तिमिरातूनी तेजाकडे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
लहानपणीच एवढा जीवघेणा प्रसंग बेतलेला असताना आणि आयुष्यभराचं दुखणं वाट्याला आलेलं असताना मनोधैर्य टिकवून उत्साहाने अंगभूत गुणांच्या आविष्करणाला मुक्त वाव देणारी अथर्वसारखी ‘माणसं’ दुर्मीळच....
 
माणूस आपल्या कामात किती उंच भरारी घेतो, हे जितकं महत्त्वाचं तितकंच खाली आपटल्यानंतर तो किती उंच उसळी घेतो हेही महत्त्वाचं. काही माणसं जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरी त्यांना पुरून उरतात. आपल्या उत्साहाचा, महत्त्वाकांक्षेचा दीप ते विझू देत नाहीत. दापोलीचा अथर्व सोमण हा २१ वर्षांचा युवक संकटांना न जुमानता अंगातल्या नानाविध गुणांचं आविष्करण करत यशस्वी वाटचाल करतोय. फोटोग्राफी, तबलावादन, पेटीवादन, कीर्तन, वक्तृत्व, बुद्धिबळ, पोहणे अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये अथर्वने स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे, तेही लहानपणी अपघातात एक पाय गमावलेला असताना! रत्नागिरी जिल्ह्यातलं दापोली हे अथर्वचं गाव. आई शिक्षिका आणि वडिलांचा स्वत:चा व्यवसाय आहे. आठवीत असताना अथर्व सायकलवरून तबल्याच्या क्लासला जात असताना त्याला अपघात झाला. त्याच्या एका पायाला गँगरीन झाले आणि तो पाय काढून टाकावा लागला. या भीषण अपघातातून तो सावरला. कुबड्या घेऊन एका पायावर आयुष्य काढणं भाग होतं. पण अथर्वची तेव्हापासून आजपर्यंतची प्रगती ही धडधाकट माणसांनाही लाजवेल अशी आहे.
 
२०१० साली त्याच्या हातात कॅमेरा मिळाला आणि त्याने फोटोग्राफी करायला सुरुवात केली. पक्षीनिरीक्षण हा अथर्वचा आवडता छंद. आज दापोली तालुक्यातल्या सुमारे २१० प्रकारच्या पक्ष्यांच्या छायाचित्रांचा संग्रह त्याच्याकडे आहे. ‘नॅशनल जिओग्राफिक’ च्या ‘युवर शॉट’ मासिकासाठी त्याचे फोटो निवडले गेले. या मासिकासाठी तीन वर्षे त्याने काम केलं. त्यानंतर ‘इंडो-जर्मन बायोडायव्हर्सिटी प्रोजेक्ट’ या प्रकल्पामध्ये ‘ग्रेट हॉर्नबिल’ या पक्ष्याचे फोटो आणि माहिती पुरवण्याचं काम त्याने एक वर्ष केलं. कोकणातल्या सुप्रसिद्ध ‘सह्याद्री निसर्गमित्र’ संस्थेकडूनही त्याला पक्षीनिरीक्षणाबद्दल गौरवण्यात आलं आहे. पुढच्याच आठवड्यात पुण्यात होणार्‍या राजा रविवर्मा आर्ट गॅलरीच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनात अथर्वच्या छायचित्रांची निवड झाली आहे. सध्या तो व्यावसायिक फोटोग्राफी करतो. पेटी, तबला आणि गाणं या तिन्ही कला अवगत केलेला अथर्व हा ‘थ्री इन वन’ कलाकार आहे. इयत्ता दुसरीत असल्यापासून अथर्व तबला शिकतो आहे आणि विशारद प्रथमपर्यंत त्याचं तबल्याचं शिक्षण झालं आहे. गेली आठ वर्षं तो हार्मोनियम शिकतोय. विविध कार्यक्रमांमध्ये तो हार्मोनियमची साथ करतो आणि सोलो वादनाचे कार्यक्रमही करतो. दिल्ली म्युझिक फेस्टिव्हलच्या कार्यक्रमामध्येही अथर्वने हार्मोनियमची साथ केली आहे. संगीताच्या जोडीला वक्तृत्वकलाही चांगली असल्याने अथर्व कीर्तनही करतो. महाराष्ट्रातल्या ‘रानडे करंडक’सारख्या अनेक नामांकित वक्तृत्व स्पर्धांमध्ये त्याने बक्षिसं मिळवली आहेत. क्रीडाक्षेत्रही अथर्वने सोडलेलं नाही. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या कॅरम स्पर्धांमध्ये तो सहभाग घेतो आणि त्याला जिल्हा स्तरावर अनेकदा पदकं मिळाली आहेत.
 
बुद्धीबळ स्पर्धांमध्ये त्याने राज्यस्तरावर चॅम्पियनशिप मिळवली आहे. एक पाय नसूनही अथर्व पोहण्यात पारंगत आहे. ‘नॅशनल पॅरालिम्पिक स्विमिंग चॅम्पियनशिप’ या अपंगांसाठीच्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याने सहभाग नोंदवला आहे. ‘‘माझा एक पाय नसला म्हणून काय बिघडलं? ’’ असं अथर्व शस्त्रक्रियेच्या वेळी म्हणाला होता. आज त्याने ते सिद्ध करून दाखवलं आहे. एका पायावर तो स्कूटर चालवतो आणि फोर व्हीलरही चालवतो. एक व्यवसाय म्हणून त्याने दापोलीत स्वत:चं खासगी इ-सेवा केंद्र सुरू केलं आहे पण भावी आयुष्यात त्याला फोटोग्राफीमध्येच करियर करयचं आहे. फोटोग्राफीमध्ये ‘मास्टर’ व्हायचं आहे. मोठी माणसं मानसिकदृष्ट्या धैर्यवान असतात पण लहानपणीच एवढा जीवघेणा प्रसंग बेतलेला असताना आणि आयुष्यभराचं दुखणं वाट्याला आलेलं असताना मनोधैर्य टिकवून तितक्याच उत्साहाने अंगभूत गुणांच्या आविष्करणाला मुक्त वाव देणारी अथर्वसारखी ‘माणसं’ दुर्मीळच...
 
 
 
- हर्षद तुळपुळे
 
@@AUTHORINFO_V1@@