फुलपूर, गोरखपूरचे संकट!
 महा एमटीबी  19-Mar-2018
राजकारणात कायम मित्र नसतात आणि कायम शत्रूही नसतात. फुलपूर-गोरखपूरच्या निकालानंतर 48 तासांच्या आत आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी भाजपा आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि आपले कट्टर शत्रू वायएसआर कॉंग्रेसच्या अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा देण्याची घोषणा केली. म्हणजे उत्तरप्रदेशात सपा-बसपा हे परस्परांचे विरोधक भाजपाच्या विरोधात एकत्र आले आणि आंध्रप्रदेशात तेलगू देसम व वायएसआर कॉंग्रेस हे विरोधक एकत्र आले. केवळ तीन दिवसांतील या ताज्या घटनाक्रमाने भाजपासमोर एक मोठे राजकीय आव्हान उभे केले आहे. उत्तरप्रदेशातील फुलपूर, गोरखपूर तर बिहारमधील अररिया या लोकसभेच्या तिन्ही जागा भाजपाने गमावल्या. मागील पाच महिन्यात भाजपाने लोकसभेच्या पाच जागा गमावल्या. प्रथम पंजाबमधील गुरुदासपूर, नंतर राजस्थानातील अल्वर-अजमेर व आता फुलपूर- गोरखपूर. अररियाची जागा भाजपाकडे नव्हती.
 
दहा दिवसांपूर्वी फुलपूर- गोरखपूरमध्ये भाजपाच्या पराजयाचा अंदाजही बांधला जात नव्हता. पण, सपा-बसपा यांनी एकत्र येताच या दोन्ही जागा भाजपाला जड जातील आणि फुलपूरमध्ये नक्की पराभव, तर गोरखपूरमध्ये निसटता विजय, असा अंदाज करणे सुरू झाले आणि प्रत्यक्षात या दोन्ही जागा भाजपाने गमावल्या. भाजपासाठी गोरखपूरचा पराभव अधिक गंभीर यासाठी आहे की, 1989 पासून भाजपाने सतत जी जागा जिंकली आहे. कोणत्याही पक्षाचे सरकार असो, गोरखपूर भाजपाचे राहात आले आहे. आता तर गोरखपूचे योगी आदित्यनाथ राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या मतदारसंघात एक नवखा उमेदवार भाजपाचा पराभव करील असे कुणालाही वाटले नव्हते आणि म्हणूनच या पराभवाचा धक्का मोठा आहे.
 
युतीचा परिणाम
 
सपा-बसपा हे दोन शत्रुपक्ष भाजपाच्या विरोधात एकत्र आले. फार गाजावाजा न करता एकत्र आले. त्याचाच परिणाम या दोन्ही मतदारसंघात झाला. सपा-बसपा यांची एकत्रित मते भाजपापेक्षा जास्त होती. भाजपा 3 कोटी 44 लाख, तर सपा-बसपा 3 कोटी 82 लाख! अखिलेश यादव आणि मायावती हे दोघेही मनाने एकत्र आले. बसपा कार्यकत्यार्र्ंनी घरोघरी जात सपाचा प्रचार केला आणि बसपाची सारी मते सपाच्या पारड्यात टाकली आणि त्याच ठिकाणी भाजपाचा पराभव निश्चित झाला.
 
एमवाय आणि डीएम
 
सपा आणि बसपा यांचे निवडणूक लढविण्याचे आपले एक समीकरण होते. सपाचे समीकरण ‘एम वाय’ म्हणजे मुस्लिम-यादव असे राहात होते तर बसपाचे ‘डी एम’ म्हणजे दलित- मुस्लिम असे राहात होते. या दोन वेगवेगळ्या समीकरणाचा फायदा भाजपाला लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मिळाला. यावेळी एक नवे समीकरण तयार झाले. ते होेते दलित-मुस्लिम-यादव! याला जोड मिळाली ती बनिया समाजाची. व्यापारी समाजाची. याचा परिणाम फुलपूर-गोरखपूरमध्ये दिसला.
 
अतिआत्मविश्वास
 
फुलपूर, गोरखपूरमध्ये भाजपाला अतिआत्मविश्वास नडला, असे मानले जाते. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या मतदारसंघात 37 आणि 43 टक्के मतदान व्हावे, हीच बाब चिंताजनक होती आणि त्यानुसार निकाल लागले.
आव्हान
 
फुलपूर-गोरखपूरचे निकालांचे तातडीचे आव्हान म्हणजे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कसे काम करणार आणि त्यांचा राजकीय वचक कसा राहणार हे आहे. उत्तरप्रदेशात केवळ वर्षभरापूर्वी योगी सरकार सत्तेवर आले आहे. त्यामुळे त्यांना बदलता येणार नाही. मात्र, त्यांचा राजकीय वचक कसा चालणार, हाही एक महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे. सरकार व संघटना या दोन्ही आघाड्यांवर हा प्रश्न निर्माण होणार आहे.
अररियातही पराभव
 
