काळाचा दुर्दम्य इतिहास
 महा एमटीबी  15-Mar-2018
 

ज्यावर्षी विज्ञान संशोधनाचा पितामह असलेल्या गॅलिलिओचा मृत्यू झाला, त्याच वर्षी सर न्युटनचा जन्म झाला आणि त्यानंतर म्हणजे १६४२ नंतर बरोब्बर ३०० वर्षांनी हा जन्माला आला आणि आताही ज्या दिवशी अल्बर्ट आईन्स्टाईन जन्मला त्याच दिवशी ह्याचा मृत्यू झाला. अर्थात हा केवळ योगायोग पण मुख्य म्हणजे या अशा योगायोगांवर त्याचा मुळीच विश्वास नव्हता. स्व-कर्तृत्वावर, असाध्य अशा रोगावर नियंत्रण मिळवत त्यात देवावरही विश्वास न ठेवता, प्रचंड जिद्दीने जगलेला असा हा.. तो म्हणजे सुप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ, विश्वरचनाशास्त्राचा गाढा अभ्यासक स्टीफन विल्यम हॉकिंग !


८ जानेवारी १९४२ रोजी लंडनमधील ऑक्सफर्ड शहरात फ्रॅंक आणि इझाबेला यांच्या पोटी स्टीफनचा जन्म झाला. लहानपणापासूनच जिज्ञासूवृत्ती असल्यामुळे तो पुढे आपसूकच विज्ञान शाखेकडे वळला. गणित आणि विज्ञान हे त्याचे मुख्य आवडीचे विषय. पण त्याची हुशारी ही त्याच्यापुरतीच मर्यादित होती. इतर हुशार विद्यार्थ्यांप्रमाणे तो वर्गात उठून दिसत नसे. त्यामुळे महाविद्यालयात जाईपर्यंत त्याची हुशारी आणि तो स्वतः दुर्लक्षितच राहिले. स्टीफन भविष्यात काही चांगले करू शकेल की नाही यावर त्याचे वर्गमित्र पैज लावत असत. इतर सर्व शास्त्राज्ञाप्रमाणे त्यालाही लहानपणी यंत्रांची आवड होती. प्रत्येक यंत्र उघडून त्याची रचना, ते कसे चालते हे बघणे त्याला आवडत असे. शिक्षकांना सतत कुतुहलयुक्त असे प्रश्न विचारून भंडावून सोडणे हा तर त्याचा छंदच होता. पण तरीही त्याला हवे तसे मोकळेपण या वातावरणात मिळत नव्हते. त्याने ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथे त्याला जास्तच मोकळीक मिळाली. त्यानंतर तो गेला थेट केंब्रिज विद्यापीठात ! केंब्रिज विद्यापीठ म्हणजे संशोधकांचे विद्यापीठ, जिथे न्यूटनपासून आईनस्टाईन असे संशोधक होते. महाविद्यालयीन जीवन हे खरेतर स्टीफन यांच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याला दिशा देणारे ठरले. गणितामध्ये स्टीफन हुशार होताच त्यामुळे पुढची सगळीच गणिते त्याने सहज सोडवली.


वयाची विशी ओलांडली त्यावेळी त्याच्या मुख्य शिक्षणाला आणि संशोधनाला सुरवात होणार होती. हा काळही तसा गोडगुलाबीच असतो. तो जेन नावाच्या एका मुलीच्या प्रेमात पडला. सर्वच गोष्टी आता ठीक चालू होत्या. अशातच त्याला पायात बूट घालताना, शारीरिक हालचाली करताना त्रास होऊ लागला. तेव्हा त्याला ALS म्हणजे मोटर न्यूरॉन डिसीज हा असाध्य असा रोग झाल्याचे निदान झाले. त्याचं चालणं, बोलणं, इतर शारीरिक हालचाली मंदावत गेल्या. चालताना हाती काठी घेउन चालावे लागे, नंतर काठीची जागा कुबड्यांनी घेतली आणि शेवटी व्हील चेअर साथीला आली ती कायमचीच. मोटर न्यूरॉन डिसीज या रोगावर आजही औषध उपलब्ध नाहीये, असा हा आजार ५० वर्षांपूर्वी स्टीफनला झाला. मज्जा संस्थेचे शरीरावरचे नियंत्रण सुटत जाते अश्या या आजाराच्या विचाराने स्टीफन खचत गेला. सर्व शरीरक्रिया अडखळत करायच्या आणि सतत उपचारांना सामोरे जायचे हा विचारच त्याच्यासाठी असह्य होता. यापेक्षा मृत्यूने आपल्याला लवकर गाठले तर बरे असा विचार तो करू लागला. पण कोणत्याही संशोधकामध्ये असते ती जिद्दी वृत्ती स्टीफनमध्येही प्रचंड होती. दवाखान्यात असताना त्याच्या शेजारच्या कॉटवर असलेला ल्युकेमिया झालेला एक लहान मुलगा त्याच्या ओळखीचा झाला. तो लहान मुलगा स्वतः आजारी असूनही स्वतः सोबत स्टीफनला ही उत्साही ठेवत असे. अशातच त्या मुलाचा ल्युकेमियाने बळी घेतला. यामुळे स्टीफन अस्वस्थ झाला आणि नव्या जोमाने कामाला लागला. या काळात त्याचं डॉक्टरेटचं कामही चालूच होतं.


