सेवाव्रताचा आधुनिक ’वानप्रस्थ’
 महा एमटीबी  16-Mar-2018


उपेक्षित वस्त्यांमध्ये सातत्याने दीर्घकाळ केलेल्या कामामुळे समाजामध्ये सुपरिचित असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते एकदा एका मजेदार घटनेविषयी मला सांगत होते. एका संस्थाचालकांबरोबर त्यांचा कुठल्यातरी निमित्ताने संवाद झाला. विषय होता संघप्रणित सेवाकार्यांचा. स्वत: करत असलेल्या कामाविषयी नैराश्य प्रकट करीत हे संस्थाचालक बोलता बोलता म्हणाले, ’तुमचे बरे असते. कारण आवाज दिल्यावर अगदी फ़ुकट काम करायलादेखील कार्यकर्त्यांची फ़ौज तुमच्याकडे सहज जमा होते. आमच्याकडे मात्र हजारो रुपये पगार देऊनही कामेच होत नाहीत.’ ही घटना त्यांनी मिश्कीलपणे मला सांगितली आणि मलाही त्यावेळी जरासे हसु आलेच. पण या घटनेने मला अंतर्मुख केले. स्वत: ची कुठलीही व्यक्तिगत अपेक्षा न ठेवता आपल्या आयुष्यातील काही काळ हा समाजकार्यासाठी देण्याची एक विलक्षण परंपरा संघामध्ये निरंतर चालत आलेली आहे, हे संघाचे कट्टर विरोधकही मान्य करतात. आपापल्या रुचि-प्रकृतीप्रमाणे सामाजिक कामासाठी दिल्या जाणाऱ्या या वेळांसाठीही शेकडो पर्याय प्रत्यक्ष संघाचे काम आणि सेवाप्रकल्पांच्या माध्यमातून उपलब्ध असतात आणि यातील एखाद्या कामात स्वत: ला झोकून देणारे शेकडो कार्यकर्तेही संघाच्या रचनेतून तयार झालेले आहेत. यात आपल्या शिक्षणानंतर आयुष्यातील काही वर्षे किंवा संपूर्ण जीवन संघकार्यासाठी देऊ करणारे प्रचारक जसे आहेत तसेच आपली संसारिक कर्तव्ये पूर्ण केल्यानंतर निवृत्तीनंतरचा काळ एखाद्या सामाजिक कार्यासाठी निरपेक्षपणे देऊ करणाराही एक मोठा वर्ग आज समाजात आहे. अशा कार्यकर्त्यांना ’सेवाव्रती’ अशी संज्ञा आहे.


सामाजिक जीवनात अशा काही सेवाव्रती मंडळींशी माझी ओळख झालेली असली तरी सेवाव्रतींचे दैनंदिन काम मला प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाली ती जनकल्याण रक्तपेढीमध्ये आल्यानंतरच. रक्तपेढीत आज काम करत असलेल्या आणि यापूर्वी काम करुन गेलेल्या सर्व सेवाव्रतींना रक्तपेढीचे कर्मचारी ’काका’ याच नावाने संबोधतात. या संबोधनामुळेही आपोआपच वातावरणात एक प्रकारचे घरपण येते. पण अर्थात असे असले तरीही या सेवाव्रतींची रक्तपेढीशी असलेली गुंतवणूक केवळ घरगुती प्रकारची नाही तर ’आपल्या अनुभवाचा, ज्ञानाचा पुरेपूर विनियोग रक्तपेढीसाठी व्हावा’ यासाठी लागणारा एक व्यावसायिक (professional) दृष्टिकोनही निश्चितपणे या मंडळींकडे आहे. आपण देत असलेल्या वेळातून काहीतरी दृश्य सकारात्मक परिणाम रक्तपेढीच्या कामासाठी मिळाले पाहिजेत अशी या सेवाव्रतींची तळमळ इथे पहायला मिळते. एकीकडे आपले ठरलेले काम कुठल्याही मोबदल्याशिवाय करायचे आणि दुसऱ्या बाजुला या कामाचे उत्तरदायित्वदेखील पूर्णत: स्वीकारायचे असे सध्याच्या काळात अव्यवहार्य ठरणारे काम हा सेवाव्रती-वर्ग इथे सातत्याने करत आलेला आहे.
 
