सरकारी योजनेला सेवेचा अर्थ...
 महा एमटीबी  20-Mar-2018
 
 
 
एक माणूस म्हणून मानसिक अस्वस्थतेवर मात करत विकास यांनी आयुष्याचा अर्थ शोधला. तोही स्वत:पुरता मर्यादित न ठेवता समाजाच्या गरजू वंचितांसाठी त्या अर्थाचा सेवादायी उपयोग केला.
 
तुमचा मुलगा परागंदा झाला का हो? तो घर सोडून का गेला हो? बाबांना दररोज आजूबाजूचे लोक प्रश्‍न विचारून भंडावून सोडत. त्यावेळी आम्ही अंधेरीच्या सारीपूत झोपडपट्टीमध्ये राहायचो. मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा प्रचारक म्हणून काम करत होतो. त्यामुळे मी घरी राहत नसे. मग लोक बाबांना हा प्रश्‍न विचारतच विचारत. त्यामुळे मी प्रचारक असतानाच बाबांनी अंधेरीचे राहते घर सोडले आणि आम्ही दुसरीकडे घर घेतले. अर्थात, मला याची कल्पनाच नव्हती,’’ ‘छत्रपती शिवाजीज क्रिएटिव्ह सोल्यूशन्स’चे सर्वेसर्वा विकास देशमुख भूतकाळातल्या जखमा हसतमुखाने उघड करत होते. ते हसत होते, पण डोळ्यात आठवणी दाटून आल्या होत्या. त्यांचे भरले डोळे सगळे काही सांगून गेले. असे काय होते की, १३० लोक त्या व्यक्तीच्या सामाजिक-आर्थिक संस्थेमध्ये कामाला आहेत. टाटा कॅन्सर हॉस्पिटल, मुंबईतील महानगरपालिकेची हॉस्पिटल्स, लालबागच्या राजाचे डायलिसीस सेंटर, मुंबईबाहेरचे कृष्णा चॅरिटेबल हॉस्पिटल या सार्‍यांच्या आरोग्यासंबंधीचे सरकारी मदतीचे मुद्दे तात्काळ सोडवणारे विकास देशमुख इतके अंतर्मुख का झाले होते? आणि शेजार्‍यांनी त्यांच्या बाबांना ज्ञानू देशमुखांना विकास बाबत विचारून का त्रास दिला होता? तसे विचारण्याआधीच विकास म्हणाले, ‘‘मी शाळेत हुशार होतो. आठवीपर्यंत स्कॉलर होतो. वर्गाचा मॉनिटरही होतो, पण आठवीनंतर मनाची ओढच बदलली. किशोरवयात मित्रांची संगत लागली. अभ्यासातून लक्ष उडाले. इतके की, अभ्यास नकोच आणि ‘अभ्यास कर...अभ्यास कर’ असे सारखे सांगणारे घरातलेही नकोसे वाटत. त्यामुळे मी दोनदा घर सोडून पळून गेलो. पण, मनाची बैचेनी वाढतच होती आणि मी विषप्राशन केले. पण ते विष नव्हते, तर द्राक्ष बागायतींच्या पानांवर पाणी साचू नये, यासाठी जे स्टिकर द्रव्य असते, ते होते. मी वाचलो, पण शारीरिक त्रास हेाऊन हॉस्पिटलमध्ये अॅडमिट तर होतोच. ही सगळी पार्श्‍वभूमी अंधेरीच्या सारीपूत झोपडपट्टीच्या शेजार्‍या-पाजार्‍यांना माहिती होती. त्यामुळे मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा प्रचारक म्हणून घराबाहेर राहायचो, त्यावेळी त्यांना नक्कीच वाटले असेल की आईबाबांनी विकासला घराबाहेर काढले का? किंवा तो पुन्हा मागच्या सारखा पळून गेला का?’’
 
