अनाथांच्या सनाथपणासाठी वात्सल्याची साद
 महा एमटीबी  19-Mar-2018गजानन दामले काका आणि वात्सल्य ट्रस्ट हे एका नाण्याच्या दोन बाजू... एकमेकांशिवाय दोघेही पूर्ण होणारच नाहीत. त्यामुळे दामले काकांच्या कर्तृत्वाचा आलेख घेताना ओघाने वात्सल्य ट्रस्टचा आलेख येतोच येतो. कारण, दामले काका सर्वसंग त्यागलेले आधुनिक तपस्वीच. त्यांची पूजा आहे अनाथ बालकांना वात्सल्य देणे, अनाथांना सनाथपणाचे वात्सल्य देणे.


सुख दुःख त्यागले माझे मी
निष्पाप कळ्यांना सौख्य द्याया
वात्सल्य झालो माझा मी...


गजानन दामले सेवेच्या पवित्र आयामात स्वतःला झोकून देणारे सेवक. ‘मी माझा न उरलो’ असे म्हणत गजानन दामले यांनी वैयक्तिक आयुष्याचा त्याग केला आणि त्यांच्या आयुष्याचे ध्येय एकच उरले ते म्हणजे वात्सल्य. वैयक्तिक, कौटुंबिक, जातीय आणि त्यातही मान्य-अमान्यतेच्या पलीकडे जाऊन केवळ वात्सल्याचा आविष्कार पेरत मानवतेची पूजा आयुष्यभर बांधणारे गजानन दामले. अनाथ मुलांना हक्काचे वात्सल्य मिळवून देणार्‍या मुंबईतील कांजूर मार्गच्या वात्सल्य ट्रस्टचे गजानन दामले सुरुवातीपासूनचे प्रमुख संस्थापक आणि सध्या सेक्रेटरी. वय वर्षे ८९ असताना दामलेकाका आठवड्याचे चार दिवस कांजूर मार्गच्या वात्सल्य ट्रस्टच्या कामाला देतात. इतर वेळी सानपाड्याच्या वात्सल्य ट्रस्टमध्ये लक्ष देतात. अर्थात लक्ष देतात म्हणजे ‘बॉसिंगगिरी’ किंवा ‘हे ट्रस्ट मी उभारले’ वगैरे टिमकी वाजवत नाहीत, तर संस्थेचे पडेल ते कामकरणारा कार्यकर्ता ज्या ताज्या दमाने उत्साहाने काम करतो, त्या उत्साहाने ते काम करतात. आपुलकीने लक्ष ठेवतात. गोव्याला अनाथ बालकांसाठी काम करणारी संस्था सुरू झाली होती. त्या संस्थेचे काम आणि त्यासंदर्भात अनाथ मुलांचे दुःख त्यावेळचे तरुण गजानन दामले आणि मित्रपरिवाराच्या हृदयात घर करून गेले. अनाथ मुलांच्या समस्येला बहुतेकदा कारण असते लादलेले मातृत्व आणि नाकारलेले पितृत्व, गरिबी, लाचारी. पण यात त्या जन्मघेतलेल्या मानवयोनीतील अर्भकाचा काय दोष? या विचारांनी सर्वजण अस्वस्थ झाले त्यातनूच वात्सल्य ट्रस्टचा जन्मझाला. वात्सल्य ट्रस्टच्या प्रमुख संस्थापक म्हणून गजानन दामलेंचे अनुभवही भयंकर वेदनादायीच आहेत. ते म्हणतात, ’’एका कचराकुंडीत एक दोन दिवसाचे बाळ सापडले, त्याचे दोन्ही डोळे तीक्ष्ण हत्याराने भोसकले होते. डोळ्यात पू झाला होता. त्या बाळाने कुणाचे काय केले होते?’’ ४० वर्षापूर्वींची घटना सांगताना दामले काका अत्यंत भावविवश झाले. थोडावेळ थांबून म्हणाले,’’...तर अशाप्रकारे अनाथ मुलांचं जगणं अत्यंत विदारक आणि भयानक. मला नेहमी वाटे की मूल होत नाही म्हणून मुलांसाठी वत्सल भावना मनात ठेऊन रडणारे कितीतरी लोक आहेत आणि दुसरीकडे आईबाप असूनही त्यांनी त्यागल्यामुळे वात्सल्यासाठी झुरणारे निष्पाप बालकेही कितीतरी आहेत. या सर्वांचा मेळ घालता आला तर? तेच काम वात्सल्य ट्रस्टमधून केले जाते.’’


