|| वाल्मिकी रामायण ||

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2018   
Total Views |



तमसा नदीच्या तीरावरील वाल्मिकी आश्रम. नारदमुनी वाल्मिकींना रामकथा सांगत आहेत. 
कांगडा शैलीतील चित्र. १७ वे शतक. National Museum, New Delhi.

रामकथांच्या न संपणाऱ्या मालिकेमधील आद्य रामायणाची कथा. अर्थात वाल्मिकी रामायणाची कथा. वाल्मिकी रामायण आणि वाल्मिकी मुनी, भारतभर किती प्रसिद्ध होते ते या दोन गोष्टींमधून कळते – एक तर पाकिस्तानातील लाहोर पासून दक्षिणेतील चेन्नई पर्यंत वाल्मिकींचे मंदिर पाहायला मिळते. आणि दुसरे असे की, दर वर्षी दसऱ्या नंतर येणाऱ्या अश्विन पौर्णिमेला वाल्मिकी जयंती साजरी केली जाते. कोण होते वाल्मिकी?

वाल्मिकी ऋषी रामायणात स्वत:चा परिचय देताना म्हणतात – “मी प्रचेतस् चा दहावा पुत्र आहे. मी अनेक वर्ष तपश्चर्या केली आहे आणि शपथपूर्वक सांगतो की मी कधीही कायेने, वाचेने किंवा मनाने पाप केले नाहीये!” तसेच वाल्मिकी रामायणात लक्ष्मण म्हणतो – वाल्मिकी मुनी व राजा दशरथ चांगले मित्र होते.

नंतर लिहिलेल्या अध्यात्म रामायणात – वाल्या कोळीची कथा येते. या कथेतला वाल्या जंगलातील लुटारू असतो. तो वनातून जाणाऱ्या प्रवाश्यांना मारून त्यांचे सामान लुटत असतो. एकदा तो जंगलातून प्रवास करणाऱ्या नारदमुनींची वाट अडवतो. “तुमच्या जवळ जे असेल ते सगळ द्या!” म्हटल्यावर, नारदमुनी गळ्यातली वीणा काढून देतात, आणि शांतपणे म्हणतात, “तू असे वाटसरूंना मारून किती पाप जमवले असशील?” तेंव्हा वाल्या कोळी म्हणतो, “मी ज्यांच्यासाठी हे कर्म करतो ते वाटून घेतील की माझे पाप! मग कितीसे उरेल?” नारद म्हणतात, “जा बरे, घरी विचारून ये. कोणी तुझे पाप वाटून घेतात का?” त्यावर वाल्याने नारदांना झाडाला बांधून ठेवले आणि घरी चौकशी करावयास गेला. जेंव्हा आई-बाप, बायको-पोरं घरातील कोणी त्याचे पाप वाटून घेण्यास तयार झाले नाहीत, तेंव्हा त्याच्या समजुतीला धक्का बसला. तो नारदांना शरण गेला. म्हणाला, “आता, माझ्या पापाचे निरसन कसे काय करावे?” तेंव्हा नारदमुनी त्याला, ”मी परत येई पर्यंत, इथे बसून रामनामाचा जप कर!”. त्यावर, “इतके पवित्र नाम माझ्या सारख्या पाप्याने कसे घ्यावे?” असे वाल्याने विचारले. नारदांनी त्याला “मरा मरा” असा जप करण्यास सुचवले. वाल्याने त्या ठिकाणी अनेक वर्ष जप केला. नारदमुनी परत येईतो त्याच्या अंगावर वारूळ चढले होते. अध्यात्म रामायणात, इथे ‘लुटारू वाल्या’चा ‘वाल्मिकी ऋषी’ झाला.

वाल्मिकी रामायणात मात्र आपली ओळख होते ती एका अत्यंत मृदू अंत:करण असलेल्या, महान पंडित व थोर कवी वाल्मिकी ऋषींची. त्यांच्या काव्यातून तत्त्वज्ञान, राजनीती, नीतिशास्त्र, शासन, भौगोलिक माहिती, वृक्षांची माहिती, ऋतू वर्णन, निसर्ग वर्णन व मानवी स्वभावाचे मनोरम दर्शन पदोपदी घडते.