पुढे योगायोगाने विकासचा संपर्क राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांशी व त्यातही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी झाला. परिषदेच्या विविध कार्यक्रमांत जबाबदारी घेऊन काम करताना विकासच्या स्वतःच्या जीवनातही आमूलाग्र बदल होत होता. पुढे २०१२ साली विकास केंद्र सरकारच्या राजीव गांधी आरोग्य योजनेच्या सहभागी यंत्रणेकडून ‘आरोग्य मित्र’ म्हणून कामाला लागले. त्यावेळी काही कारणांस्तव मॅनेजर केईएम हॉस्पिटलला जाऊ शकले नाहीत आणि कंपनीच्या सीईओ व्यकंटेश यांनी केईएम हॉस्पिटलला त्यांच्या जागी मला पाठवले. केईएममध्ये गेलो त्यादिवशी मी दहा रूग्णांना राजीव गांधी आरोग्यदायी योजनेच्या अंतर्गत मदत करू शकलो. सीईओंना हे अशक्य वाटले. कारण मोठी यंत्रणा लावूनदेखील दिवसाला दोन-तीन रूग्णांना मदत शक्य होत नव्हती. पण, आज दहा जणांना मदत झाली. त्यांना नवल वाटले, पण त्यात मला विशेष वाटले नाही, कारण लोकांना भेटणे, त्यांचे प्रश्‍न समजून त्यांना मदत करणे, याचे सर्वांगीण प्रशिक्षण अभाविपच्या माध्यमातून झालेच होते. ती माझी आवडच होती.’’
 
विकास सातत्याने मनापासून या योजनेवर काम करायचे. त्यामुळे ९७१ आजारांवर पिवळ्या आणि केशरी रेशनकार्ड धारकांना सरकारी मदत मिळवताना काय अडचणी येतात, ते हॉस्पिटल्सना ही योजना राबवल्यावर रूग्णांच्या मदतीचे पैसे परत मिळवताना काय त्रास होतो, याबाबत चांगलीच माहिती झाली. इतकी की ते या क्षेत्राचे गुरूच झाले.
 
विकास म्हणतात, "शिवाजी द मॅनेजमेंट गुरू" या पुस्तकाचा माझ्यावर खूप परिणाम हेाता. अर्थार्जनही करायचे ते देश आणि समाजासाठी हे अभाविपचे संस्कार मनावर ठाम कोरलेले. ‘आरोग्यमित्र’ म्हणून काम करताना पाहत होतो की रूग्णांना आणि हॉस्पिटल्सनाही ही मदत मिळवताना नाकी नऊ यायचे. त्यात काही अडचण नसतानाही. मग मी स्वतःची मदत यंत्रणा सुरू करण्याचे ठरवले. नावच ठेवले ‘छत्रपती शिवाजीज क्रिएटिव सोल्यूशन्स.’ या माध्यमातून सुरुवातीला टाटा हॉस्पिटलच्या रूग्णांची १.५ कोटींची मदत मिळवून दिली. त्यामध्ये आमचा करार झाला की आम्ही जरी सेवाभावी वृत्तीने ही कामे करत असलो तरी या कामासाठी नेमलेली माणसे, व्यवस्था यांसाठी पैसे लागतच होते. त्यामुळे अल्प कमिशन पद्धतीवर हे काम सुरू केले. या कामाचा आवाका इतका वाढला की महानगरपालिकेच्या हॉस्पिटल्सना राजीव गांधी आरोग्यदायी योजनेची १२.५ कोटींची आर्थिक मदत केवळ तीन महिन्यांत मिळवून दिली. विकासला आज एकच लक्ष्य आहे. गोरगरीबांच्या आरोग्यासाठी संजीवनी असलेल्या या योजनेचा लाभ खरच गरजू गरीबांना मिळावा. त्यासाठी विकास आणि त्यांची छत्रपती शिवाजीज क्रिएटिव सेाल्यूशन्स अक्षरशः अहोरात्र काम करत आहेत.
 
 
- योगिता साळवी