दामले काका सांगत होते, पण वार्धक्य आच्छादलेल्या डोळ्यांमधली करुणा लपत नव्हती. या करुणेचे मला अप्रूप वाटते. कारण, काकांच्या आयुष्याचा वेध घेतला तर काकांना वैयक्तिक आयुष्यात वात्सल्य आणि वत्सलभाव लौकिकार्थाने म्हणावे तसे मिळालेच नव्हते. वयाच्या दुसर्‍या वर्षीच त्यांचे मातृछत्र हरपले. खेडमधल्या मामाने त्यांचे संगोपन वयाच्या आठव्या-नवव्या वर्षांपर्यंत केले. गजानन यांचे वडील आणि भाऊ आणि बहिणी सगळे कुटुंबच खानदेशात. कारण, वडील चित्रकलेचे शिक्षक आणि त्यांची नोकरी तेथे. आईविना असलेले आणि वडील दूर असलेल्या गजानन यांचे संगोपन मामा- मामीने कितीही प्रेमाने केले असले तरी केव्हा तरी बाल गजानन यांना आईबाबा आठवले असतील का? पुढे शिक्षणासाठी गजानन यांना वडिलांनी खानदेशला नेले. तिथेच संघाचा आणि संघशाखेचा परिचय झाला. गजानन शिकले. चांगली नोकरी लागली. त्यावेळचा अनुभव सांगताना गजानन सांगतात, ’’खानेदशातलं गाव, पण तिथेही कुमारी मातांची उकिरड्यावर टाकलेली बालकं अनास्थेचा विषय असत. काही वेळा तर असेही असे की, गावातल्या गरीब दाम्पत्याला बाळ होई, ते मुंबई किंवा इतर शहरात जातो, असे सांगत आणि परतताना बाळाविना येत. ती बालके कुठे जात असतील?’’ पुढे मुंबईला गोतावळा वाढत असताना सामाजिक दायित्वासंबंधी चर्चा करताना अनाथ बालकांचा प्रश्न नेहमी समोर येई. बालके कुठे जात असतील, अशी चर्चा होत असताना बहुसंख्य लोक म्हणत, आपण आशियाई, अमेरिका किंवा ब्रिटनच्या लोकांच्यामते काळे लोक आहोत. पण, आपली मुलं दत्तक घेण्यामध्ये ते पहिले. गोरे आपली काळी मुलं काय प्रेमाने दत्तक घेत असतील. नाहीच या मुलांचे ते काय करत असतील? त्यांच्याशी कसा वागत असतील? एक अनुत्तरित प्रश्न. पण हे सगळे एकून दामलेंच्या जिवाचे पाणी पाणी होत असे. पुढे दामलेंचा विवाह झाला. दुर्दैवाचे पाश त्यांच्या कौटुंबिक सौख्याला असे आवळले गेले की, लागोपाठ त्यांना चार मुले झाली आणि छोट्या छोट्या कारणांनी ती बालके शिशुवयातच देवाघरी गेली. या धक्क्याला दामले दाम्पत्यांनी पचवलेही असते, पण इतक्यात तरुण दामलेंना कळले की, पत्नीला असाध्य कर्करोग झाला आहे. त्यातच तिचा अंत झाला. काहीएक न कळायच्या वयात आईचा मृत्यू, तरुणपणी स्वतःच्या चार मुलांचा मृत्यू आणि शेवटी सुख दुः खात साथ देणार्‍या पत्नीचाही चटका लावणारा मृत्यू. एखादी व्यक्ती असती तर आयुष्यातून उठली असती. जीवनातल्या सगळ्या सकारात्मक गोष्टीवरून विश्वास उडाला असता, पण गजानन दामलेंचे मोठेपण हे की, या सर्व दुःखातून त्यांनी फिनिक्स पक्ष्यासारखी भरारी घेतली. ते वैयक्तिक दुःखातून वर उठले आणि त्यांनी हजारो अनाथ बालकांच्या दुःखाला दूर सारले. वात्सल्य ट्रस्टमध्ये दामलेकाकांनी स्वतःला अक्षरश: विलीन करून घेतले.


अनाथ मुलांसाठी काम करून तुम्ही अनैतिकतेला बळ देता असा आरोप सुरुवातीला दामले आणि वात्सल्य परिवारावर झाला. या सगळ्या आरोपांना झेलत दामलेकाका सहकार्‍यांच्या मदतीने वात्सल्याच्या कामाची व्याप्ती वाढवत होते. सुरुवातीला एका ब्लॉकमध्ये सुरू झालेले वात्सल्य ट्रस्टचे रूपांतर आता कांजूरच्या मोठ्या इमारतीमध्ये, सानपाडा आणि अलिबाग इथेही सुरू झाले आहे. या ट्रस्टमध्ये अनाथ बालकांचे नुसते संगोपन किंवा दत्तक देणे वगैरेच होत नाही, तर बालिकांसाठी तसेच आसपासच्या गरजू स्त्रियांसाठी वासंतिक शिबिरे, वेगवेगळे छोटे कोर्सेस यांचे आयेाजन केले जाते. बॅगा बनवणे, ग्लास पेटिंग, सौंदर्यप्रसाधने बनविणे, बालक पालक मार्गदर्शन केंद्र खुशी, जाणीव जागृतीविषयक कार्यक्रम, वयोगट ० ते १० वर्षाच्या मतिमंद मुलांकरिता पूर्व निदान केंद्र-आकार. सेवावस्तीतील गरजूंसाठी अल्प शुल्कामध्ये संगणक प्रशिक्षण, रुग्ण सहायक अभ्यासक्रमाचे आयोजन केले जाते. वात्सल्याचे नाव आता देशभरातली मान्यवर सेवा संस्था म्हणून घेतले जाते.आजवर दामले काकांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने ११३३ मुलांना दत्तकविधीतून आईबाप मिळवून दिले आहेत. आज वात्सल्य ट्रस्टसोबतच दामले काकांनाही त्यांच्या सेवाकार्यासाठी अनेक पारितोषिके मिळाली आहेत. कित्येक सन्मान मिळाले आहेत. दामले काका म्हणतात, ’’ही मुलं त्यांच्या आईवडिलांकडे सुखात राहिली की आम्ही भरून पावतो. हीच खरी आमची संपत्ती आहे.
- योगिता साळवी