सभ्य आणि सुसंस्कृत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

पर्यटकांचा एक गट आणि त्यांचा एक मार्गदर्शक अशी मंडळी लंडनच्या ब्रिटिश म्युझियममध्ये फिरत होती. एके ठिकाणी समोरच्या काचेमागची कवटी दाखवत मार्गदर्शक म्हणाला, ’‘ही पाहा ऑलिव्हर क्रॉमवेलची कवटी.’’ क्रॉमवेल हा १७ व्या शतकात होऊन गेला. त्याने इंग्लंडचा राजा चार्ल्स पहिला याचा शिरच्छेद केला. पुढे तो हुकूमशहा बनला. ’’कवटी निरखून पाहणार्‍यांपैकी एक पर्यटक म्हणाला, ’’इंग्लंडच्या इतिहासातली क्रॉमवेल ही मोठी व्यक्ती होती. त्या मानाने त्याची कवटी लहान वाटते.’’ व्यावसायिक मार्गदर्शकालाच शोभून दिसेल असा तुच्छ कटाक्ष त्याच्याकडे फेकत मार्गदर्शक म्हणाला, ’’साहजिक आहे. ती त्याची लहानपणची कवटी आहे.’’


हा रचलेला विनोदी किस्सा नसून खरोखरच घडलेला प्रसंग असण्याची शक्यता आहे. कारण, १९६० सालापर्यंत ऑलिव्हर क्रॉमवेलचं धडावेगळे मुंडकं खरोखरच ब्रिटिश म्युझियममध्ये होते. त्या वर्षी ते गुप्तपणे तिथून हलवून केंब्रिज विद्यापीठातल्या सिडने-ससेक्स कॉलेजच्या चर्चमध्ये पुरण्यात आलं. इंग्रज लोक स्वतः ला मोठे सभ्य आणि सुसंस्कृत समजतात आणि अर्थातच इतरांना असभ्य, रानटी, अडाणी समजतात. वास्तवात, ते किती क्रूर बनू शकतात याचा अनुभव आपण भारतीय लोकांनी घेतलेला आहे. इंग्रजी राजवटी विरुद्ध युद्ध पुकारलेल्या भारतीय स्वातंत्र्ययोद्ध्यांना चिरडून टाकण्यासाठी मेजर जनरल जेम्स नील याने अत्यंत अमानुष उपाय योजले. अवध म्हणजे अयोध्या प्रांतात बंडखोर शिपायांसह असंख्य नागरिकांना फासावर लटकविण्यात आलं. त्यांच्या मृतदेहांना इंग्रजी आठ व नऊ या आकड्यांचा आकार देऊन झाडावर लटकवून ठेवण्यात आलं. अनेक नागरिकांना इंग्रजी सैन्याचे ‘पायखाने’ म्हणजे संडास जिभेने चाटून साफ करण्याची शिक्षा फर्मावण्यात आली. अनेकांना तोफेच्या तोंडी देण्यात आलं.


एका दृष्टीने यात नवल काहीच नाही, कारण इंग्रज हे काही हिंदू नव्हेत. ‘मरणान्तानि वैराणि’- मृत्यूबरोबरच वैर संपलं, असं म्हणून पापात्म्या रावणाच्या मृतदेहावरही संस्कारपूर्वक अंत्येष्टी करणार्‍या प्रभू रामचंद्राचे काही ते वारसदार नव्हेत. पण, ऑलिव्हर क्रॉमवेलच्या मृतदेहाची त्यांनी जी विटंबना केली, ती पाहून आश्चर्य वाटतं. कारण, क्रॉमवेल भारतीय नव्हता. तोही इंग्रजच होता. सन १६५८ साली ज्या क्रॉमवेलला मोठ्या थाटाने आणि सन्मानाने लंडनच्या प्रसिद्ध दफनभूमीत पुरण्यात आलं होतं, त्याला पुढच्याच वर्षी तिथून खणून काढण्यात आलं. मग तो मृतदेह ’व्हाईटहॉल’ म्हणजे राजाच्या निवासस्थानासमोर कित्येक दिवस झाडावर लटकत ठेवण्यात आला. नंतर त्याचं मुंडकं छाटून ते एका भाल्यावर खोचून व्हाईटहॉलसमोरच ठेवण्यात आलं. त्याच्या कपाळात एक मोठा खिळा ठोकण्यात आला. हे सगळं कशासाठी, तर लोकांना दहशत बसण्यासाठी. जर कुणी राजाविरुद्ध बंड पुकाराल आणि राजाला ठार माराल, तर ही अशी स्थिती होईल, हे लोकांना कळावं म्हणून हा खटाटोप आणि दुसरं म्हणजे जिवंतपणी नाही, तर निदान मेल्यावर तरी क्रॉमवेलवर सूड उगवण्याचं समाधान! हवापाण्याने खराब झालेलं, आक्रसलेलं, कृमिकीटकांनी खाऊन विदूप केलेलं ते मुंडकं बराच काळ व्हाईटहॉलसमोर तसंच भाल्याच्या फाळावर खोचलेल्या स्थितीत होतं. एका जबरदस्त वादळात ते उडून कुठेतरी जाऊन पडलं. व्हाईटहॉलच्या पहार्‍यावरच्या एका सैनिकाला ते सापडलं. त्याने ते गुपचूप स्वत: च्या घरी नेऊन लपवून ठेवलं. १८९९ साली क्रॉमवेलचं राजकीय पुनर्वसन करण्यात आलं. त्याचा पुतळा व्हाईटहॉल राजवाड्याजवळच उभारण्यात आला. इंग्रजांना आपल्या लोकशाहीची डिंग मारायला नवा विषय मिळाला. ते मोठ्या प्रौढीने सांगू लागले की, आमची लोकशाही किती उदार आहे पाहा. व्हाईटहॉल राजवाड्याच्या एका टोकाला राजा चार्ल्स पहिला याचा पुतळा आहे तर दुसर्‍या टोकाला त्या राजाला ठार मारणार्‍या ऑलिव्हर क्रॉमवेलचा पुतळा आहे.