 
 
रक्तपेढीत माझा पहिला प्रवेश झाल्यानंतर जशी अन्य कर्मचाऱ्यांबरोबर माझी ओळख करुन देण्यात आली तशीच या सेवाव्रतींशीदेखील माझी ओळख झाली. यानंतर नित्य काम करत असताना जेव्हा या सेवाव्रती-वर्गाचा - म्हणजेच मराठे काका (श्री. दौलतराव मराठे), कुलकर्णी काका (श्री. रवींद्र कुलकर्णी) आणि खांडेकर काका (श्री. अशोक खांडेकर) यांचा – दिनक्रम मी जवळून पाहिला तेव्हा मला आश्चर्य वाटले. कारण ’सेवाव्रती’ म्हणून कुठल्या विशेष सवलती घेणे तर सोडाच पण दिवसभरात कामासाठी दिलेला पुरेपूर वेळ, सातत्याने कामात राहण्याची वृत्ती, किरकोळ कामांसाठी मदतनीसांची वाट न पहाता स्वत: च कामाला हात घालण्याची सवय, रक्तपेढी व्यवस्थापनाप्रती असणाऱ्या उत्तरदायित्वाची सदोदित जाण आणि आपल्या बुद्धि-कौशल्यांचा ’हातचे राखून’ न ठेवता केला जाणारा वापर या सेवाव्रतींमध्ये असलेल्या अंगभूत गुणांमुळे इथल्या अन्य कर्मचाऱ्यांनाच न्यूनगंड येत असेल की काय अशी शंका मला आली. अर्थात पुढे ही शंकाही फ़ोल ठरली. कारण इतके सर्व असूनही या सर्वांची कर्मचाऱ्यांशी असलेली जवळीकही मला अनुभवता आली. ही जवळीकही केवळ वरवरची नाही तर कर्मचाऱ्यांना आपल्या वैयक्तिक अडचणीही मोकळेपणाने सांगाव्याशा वाटण्याइतपत हा स्नेह दोन्ही बाजुंनी जपला गेलेला आहे. घरातील ज्येष्ठांचा आपल्या कुटुंबीयांशी जसा संवाद असतो त्याच प्रकारचा संवाद या काका मंडळींचा बहुतेक सर्वच कर्मचाऱ्यांशी आहे. त्यामुळे प्रसंगी योग्य ती सुधारणा होण्यासाठी आपलेपणाने रागावणे आणि दुसऱ्या बाजुला भरभरुन प्रेमही करणे या दोन्ही गोष्टी स्वाभाविकपणे घडतात. या लोकांच्या कुठल्याही कृतीमागे थोडादेखील स्वार्थ असण्याची शक्यता नाही, याची खात्री असल्याने रक्तपेढीची सेवा आणखी उत्तम होण्यासाठी जे जे आवश्यक ते ते सर्व करत राहण्याचा एक अलिखित अधिकार या सर्वांना त्यांच्या कामातून आपोआपच प्राप्त झाला आहे.
 
 
 
मराठे काका तर रक्तपेढीच्या स्थापनेपासून रक्तपेढीशी संबंधित आहेत. सुरुवातीच्या काळात नवीन रक्तदाते आणि रक्तदान-शिबिरे मिळवण्यासाठी आणि ती पुढे टिकवून ठेवण्यासाठी मराठेकाकांनी आश्चर्यवत पायपीट केलेली आहे. त्यामुळेच आजही पुणे परिसरातील रक्तदानाच्या क्षेत्रात मराठे काकांना ओळखत नाही असा माणूस विरळाच. स्वत: नोकरीत असताना आणि निवृत्ती पत्करल्यानंतरही काकांचे प्रथम प्राधान्य राहिले ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाला आणि रक्तपेढीची स्थापना झाल्यानंतर रक्तपेढीलाच. राजकीय पक्ष, शैक्षणिक संस्था, रुग्णालये, बॅंका, सामाजिक संस्था, हौसिंग सोसायट्या अशा सर्व क्षेत्रांत मराठे काकांचा मुक्त वावर आहे. अशा सर्व ठिकाणी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत बहुतेक सर्व मंडळींना मराठे काका परिचित आहेत. साधा झब्बा – पायजमा, खांद्यावर सॅक आणि डोक्यावर उन्हाची टोपी इतकाच जामानिमा सोबत घेऊन सकाळपासून एक तर रक्तदान शिबिरात किंवा ते नसल्यास संबंधित भेटीगाठींसाठी पुण्याच्या बहुतेक सर्व भागांमध्ये बसमधून किंवा चक्क पायी मराठे काकांची भ्रमंती चाललेली असते. आज वयाची ऐंशी वर्षे उलटुन गेल्यानंतरही या दिनक्रमात फ़ारसा बदल नाही, किंबहुना हे काम हीच त्यांची शक्ती बनलेली आहे.
 
