अर्जुन आणि संजूबाबाच्या आगामी 'पानिपत' चित्रपटाचे पोस्टर बघितले का?
 महा एमटीबी  14-Mar-2018

 
आशुतोष गोवारीकर यांचा ऐतिहासिक चित्रपट बनविण्यात हातखंड आहे हे याआधी त्यांनी दाखवून दिले आहे. 'जोधा अकबर' किंवा 'मोहनजेदोडो' या चित्रपटातून त्यांनी पुन्हा एकदा इतिहासाला उजाळा दिल्याचे दिसून आले होते, अर्थात या दोन्ही चित्रपटांना यश किती मिळाले हा वेगळा विषय आहे. पण तरीदेखील आशुतोष गोवारीकर आता पुन्हा एकदा ऐतिहासिक चित्रपट घेऊन आपल्या समोर येत आहेत आणि त्या चित्रपटाचं नाव आहे 'पानिपत'. आज सोशल मीडियावरून चित्रपटाचे पहिले टिझर पोस्टर प्रदर्शित झाले.
 
 
अर्जुन कपूर, संजय दत्त आणि क्रिती सेनान हे त्रिकुट आपल्याला या चित्रपटातून दिसणार आहे. हे तिघेही प्रथमच एकत्र दिसणार आहेत आणि विशेष म्हणजे ते या चित्रपटाचा विषय ऐतिहासिक आहे. या तीनही कलाकारांचा जॉनर ऐतिहासिक चित्रपटाला कितपत साजेसा असेल याबाबत शंका आहे, पण ज्या अर्थी यांचे कास्टिंग झाले आहे त्याअर्थी दिग्दर्शकाने नक्कीच याचा विचार केला असणार.
१७६१ मध्ये मराठा व मुघल साम्राज्यात झालेल्या लढाईवर आधारित हा चित्रपट असेल. याला पानिपतची तिसरी लढाई असे संबोधले जाते. आता यामधील कोणती व्यक्तिरेखा कोण साकारणार याचा अजून खुलासा झालेला नाही. लवकरच याबाबत माहिती मिळेल. पण हा चित्रपट प्रेक्षकगृहात जाऊन बघायला रसिकांना बराच काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण पुढच्या वर्षीच्या अखेरीस म्हणजेच ६ डिसेंबर २०१९ ला 'पानिपत' प्रदर्शित होईल.