बिहारच्या अररिया लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय लोक दलाचे सरफराज विजयी झाले. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासाठी हा एक मोठा धक्का आहे. अररियातील लढत नितीशकुमार आणि तेजस्वी यादव यांच्यात लढली जात होती. बिहारच्या जनतेने लालू-नितीश युतीला निवडून दिले होते. नितीशजींनी तुमचा विश्वासघात केला. लालूला तुरुंगात टाकून, भाजपाशी मैत्री केली, असा प्रचार तेजस्वी यादव यांनी केला. नितीशकुमार यांनी विकासाचा मुद्दा केला. अररियाच्या जनतेने आपला कौल तेजस्वी यादवच्या बाजूने दिला. बिहारमधील विधानसभेच्या दोन जागांपैकी भाजपाने आपली जागा कायम राखण्यात यश मिळविले, तर राष्ट्रीय जनता दलाने जनता दल युचा पराभव करून एक जागा जिंकली. या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर, रांची जेलमध्ये असलेले लालूप्रसाद भारी पडले. बिहारमध्ये तेजस्वी यादवचा उदय झाला असल्याचे मानले जाते. यादव-मुस्लिम-दलित अशी युती राज्यात तयार झाली आहे. लालूप्रसाद यादव यांनी जेलमध्ये असणे आता त्यांच्या फायद्याचे ठरत आहे. लालूप्रसाद यादव यांना आतापर्यंत 12-14 वर्षांची शिक्षा झाली आहे. आणखी त्यांना दोन-तीन प्रकरणांत शिक्षा होण्याची शक्यता आहे. लालूप्रसाद यादव यांना जेवढी जास्त शिक्षा होईल त्याचा पूरेपूर फायदा राष्ट्रीय जनता दलाला होईल, असे म्हटले जाते.
 
दुसरे संकट
फुलपूर-गोरखपूरचे-अररियाचे निकाल भाजपाच्या विरोधात जाताच, चंद्राबाबू नायडू व जगन मोहन रेड्डी कॉंग्रेस यांनी हातमिळवणी करीत मोदी सरकारच्या विरोधात दंड थोपटले. या दोन्ही पक्षांनी मोदी सरकारविरुद्ध लोकसभेत अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला. लोकसभेत मोदी सरकारच्या स्थैर्यावर कोणताही परिणाम होणार नसला, तरी यातून जाणारा राजकीय संकेत मोदी सरकारसाठी फारसा चांगला नाही.
देशाच्या राजकारणात उत्तरप्रदेश-बिहारचे किती कसे महत्त्व आहे, हे या घटनाक्रनावरून दिसून येत आहे. नागालॅण्ड-त्रिपुरात भाजपाला विजय मिळाला. भाजपासाठी ही फार मोठी उपलब्धी आहे. देशाच्या भावनिक ऐक्यासाठी ही एक मोठी बाब आहे. पण, याचा राजकीय परिणाम फार होत नसतो. कारण, नागालॅण्डमध्ये एकूण मतदार 12 लाख. आता मतदान झाले 9 लाख आणि दुसरीकडे गोरखपूर-फुलपूर, अररिया हे मतदारसंघ संपूर्ण नागालॅण्ड वा त्रिपुरापेक्षा मोठे आहेत आणि म्हणूनच फुलपूर-गोरखपूरचे निकाल येताच चंद्राबाबू नायडू यांनी व भाजपाशी मैत्री करण्याची भाषा बोलणार्या जगनमोहन रेड्डी यांनी अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला. आता सवार्र्ंचे लक्ष, केंद्रीय मंत्री रामविलास पास्वान यांच्याकडे लागले आहे. जीतनराम मांझी भाजपा आघाडी सोडून लालू गोटात दाखल झाले आहेत. बिहारच्या पोटनिवडणुकीत त्यांच्या या निर्णयाचा फायदा लालूप्रसाद यादव यांना मिळाला. रामविलास पास्वान या सार्या घटनाक्रमावर लक्ष ठेवून आहेत. ते केव्हा, कोणता निर्णय घेतील हे फक्त त्यांनाच ठाऊक असावे.
 
सेना आक्रमक
 
या सार्या घटनाक्रमाचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणारही होणार आहे. शिवसेनेने स्वतंत्र लढण्याचा संकेत दिला आहे. उद्या सेनेेने भाजपासोबत राहण्याचा निर्णय घेतला, तरी लोकसभा-विधानसभा निवडणुकीत सौदेबाजी करण्याची संधी सेनेला मिळणार आहे. 2019 च्या निवडणुकीत उत्तरप्रदेश, बिहार व महाराष्ट्र ही तीन राज्ये महत्त्वाची ठरणार आहेत. या राज्यांमध्ये एकूण 168 जागा असून, 2014 मध्ये भाजपा आघाडीला 168 पैकी 147 जागा मिळाल्या होत्या. त्या कामगिरीची बरोबरी करण्याची जबाबदारी, या राज्यातील सरकारांवर राहणार आहे. पंतप्रधान मोदी व भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या समर्थ नेतृत्वाखाली भाजपाला ही स्थिती हाताळावी लागेल.