आमिर खानचे 'इन्स्टा'वर दणक्यात आगमन!
 महा एमटीबी  14-Mar-2018

 
सध्याच्या घडीला बॉलीवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेता म्हणून आमिर खानकडे पहिले जाते. गेल्या काही वर्षात त्याने एका पाठोपाठ सुपरहिट चित्रपट दिले. नुसताच यशस्वी कलाकार नाही तर 'परफेक्शनिस्ट' अशीही त्याची ख्याती आहे. याच आमिर खानचा आज ५३वा जन्मदिवस. या शुभदिनाचे औचित्य साधून आमिरने 'इंस्टाग्राम'वर आगमन केले आहे. विशेष म्हणजे 'इन्स्टा'वर एन्ट्री करताना त्याने आई झीनत हुसेन हिचा कोलाज फोटो सर्वप्रथम पोस्ट केला आहे. त्याच्या या निर्णयामुळे साहजिकच त्याच्याबद्दल त्याच्या चाहत्यांच्या मनात आणखी मोलाचे स्थान मिळाले असणार.
 

 
 
आज दुपारी आमिरने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता व त्यामध्ये आपण 'इन्स्टा'वर सुद्धा येत असल्याचे त्याने जाहीर केले. जोधपूरला 'ठग ऑफ हिंदुस्थान'चे चित्रीकरण सुरु असतानाही कुटुंबासोबत मला आजचा दिवस साजरा करायची संधी दिग्दर्शकांनी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असंही त्यांनी या व्हिडिओ मध्ये नमूद केले आहे.
 
 
आमिर इन्स्टावर आल्यानंतर काही तासातच त्याच्या फॉलोअर्सची संख्या झपाट्याने वाढत आहे. हे वृत्त लिहीत असताना ही संख्या ३३७ हजार इतकी होती. मोठ्या पडद्यावर विक्रम निर्माण करणारा आमिर 'इन्स्टा'वर देखील शाहरुख व अमिताभ यांना मागे टाकतो का हे पाहणं औसुक्याच ठरणार आहे.