अशातच त्याने ‘रॉजर पेनरोज’ या संशोधकाचे ‘कृष्णविवर’ या खगोलशास्त्रातील गोष्टीशी संबंधित ‘सिंग्यूलॅरिटी’ या विषयावरील व्याख्यान ऐकले आणि तो प्रचंड प्रभावित झाला. कृष्णविवर म्हणजे ताऱ्याची अंतिम अवस्था ज्यात ते बिंदुवत असते पण त्याचे वस्तुमान खूप जास्त असते, तसेच त्याचे गुरुत्वीय बल एवढे शक्तिशाली असते की त्यातून प्रकाशही सुटू शकत नाही. सिंग्यूलॅरिटी’ म्हणजे ताऱ्याचे इंधन संपत जाऊन त्याला बिंदुवत अवस्था प्राप्त होते म्हणजेच सिंग्यूलॅरिटी. यावर पेनरोज यांनी सविस्तर भाष्य केले होते. हे ऐकून स्टीफनने मित्रांमध्ये अशी कल्पना मांडली की सिंग्यूलॅरिटी हा प्रकार जर ताऱ्यांच्या संदर्भात घडू शकतो तर हेच विश्वात घडत असले तर ? विश्वसुद्धा जर घनता कमी होऊन बिंदुवत होत असेल तर ? आणि याच कल्पनेचा विस्तार करून, त्यावर शोधनिबंध लिहून त्याने डॉक्टरेट मिळवली. त्याला त्यानंतर केंब्रिजमधल्या एका कॉलेजची फेलोशिप मिळाली ज्यातून त्याला उत्पन्न मिळू लागले, संशोधनही सुरु झाले. आजाराचे निदान झाल्यावर स्टीफनने किमान डॉक्टरेट तरी पूर्ण करावी अशी वडिलांची इच्छा होती जी त्याने पूर्ण केली. पण स्टीफनला जगवले ते त्याच्यातल्या संशोधकाने. या काळात त्याचे जेन बरोबर लग्नही झालं, तिने स्टीफनची भरपूर सेवा केली, त्याची सर्व कामे ती करत असे. ज्या रॉजर पेनरोज यांच्या व्याख्यानातून स्टीफनने प्रेरणा घेतली होती त्यांच्यासोबत आता तो संशोधन करू लागला.


