गुढी पाडवा
 महा एमटीबी  18-Mar-2018
गुढीपाडव्याचा सण
आतां उभारा रे गुढी
नव्या वरसाचं देनं
सोडा मनांतली आढी
गेलसालीं गेली आढी
आतां पाडवा पाडवा
तुम्ही येरांयेरांवरी
लोभ वाढवा वाढवा बहिणाबाई चौधरी ह्या थोर कवयित्रीच्या ह्या ओळी गुढीपाडव्याचा आनंद खऱ्या अर्थाने द्विगुणित करतात. गुढीपाडवा म्हणजेच चैत्र शुक्ल प्रतिपदा. भारतातल्या बऱ्याच राज्यात हा दिवस हिंदू नववर्षाचा प्रारंभ म्हणून साजरा केला जातो. हिंदूंचे जवळजवळ सर्वच सण निसर्गचक्राशी निगडित आहेत. गुढीपाडवा म्हणजे चैत्रपालवीचा सण. हिंवाळा संपून निसर्गाला नवसर्जनाची चाहूल लागते, झाडांना नवीन कोवळी पालवी फुटते, पिके कापणीला येतात आणि ऋतुचक्राचे एक आवर्तन पूर्ण होते. त्या नवचैतन्याचे स्वागत करणारा सण म्हणजे गुढीपाडवा. महाराष्ट्रातल्या सातवाहन कुळातल्या एका राजाच्या नावाने सुरु केलेल्या शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. सातवाहन राजाने शक-क्षत्रप राजांचा पराभव केला त्या सालापासून ही कालगणना सुरू केली गेली, म्हणूनच ह्या कालमापन पद्धतीला शक संवत्सर असेही म्हटले जाते.महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारतात. गुढी म्हणजे ब्रह्मध्वज, पावित्र्य आणि समृद्धीचे प्रतीक. काठीवर उपडा ठेवलेला चांदीचा किंवा तांब्याचा गडू, येणाऱ्या वर्षाचे प्रतीक म्हणून त्या खाली पिवळ्या किंवा लाल रंगाचे रेशमी वस्त्र, गत वर्षातल्या कडू-गोड प्रसंगांची आठवण म्हणून साखरेच्या गाठींचा हार आणि कडुनिंबाची डहाळी आणि नववर्षाच्या शुभागमनाचे प्रतीक म्हणून आंब्याचे पान ठेवून गुढी उभारली जाते. गुढी उंचावर लावून, गंध, अक्षता, फुले वगैरे वाहून गुढीची पूजा करतात. निरांजन लावून गुढीला दिवे दाखवले जातात आणि दिवसभर गुढी तशीच ठेवून संध्याकाळी सूर्यास्ताचे वेळी परत हळद-कुंकू, फुले वाहून व अक्षता टाकून गुढी उतरवतात. गुढीपाडव्याचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. पाडव्याच्या दिवशी कुठलीही वेळ शुभ असते असे मानले जाते म्हणून गाडी, घर वगैरे नवीन गोष्टींची खरेदी, नवीन व्यवसायाचा प्रारंभ, नव्या उपक्रमांची सुरवात करण्यासाठी पाडव्याची निवड केली जाते. असे मानले जाते की चैत्र शुद्ध प्रतिपदा ह्या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. सर्व दिवसांत पहिले पद पटकावणारा हा दिवस म्हणून प्रतिपदा हे नाव रूढ झाले.गुढी उभारण्याचे उल्लेख मराठी काव्यात पार बाराव्या शतकापासून येतात त्यावरून दिसून येते की महाराष्ट्रात पाडव्याची गुढी उभारण्याची परंपरा किती जुनी आहे. तेराव्या शतकात लिहिले गेलेल्या लिळाचरित्रात 'मग तेंही सडासंमार्जन करवीलें : चौक रंगमाळीका भरवीलीया : गुढी उभविली' असा उल्लेख आहे. अगदी श्री ज्ञानेश्वरांपासून ते एकनाथांपर्यंतच्या संतकवींनी आपल्या काव्यात गुढी उभारणे हा शब्दप्रयोग वारंवार वापरलेला आहे. विजयाची, हर्षाची गुढी उभारणे, रणांगणी गुढी उभारणे ह्या उल्लेखांवरून स्पष्ट दिसून येते की गुढी उभारण्याची परंपरा आपल्याकडे किती प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे.महाराष्ट्रातल्या काही भागात गुढीपाडव्याच्या दिवसापासून महिनाभर घराच्या अंगणात चैत्रांगण काढले जाते. चैत्रांगण म्हणजे तुळशीच्या आसपास जमीन सारवून चैत्रगौरीच्या आगमनानिमित्त काढलेली सुबक रांगोळी. चैत्रांगणाच्या रांगोळीत चैत्रगौरीचा झोपाळा, गणपती, समई, कमळ, कासव, शंख, सूर्य, चंद्र, गोपद्म, सर्प, त्रिशूल, स्वस्तिक इत्यादी हिंदू शुभचिन्हे काढली जातात. शेणाने सारवलेल्या जमिनीवर किंवा काळसर शहाबादी फरशीवर तांदळाच्या पीठाने काढलेल्या ह्या शुभ्र रांगोळ्या घराला वेगळीच शोभा आणतात.