 
 
कुलकर्णी काकांचेही कूळ संघाचेच. मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या कुलकर्णी काकांनी टाटा मोटर्समधून मोठ्या पदावरुन निवृत्त झाल्यानंतर बारा वर्षांपूर्वी रक्तपेढीच्या कामाशी स्वत: ला जोडून घेतले आणि निवृत्तीनंतरची ही सेकंड इनिंगही ते विलक्षण क्षमतेने पार पाडत आहेत. स्वत: यंत्र अभियंता असल्याने त्या क्षेत्रातील त्यांच्या ज्ञानाचा उपयोग रक्तपेढीला निश्चितच होतो. त्यांची नजर ही खास अभियंत्याची नजर आहे. रक्तपेढीच्या वाहनांची देखभाल असो, पाण्याच्या मोटारचे व्यवस्थापन असो, विद्यूत विभागाशी संबंधित काही काम असो अथवा बांधकामाचा विषय असो – कुलकर्णी काकांची ही अनुभवी नजर नेहमी नवी दृष्टी देणारी असते. सातत्याने नवेपणाचा ध्यास हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे एक खास वैशिष्ट्य. रक्तपेढीतील सर्व तांत्रिक प्रक्रिया त्यांनी स्वत: उत्तम पद्धतीने समजून घेतलेल्या आहेत आणि याचा उपयोग अनेक नवनवे रक्तदाते आणि हितचिंतक रक्तपेढीला जोडण्यासाठी ते करत आलेले आहेत. रक्तपेढीच्या अंतर्गत रचनेपासून ते रक्तदात्यांना दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रांपर्यंत सर्व बाबींमध्ये नाविन्य, आधुनिकता कशी आणता येईल याचा केवळ विचार करुनच ते थांबत नाहीत तर या कल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी स्वत: जीवाचे रान करण्याची मानसिकताही त्यांच्याकडे आहे. आय. टी. कंपन्या, निरनिराळे कारखाने अशा ठिकाणी तेथील सर्व शिस्ती सांभाळून रक्तदान-शिबिरे यशस्वीपणे पार पाडण्यामध्ये आता जनकल्याण रक्तपेढीचा संच इतका सरावला आहे की अशा बहुतेक ठिकाणांची प्रथम पसंती जनकल्याण रक्तपेढीलाच असते. पण ही स्थिती येण्यात कुलकर्णी काकांचे अत्यंत मोलाचे योगदान आहे. रक्तदान शिबिरांतून जाणारे आपले मनुष्यबळ कुशलच असले पाहिजे हा त्यांचा आग्रह अनेकांना दिशा देत असतो.
 
 
 