बहुधा याचवेळेस क्रॉमवेलचं ते कपाळात खिळा ठोकलेलं मुंडकं त्या सैनिकाच्या वंशजांकडून मिळवण्यात आलं नि ब्रिटिश म्युझियममध्ये मांडण्यात आलं. मात्र, १९६० साली ते तिथून हलवून केंब्रिजमधल्या सिडने-ससेक्स चर्चमध्ये दफन करण्यात आलं. कारण क्रॉमवेल या महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. आपली लोकशाही जेमतेम ७० वर्षांची आहे. पण, आपले राजकारणी कसे नालायक आणि भ्रष्ट आहेत, याबद्दल आपल्याला खंत वाटते. याला मूळ कारण म्हणजे आपल्या जनतेत लोकशाही मूल्यं रुजलेली नाहीत, असंही आपण म्हणतो. पण, आधुनिक लोकशाहीची जननी जे इंग्लंड, तिथली लोकशाहीची वाटचाल पाहिली तर भारतातली लोकशाही खूप बरी म्हणण्याची वेळ येते. १५ जून १२१५ या दिवशी इंग्लंडमध्ये रनीमीड या ठिकाणी राजा जॉन आणि लोकांचे प्रतिनिधी यांच्यात एक करार झाला. हाच तो सुप्रसिद्ध ’मॅग्ना कार्टा करार.’ या कराराने लोकांना राजकीय आणि नागरी स्वातंत्र्याची हमी देण्यात आली. म्हणजेच, पार्लमेंट किंवा राज्यसभा म्हणजेच संसदेला विचारल्याशिवाय कोणताही निर्णय राजा स्वत:च्या मर्जीनुसार घेऊ शकणार नाही, असं ठरलं. राजे लोकांना हे मान्य होतं असं नाही. नाइलाज म्हणून त्यांना हे कबूल करावं लागलं होतं. त्यामुळे राजा पार्लमेंटवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असे आणि पार्लमेंट त्याला तसं करू न देण्याच्या प्रयत्नात असे. हे वर्षानुवर्षे, नव्हे शतकानुशतकं चाललं होतं. इ. स. १६२५ साली म्हणजे ’मॅग्ना कार्टा करार’ होऊन ४०० वर्षे उलटल्यावर राजा पहिला चार्ल्स हा गादीवर आला. वरकरणी इतर राजकीय कारणांवरून, पण खरं म्हणजे राजा मोठा की पार्लमेंट मोठं, या प्रश्नावरून चार्ल्सचं सैन्य आणि पार्लमेंटचं सैन्य यांच्यात चक्क लढाया झाल्या. त्यात राजाचं सैन्य जिंकलं.


इंग्लंडमधल्या या राजकीय भानगडींना धार्मिक, सांप्रदायिक धारही होतीच. राजा आठवा हेन्री याने पोपचं वर्चस्व झुगारून, कॅथलिक संप्रदाय नाकारून, इंग्लंडचं स्वतंत्र अँग्लिकन चर्च उभं केलं. तो स्वतः च या संप्रदायाचा प्रमुख बनला. म्हणजे राजकीय आणि धार्मिक सत्ता त्याने एकाच वेळी आपल्या हातात घेतली. तेव्हापासून ब्रिटन हा देश प्रोटेस्टंट पंथी ख्रिश्चन देश आहे, निधर्मी नव्हे. आणि आजही तिथला राजा किंवा राणी ही राजकीय प्रमुख व धार्मिक प्रमुखही असतात.


