडून टीका करण्यासही मागेपुढे पाहिले नाही. राहुल गांधी यांनी केलेली टीका पाहता आगामी काळात भाजपचे विरोधक प्रचाराची किती खालची पातळी गाठू शकतात याची कल्पना यावी.
 
रविवारी या महाअधिवेशनात बोलताना राहुल गांधी यांनी तर कडी केली. भाजप म्हणजे सत्तेसाठी हापापलेले कौरव असल्याचा आरोप त्यांनी केला. तर कॉंग्रेस पक्ष हा पांडवांसारखा सत्यासाठी लढायला कायम तयार असल्याचे म्हटले. गेली अनेक वर्षे असत्य वर्तन करून आणि जनतेच्या तोंडावर केवळ आश्वासने फेकणार्‍या कॉंग्रेसने एकदम स्वत:स पांडव घोषित करून टाकले! याच पांडव म्हणवून घेणार्‍या कॉंग्रेस पक्षाने आणीबाणीच्या काळात जे कौरवांसारखे वर्तन केले होते ते जनता विसरलेली नाही. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर कॉंग्रेसच्या नेत्यांच्या चिथावणीने शीखांचे जे हत्याकांड घडले ते कौरवांनाही लाजविणारे होते. असे असूनही स्वत:स पांडव म्हणवून घेण्याचा प्रकार म्हणजे खोटारडेपणाचा कळस झाला. आपण सतत कौरवांसारखे वर्तन करायचे, कटकारस्थाने करायची, चांगले काम करणार्‍यांच्या मार्गांत विघ्ने कशी येतील यासाठी आटापिटा करायचा आणि असे सर्व करून स्वत:स पांडव म्हणवून घ्यायचे! धन्य आहे तुमची राहुल गांधी! महाभारताचा नीट अभ्यास करून तरी बोलत जावे! देशात सर्व बाजूनी विरोधक भाजपला घेरण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. संधी मिळेल तेव्हा भाजपला घेरले जात आहे. कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मग ते महाराष्ट्रातील लाल वादळ असो वा नरेंद्र मोदी सरकारविरुद्धचा अविश्वास ठराव असो भाजपला त्यानिमित्ताने कात्रीत पकडण्याचे खेळ चालू आहेत. विरोधकांचे हे डावपेच लक्षात घेऊन आपल्या कर्तृत्वाने, त्यांचेच दात त्यांच्याच घशात कसे घातले जातील, हे सत्याची कास धरून वाटचाल करीत असलेल्या भाजपला सिद्ध करून दाखवावे लागेल. राहुल गांधी, कोण पांडव आणि कोण कौरव याचा निवाडा देशातील जनतेलाच करु द्यात!
 
 
 
दत्ता पंचवाघ
९८६९०२०७३२