होमियोपॅथी - एक परिपूर्ण औषधशास्त्र
 महा एमटीबी  20-Mar-2018
 
 
 
होमियोपॅथी ही चिकित्सा पद्धती व औषध प्रणाली आज सूंपर्ण जगामध्ये अत्यंत गुणकारक, अत्यंत सुरक्षित व असाध्य रोगांवर गुणकारक अशी उपचार पद्धती म्हणून लोकप्रिय व प्रसिद्धही आहे. होमियोपॅथीची लोकप्रियता व सिद्धता आता जवळ जवळ संपूर्ण जगाला परिचित आहे. परंतु, अजूनही लोकांमध्ये होमियोपॅथीबद्दल अज्ञान दिसून येते, अनेक समज व गैरसमज लोकांमध्ये आढळून येतात. होमियोपॅथी म्हणजे नक्की काय व आपण आपल्या निरोगी आयुष्यासाठी होमियोपॅथीचा कसा उपयोग करुन घेऊ शकतो याची माहिती घेण्यासाठी दर मंगळवारी होमियोपॅथीचे डॉक्टर मंदार पाटकर यांचे ‘ओळख होमियोपॅथीची’ हे खास सदर...
 
होमियोपॅथीला आपण ‘समचिकित्सा पद्धती’ म्हणूनही ओळखतो. होमियोपॅथीची सुरुवात कुठे व कशी झाली, हे समजून घेण्याकरिता आपल्याला अठराव्या शतकात जावे लागेल. त्या काळात युरोपमध्ये पारंपरिक औषधशास्त्र सर्वत्र वापरले जायचे, काही इस्लामिक देशात युनानी म्हणजेच हकीम, तर भारतासारख्या खंडप्राय देशात आयुर्वेदही तेवढ्याच ताकदीने वापरला जात असे. अशाच काळात जर्मनीमध्ये १० एप्रिल १७५५ रोजी डॉ. सॅम्युएल हॅनेमान यांचा जन्म झाला. एका पोरसिलीन पेंटरच्या घरात जन्मलेल्या डॉ. सॅम्युएल हॅनेमान यांचे आयुष्य हलाखीचे व सामान्य होते. अनेक संघर्षांना व आव्हानांना मोठ्या चिकाटीने तोंड देत सॅम्युएल हॅनेमान हे पारंपरिक औषधशास्त्रात प्रवीण झाले व त्यांना विद्यापीठानेही पदवी प्रदान केली. यानंतर त्यांनी जर्मनीमध्ये स्वत:चा वैद्यकीय व्यवसाय सुरु केला. अनेक वर्षे हा व्यवसाय यशस्वीरीत्या करत असताना त्यांच्यातील संशोधक त्यांना गप्प बसू देईना. याचे कारण असे की, पूर्वीच्या औषधप्रणालींमध्ये रुग्णांना बरे करण्यासाठी काही वेळा अत्यंत अघोरी व वेदनादायी उपचार पद्धतींचा वापर केला जात असे. उदा. जखमेवर चीर देऊन रक्त साफ करणे, अशुद्ध रक्त बाहेर काढण्यासाठी रूग्णाच्या शरीरावर जळवा चिकटवणे इत्यादी उपचारांमुळे रूग्ण अतिशय पीडा सहन करत असे आणि इतके असूनही रूग्णाला मुळापासून आराम मिळत नसे. औषधांचे दुष्परिणाम हे अतिशय घातक होत असत.
 
वैद्यकीय व्यवसाय करत असताना डॉ. हॅनेमान यांना या गोष्टी खूप खटकत असत. अशाच वेळी त्यांच्यातील संशोधकाने असा विचार केला की, निसर्ग ही सर्वांची आई आहे आणि त्याच निसर्गाकडे आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. तेव्हा अशी एखादी औषधप्रणाली असणारच की, जी नैसर्गिक तत्वांवर काम करेल व निसर्गाच्या नियमांनुसारच रूग्णाला बरे करेल. डॉ. हॅनेमान अशाच प्रकारच्या संशोधनात गुंतले व त्यासाठी त्यांनी भरपूर वाचन सुरू केले. त्याच बरोबर त्याचे इंग्रजी व जर्मन या भाषांवर प्रभुत्व असल्याने त्यांनी पुस्तकांची भाषांतरे करण्यास सुरुवात केली. अशाच एका पुस्तकाचे ते भाषांतर करत होते. ’क्युलेन्स मटेरीया मेडीका’ हे त्या वैद्यकीय पुस्तकाचे नाव होते. त्यात त्यांच्या नजरेस एक वाक्य पडले, ते असे की सिंकोना बार्क ही वनस्पती त्याच्या कडवट व तुटक चवीमुळे मलेरिया बरा करते.
 
हे वाक्य बुद्धिवादी डॉ. हॅनेमानला पटले नाही. त्यांनी या सिंकोना बार्कच्या औषधाचे प्रयोग करून बघायला सुरुवात केली. त्यांनी या औषधाचे काही डोस स्वतः घेतले व काही त्यांच्या सहकार्‍यांना दिले. हे औषध घेतल्यावर त्या सर्वांना थंडी वाजून ताप आला, अंग थरथरले व ती सर्व लक्षणे दिसली जी मलेरियामध्ये दिसतात. या प्रयोगावरुन त्यांच्या लक्षात आले की, एखादे औषध निरोगी माणसांत जी रोगाची लक्षणे दाखवते, ते औषध आजारी माणसांत तीच लक्षणे बरी करते. ’Like cures like' इथेच त्यांना हा मोठा शोध लागला व जगाला ‘होमियोपॅथी’ नावाचे शास्त्र त्यांनी दिले. १७९७ मध्ये त्यांनी या प्रयोगांनी सिद्ध केलेल्या औषधशास्त्राला ‘होमियापॅथी’ असे नाव दिले. पारंपरिक औषधशास्त्राचे नामकरण करण्याचे श्रेयदेखील डॉ. हॅनेमान यांनाच जाते. त्यांनी या पारंपरिक औषधशास्त्राला ‘अॅलोपॅथी’ असे नाव दिले आणि तेव्हापासूनच डॉ. हॅनेमान यांनी अनेक शास्त्रशुद्ध प्रयोग करून ‘होमियोपॅथी’ हे एक विज्ञान असल्याचे सिद्ध केले व होमियोपॅथीची उपचार पद्धती सुरु केली.
 
 
 
 
 
- डॉ. मंदार पाटकर
(लेखक एम. डी. होमियोपॅथी आहेत.)