एका यशस्वी उद्योजकाची स्वप्नपूर्ती
 महा एमटीबी  19-Mar-2018
 
 
 
उद्योजक होताना प्रचंड आत्मविश्वास, नुकसान सोसण्याची तयारी, घडणार्‍या चुका आणि त्यातून समजणारे बारकावे, परिश्रम, प्रामाणिकपणा, ग्राहकांचा विश्वास, व्यवस्थापन या बाबी महत्त्वाच्या असतात. हे उद्योजकाचे गुण आत्मसात केल्यानंतर अंगी चिकाटी निर्माण होते. कॉसमॉस ग्रुप ऑफ कंपनीचे सर्वेसर्वा भूषण मर्दे यांनीही उद्योजकांची ही गुणवैशिष्ट्ये अंगी रुजवली आणि घरात उद्योगपूरक वातावरण नसताना आपला व्यवसाय यशस्वी करुन दाखविला. अवघ्या १५ हजारांपासून ते १०० कोटींपर्यंतच्या या व्यावसायिक उलाढालीचा भूषण मर्दे यांचा प्रवास खरंच थक्क करणारा आहे.
 
 
इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर आपला स्वतःचा एक स्वतंत्र व्यवसाय उभा करण्याचा ध्यास मर्दे यांनी घेतला आणि अथक परिश्रम आणि दांडग्या जनसंपर्काच्या माध्यमातून हवेचे वितरण करणाऱ्या उत्पादन (­Air distribution products) क्षेत्रात पाय रोवून उंच भरारी घेतली. साधारणपणे २७-२८ वर्षांपूर्वी मराठी मध्यमवर्गीय व्यक्ती आणि व्यवसाय यांचा तसा दूरदूरपर्यंत संबंध नव्हता. पण, अशा परिस्थितीमध्ये पदवीनंतर स्वतःचा एक स्वतंत्र व्यवसाय करण्याचा ध्यास भूषण मर्दे यांना स्वस्थ बसू देईना. मर्दे हे कोळी समाजाचे. त्यांनी शालेय शिक्षण संपल्यानंतर मेकॅनिकल इंजिअरिंगसाठी विलेपार्ले येथील भगुबाई पॉलिटेक्निकमध्ये डिप्लोमासाठी प्रवेश घेतला. शिक्षण सुरू असतानाच त्यांनी महाविद्यालयाच्या क्रिकेट संघामध्ये सामने खेळायला सुरुवात केली. त्याकाळात कर्णधारपदाची सूत्रे भूषण यांच्या हातात होती. शिक्षण संपल्यानंतर, हातात पदवी आल्यानंतर त्यांनी सुरुवातीला फ्री लान्सर म्हणून एअर कडिशनिंग इंडस्ट्रीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. पण, त्यानंतर त्यांना क्रिकेटमध्ये करिअर करणे किंवा तिथपर्यंत पोहोचणे शक्य नसल्याची जाणीव झाली. त्यानंतर त्यांनी नोकरी करण्यास सुरुवात केली. १९९१ च्या दरम्यान भूषण यांचे लग्न झाले.
 
 
स्वतंत्र विचारसरणी आणि नेतृत्व करण्याची सवय असलेल्या भूषण यांचे मन नोकरीमध्येही फारसे रमले नाही. त्यांच्या मनात व्यवसाय करण्याचा विचार येऊ लागला. एअर कंडिशनिंग इंडस्ट्रीमध्ये कामाचा अनुभव होताच. सेंट्रल एसी सिस्टिममध्ये थंड हवेचे वितरण करण्यासाठी एअर टर्मिनल लागतात. ते प्लास्टिकमध्ये तयार करावे अशी कल्पना त्यांना सुचली; जेणेकरून त्याची किंमत कमी होईल व बाजारात मागणी येऊ शकेल. असा प्रयत्न भारतात पहिल्यांदा होणार असल्याने त्यात नाविन्य होते. याचवेळेस महाविद्यालयातील गुजराथी मित्राची मदत घेऊन व्यवसायात उतरण्याचा मर्दे यांनी निर्णय घेतला. त्यासाठी पहिला प्रयत्न केला. १९९२ मध्ये एक उत्पादन (प्रॉडक्ट) निवडले. तसे उत्पादन भारतात नसल्यामुळे त्यांनी त्याची निवड केली. त्या उत्पादनाचा विकास करेपर्यंत काही कालावधी गेला. या मधल्या काळात भूषण यांनी फॅब्रिकेशनची काही कामे घेतली. हे सुरू असतानाच भूषण यांच्या सिव्हिल इंजिनिअर मित्रांनी मोठा प्रोजेक्ट (जलविद्युत केंद्राच्या कालव्याचा) आणला. त्यात भूषण यांनी भागीदारी घेतली. पण, हा प्रयत्न अंगाशी आला व मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले. त्यानंतर १९९४ मध्ये भूषण आणि त्यांचे मित्र यांनी विकसित केलेले उत्पादन बाजारामध्ये आले. भूषण यांनी त्यांच्या एका गुजराथी मित्राची मदत घेऊन जागा भाड्याने घेऊन एक छोटीशी कंपनी सुरू केली. अर्थात, कंपनी सुरू करण्यासाठी आवश्यक असणार्‍या भांडवलासाठी त्यांना त्यांच्या वडिलांनी मोलाची मदत केली. सुरुवातीला चार कर्मचारी आणि भूषण मर्दे अशा एकूण पाच कर्मचार्‍यांसह कंपनीमध्ये विविध उत्पादनांची निर्मिती करण्याचे काम सुरू झाले. सुरुवातीपासून भूषण व त्यांच्या मित्रांनी कामाची विभागणी करून घेतली होती.
 