असेच संशोधन सुरु होतं. व्हिलचेअरच्या मदतीने स्टीफन जगत होता. जेन तर त्याच्या प्रत्येक गोष्टीत हातभार लावत होती. वर्षे सरत होती तशी त्याची व्हीलचेअरशी असलेली नाळ अजूनच घट्ट होत गेली. प्रकृती अधूनमधून ढासळत होती. १९७० ते ७४ ही वर्षे हॉकिंगलाच कलाटणी देणारी होती. या काळात त्याने कृष्णविवर या विषयावर संशोधन केले. त्यात त्याने असं मांडलं की, ’विश्व हे अणु या छोट्या एककापासुन बनले आहे हे आपण जाणतोच. त्यातल्या प्रोटोन, न्युट्रॉन, इलेक्ट्रॉन सारख्या कणांसारखे अनेक सूक्ष्म कण विश्वात असतात. या प्रत्येक कणाला स्वतःचा असा एक प्रतिकण असतो म्हणजेच एक जोडीदार असतो. या जोडीतला एक ऋण भारीत असतो तर एक धन भारीत असतो. हे दोघे एकाच वेळी निर्माण होतात आणि एकमेकांवर आदळून क्षणात नष्ट होतात. असे अनेक कण सतत निर्माण होत असतात आणि नष्ट होतात. जर हे असे कण कृष्णविवराजवळ निर्माण झाले, तर त्यातील ऋण(-) कण कृष्णविवरात खेचला जाईल आणि विरुद्ध कण म्हणजे धन (+) भारीत कण बाहेर उत्सर्जनाच्या स्वरूपात फेकला जाईल. असे अनेक ऋण कण कृष्णविवर गिळेल आणि शेवटी त्याचा स्फोट होईल.’ यात जे उत्सर्जन म्हटले आहे ते ‘हॉकिंग उत्सर्जन (hawking radiation) या नावाने प्रसिद्ध झाले. स्टीफनच्या या नव्या संशोधनाला प्रखर विरोध दर्शविला गेला. पण त्याने निश्चयपूर्वक त्यावर शोधनिबंध लिहून तो ‘नेचर’ या विज्ञान मासिकात प्रसिद्ध केला. याचे जोरदार स्वागत झाले. या संशोधनामुळे स्टीफन यांना मानाची समजली जाणारी FRS (Fellow of Royal Society) मिळाली. ज्यामुळे स्टीफन यांचं नाव विज्ञान जगतात गाजू लागलं कारण हा बहुमान त्यांना वयाच्या फक्त ३२ व्या वर्षी मिळाला होता. अमेरिकेमध्ये दिला जाणारा बहुप्रतिष्ठित असा आईनस्टाईन पुरस्कारही १९७८ साली हॉकिंगना मिळाला.


८० चे दशक हॉकिंगसाठी फार महत्वाचं ठरलं. विविध आठ विद्यापीठांमधून त्यांना डॉक्टरेट मिळाली. त्यानंतर एक महत्वाची गोष्ट स्टीफनच्या हातून झाली ती म्हणजे त्यांनी लिहिलेले ‘ब्रीफ हिस्टरी ऑफ टाईम’ हे पुस्तक ! पैशांची कमतरता म्हणून काहीतरी जास्तीची कमाई म्हणून लिहिलेले हे पुस्तक बेस्ट सेलरच ठरलेच पण श्रीमंत लोक हे पुस्तक बेस्ट सेलर म्हणून मिरवू लागले. या पुस्तकाने हॉकिंग यांना अमाप पैसा आणि प्रसिद्धी दिली. हा आनंद उपभोगत असतानाच १९८५ साली त्यांना न्युमोनिया झाल्याचे स्पष्ट झाले. यावरील उपचारांना यश येण्यासाठी डॉक्टरांना एक गोष्ट अनिच्छेने करावी लागली. यातून ते बरे झाले पण त्याची वाचा कायमची गमवावी लागली. यावर उपाय म्हणून कॅलिफोर्निया येथील वॉल्ट वोल्टाझ या व्यक्तीने ‘इक्वेलायझर’ ही संगणक प्रणाली भेट दिली. यामध्ये ३००० शब्द आणि चिन्ह आहेत. याच्या मदतीने ते बोटांचा उपयोग करून टंकलेखन करत असे आणि त्यांच्या मनातलं, व्हीलचेअरला जोडलेल्या समोरच्या संगणकावर उमटत असे.


गेली ४०-५० वर्षे हॉकिंगना साथ केली ती विज्ञान आणि व्हीलचेअर यांनी ! हॉकिंग यांनी विश्वरचनाशास्त्र, कृष्णविवर, स्ट्रिंग थेअरी, गणित अशा अनेक विषयांवर संशोधन केलं. प्रत्यक्ष आयुष्यात कडवा नास्तिक असलेला हा माणूस विज्ञानाबाबत अत्यंत श्रद्धाळू होता. याच श्रद्धेने त्यांना ७६ वर्षे जगवलं. २१ व्या वर्षी जो व्यक्ती पुढची फक्त २ वर्षे जगू शकेल असे निदान झाले होते तो पुढची ५५ वर्षे जगला आणि त्याने आधुनिक विज्ञानाला एका वेगळ्याच उंचीवर नेउन ठेवला. पाच दशके मृत्यूला दूर ठेऊन संशोधनाला वाहून घेतलेला स्टीफन हॉकिंग वयाच्या ७६ व्या वर्षी मृत्यूला सामोरा गेला आणि अखेर मुक्त झाला.


- पुष्काराज घाटगे