जनकल्याण रक्तपेढीच्या वतीने अनेक मोठमोठ्या कंपन्यांना आर्थिक सहयोगाची मागणी करणारे प्रस्ताव देण्याचे काम मी अधिकारी या नात्याने केले. यातील बऱ्याच जणांनी मोठ्या प्रमाणावर आपला हातभारही रक्तपेढीच्या कामास लावला. परंतु हा सर्व सहयोग केवळ रक्तपेढीच्या पूर्वपुण्याईवर मिळत नाही तर पूर्णत: व्यावसायिक असलेल्या या कंपन्यांकडून रक्तपेढीची आर्थिक शिस्त कसून तपासण्यात येते आणि अशा देणग्या मिळण्यासाठी ही आर्थिक शिस्तही मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरते. या आर्थिक शिस्तीमागे जर कुणी पाय रोवुन उभे असेल तर ते खांडेकर काका आहेत. जनकल्याण रक्तपेढीसारख्या मोठ्या रक्तपेढीचा अर्थविभाग निरपेक्षपणे काम करणाऱ्या एका सेवाव्रती संघकार्यकर्त्याने सांभाळला आहे हे कळल्यानंतर आजवर भल्याभल्यांनी तोंडात बोटे घातली आहेत. स्टेट बॅंक ऑफ़ इंडियामधून मॅनेजर म्हणून निवृत्त झाल्यानंतर सुमारे बारा वर्षांपासून काकांनी रक्तपेढीचा अर्थविभाग एकहाती सांभाळून बदलत्या काळाप्रमाणे रक्तपेढीच्या जमा-खर्चाला एका शिस्तीत बसविण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे. प्रत्येक खर्चासाठी लिखित संदर्भ, त्यावर अधिकाऱ्यांची संमती, रोखीच्या व्यवहारांना आळा, धनादेश-व्यवहारासाठी टोकाची भूमिका, वसुलीसाठी पाठपुरावा, दैनंदिन किरकोळ खर्चाच्या लिखित तपशीलाचा आग्रह अशा कितीतरी प्रकारच्या शिस्तींना आकार देण्याचे मोलाचे काम खांडेकरकाकांनी अत्यंत स्थिरचित्ताने इथे केले आहे. मुळातच मानवी स्वभावाला शिस्त मानवत नाही. त्यात रक्तपेढीमध्ये सत्तरेक कर्मचाऱ्यांच्या विभिन्न प्रकृती. अशा स्थितीतही शिस्तीचा सातत्याने आग्रह धरुन, प्रसंगी वाईटपणा घेऊनही खांडेकरकाकांनी रक्तपेढीची ही आर्थिक घडी नीटपणे बसवली आहे. अर्थविभागाच्या या स्वयंस्वीकृत दायित्वाबरोबरच रक्तपेढीशी संबंधित लिखाण काम, रक्तपेढीस भेट देणाऱ्या ज्येष्ठांशी यजमान या नात्याने संवाद, रक्तदाता मेळावे वगैरे कार्यक्रमांच्या व्यवस्था अशा अन्य कामांतही खांडेकरकाकांचा उस्फ़ूर्त सहभाग असतो.
 
माझा व्यक्तिगत संबंध या तिघांशीच आलेला असला तरी वेगवेगळ्या काळात बरेच सेवाव्रती रक्तपेढीमध्ये काम करुन गेले आहेत. रक्तदान शिबिरे, रक्तदाता संपर्क, पत्रलेखन, अर्थविभागातील कामे अशा विविध कामांसाठी आजवर गोऱ्हे काका, (कै. शंकरराव गोऱ्हे), वझे काका (कै. भालचंद्र वझे), आठवले काका (कै. नंदकुमार आठवले), जोशी काका (कै. विश्वेश्वर जोशी), आणि देव काका (श्री. रमेश देव) या सर्व ’काकांनी’ आपले अमूल्य असे योगदान दिलेले आहे. अगदी अलिकडच्या काळातही दीर्घकाळ रक्तपेढीच्या तांत्रिक विभागात व्यवस्थापनाचे काम केलेल्या सौ. शुभदाताई देशपांडे यांनीदेखील निवृत्तीनंतर ’सेवाव्रती’ या भूमिकेतून रक्तपेढीशी नाते कायम ठेवत ’थॅलेसेमिया प्रबोधना’सारख्या महत्वाच्या विषयाला स्वत: स वाहुन घेतले आहे. ठरलेले काम तडीला नेण्यासाठी या सर्वांनी घेतलेले कष्ट हा तर एका स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकेल.
 
सुरुवातीच्या प्रसंगात सांगितल्याप्रमाणे समाजामध्ये एकीकडे ’सापेक्ष अकार्यक्षमता’ आहे तर दुसरीकडे ’निरपेक्ष सेवाभाव’ आहे. एकीकडे उद्वेग आणि नैराश्य आहे तर दुसरीकडे समाधान आणि कृतार्थता आहे. आपली अंत: प्रेरणा आपल्याला यातील कशासाठी कौल देते, यावरच खरे म्हणजे आयुष्याची सार्थकता अवलंबुन असते. वर उल्लेख केलेल्या सेवाव्रतींनी आपल्या याच अंत:प्रेरणेच्या बळावर सेवाभावाचे हे व्रत स्वीकारले आहे. गृहस्थाश्रमाची कर्तव्ये पूर्ण करुन आपल्या अनुभवांचे संचित समाजासाठी निरपेक्षपणे खुले करणारा हा आधुनिक काळातील वानप्रस्थाश्रमच आहे आणि ’आयुष्याची सार्थकता कशात आहे’ असा प्रामाणिक प्रश्न मनात असलेल्या अनेकांसाठी तो दिशादर्शकही आहे.
- महेंद्र वाघ