 
 
भूषण हे प्रॉडक्ट डेव्हलपमेंट व मार्केटिंग सांभाळायचे आणि त्यांचा भागीदार मित्र उत्पादन व अर्थकारण सांभाळू लागला. कंपनीचा पाया रोवल्यापासून सुरुवातीची पहिली तीन वर्षं भूषण यांना जो आर्थिक मोबदला मिळाला, तो सगळा पैसा कंपनीचे भाडे, भांडवल उभं करण्यासाठी तसेच उत्पादन बनवण्यासाठी लागणारे साहित्य, मशीन्स, नुकसान भरपाई, चार कर्मचार्‍यांचे पगार देण्यामध्ये खर्च झाला. या सर्व काळामध्ये भूषण यांच्या वडिलांनी सर्व कौटुंबिक जबाबदारी स्वीकारली. हे सर्व सुरू असतानाच त्यांना त्यांच्या लहान भावानेही आर्थिक मदत केली. पण हळूहळू त्यांना नवीन कामे मिळत गेली. दिवसेंदिवस कामाचा वाढलेला व्याप लक्षात घेता त्यांना अतिरिक्त कर्मचार्‍यांची गरज भासू लागली. त्यांना कंपनीसाठीही मग हक्काची जागा हवी, असे प्रकर्षाने जाणवले आणि मग त्यांनी दमणमध्ये गाळा घेतला. तिथे काही कर्मचारी नेमून उत्पादन निर्मिती सुरु केली. त्यानंतर माहिममध्ये त्यांनी जागा घेतली. माहिमच्या कंपनीची सर्व सूत्रे भावाच्या हातात सोपवली. अर्थात तोपर्यंत एअरकंडिशनिंग उद्योगामध्ये भूषण यांची स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. पण, तरीही आर्थिक गणिताचा आलेख फारसा समाधानकारक नव्हता. कंपनी व्यवस्थापनामध्ये आपण कमी पडत आहोत, असं त्यांना जाणवू लागलं. हे सगळं सुरू असतानाच २००४ मध्ये भूषण यांना एका कटू प्रसंगाला सामोरं जावं लागलं. त्यांच्या क्षेत्रातील एका क्लायंटने त्यांचे उत्पादन विकत घ्यायला नकार दिला. त्याक्षणी आतापर्यंत आपण जे काही मिळवलं, ते हातातून निसटणार तर नाही ना, ही चिंतेची भावना त्यांना व्यथित करुन गेली. पण, तरीही धीर न सोडता भूषण पुन्हा नव्याने उभे राहिले. त्यानंतर भूषण व त्यांचा गुजराती मित्र असलेल्या सहकार्‍यांनी एकत्र कामन करण्याचा निर्णय घेतला आणि मग ‘कॉसमॉस’ची सर्व सूत्रे भूषण यांनी हाती घेतली. त्यानंतर ‘कॉसमॉस’ अजूनही आपले स्थान टिकवून आहे, हे सिद्ध करण्यासाठी एका एअर कंडिशनिंग इंडस्ट्रीच्या प्रदर्शनामध्ये ‘कॉसमॉस’ने स्पॉन्सर केलं. त्यामुळे ‘कॉसमॉस’ने पुन्हा प्रगतीच्या दिशेने नव्याने वाटचाल करायला सुरुवात केली. त्यानंतर २००६ मध्ये दुबईच्या एका फ्रेंच कंपनीला त्यांचं उत्पादन भारतात विकायचं होतं. त्या फ्रेंच कंपनीने भूषण यांना एक प्रोजेक्ट रिपोर्ट देण्यास सांगितला. त्या प्रॉडक्टची भारतात किती मागणी आहे, याचा अहवाल भूषण यांना तयार करायला सांगितला. तसा अहवाल भूषण यांनी त्या फ्रेंच कंपनीला दिला. पण, त्यांचा माल विकण्याऐवजी भूषण यांनी क्लायंटशी संपर्क साधला. पुन्हा हा असा अनुभव आल्यानंतर तसेच उत्पादन भारतात विकसित करण्याचा भूषण यांनी ठाम निश्चय केला. तसे उत्पादन निर्माण करणारी ‘कॉसमॉस’ ही भारतातील पहिली कंपनी ठरली. त्यानंतर बोईसरमधल्या एमआयडीसीमध्ये जागा घेऊन तिथल्या स्थानिकांना नोकरी देण्याला भूषण यांनी प्राधान्य दिले. २०१४ रोजी फ्रान्समधल्या एअर कंडिशन व्यवसायामध्ये अग्रेसर असलेल्या एका क्लायंटसोबत संपर्क झाला. त्यांनी त्याच्या एका उत्पादनासाठी आमच्या कंपनीची काही उत्पादने घेण्याची तयारी दर्शवली. आमच्या कंपनीला भेट दिली. त्यांच्यासोबत कामकरू लागलो. पुढे २०१६ मध्ये फ्रान्समधला पॅरिस हायकोर्टासाठी कॉसमॉसच्या उत्पादनाची निवड करण्यात आली. त्यावेळेस पहिल्यांदा एका भारतीय ब्रॅण्डला पसंती देण्यात आल्याचे मर्दे सांगतात. ज्या देशाच्या कंपनीने वाईट वागणूक दिलीस, त्याच फ्रान्समध्ये त्यांचे नशीब चमकले. या क्षेत्रातील उत्पादने बनविण्यासाठी आमच्या कंपनीची निवड करण्यात आली. हाच कॉसमॉससाठी मानाचा तुरा होता. फ्रान्समधल्या एका नावाजलेल्या कंपनीने भारतीय ब्रॅण्डची निवड केली. तिथे ग्लोबल कॉन्फरन्स सुरू होती.
 