अशा तपस्वी वाल्मिकींनी एकदा मुनीश्रेष्ठ नारदांना विचारले, “या जगात सर्वगुण संपन्न असा कोणी पुरुष आहे का? जो वीर आहे, सामर्थ्यवान आहे, जो धर्म जाणतो, जो सत्यवचनी आहे, विद्वान आहे आणि प्रियदर्शनी आहे?” तेंव्हा नारद म्हणाले, “मुने! इक्ष्वाकू वंशात राम नावाचा बुद्धिमान, नीतिमान, श्रीमान, सर्वज्ञ, धर्मज्ञ, महाबाहू, अजानबाहू, शत्रूंचे निर्दालन करणारा, एकवचनी, एकपत्नी, माता – पित्याला आनंद देणारा आणि प्रजेला प्रिय असलेला अयोध्येचा राजा राम, तुम्ही विचारता तसा आहे.” त्यावर नारदांनी वाल्मिकींना रामाच्या जन्मापासून रामाच्या राज्याभिषेकापर्यंतचा सर्व वृतांत सांगितला.

वाल्मिकी ऋषींचा आश्रम तमसा नदीच्या तीरावर होता. एकदा स्नानासाठी तमसा नदीकडे जात असतांना वाल्मिकींना झाडावर क्रौंच पक्ष्याचा सुंदर जोडा क्रीडा करतांना दिसला. अचानक एका निषादाने त्यातील नर पक्ष्याला बाण मारला. तो जखमी पक्षी खाली पडून तडफडू लागला. त्यावेळी क्रौंच पक्षिणीने हृदयद्रावक शोक केला. हे विदीर्ण करणारे दृष्य, वाल्मिकींना असह्य झाले आणि त्यांच्या तोंडून शाप आला –

मां निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः।
यत्क्रौंचमिथुनादेकम् अवधीः काममोहितम्॥


- रामायण, बालकाण्ड, द्वितीय सर्ग, श्लोक १५



हे निषादा! कामाने मोहित क्रौंच पक्ष्याच्या जोडीतील एकाला तू मारलेस, तुला अनंत काळापर्यंत प्रतिष्ठा प्राप्त होणार नाही! या श्लोकाचा दुसरा अर्थ होतो –

 
मा (लक्ष्मी) ज्याच्या पायाशी बसते, त्याने (विष्णूने), कामाने मोहित झालेल्या रावणाला, अर्थात रावण–मंदोदरीच्या जोडीतील एकाला मारले! तुला (विष्णूला) अनंत काळापर्यंत प्रतिष्ठा लाभेल!
संपूर्ण रामायणाचा अर्थ या एका श्लोकात रामायणाच्या सुरुवातीला येतो!

हा छंदात स्फुरलेला शाप, मानवाचे पहिले काव्य मानले जाते. आठ आठ अक्षरांच्या चार चरणात, एकूण ३२ अक्षरे असलेल्या अनुष्टुप छंदाला श्लोक हे नाव दिले. शोकातून उत्पन्न झालेल्या या श्लोकाने वाल्मिकी सुद्धा अचंबित झाले! कसे काय असा श्लोक माझ्या मुखातून आला? या चिंतनात मग्न असतांना ब्रह्माने त्यांना सांगितले, “मुने! मागे नारदाने तुला जी रामकथा सांगितली, ती तू श्लोकबद्ध कर! रामाच्या चरित्राची रचना करण्यासाठीच हा श्लोक तुझ्या मुखातून अवतरला आहे!
यावत् स्थास्यन्ति गिरयः सरितः च महीतले |
तावत् रामायण कथा लोकेषु प्रचरिष्यति |


जो पर्यंत या धरेवर नद्या वाहात आहेत, जो पर्यंत या पृथ्वीवर पर्वत स्थिर आहेत, तोवर मुने, तुझे रामायण सर्व लोकात प्रसिद्ध राहील!”