पण, या प्रोटेस्टंट पंथातही पुढे एपिस्कोपेलियन, प्रेस्बिटेरियन, प्युरिटन इत्यादी उपपंथ निघाले. ते एकमेकांचा भरपूर द्वेष करीत आणि एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नसत. ऑलिव्हर क्रॉमवेल हो प्युरिटन पंथाचा होता. तो मोठा जमीनदार होता. शिवाय पहिल्या चार्ल्सच्या या कालखंडात तो पार्लमेंटचा सभासदही होता. राजाच्या सैन्यासमोर पार्लमेंटचं सैन्य मार का खातं, याचा त्याने बारकाईने अभ्यास केला, तेव्हा त्याला असं आढळलं की, राजाचं सैन्य हे व्यावसायिक, प्रशिक्षित सैन्य आहे, तर पार्लमेंटचं सैन्य हे शेतकरी व इतर व्यावसायिक लोकांचं, फावल्या वेळात शिपाईगिरी करणारं सैन्य आहे. त्यांना लढाईचं पद्धतशीर शिक्षण नाही. क्रॉमवेलने ताबडतोब स्वतः चं असं प्रशिक्षित सैन्य उभं करण्याची जबाबदारी घेतली. पार्लमेंटचं असं सैन्य सज्ज झाल्यावर त्याने राजाशी सन १६४८ साली प्रेस्टन इथे लढाई केली. या लढाईत क्रॉमवेल जिंकला. राजा चार्ल्स पहिला याला पकडून त्याच्यावर खटला चालविण्यात आला. देशाला घातक अशी धोरणे राबविल्याबद्दल त्याला ‘देशद्रोही’ म्हणून वधदंड फर्मावण्यात आला नि त्याचं मुंडकं उडवण्यात आलं. यानंतर क्रॉमवेलने आयर्लंड, स्कॉटलंड इथली बंड मोडून पार्लमेंटची सत्ता निर्वेध केली. त्याचप्रमाणे इंग्लंडच्या सागरी सत्तेला आव्हान देणार्‍या डच आरमाराचा निर्णायक पराभव करून इंग्लंड हीच सर्वश्रेष्ठ सागरी सत्ता असल्याचं ठासून सिद्ध केलं. पण, ज्या पार्लमेंटसाठी म्हणजे लोकांसाठी क्रॉमवेलने हे सगळं केलं, ते लोक काही धड कारभार करीनात. त्यांनी क्रॉमवेललाच राजा बनण्याची सूचना केली. पण, क्रॉमवेलला लोकशाही हवी होती. त्याने राजमुकुट नाकारला. प्युरिटन पंथात साधी, राहणी, उच्च विचारसरणी व धार्मिक वर्तनाला फार महत्त्व आहे. क्रॉमवेल वैयक्तिक जीवनात तसाच होता. इंग्लंडमध्ये सर्वांनी प्युरिटन पंथ स्वीकारला आणि पार्लमेंट हे संतांचं राज्य व्हावं, असं त्याला मनापासून वाटत असे. पण, लोकांना तसं नको होतं. शेवटी देशाचा कारभार नीट चालावा म्हणून क्रॉमवेलने देशाचे अकरा सुभे बनवून त्यावर अकरा सुभेदार नेमले व तो स्वतः संरक्षक म्हणजे ’लॉर्ड प्रोटेक्टर’ बनला. परंतु, या सुभेदारांनी मनमानी सुरू केली. त्यामुळे क्रॉमवेलची राजवट अप्रिय होऊ लागली. क्रॉमवेल विरुद्ध कटकारस्थानं सुरू झाली. जिवाच्या भीतीने क्रॉमवेल कायम चिलखत घालून वावरू लागला. अखेर सन १६५८ साली तो मरण पावला. त्याचा एक सेनापती जनरल अंक याने पहिल्या चार्ल्सचा मुलगा दुसरा चार्ल्स याला राजमुकुट घेण्याची विनंती केली. पहिल्या चार्ल्सचा १६४९ साली शिरच्छेद झाल्यावर त्याचा हा मुलगा फ्रान्समध्ये विजनवासात काळ कंठीत होता. ध्यानीमनी नसताना राजेपद त्याच्याकडे चालून आलं. त्याने ते अर्थातच आनंदाने स्वीकारले. हाच तो दुसरा चार्ल्स, ज्याला पोर्तुगालच्या राजाने आपली बहीण दिली नि तिच्याबरोबर आंदण म्हणून मुंबई बेट दिलं. दुसरा चार्ल्स आळशी, रंगेल आणि बाहेरख्याली होता. क्रॉमवेलच्या प्युरिटन राजवटीत सर्वसामान्य माणसाला दारू, जुगार, बाकी रंगढंग करायला मिळाले नव्हते. आता राजाच रंगेल असल्यामुळे लोकांनीही रंगढंग उधळण्याचा अनुशेष भरून काढला.


दुसर्‍या चार्ल्सला क्रॉमवेलला रणांगणात कधीच जिंकता आलं नव्हतं. तो राग आणि आपल्या बापाच्या मृत्यूचा राग, हे शमवण्यासाठी त्याने क्रॉमवेलचं प्रेत वेस्टमिन्स्टर ऍबेमधून खणून काढलं. कित्येक दिवस ते व्हाईटहॉलसमोर झाडाला लोंबकळत ठेवलं. मग त्याचं मुंडकं छाटून ते भाल्यावर खोचून ठेवलं.


आणि तरीही म्हणे हे इंग्रज सभ्य, सुसंस्कृत, लोकशाही मूल्यांचं जतन करणारे! त्यांनी स्वतःला काहीही म्हणवावं, आमचा आक्षेप नाही. फक्त इतरांना रानटी, अडाणी, मागास म्हणू नये.


- मल्हार कृष्ण गोखले
@@AUTHORINFO_V1@@