 
त्यावेळेस भूषण यांच्या उत्पादनाचे, त्यांच्या कंपनीचे फ्रान्समधल्या कंपनीने भरभरून कौतुक केले. त्यांचं उत्पादन हे कसं वेगळं आहे, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत याची माहिती देण्यात आली. तो क्षण भूषण यांच्यासाठी अभिमानास्पद असा क्षण होता. आज भूषण यांच्या कंपनीमध्ये जवळपास २२५ पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत. भूषण त्यांच्या कंपनीमध्ये कर्मचार्‍यांची नियुक्ती करताना या क्षेत्रामध्ये करिअर करून पाहणार्‍या नवख्या तरुणांना जास्त प्राधान्य देतात. भूषण यांचे त्यांच्या कर्मचार्‍यांसोबत मैत्रीचं नातं आहे. त्यांच्या कंपनीत वर्षातून एकदा कर्मचारी व त्यांच्या कुटुंबाला बोलवून एकत्र कार्यक्रम आयोजित केला जातो. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांसोबत स्पर्धा करायची असल्यास त्यांचे तंत्रज्ञान समजावून घेणे भूषण यांना खूप महत्त्वाचे वाटते. यासाठी ते भारताबाहेर भरणार्‍या अनेक मशीन्सच्या प्रदर्शनामध्ये सहभागी होत असतात. तसेच त्यांच्यासारखी जिद्द बाळगणारे आणखी उद्योजक तयार करण्यासाठी ते महाविद्यालयातील तरुणांना मार्गदर्शनदेखील करतात. अर्थात, हा प्रवास सोपा नव्हता. विशेष म्हणजे, या प्रवासामध्ये भूषण मर्दे यांना त्यांच्या पत्नीने खूप आधार दिला. कंपनीच्या कामाची जबाबदारीबरोबरच भूषण मर्दे सामाजिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय आहेत. भूषण रा. स्व. संघ परिवाराशी जोडलेले आहेत. साधारण १७ वर्षांपूर्वी दादर-माहीम भागात हिंदू नववर्ष स्वागत समितीची स्थापना करण्यात आली. संघाने या हिंदू नववर्ष स्वागत समितीची जबाबदारी भूषण यांना दिली. सध्या समितीचे कार्याध्यक्ष म्हणून गेली ११ वर्षं भूषण कार्यरत आहेत. गेल्या वर्षीपासून गुढीपाडव्याच्या निमित्ताने ४८ ठिकाणी सार्वजनिक गुढीपूजन करण्याचा एक अनोखा उपक्रमही राबविला जातो. ते लघुउद्योग भारतीसाठीही कामकरत आहेत. मर्दे यांनी ’मराठी व्यापारी उद्योजक मंडळ’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. भूषण यांचा हा अनुभव, प्रवास बघून भविष्यात त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून अनेक यशस्वी उद्योजक घडतील, अशी आशा बाळगूया.
 
 
 
 
- सोनाली रासकर