ब्रह्माच्या आज्ञेने वाल्मिकींनी राम चरित्र रचण्यास सुरुवात केली. रामायण! अर्थात रामाचा प्रवास. २४,००० श्लोकांच्या वाल्मिकी रामायणात ७ काण्ड आहेत. प्रत्येक काण्डात अनेक सर्ग आहेत व प्रत्येक सर्गात अनेक श्लोक.
असे मानले जाते की वाल्मिकी रामायण हे मौखिक परंपरेने जपले होते. जेंव्हा कधीतरी ते लिहिले गेले, तेंव्हा वेगवेगळ्या परंपरांमधून तीन वेगळे पाठ तयार झाले – पश्चिमी पाठ (लाहोर, गंधार प्रांतातील), गौड पाठ (बंगाल प्रांतातील) व दाक्षिण्य पाठ (गुजरात प्रांतातील). थोडाफार पाठभेद वगळता कथानकाच्या दृष्टीने तिन्ही पाठ सारखे आहेत. बडोदा विश्व विद्यालयाने उपलब्ध हस्तलिखितांवरून १९६० मध्ये वाल्मिकी रामायणाची Critical Edition प्रकाशित केली.
वाल्मिकी रामायणात प्रत्येक काण्डात येणारा कथाभाग असा आहे -
- बालकाण्ड – अयोध्येचे वर्णन; दशरथाचा पुत्रकामेष्टी यज्ञ; कौसल्येला राम, कैकयीला भरत, सुमित्रेला लक्ष्मण व शत्रुघ्न; त्राटिकावध, अहिल्या उद्धार, सीता स्वयंवर.
- अयोध्याकाण्ड – दशरथाची रामाला राज्याभिषेक करायची इच्छा, मंथरा कैकयी संवाद, कैकेयीचे वर - रामाला वनवास आणि भरताला राज्याभिषेक, राम - लक्षमण - सीतेचे अरण्याकडे प्रस्थान, दशरथाचा मृत्यू, भरत भेट.
- अरण्यकाण्ड –पंचवटीत वास्तव्य, शूर्पणखा, खरदूषण, मारीच-रावण संवाद, सुवर्ण मृग, सीता हरण, जटायूचा प्रतिकार, सीतेसाठी रामाचा शोक.
- किष्किंधाकाण्ड – राम-हनुमान भेट, सुग्रीवशी मैत्री, वाली वध, सीतेचा शोध.
- सुंदरकाण्ड – लंकेचे वर्णन, हनुमानाचे उड्डाण, अशोकवनात सीता भेट, लंकादहन.
- युद्धकाण्ड – रावण-विभीषण संवाद, विभीषण रामाला शरण येतो, सेतू बांधतात, युद्ध आरंभ, कुंभकर्ण वध, इंद्रजीत – लक्ष्मण युद्ध, हनुमान संजीवनी आणतो, रावण वध, विभिषणाचा राज्याभिषेक, सीतेची अग्निपरीक्षा, पुष्पक विमानाने अयोध्येला परत, राम-राज्याभिषेक.
- उत्तरकाण्ड - धोब्याचा सीतेवरील आरोप, सीता-त्याग, शम्बुक वध, लव-कुशाचा जन्म, रामाचा अश्वमेध यज्ञ, लव-कुशाचे अयोध्येत रामायण गान, त्यांची रामपुत्र म्हणून ओळख, सीतेचा धरणीमध्ये प्रवेश, लक्ष्मणाचा देहत्याग व रामाची शरयू मध्ये जलसमाधी आदि कथाभाग येतो.

बालकांड मध्ये येणारी अनुक्रमणिका राज्याभिषेकपर्यंत आहे. नारदांनी वाल्मिकींना सांगितलेली रामकथा पण राज्याभिषेकाला संपते. या व अशा अनेक अंतर्गत पुराव्यांवरून उत्तरकाण्डची रचना नंतरच्या काळात केली गेली असावी असे लक्षात येते.

वाल्मिकी रामायणाच्या युद्धकाण्डमध्ये रामाला राज्याभिषेक होतो, रामराज्याचे वर्णन येते, रामायण वाचल्याने काय फळ मिळेल ते सांगणारी फलश्रुती येते आणि रामकथा समाप्त होते. रामाला राज्याभिषेक झाल्यावर संपणारी वाल्मिकींची रामकथा सुखांत आहे.

संदर्भ –

१. रामकथा उत्पत्ती और विकास – फादर कमिल बुल्के
२. वाल्मिकी रामायण - IIT Kanpur Site

- दिपाली पाटवदकर
@@AUTHORINFO_V1@@