देशातल्या काही भागात चैत्र शुद्ध प्रतिपदा युगादी किंवा उगादी ह्या नावाने साजरी केली जाते. नव्या युगाची सुरवात म्हणजे युगादी. कर्नाटक, आंध्र आणि तेलंगाणा ह्या राज्यांमध्ये युगादी मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. महाराष्ट्रात ह्या दिवशी ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर आणि कडुनिंबाची कोवळी पाने एकत्र वाटून बनवलेली चटणी खातात तर आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगाणा ह्या राज्यांमध्ये कोवळी कैरी, गूळ, मिरी, कडुनिंब आणि मुगाची डाळ एकत्र वाटून केलेली पचडी खाल्ली जाते. कडू, गोड, तिखट, आंबट, तुरट ह्या सर्व चवींनी युक्त असलेली ही पचडी म्हणजे जीवनाचेच प्रतीक आहे. युगादीच्या दिवशी सकाळी स्नान करून नवीन कपडे घातले जातात, घरापुढे रांगोळी काढली जाते आणि खास पक्वान्ने बनवली जातात.गोव्यातही पाडवा हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. गुढी पाडव्याला गोव्यात 'संवसार पाडवो' म्हणजे संवत्सर पाडवा असे म्हणतात. ह्या दिवशी नवीन लग्न झालेल्या मुलींची पासडी होते. नवी साडी नेसवून व हळद-कुंकू वाहून तिची ओटी भरली जाते आणि घराघरात भाजलेली मूग डाळ आणि गूळ एकत्र करून बनवलेली घट्ट खीर खाल्ली जाते. ह्या खिरीला कोकणीत कण्ण असे नाव आहे. केवळ पश्चिम व दक्षिण भारतातच नव्हे, तर देशभरात चैत्र शुद्ध प्रतिपदेला हिंदू नववर्षाचा प्रारंभ होतो. सिंधी लोक चेटी चंड, म्हणजे चैत्री चंद्र ह्या नावाने ह्या दिवशी नववर्ष साजरे करतात. सिंधी लोकांची इष्ट देवता झुलेलाल, त्याचा जन्मदिवस ह्या दिवशी असतो असा सिंधी लोकांचा विश्वास आहे. मिर्कशहा नावाचा सिंधचा मुसलमान राजा हिंदूंवर फार जुलूम करायचा म्हणून सिंधच्या जनतेने वरुणाची प्रार्थना केली आणि देवांनी उदेरोलाल ह्या नावाने ईश्वरी अंश पृथ्वीवर पाठवला. ह्या उदेरोलालने पुढे मिर्कशहाचा पराभव करून हिंदूंना त्यांचे हक्क परत मिळवून दिले, म्हणून त्याची झुलेलाल ह्या नावाने पूजा केली जाते. ह्या दिवशी सिंधी लोक बहाराना साहिब ह्या नावाने पूजेचे तबक बनवतात व पाणवठ्यावर जाऊन झुलेलालची पूजा करतात.भारताच्या ईशान्येला असलेल्या मणिपूर ह्या राज्यात चैत्र शुद्ध प्रतिपदा साजीबू नोंगमा पानबा ह्या नावाने साजरी केली जाते. ह्या दिवशी मणिपुरी हिंदू घराघरामध्ये खास नैवेद्य बनवला जातो. विशेष म्हणजे हा नैवेद्य घरातले पुरुष बनवतात. हा नैवेद्य मग पुढच्या आणि मागच्या दारात विशिष्ट ठिकाणी विधिवत पूजा करून ठेवला जातो. त्यानंतर घराघरात गोडाधोडाचे जेवण होते. केवळ भारतातच नाही, तर जिथे जिथे म्हणून हिंदू संस्कृतीच्या पाऊलखुणा उमटलेल्या आहेत तिथे तिथे चैत्र शुद्ध प्रतिपदेला विशेष महत्व आहे. अगदी आजही इंडोनेशियातल्या बाली ह्या हिंदू बेटावर आणि कंबोडियामध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदेला नववर्ष साजरे केले जाते. न्येपी ह्या नावाने गुढीपाडव्याचा हा सण ह्या देशांमधून साजरा केला जातो. भारताचे सांस्कृतिक संचित किती खोलवर रूजलेले आहे हे पाडव्याच्या ह्या सणावरून आपल्याला सहजपणे कळून येते. महाएमटीबीच्या सर्व वाचकांना पाडव्याच्या आणि येणाऱ्या वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!


- शेफाली वैद्य